योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची शांतीकडे मार्गक्रमण करणारी छायाचित्रे

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अवस्था आनंदाच्या स्थितीतून
शांतीकडे मार्गक्रमण करणारी असल्याचे त्यांच्या छायाचित्रांच्या प्रयोगातून जाणवणे

‘रामनाथी आश्रमातील साधकांना योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या ‘अ’ आणि ‘आ’ या दोन छायाचित्रांच्या संदर्भात प्रयोग करायला सांगितला होता. त्या वेळी दोन्ही छायाचित्रांकडे पाहून जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

१. छायाचित्र ‘अ’
१ अ. छायाचित्राकडे पाहिल्यावर त्यातून पुष्कळ प्रमाणात आनंद प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले.

१ आ. प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. डॉक्टर आणि हिंदु धर्माचे तेज यांच्या रक्षणार्थ दिवसरात्र ध्यानावस्थेत तेजोपासना करत असल्याचे जाणवणे : प.पू. दादाजी यांच्यासारखी थोर विभूती सतत आपले विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांच्या आधारे ईश्‍वराचे विचार ग्रहण करून समष्टीच्या कल्याणार्थ, तसेच प.पू. डॉक्टर अन् हिंदु धर्माचे तेज यांच्या रक्षणार्थ दिवसरात्र ध्यानावस्थेत असूनही देवाज्ञा, तसेच ईश्‍वरी संकेत यांनुसार तेजोपासना करत आहेत.

१ इ. ध्यानावस्थेत असूनही आनंदावस्थेत असणे : त्यांच्यासारखी थोर विभूती ध्यानावस्थेत असूनही सतत आनंदावस्थेत असतात.

१ ई. ईश्‍वराच्या निर्गुण रूपाशी एकरूप होत असणे : ते ध्यानावस्थेच्या माध्यमातून ब्रह्मांडाशी तादात्म्य पावत आहेत. थोडक्यात ईश्‍वराच्या निर्गुण रूपाशी एकरूप होत आहेत.

१ उ. आनंदावस्था प्राप्त होणे : ते ब्रह्मांडाकडून येणार्‍या लहरी सतत देवाज्ञेच्या स्वरूपात ग्रहण करत असल्याने ध्यानावस्थेच्या स्थितीत शिवदशेत असतांना त्यांच्या अंतरंगाला आनंदावस्था प्राप्त होते. ही आनंदावस्था जीवदशेत येण्यापूर्वीच त्यांच्या मुखमंडलाच्या ठिकाणी निर्माण होते आणि प.पू. दादाजी ध्यानावस्थेतून जीवदशेत येण्यापूर्वीच त्यांच्या मुखमंडलावर आनंददायी अवस्था निर्माण होते.

१ ऊ. स्थूलदेहापासून काही अंतरापर्यंत आनंदाचे प्रक्षेपण होणे : ही आनंददायी अवस्था निर्माण झाल्यावर त्यांच्या मुखमंडलाच्या ठिकाणी निर्माण झालेले तेज आणि आनंद यांचे त्यांच्या स्थूलदेहापासून साधारणत: ८ कि.मी. अंतरापर्यंत प्रक्षेपण होते.

१ ए. नेत्रांमध्ये भाव जाणवणे : या छायाचित्रामध्ये प.पू. दादाजींच्या नेत्रांमध्ये भाव जाणवतो. ‘भावाच्या आनंददायी लहरी वातावरणात प्रक्षेपित होत असून त्या लहरी साधकजनांना चैतन्य आणि आनंद प्रदान करत आहेत’, असे जाणवले.

१ ऐ. प.पू. दादाजी वैशंपायन यांची अवस्था आनंदाच्या स्थितीतून शांतीकडे मार्गक्रमण करणारी आहे.

२. छायाचित्र ‘आ’
२ अ. तेजाची प्रभावळ जाणवणे :
प.पू. दादाजी यांच्या मुखमंडलाच्या ठिकाणी तेजाची प्रभावळ जाणवली. ही तेजाची प्रभावळ निर्गुणाकडे वाटचाल करत असल्याचे जाणवले.

२ आ. वातावरणात साधनेचे तेज प्रक्षेपित होणे : एखादी थोर विभूती आपल्या साधनेच्या बळाने अधिकाधिक व्यापक होते, त्या वेळी त्यांची आनंदावस्था नेहमीच्या तुलनेत न्यून होऊन त्या आनंदावस्थेला साधनेच्या तेजाने प्रगल्भता प्राप्त होऊन हे तेज या थोर विभूतीच्या माध्यमातून वातावरणात प्रक्षेपित होऊन या थोर विभूतीला धर्मकार्याच्या दृष्टीने निर्गुणाकडे घेऊन जाते.

२ इ. उद्दिपित झालेल्या षट्चक्रांनी ब्रह्मांडाच्या कक्षेत येऊन कार्य करणे : त्या वेळी आनंदावस्थेत उद्दिपित होणारी षट्चक्रे मनोदेह आणि कारणदेह यांच्या ठिकाणी तेथेच कार्यरत होतात. त्यांच्या कार्याच्या कक्षा ब्रह्मांडाच्या कक्षेत येऊन उद्दिपित होत असतात.

२ ई. ईश्‍वराच्या समीप येणे : ‘ध्यानावस्थेतून आपली आनंदाच्या दिशेतून होणारी वाटचाल आता ईश्‍वराच्या समीप होऊ लागली आहे’, याची या थोर विभूतीला जाणीव असते.

२ उ. देवस्वरूप होत असल्याची अनुभूती घेणे : ही थोर विभूती निर्गुणाकडे वाटचाल करत असतांना ‘परमानंदाच्या आत आत जाऊन तेथेच विलीन होत आहोत आणि आपणच देवस्वरूप होत आहोत’, याची अनुभूतीघेत असते.

२ ऊ. मुखमंडलातील तेज शक्तीच्या स्वरूपात कार्यरत होणे : त्यामुळेच प.पू. दादाजी ध्यानावस्थेच्या परमानंदाच्या, शांतीच्या अवस्थेला पोहोचले असल्याने या विभूतीच्या मुखमंडलातील तेज आता शक्तीच्या स्वरूपात कार्यरत होऊ लागले आहे.

२ ए. आनंदापेक्षा शक्ती अधिक जाणवणे : त्यांचे मुखमंडल आनंदाच्या अवस्थेपेक्षा तेजाच्या स्थितीत मार्गक्रमण करून वातावरणात शक्तीतत्त्व प्रक्षेपित करत असल्याने प.पू. दादाजी यांच्या या छायाचित्रात आनंदापेक्षा शक्ती अधिक जाणवत आहे.

२ ऐ. निर्गुण स्तरावर ईश्‍वरात विलीन होऊन स्वतःच परमात्मा असल्याची अनुभूती घेणे : ही शक्ती तेजस्वरूप असल्याने त्यांच्या मुखमंडलाच्या ठिकाणी असलेली प्रभावळही आता ब्रह्मांडपोकळीच्या आत आत विलीन होत आहे. त्यामुळे त्यांच्या मुखमंडलाच्या ठिकाणी तेजाची निर्गुण शक्ती जाणवून प.पू. दादाजी आता निर्गुण स्तरावर ईश्‍वरात, त्या परमात्म्यात विलीन होत आहेत. निर्गुण स्तरावर ते स्वतःच परमात्मा असल्याची अनुभूतीघेत आहेत. ही अनुभूतीत्यांना ध्यानावस्थेच्याही पलीकडे जाऊन प्राप्त होत आहे.

२ ओ. मुखमंडल, शरीर आणि नेत्र यांच्या ठिकाणी शक्ती जाणवणे : जेव्हा एखादी थोर विभूती ध्यानावस्थेच्या पलीकडे जाऊन ‘मी परमात्मास्वरूप किंवा सच्चिदानंदस्वरूप आहे’, याची अनुभूती घेत असते, त्या वेळी तिच्या षट्चक्रांत स्थित्यंतरे घडून येत असतात. त्यांच्या षट्चक्रांतून तेजाची वलये वातावरणात प्रक्षेपित होत असल्याने त्यांच्या मुखमंडलाच्या ठिकाणी, तसेच शरीर आणि नेत्र यांच्या ठिकाणीही शक्तीच जाणवत असते.

२ औ. छायाचित्रात शक्ती आणि मारक तत्त्व जाणवणे : आनंदाच्या स्थितीत भावावस्थेत असलेला प.पू. दादाजी यांचा तारक स्वरूपातील तोंडवळा आता मारक होत चालल्याने या छायाचित्रामध्ये शक्ती आणि मारक तत्त्व जाणवत आहे.

२ अं. नेत्रांमधून प्रक्षेपित होत असलेल्या शक्तीयुक्त तेजाने साधकांवर आध्यात्मिक उपाय होणे : या छायाचित्रातील नेत्रांमधून शक्तीयुक्त तेज वलयांकित स्वरूपात वातावरणात प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले. या तेजामुळे वातावरणात शक्ती आणि मारक तत्त्व प्रक्षेपित होत असल्याने साधकांवर आध्यात्मिक उपाय होत असल्याचे जाणवले.’

– कु. नीता अहिरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.११.२०१३)

 

प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या छायाचित्र ‘आ’कडे पाहून
रामनाथी आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात भोजनकक्षातील पटलावर प.पू. दादाजी वैशंपायन यांचे छायाचित्र असलेली २ मासिके ठेवली होती. त्या दोन्ही मासिकांवरील ‘प.पू. दादाजींच्या छायाचित्रांकडे पाहून काय वाटले’, याचा आश्रमातील १०७ साधकांनी प्रयोग केला. त्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
१. सामायिक अनुभूती

२. वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

अ. ‘प.पू. दादाजी विदेही अवस्थेत असल्याचे जाणवून शून्यावस्था जाणवली.’ – श्रीमती मेघना वाघमारे

आ. ‘त्यांचे दैवी शक्तीशी अनुसंधान चालू आहे’, असे वाटले.’ – कु. युवराज्ञी शिंदे

इ. ‘त्यांचे डोळे कुठेच पहात नाहीत’, असे वाटले.’ – श्री. केतन शहाणे

ई. ‘प.पू. दादाजी देहात नाहीत, असे वाटले.’ – श्री. रूपेश रेडकर

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment