साक्षात ईश्‍वराने सनातनला दिलेले अनमोल आणि दिव्य कृपाछत्र : योगतज्ञ दादाजी वैशंपायन !

Article also available in :

‘वर्ष २००० पासून सनातन संस्थेच्या कार्याची गती जसजशी वाढू लागली, तसतशी सनातनवर स्थुलातून आणि सूक्ष्मातून अनेक संकटे ओढवू लागली. साधकांवर अनिष्ट शक्तींची मोठमोठी आक्रमणे होऊ लागली. या सर्व कठीण परिस्थितीत अनेक संत सनातनच्या साहाय्याला धावून आले. त्यांतील एक महान तपस्वी म्हणजे योगतज्ञ दादाजी वैशंपायन ! ‘सनातन आपलीच आहे’, अशा भावाने ते सनातन संस्था आणि साधक यांचे निरपेक्षपणे रक्षण करू लागले.

१. परात्पर गुरु डॉक्टरांचे अवतारत्व ओळखून त्यांच्या
सगुण देहाचे रक्षण करण्याचे दायित्व योगतज्ञ दादाजींनी स्वतःहून स्वीकारणे, ही दैवी लीला !

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

योगतज्ञ दादाजींसारख्या महान विभूतीने परात्पर गुरु डॉक्टरांचे अवतारत्व ओळखले. द्रष्टेपणामुळे त्यांना ‘परात्पर गुरु डॉक्टर ईश्‍वरी राज्याची स्थापना करणार आहेत’, हे ज्ञात असल्याने ‘या ईश्‍वरी कार्याचे रक्षण व्हायला हवे’, या हेतूने त्यांनी गुरुदेवांवर होणार्‍या आक्रमणांच्या निवारणार्थ वेगवेगळे उपाय योजले. साधकांना साधनेकडे वळवून त्यांची आध्यात्मिक प्रगती करून घेणे आणि त्यांना मोक्षपथावर नेणे, तसेच पृथ्वीतलावर ईश्‍वरी राज्याची स्थापना करणे, यांसाठी अथक कार्य करणारे परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच्या देहाकडे मात्र साक्षीभावाने पहातात. योगतज्ञ दादाजींनी परात्पर गुरूंच्या स्थूल देहासमवेत त्यांच्या सूक्ष्मातील कार्याचे रक्षण व्हावे, याची पुरेपूर काळजी घेतली आणि आताही घेत आहेत. प्राणघातक आक्रमणांपासून परात्पर गुरूंच्या सगुण देहाचे रक्षण करण्याचे दायित्व दादाजींनी आपणहून स्वीकारणे, ही दैवी लीला पाहून मन अचंबित होऊन जाते. ते करत असलेल्या या अपार कृपेविषयी माझ्याकडे शब्दच नाहीत.

२. योगतज्ञ दादाजींची सनातनशी भेट होणे, हे ईश्‍वराचे सुंदर नियोजन !

मागे वळून पहातांना असे वाटते की, योगतज्ञ दादाजींची सनातनशी भेट होणे, हे ईश्‍वराचे सुंदर नियोजन असून दिव्य सिद्ध मंत्र आणि योगसामर्थ्य यांमुळे त्यांनी अनेक साधकांच्या प्राणांचे रक्षण केले आहे. त्यांनी सिद्ध केलेले मंत्र, ते स्वतः करत असलेली अनुष्ठाने आणि इतर अनेक दिव्य उपचार यांमुळे साधकांभोवती दिव्य संरक्षक-कवच निर्माण होऊन त्यांच्या आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण न्यून होत आहे.

३. योगसामर्थ्यामुळे ब्रह्मांडातील सूक्ष्म घडामोडींचा
अचूक वेध घेऊन सनातनवरील संकटांचे निवारण करणारे विघ्नहर्ते योगतज्ञ दादाजी !

योगतज्ञ दादाजींतील दैवी सामर्थ्यामुळे ब्रह्मांडातील सूक्ष्म घडामोडींविषयी त्यांना अचूक ज्ञान होते. त्यांनी वेळोवेळी केलेल्या अनेक भाकितांवरूनही हे सिद्ध झाले आहे. योगसामर्थ्यामुळे सनातन संस्था, तसेच परात्पर गुरु डॉक्टर यांच्या संदर्भातील सूक्ष्म घडामोडी अवगत होऊन संकटे येण्यापूर्वीच ते विघ्नहरण करतात. त्यांचे दैवी पाठबळ लाभल्यामुळेच सनातन संस्थेचे कार्य वृद्धींगत होत आहे. अशा विघ्नहर्त्या आणि वात्सल्यसिंधू दादाजींच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

४. दिव्य प्रकाश आणि चैतन्य यांचा स्रोत असलेली चैतन्यमूर्ती योगतज्ञ दादाजी !

योगतज्ञ दादाजी यांच्या दैवी सामर्थ्यामुळे अनेक साधकांना अनुभूती येतात. साधकांचे औषधोपचाराने बरे न झालेले अनेक असाध्य आजार त्यांच्या मंत्रोपचारामुळे बरे झाले आहेत. त्यांच्या योगसामर्थ्याची कल्पना करणे खरेतर अशक्य कोटीतील गोष्ट आहे. मध्यंतरी मी त्यांचे एक छायाचित्र पाहिले. ‘त्या छायाचित्रातून दिव्य प्रकाश आणि चैतन्य येत आहे’, असे जाणवत होते. ते पाहिल्यावर मी ‘सूर्यासम तेजःपुंज प्रकाशाकडे पहात आहे’, असे मला जाणवले. त्यांच्या छायाचित्रातच एवढे चैतन्य जाणवते, तर त्यांच्या सहवासात किती चैतन्य असेल ! अशा दादाजींच्या अस्तित्वाने पुष्कळ मोठे कार्य होत आहे.

सर्व साधकांच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्य
करणार्‍या कृपावत्सल योगतज्ञ दादाजींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या सगुण देहाचे रक्षण करणारे आणि त्यांच्या निर्गुण कार्यातील संकटांचे निवारण करणारे दिव्य योगी योगतज्ञ दादाजी यांच्या चरणी शरणागत भावाने शतशः नमन !’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.५.२०१९)

Leave a Comment