योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची सात्त्विक जीवनशैली आणि त्यांचे विविध गुण

Article also available in :


२६ मे २०२१ या दिवशी (वैशाख पौणिमा) योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांचे रहाणीमान, सात्त्विक जीवनशैली आणि त्यांचे आध्यात्मिक गुण यांविषयी येथे देत आहोत.

योगतज्ञ दादाजी यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

भक्तांच्या सकाम-निष्काम दोन्ही इच्छांमध्ये सारखाच रस घेणे

‘योगतज्ञ दादाजी भक्तांच्या सकाम-निष्काम दोन्ही इच्छांमध्ये सारखाच रस घेऊन त्यांना साहाय्य करायचे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले, संस्थापक, सनातन संस्था.

 

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची
सनातनच्या संतांच्या लक्षात आलेले विविध आध्यात्मिक गुण

साधकांची अतीव प्रेमाने विचारपूस करणे

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

‘योगतज्ञ दादाजी कुठेही गेले, तरी ते आपल्यातीलच एक होऊन जायचे. ‘दुसर्‍यांना आपल्या प्रेमळ दृष्टीक्षेपाने आपलेसे करणे’, हे त्यांचे एक वैशिष्ट्य होते. केव्हाही योगतज्ञ दादाजींना भेटले, तरी ते ‘सर्व साधक बरे आहेत ना ? सर्वांची साधना चांगली चालू आहे ना ?’, असे प्रश्‍न विचारून आपल्यालाच लाजवत असत. खरेतर ते सर्वच दृष्टींनी, म्हणजेच वय आणि आध्यात्मिक अधिकार यादृष्टीने मोठे असल्याने आम्हीच त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस करायला हवी. येथे तर उलटच व्हायचे, तेच साधकांच्या प्रकृतीविषयी विचारपूस करायचे.’

 

मुखमंडलावर आणि हालचालींमध्ये अहंचा लवलेशही नसणे

‘योगतज्ञ दादाजींच्या मुखमंडलावर सतत तेज जाणवते. त्यांच्या मुखमंडलावर आणि हालचालींमध्ये अहंचा लवलेशही नसतो. त्यांचे आध्यात्मिक विश्‍वातील कर्तृत्व अलौकिक असूनही त्याविषयी ते कुठेही वाच्यता करत नसत. ते मितभाषी असून सतत अंतर्मुख अवस्थेत असतात.’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.४.२०१२)

आनंदी, उत्साही आणि चैतन्यमय अवस्थेत असणे

पू. शिवाजी वटकर

‘२४.२.२००९ या दिवशी महाशिवरात्रीनिमित्त योगतज्ञ दादाजी त्यांच्या भक्तांच्या समवेत देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात आले होते. त्यांनी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत ‘सिद्ध तंत्र-मंत्र’ पूजाविधी आणि ‘तर्पयामि-मार्तण्ड-सर्पसूक्ता’चे पठण केले. तेव्हा योगतज्ञ दादाजी यांनी दिवसभर काहीच खाल्ले नव्हते. रात्री त्यांनी भक्तांना दर्शन दिले आणि सर्वांचे शंकानिरसनही केले. त्यानंतर त्यांनी उशिरा भोजन ग्रहण केले. नंतर त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये दुसर्‍या दिवशी प्रसिद्ध होणार्‍या अनुष्ठानाच्या कार्यक्रमाचे वृत्तही पडताळून (तपासून) दिले. ते दिवसभर आनंदी, उत्साही आणि चैतन्यमय अवस्थेतच होते.’ – पू. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

साधे रहाणीमान

(पू.) सौ. अश्‍विनी अतुल पवार

‘याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. योगतज्ञ दादाजी यांच्या गरजा अत्यल्प होत्या. त्यामुळे नाशिक येथील त्यांच्या वास्तूत ते एका लहानशा खोलीत रहात असत. त्या खोलीत त्यांचे साहित्यही पुष्कळ नव्हते.

आ. ते अत्यंत साधे आणि काटकसरी होते. त्यामुळे त्यांच्या पलंगावरची चादर, तसेच अंगावरील वस्त्रे अत्यंत साधी होती. त्यांचे वैयक्तिक साहित्यही साधे आणि मोजकेच होते. ते भक्त आणि साधक यांना समस्यांच्या निवारणासाठी आध्यात्मिक उपाय सांगत. त्यामुळे त्यांच्याकडेे माळा, विभूती इत्यादी आध्यात्मिक उपायांचे साहित्य, तसेच पूजेचे साहित्य अधिक प्रमाणात होते.

इ. वैयक्तिक जीवनात त्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार नसे. ते सर्व गोष्टी आनंदाने स्वीकारत असत.’

‘आता उरलो उपकारापुरता’, अशी स्थिती !

‘योगतज्ञ दादाजी यांच्याकडे येणारा गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा कुणीही असो, ते त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवत नसत. ‘तिच्या कल्याणासाठी काय करू आणि काय नको ?’, असे त्यांना झालेले असायचे. ‘आता उरलो उपकारापुरता’, अशी त्यांची स्थिती होती.’

– (पू.) सौ. अश्‍विनी अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.४.२०१८)

वैराग्य

‘योगतज्ञ दादाजी यांचे जीवन अत्यंत वैराग्यमय होते !’ – (पू.) सौ. अश्‍विनी पवार

योगतज्ञ दादाजींच्या मातृतुल्य प्रीतीमुळे ‘त्यांना सोडून जाऊ नये’, असे वाटणे

‘योगतज्ञ दादाजी यांना भेटल्यावर माझी दृष्टी पुनःपुन्हा त्यांचे मुख आणि चरण यांच्यावरच स्थिरावत असे. त्यांच्या मातृतुल्य प्रीतीमुळे त्यांना सोडून जावेसे वाटायचे नाही. संत तुकाराम महाराज यांच्या ‘कन्या सासुरासी जाये । मागें परतोनि पाहे ॥ तैसें जालें माझ्या जिवा । केव्हा भेटसी केशवा ॥’, या अभंगाप्रमाणे स्थिती होत असल्याचे मी प्रत्येक वेळी अनुभवत असे.’
– (पू.) सौ. अश्‍विनी पवार (१७.५.२०१९)

 

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे साधकांच्या लक्षात आलेले विविध गुण

योगतज्ञ दादाजी म्हणजे विविध गुणांची खाणच !  त्यांच्यातील प्रत्येक गुणाची असंख्य उदाहरणे सांगता येतील; पण त्यांतील केवळ काही उदाहरणे पुढे देत आहोत.

श्री. अतुल पवार

१. अत्यल्प आहार आणि झोप

योगतज्ञ दादाजींचा आहार अतिशय अल्प होता, तसेच त्यांची झोपही साधारणपणे केवळ २ ते ३ घंटे होती.

२. केस आणि नखे अधिक वाढू न देणे

 

अ. वयाच्या ९९ व्या वर्षीही ‘योगतज्ञ दादाजींची दाढी किंवा डोक्यावरील केस वाढले आहेत’, असे कधीही पहायला मिळत नसे.

आ. त्यांच्या हाता-पायांची नखे वाढल्यावर ते मला नखे कापण्यासाठी लगेच सांगायचे. वेळ प्रसंगी काही कारणास्तव मी किंवा अन्य साधकही उपलब्ध नसल्यास ते स्वतःच नखे कापत असत.

३. स्वावलंबन

‘योगतज्ञ दादाजी यांची सेवा करण्यासाठी कुटुंबीय आणि साधकवर्ग तत्पर असायचे; मात्र योगतज्ञ दादाजी छोट्यातील छोटी कृतीही स्वतः करत असत.

अ. वयाच्या ९७ व्या वर्षीही योगतज्ञ दादाजी स्वतःचे कपडे स्वतः धूत असत.

आ. ते स्वतःच्या डोळ्यांत स्वतःच्या हाताने औषध घालत. ते अशा कौशल्याने स्वतःच्या डोळ्यांत औषध घालत की, ते औषध किंचित्हि डोळ्यांच्या बाहेर जात नसे.

इ. वयाच्या ९८ व्या वर्षी पुष्कळ थकवा असल्याने योगतज्ञ दादाजी यांना उभे रहाता येत नसे. असे असूनही ‘२ फूट उंचीच्या पलंगावरून विशिष्ट पद्धतीने खाली उतरणे; स्वतःच्या खोलीत असलेल्या कपाटातील पूजेचे साहित्य बाहेर काढणे; पूजा झाल्यावर ते साहित्य कपाटात परत ठेवणे; कागदपत्रे, तसेच बाहेरून आलेली पत्रे, वस्तू आदी साहित्य स्वतः पहाणे आणि त्यांतील अनावश्यक गोष्टी बाजूला काढून ठेवणे अन् सर्व साहित्य आवरून पुन्हा २ फूट उंचीच्या पलंगावर स्वतः चढणे’, अशा कृती योगतज्ञ दादाजी करत. ते म्हणायचे, ‘‘आपल्याला करायला जमते, तोपर्यंत आपण करत रहावे. जेव्हा जमणार नाही, तेव्हा साहाय्य घ्यायचेच आहे.’’

ई. वयाच्या ९९ व्या वर्षीही पुष्कळ थकवा असूनही ते स्वतःच स्वतःची दाढी २ – ३ दिवसांनी करायचे. मी त्यांना म्हणायचो, ‘‘मी तुमची दाढी करतो.’’ तेव्हा ते म्हणायचे, ‘‘मला जमते, तोपर्यंत मी करीन.’’

४. व्यवस्थितपणा

अ. कपाटातील साहित्य नीट लावणे : योगतज्ञ दादाजी यांच्या खोलीत एक लहान लाकडी कपाट होते. त्यामध्ये ते त्यांचे वापरावयाचे कपडे, ‘नॅपकीन’, रुमाल, तसेच चादर इत्यादी साहित्य ठेवत असत. योगतज्ञ दादाजींनी त्या कपाटाचे कप्पे ‘स्वतःचा हात सहज पोचू शकेल’, असे करून घेतले होते. एकदा मी त्यांच्या खोलीत गेलो. त्या वेळी ते स्वतः कपाटातील साहित्य नीट लावत होते. मी त्यांना म्हटले, ‘‘मी साहित्य लावून देतो.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘नको. मी तुला दुसरी सेवा देतो, ती कर.’’ योगतज्ञ दादाजी कपड्यांच्या व्यवस्थित घड्या करून ते कपाटात ठेवत असतांना त्या कृतीशी एकरूप झाले होते.

आ. झोपतांना घ्यायच्या चादरीचा डोक्याकडे येणारा भाग नेहमी डोक्याकडेच घेता यावा, यासाठी खूण म्हणून त्या भागाकडे टोकाला गाठ मारून ठेवणे : योगतज्ञ दादाजींना झोपतांना लागणार्‍या पांघरुणाच्या किंवा चादरीच्या एका टोकाला गाठ मारलेली असायची. मी त्यांच्याकडे प्रथमतःच सेवेला गेलो असल्याने ‘ते ही गाठ कशासाठी मारतात ?’, हे मला समजत नव्हते. एकदा रात्री बिछाना घालण्याची सेवा करतांना मी याविषयी त्यांना विचारले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘चादरीची एक बाजू कधी डोक्याकडे, तर कधी पायाकडे, अशी न येता नेहमी डोक्याकडेच यायला हवी’, यासाठी खूण म्हणून मी गाठ मारतो. आपल्या पायाकडील बाजूच्या चादरीला धूळ लागलेली असते. चादरीची ती अस्वच्छ बाजू कधीही डोक्याकडे यायला नको.’’

५. नियोजनबद्धता

अ. पाहुणे किंवा प्रतिष्ठित व्यक्ती भेटायला येणार असल्यास त्या संदर्भात पूर्वनियोजन करणे

१. योगतज्ञ दादाजी ‘स्वतःची वेशभूषा व्यवस्थित आहे ना ?’, हे पहात असत.

२. ‘आसंद्या (खुर्च्या) व्यवस्थित ठेवल्या आहेत ना ? ‘दोन व्यक्तींचे बोलणे एकमेकांना व्यवस्थित ऐकायला येईल’, अशा रितीने दोन आसंद्यांमध्ये अंतर ठेवले आहे ना ? आसंद्या पुष्कळ जवळ नाहीत ना ?’, हे योगतज्ञ दादाजी पहात असत.

३. ‘भेटीच्या ठिकाणी पिण्याचे पाणी-पेला, वाचण्यासाठी मासिके, ग्रंथ इत्यादी आहेत ना ? आजूबाजूला अनावश्यक साहित्य नाही ना ? सर्व साहित्य व्यवस्थित ठेवले आहे ना ?’ इत्यादीही पहात असत.

६. काटकसरीपणा

अ. दूरचा प्रवास लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीने आणि मुंबईतील प्रवास ‘लोकल’ने करणे : योगतज्ञ दादाजी कधीही पैशांची उधळपट्टी किंवा पैशांचा अवाजवी वापर करत नसत. ते सर्वसामान्य लोकांसारखे रहायचे. त्यांना जोपर्यंत व्यवस्थित चालता-फिरता येत होते, तोपर्यंत ते दूरचा प्रवास लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीने करायचे. मुंबईत ते ‘लोकल’च्या डब्यातूनही प्रवास करायचे. प्रवासाच्या वेळी ‘लोकल’च्या डब्यात बसायला जागा मिळाली नाही, तर ते स्वतःच्या समवेत असलेल्या ‘अ‍ॅल्युमिनियम’च्या पेटीचा वापर बसण्यासाठी करायचे.’

– श्री. अतुल पवार

कु. सई कुलकर्णी

आ. लिखाणासाठी पाठकोर्‍या कागदांचा वापर करण्यास सांगणे : ‘२३.१.२०१४ या दिवशी योगतज्ञ दादाजी यांनी मला आणि सहसाधिकेला काही सूत्रे एका कागदावर लिहून देण्यास सांगितली. सूत्रे वहीतील एका कागदावर लिहून सहसाधिका तो कागद फाडू लागली. तेव्हा योगतज्ञ दादाजी म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाठकोर्‍या कागदावरच लिहिलेले आवडते ना !’’ (‘जेथे पूर्ण कोर्‍या कागदाची आवश्यकता नसेल, तेथे पाठकोरे कागद वापरावेत’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले शिकवतात.’ – संकलक) वरील प्रसंगावरून आम्हाला आमची चूक लक्षात आली.’

– कु. सई कुलकर्णी, सनातन आश्रम, मिरज, जि. सांगली. (२८.१.२०१४)

७. ‘विस्मरण होऊ नये’, यासाठी सूत्रे (मुद्दे) लिहून ठेवणे

‘कोणत्याही गोष्टीचे विस्मरण व्हायला नको; म्हणून योगतज्ञ दादाजी सर्व नोंदी कागदावर किंवा नोंदवहीत करून ठेवत. प्रसंगी विस्मरण झाल्यास त्यांच्या साधनेच्या बळावर ते त्या सर्व गोष्टी आठवू शकत असत; मात्र तसे ते करत नसत. बाहेरून आणायच्या वस्तूंची सूची (यादी) बनवून ते मला द्यायचे आणि त्या कागदावरही त्यांनी लिहिलेले असायचे, ‘हे आणाच. विसरू नका !’

८. उत्साह

योगतज्ञ दादाजी यांनी ९९ व्या वर्षात पदार्पण केलेले असल्याने त्यांचा देह वयोमानानुसार अनेक कष्ट सहन करत होता; पण त्याचा त्यांच्या मनावर कोणताही परिणाम झाला नाही. उलट ‘त्यांचा उत्साह वाढतच आहे’, असे जाणवायचे. योगतज्ञ दादाजींची प्रत्येक कृती उत्साही आणि स्फूर्तीदायी असेे. देह थकला असला, तरी ते म्हणत, ‘‘मन कुठे थकले आहे !’’

९. घरी येणार्‍या प्रत्येकाचे आनंदाने स्वागत करणे

योगतज्ञ दादाजी ‘अतिथिदेवो भव ।’ म्हणजे ‘अतिथीला देव मानावे’, या उक्तीप्रमाणे घरी येणार्‍या प्रत्येकाचे आनंदाने स्वागत करत. चहा-पाणी आणि प्रसाद दिल्याविना ते कुणालाही घरून परत पाठवत नसत. हाच वारसा योगतज्ञ दादाजींच्या कुटुंबियांनीही पुढे चालू ठेवला आहे.

१०. इतरांचा विचार करणे

योगतज्ञ दादाजी यांना कुणाला निरोप द्यायचा असेल किंवा बाहेरून काही वस्तू आणायच्या असतील, तर ते कागदावर लिहून ठेवून नंतर तो कागद माझ्याकडे द्यायचे. त्यामागे ‘मला पुन्हा ते लिहून घ्यायला लागायला नको’, असा त्यांचा विचार असे.’

– श्री. अतुल पवार

अ. ‘इतरांना त्रास होऊ नये’, याची काळजी घेणे : ‘योगतज्ञ दादाजी यांना ९३ व्या वर्षी वयोमानामुळे मिरज येथील सनातनच्या आश्रमातील ३ – ४ मजले चढता येणार नाहीत’, असे आम्हाला वाटले होते. त्यामुळे त्यांच्या आगमनाच्या वेळी त्यांना आसंदीवर (खुर्चीवर) बसवून वरच्या मजल्यावर नेण्याची व्यवस्था केली होती; मात्र योगतज्ञ दादाजी स्वतःच जिना चढले आणि नंतर उतरलेही. त्या वेळी ‘साधकांना त्रास होऊ नये; म्हणून ते असे करत आहेत’, असे मला वाटले.’

– कु. सई कुलकर्णी (२८.१.२०१४)

आ. ‘भेटायला येणारे साधक, हितचिंतक आणि पाहुणे यांचा वेळ वाया जाऊ नये’, याची काळजी घेणे : ‘योगतज्ञ दादाजी यांना साधक, हितचिंतक आणि पाहुणे भेटायला येत. ‘काही कारणास्तव स्वतःला बैठक कक्षात यायला उशीर झाला, तर येणार्‍यांचा वेळ वाया जाऊ नये आणि त्यांना वाचन करता यावे’, यासाठी योगतज्ञ दादाजी यांच्या बैठक कक्षात एका पिशवीत मासिके, ग्रंथ इत्यादी साहित्य ठेवलेले असायचे. त्या पिशवीवर योगतज्ञ दादाजी यांनी स्वतः लिहिले होते, ‘वाचनासाठी. वाचून झाल्यावर परत जागेवर ठेवा.’ पाहुण्यांना पहाण्यासाठी काही विलक्षण छायाचित्रे आणि अनुभूतींची कात्रणे बैठक कक्षाच्या एका भिंतीवर लावलेली होती.

११. उत्तम स्मरणशक्ती

साधारणतः उतारवयात स्मरणशक्ती न्यून होत जाते; पण योगतज्ञ दादाजी यांची स्मरणशक्ती वयाच्या १०० व्या वर्षी देहत्याग करीपर्यंत उत्तम होती. ते अनेक वर्षांपूर्वी ज्यांना भेटले, त्यांची नावे, तसेच ‘कुणाला काय निरोप दिला ?’ इत्यादी त्यांच्या लक्षात रहायचे.

– श्री. अतुल पवार

१२. अहं अल्प असणे

योगतज्ञ दादाजींनी साधिकेला दैनिक ‘सनातन प्रभात’मधील पान कापून घेण्यापूर्वी उत्तरदायी साधकांची अनुमती घेण्यास सांगणे

‘वर्ष २०१४ मध्ये योगतज्ञ दादाजींच्या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रतिदिन लेख प्रसिद्ध होत होते. त्या वेळी योगतज्ञ दादाजी मिरज येथील सनातन आश्रमात काही दिवस वास्तव्यासाठी होते. त्यांना प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’चे काही अंक (त्यांच्या भक्तांना भेट देण्यासाठी) दिले जात होते. एक दिवस योगतज्ञ दादाजी मला म्हणाले, ‘‘दैनिकात ज्या पानावर लेख येतात, तेवढेच पान फाडून घेता येऊ शकते का ? म्हणजे आम्हाला प्रवासात जास्त ओझे होणार नाही. आम्ही संग्रहासाठी दैनिकाचे २ अंक पूर्ण ठेवू. या संदर्भात येथील उत्तरदायी साधकांना विचार. ते ‘हो’ म्हणाले, तरच आम्ही तसे करू.’’ त्या वेळी मी योगतज्ञ दादाजींना म्हटले, ‘‘आपण म्हणाल, तसेच करूया. मी उत्तरदायी साधकांना विचारायची तशी काही आवश्यकता नाही. मी केवळ त्यांच्या कानावर घालते. त्यांची अनुमती घेत नाही.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘नको, संमती घेऊनच तसे करूया !’’ – कु. सई कुलकर्णी

Leave a Comment