रासायनिक, सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती यांतील भेद !

Article also available in :

‘झाडांची वाढ होण्यासाठी त्यांना खते घालावी लागतात आणि रोग अन् किडी यांपासून संरक्षण होण्यासाठी औषधांची फवारणी करावी लागते. झाडांसाठी आपण कोणत्या प्रकारच्या निविष्ठा (खते आणि औषधे) वापरतो यांवरून शेती रासायनिक, सेंद्रिय कि नैसर्गिक ते ठरते.

 

१. रासायनिक शेती

दुसर्‍या महायुद्धानंतर विदेशात शेतीसाठी मोठ्या प्रमाणात विषारी रसायनांचा वापर चालू झाला आणि नंतर भारतात त्याचा प्रसार झाला. रासायनिक शेतीमध्ये मानवनिर्मित विषारी रासायनिक खते आणि औषधे यांचा वापर केला जातो. यांच्या वापराचे अनेक भयंकर दुष्परिणाम पर्यावरणावर, तसेच आपल्या आरोग्यावरही होतात. विषारी रासायनिक खते आणि औषधे मोठमोठ्या कारखान्यांमध्ये बनतात. त्यामुळे आपत्काळात ती मिळणार नाहीत, तसेच आरोग्याच्या दृष्टीने ही पद्धत अयोग्य आहे.

 

२. सेंद्रिय शेती

टाकाऊ नैसर्गिक पदार्थांवर अनेक प्रक्रिया करून सेंद्रिय खते बनवली जातात. कंपोस्ट खत, गांडूळ खत, मंडईतील भाज्यांचा कचरा, शहरातील कचरा, पशूवधगृहातील टाकाऊ पदार्थ, प्राण्यांच्या हाडांचा चुरा, मासळी खत, कोंबडी खत, पेठेत मिळणारी सेंद्रिय खते ही सेंद्रिय शेतीसाठी वापरण्यात येणार्‍या निविष्ठांची (खते आणि औषधे यांची) उदाहरणे आहेत. पेठेत मिळणारे सर्वांत प्रचलित सेंद्रिय खत म्हणजे ‘स्टेरामील’. यामध्ये हाडांची भुकटी हा एक घटक असतो. ‘कंपोस्ट खत’ म्हणजे निरनिराळ्या कचर्‍याचे एकावर एक थर लावून ते कुजवून बनणारा पदार्थ.

सेंद्रिय शेतीत अशा अधिक प्रक्रिया केलेल्या निविष्ठांचा वापर होत असल्याने त्या निविष्ठा महाग असतात, तसेच त्यांमध्ये आर्सेनिक, शिसे यांसारख्या विषारी धातूंचे प्रमाण जास्त असू शकते. या धातूंचे शरिरावर दुष्परिणामही होऊ शकतात. ही पद्धतही परावलंबी असल्याने आपत्काळात उपयोगाची नाही.

रासायनिक शेतीचे भयंकर दुष्परिणाम लक्षात आल्यावर विदेशात सेंद्रिय शेती चालू झाली. त्यानंतर ही पद्धत भारतात आली. ही मूळ भारतीय पद्धत नव्हे !

 

३. नैसर्गिक शेती

भारतात पूर्वापार नैसर्गिक शेतीच होत होती. या पद्धतीत नैसर्गिक पदार्थांवर न्यूनतम प्रक्रिया केली जाते. आपत्काळात रासायनिक किंवा सेंद्रिय खते उपलब्ध होणे कठीण आहे. नैसर्गिक शेती पूर्णतः स्वावलंबी शेती असून आपत्काळासाठी, तसेच नेहमीसाठीही अत्यंत उपयुक्त आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला भाजीपाला, फळे, तसेच औषधी वनस्पती या पूर्णतः विषमुक्त आणि आरोग्यदायी असतात. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित श्री. सुभाष पाळेकर यांनी ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ या शेतीतंत्राचा मोठ्या प्रमाणात प्रसार केला. यामध्ये देशी गोमातेचे गोमय (शेण) आणि गोमूत्र, तसेच सहज उपलब्ध होणार्‍या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून जीवामृत, बीजामृत यांसारख्या निविष्ठा बनवून वापरल्या जातात.’

– एक कृषीतज्ञ, पुणे

 

लागवडीसंबंधी शंकानिरसन

प्रश्न १ : ‘माझ्या बंगल्याच्या बागेत थोडी मोकळी जागा आहे; पण बाजूला नारळ आणि रामफळाची झाडे असल्याने सावली येते. त्या जागेवर ऊन फार येत नाही. त्या जागेवर भाजी येईल का? (गच्चीवर पण भाजी लावू शकते.)’ – सौ. स्मिता माईणकर (१४.११.२०२१)

उत्तर : ‘प्रत्येक वनस्पतीची सूर्यप्रकाशाची आवश्यकता वेगवेगळी असते. बहुतेक सर्वच फळझाडे आणि भाजीपाला यांना चांगली वाढ होण्यासाठी सकाळचे न्यूनतम ४ ते ५ घंटे ऊन मिळणे आवश्यक असते. मसाल्याच्या वनस्पतींना (उदा. मिरीची वेल) प्रखर सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. त्या सावलीत किंवा अल्प तीव्रतेच्या सूर्यप्रकाशात चांगल्या होतात. त्यामुळे झाडांची सावली पडणार्‍या जागेत मसाल्यांच्या वनस्पती लावता येऊ शकतात आणि आगाशीवर (गच्चीवर) सूर्यप्रकाशात भाज्यांची लागवड करता येऊ शकते.’

प्रश्न २ : ‘आजकाल प्लास्टिकच्या कुंड्या मिळतात. त्यांमध्ये झाडे लावली, तर चालते का ?’ – सौ. स्मिता माईणकर (१४.११.२०२१)

उत्तर : ‘शक्यतो प्लास्टिकचा वापर टाळावा; मात्र जुन्या प्लास्टिकच्या कुंड्या, बरण्या किंवा जाड पिशव्या असतील, तर त्या टाकून न देता त्यांचा वापर करता येऊ शकतो. मातीच्या कुंड्या किंवा विटांचे वाफे करणे अधिक योग्य असते.’

 

सनातनच्या संकेतस्थळावर वाचा : ‘घरच्या घरी
नैसर्गिक पद्धतीने लागवड कशी करावी’, यासंदर्भात सविस्तर माहिती

https://www.sanatan.org/mr/a/82985.html

(या मार्गिकेवर थेट जाण्यासाठी खालील ‘QR कोड’‘स्कॅन’ करा !)

या मार्गिकेवर दिलेल्या विविध व्हिडिओंद्वारे विषय सुस्पष्ट होण्यास साहाय्य होईल. लागवडीसंबंधी काही शंका असल्यास त्या या मार्गिकेवर विचारता येतील.

टीप – संकेतस्थळावर प्रश्न विचारण्याची पद्धत

१. पानाच्या शेवटी ‘Leave a Comment’ असे लिहिलेल्या जागी ‘क्लिक’ करावे.

२. येथे आपला प्रश्न टंकलिखित करावा. आपले नाव आणि ईमेल पत्ता लिहावा.

३. Save my name… हा पर्याय निवडावा. असे केल्याने पुढच्या वेळी नाव आणि ईमेल पत्ता पुन्हा घालावा लागणार नाही.

४. ‘Post Comment’ असे लिहिलेल्या जागी क्लिक करावे.

असे केल्यावर हा प्रश्न संकेतस्थळाच्या प्रशासकाकडे (ॲडमिनकडे) जाईल आणि त्याने स्वीकृती दिल्यावर हा प्रश्न संकेतस्थळाच्या पानावर दिसेल.

2 thoughts on “रासायनिक, सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती यांतील भेद !”

  1. मी घरी कुंडीत गोकर्ण चे झाड लावले. काही दिवस झाड चांगले राहिले पण आता झाडाची पाने सुकल्यासारखी झाली आहेत. मी झाडाला शेणखत पण घातले होते, सूर्यप्रकाश ही भरपूर आहे तरी झाड असे का झाले कळत नाही

    Reply
    • पुरेसे पाणी द्यावे. मुळांशी मुंग्या इ नाहीत ना, हे तपासावे. ताजे शेण वापरू नये. दाहपट पाण्यात पातळ केलेले जीवामृत वापरावे.

      Reply

Leave a Comment