अनुक्रमणिका
- १. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून घरोघरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड करा !
- २. लागवडीमध्ये समस्या असल्या, तरी त्यांच्यावर उपाययोजना काढून घरोघरी लागवड करणे आवश्यक !
- ३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाने कार्तिकी एकादशीपासून सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेला आरंभ !
- ४. ३० वर्षांहून जास्त काळापासून घराच्या आगाशीमध्ये कोणत्याही रासायनिक खतांविना विषमुक्त अन्न पिकवणार्या पुणे येथील सौ. ज्योती शहा
- ५. ‘कोणत्याही रासायनिक खतांविना स्वतःच्या घरी लागवड करू शकतो’, असा आत्मविश्वास निर्माण करणारी सौ. ज्योती शहा यांची ‘शहर शेती’ !
- ६. घराच्या खिडकीतही लागवड कशी करू शकतो, याचे उदाहरण
- ७. जीवामृत बनवण्याची आणि ते वापरण्याची पद्धत
- ८. विटा आणि पालापाचोळा यांच्या साहाय्याने वाफे बनवण्याची पद्धत (वाफे म्हणजे झाडे लावण्यासाठीचे कप्पे)
- ९. मातीविना कुंडी भरण्याची किंवा रोप लावण्याची पद्धत
- १०. आधीपासूनच्या लागवडीमध्ये नैसर्गिक पद्धत कशी अंतर्भूत करावी, याचे प्रात्यक्षिक
- ११. घरच्या घरी लागवड करू शकतो अशा वनस्पतींचे बियाणे
- १२. बीजामृत बनवण्याची कृती
- १३. बीजसंस्कार (बी रुजत घालण्यापूर्वी करायचे संस्कार)
- १४. प्रत्यक्ष लागवड कशी करावी ?
- १५. लागवडीसाठी बियाणे कसे गोळा करावे ?
- १६. लागवडीविषयी सविस्तर मार्गदर्शन
- १७. लागवडीसंदर्भात काही शंका असल्यास त्या या संकेतस्थळावर अशा विचारा !
- १८. शंकानिरसनाची कार्यपद्धत
- १९. श्रीगुरूंचे आज्ञापालन म्हणून या मोहिमेत श्रद्धा आणि भाव पूर्वक सहभागी व्हा !
१. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून
घरोघरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड करा !
संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या मताप्रमाणे आपत्काळाला प्रारंभ झाला आहे आणि त्याची तीव्रता पुढील ३ ते ४ वर्षे तरी वाढतच जाणार आहे. कोरोनाच्या काळात आपण भीषण आपत्काळाची झलक अनुभवली. आपत्काळात अन्नधान्य, तयार औषधे यांचा तुटवडा असणार आहे. त्यामुळे आतापासूनच आपल्याला त्यासाठी सिद्धता करणे आवश्यक आहे.
आजकाल बाजारात मिळणारा भाजीपाला, फळे इत्यादींवर हानीकारक रसायनांची फवारणी केलेली असते. अशा भाज्या आणि फळे खाल्ल्याने प्रतिदिन विषारी पदार्थ आपल्या पोटात जात असतात. यामुळे रोग होतात. साधनेसाठी शरीर निरोगी रहाणे आवश्यक असते. हानीकारक रसायनांपासून मुक्त, म्हणजेच विषमुक्त अन्न खाण्यासाठी सध्याच्या काळात घरच्या घरी थोडातरी भाजीपाला पिकवणे आवश्यक झाले आहे.
२. लागवडीमध्ये समस्या असल्या, तरी त्यांच्यावर
उपाययोजना काढून घरोघरी लागवड करणे आवश्यक !
घराच्या बाजूला लागवड करण्यासाठी जागा उपलब्ध नसणे, लागवड करण्यासाठी वेळ नसणे, ‘लागवड कशी करतात’, हे माहित नसणे, ‘बियाणे, खते इत्यादी कुठून आणायची’, हे माहित नसणे अशा अनेक समस्यांमुळे घरच्या घरी भाजीपाला पिकवणे बहुतेकांना अशक्यच वाटते; परंतु या सर्वांवर उपाययोजना काढून आपण घरच्या घरी भाजीपाला, फळे आणि औषधी वनस्पती यांची लागवड निश्चितच करू शकतो किंबहुना भीषण आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येकाला हे करावेच लागणार आहे.
३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाने
कार्तिकी एकादशीपासून सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेला आरंभ !

सर्वत्रच्या साधकांना वरील समस्यांवर मात करून घरच्या घरी थोडीतरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड करता यावी, यासाठी कार्तिकी एकादशी (१५.११.२०२१) पासून परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाने सनातन ‘घरोघरी लागवड मोहीम’ चालू करत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने लागवड करणे शिकवले जाणार असून साधकांकडून ती करवूनही घेतली जाणार आहे.
४. ३० वर्षांहून जास्त काळापासून घराच्या आगाशीमध्ये
कोणत्याही रासायनिक खतांविना विषमुक्त अन्न पिकवणार्या पुणे येथील सौ. ज्योती शहा
पुणे येथील सौ. ज्योती शहा गेल्या ३० वर्षांपासून त्यांच्या घराच्या आगाशीमध्ये नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड करत आहेत. थोड्याशा जागेमध्ये त्यांनी १८० हून अधिक प्रकारची झाडे लावली आहेत. केवळ एका विटेच्या जाडीच्या कप्प्यांमध्ये पालापाचोळा, स्वयंपाकघरातील कचरा (सौ. शहा याला ‘कचरा’ असे न म्हणता ‘झाडांचा खाऊ’ असे संबोधतात), तसेच देशी गायीचे शेण आणि गोमूत्र यांच्यापासून बनवलेला ‘जीवामृत’ नावाचा विशिष्ट पदार्थ यांचा वापर करून त्यांनी ‘मातीविना शेती’ केली आहे. जीवामृत सोडून अन्य कोणत्याही खतांचा वापर न करता त्यांच्या घराच्या आगाशीत त्या विषमुक्त अन्न पिकवत आहेत. यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच ! त्यांनी केलेल्या लागवडीची पुढील छायाचित्रे प्रत्येकाच्या मनात ‘शहरातील जागेच्या समस्येवर मात करून कोणत्याही खताविना लागवड करणे शक्य आहे’, असा आत्मविश्वास निर्माण करतात. सौ. ज्योती शहा केवळ स्वतःच्या घरात लागवड करून थांबल्या नाहीत, तर त्यांनी आतापर्यंत असंख्य जणांना ही लागवडीची पद्धत शिकवली आहे.







५. ‘कोणत्याही रासायनिक खतांविना
स्वतःच्या घरी लागवड करू शकतो’, असा आत्मविश्वास
निर्माण करणारी सौ. ज्योती शहा यांची ‘शहर शेती’ !
व्हिडिओचा कालावधी : ३ मिनिटे
व्हिडिओचा कालावधी : ३ मिनिटे
व्हिडिओचा कालावधी : ५ मिनिटे
६. घराच्या खिडकीतही लागवड कशी करू शकतो, याचे उदाहरण
साभार : श्री. राहुल रासने, पुणे
व्हिडिओचा कालावधी : ११ मिनिटे
व्हिडिओचा सारांश : घरातील खिडक्यांमध्येसुद्धा वाफे बनवून लागवड करता येते. ४.५ इंच पालापाचोळ्याचा थर आणि त्यावर १ इंचाचा ओल्या कचर्याचा (झाडांसाठीच्या खाऊचा) थर हे प्रमाण ठेवले, तर कोणत्याही प्रकारचा दुर्गंध येत नाही. (ओल्या कचर्याचा थर १ इंचाच्या वर नसावा.) जीवामृत शिंपडल्याने कचर्याचे लवकर विघटन होते आणि लागवडीसाठीची जागा सुपीक बनते. त्यामुळे लहानशा जागेतही भाजीपाला पिकवता येतो.
७. जीवामृत बनवण्याची आणि ते वापरण्याची पद्धत
व्हिडिओचा कालावधी : ४ मिनिटे
व्हिडिओचा सारांश : नैसर्गित शेतीमध्ये जीवामृत हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. हे जीवामृत प्रत्येक आठवड्याला बनवून ताजे वापरावे.
अ. १००० वर्ग फूट (१०० फूट x १० फूट) लागवडीसाठी आवश्यक १० लिटर जीवामृत बनवण्यासाठी लागणारे घटक
१. १० लिटर पाणी
२. देशी गायीचे अर्धा ते १ किलो ताजे शेण
३. अर्धा ते १ लिटर गोमूत्र (कितीही जुने चालते. गोमूत्र अर्क वापरू नये.)
४. १ मूठ माती
५. १०० ग्रॅम नैसर्गिक किंवा रसायनविरहित गूळ
६. १०० ग्रॅम कोणत्याही कडधान्याचे (डाळीचे) पीठ
आ. जीवामृत धातूच्या भांड्यात न बनवता मातीच्या किंवा प्लास्टिकच्या भांड्यात बनवावे.
इ. जिवामृताचे मिश्रण गोणपाटाने किंवा सुती कपड्याने झाकून ठेवावे.
ई. हे मिश्रण ३ दिवस प्रतिदिन सकाळ – सायंकाळ काठीने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ढवळावे आणि चौथ्या दिवशी वापरावे.
उ. वापरतांना १० पट पाणी घालून वापरावे.
व्हिडिओचा कालावधी : ४ मिनिटे
व्हिडिओचा सारांश : प्रत्येक झाडाला जीवामृत देतांना १ मग जिवामृतामध्ये १० मग पाणी घालावे. लहान झाडांना हे जीवामृत देतांना प्रत्येकी एक कप, तर मोठ्या झाडांना प्रत्येकी १ लिटर (१ मग) या प्रमाणात द्यावे. आठवड्यातून १ दिवस सर्व झाडांना जीवामृत द्यावे.
८. विटा आणि पालापाचोळा यांच्या साहाय्याने वाफे बनवण्याची पद्धत
(वाफे म्हणजे झाडे लावण्यासाठीचे कप्पे)
व्हिडिओचा कालावधी : ६ मिनिटे
व्हिडिओचा सारांश : वाफे जास्तीतजास्त २ फूट रुंदीचे करावेत, म्हणजे त्यात काम करणे सोयीचे जाते. वाफ्यांची लांबी कितीही असली, तरी चालते. विटा रचून वाफे बनवता येतात. यांमध्ये गवत, नारळाच्या शेंड्या किंवा पालापाचोळा पसरावा. तो पायांनी दाबून घ्यावा. यावर साधारण १ इंच मातीचा थर द्यावा. (माती नसेल, तर केवळ गवत किंवा पालापाचोळा ठेवला तरी चालेल.) यानंतर १ भाग जीवामृत आणि १० भाग पाणी असे मिश्रण बनवून ते थोडे थोडे यावर शिंपडावे. या वाफ्यांवर प्रतिदिन थोडे थोडे पाणी शिंपडून हे नेहमी ओलसर रहातील, असे पहावे, तसेच आठवड्यातून एकदा जीवामृत बनवून ते या वाफ्यांवर शिंपडावे. (गवत किंवा पालापाचोळा ओलसर राहिल्याने, तसेच जीवामृत वापरल्याने तो लवकर कुजून त्याची माती बनते.)
एका विटेचे वाफे केल्याने आगाशीला जास्त वजन होत नाही. पालापाचोळ्यापासून बनणार्या सुपीक मातीमध्ये ओलावा धारण करून ठेवण्याची क्षमता जास्त असते. यामुळे झाडाला अत्यंत थोडे पाणी दिले, तरी पुरेसे होते.
९. मातीविना कुंडी भरण्याची किंवा रोप लावण्याची पद्धत
व्हिडिओचा कालावधी : ५ मिनिटे
व्हिडिओचा सारांश : कुंडीच्या तळाशी असलेल्या छिद्रावर फुटलेल्या कुंडीचा किंवा कौलाचा तुकडा ठेवावा. कुंडीमध्ये पालापाचोळा दाबून दाबून भरावा. पिशवीत लावलेले एखादे तयार रोप कुंडीत लावायचे असेल, तर त्याची पिशवी कापून टाकावी. मातीच्या गोळ्यासहित रोप कुंडीत ठेवावे. माती काढू नये. मातीचा गोळा पूर्णपणे कुंडीच्या आत रहायला हवा. तो कुंडीच्या वर यायला नको. याच्या बाजूने पालापाचोळा ठासून भरावा. सर्वांत वर एकच इंच (यापेक्षा जास्त नको) स्वयंपाकघरातील कचरा पसरावा. यावर १ कप जिवामृताचे द्रावण (१ भाग जीवामृत आणि १० भाग पाणी) शिंपडावे. (व्हिडिओमध्ये या ऐवजी घन जीवामृत वापरून दाखवले आहे.) नंतर यावर थोडेसे पाणी शिंपडावे. झाडाला पाणी देतांना थोडेसेच पाणी शिंपडावे. झाडाला अंघोळ घालू नये !
व्हिडिओचा कालावधी : ४ मिनिटे
व्हिडिओचा सारांश : आठवड्यातून एकदा कुंडीमध्ये किंवा वाफ्यामध्ये पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या यांसारखे काष्ठ आच्छादन आपण ४.५ इंचांपर्यंतही करू शकतो; मात्र ओला ‘खाऊ’ (स्वयंपाकघरातील ओला कचरा) १ इंचापेक्षा जास्त जाड भरू नये. पूर्वी घातलेले काष्ठ आच्छादन (पालापाचोळा इत्यादी) खाली बसल्यावर नवीन घालावे.
१०. आधीपासूनच्या लागवडीमध्ये नैसर्गिक पद्धत कशी अंतर्भूत करावी, याचे प्रात्यक्षिक
व्हिडिओचा कालावधी : ३ मिनिटे
व्हिडिओचा सारांश : पूर्वीपासून कुंड्यांमध्ये लावलेली झाडे असतील, तर त्या कुंड्यांतील मातीचा थोडासा वरचा थर काढून टाकावा. कुंडीतील मातीवर १ भाग जीवामृत आणि १० भाग पाणी यांचे १ कप मिश्रण शिंपडावे. कुंडीचा रिकामा भाग पालापाचोळा, वाळलेले गवत इत्यादींनी भरून घ्यावा. यावर पाणी शिंपडून गवत ओलसर ठेवावे. (पाणी केवळ शिंपडावे. झाडाला अंघोळ घातल्याप्रमाणे भरपूर पाणी घालू नये.)
११. घरच्या घरी लागवड करू शकतो अशा वनस्पतींचे बियाणे
व्हिडिओचा कालावधी : ३ मिनिटे
व्हिडिओचा सारांश : यामध्ये घरच्या घरी कोणकोणत्या प्रकारच्या भाज्यांची बियाण्याद्वारे लागवड करू शकतो, हे दाखवले आहे.
१२. बीजामृत बनवण्याची कृती
व्हिडिओचा कालावधी : ३ मिनिटे
अ. १००० वर्ग फूट (१०० फूट x १० फूट) लागवडीसाठी आवश्यक अर्धा लिटर बीजामृत बनवण्यासाठी लागणारे घटक
१. अर्धा लिटर पाणी
२. देशी गायीचे ५० ते १०० ग्रॅम ताजे शेण
३. ५० ते १०० मिलि (अर्धा ते १ कप) गोमूत्र
४. चिमूटभर माती
५. चिमूटभर खाण्याचा चुना
आ. बीजामृत धातूच्या भांड्यात न बनवता मातीच्या किंवा प्लास्टिकच्या भांड्यात बनवावे.
इ. बिजामृताचे मिश्रण गोणपाटाने किंवा सुती कपड्याने झाकून ठेवावे.
ई. बिजामृताचे मिश्रण सकाळ – सायंकाळ काठीने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ढवळावे आणि २४ घंट्यांनी वापरावे. बीजसंस्कारासाठीचे बीजामृत विरळ (डायल्यूट) करू नये.
उ. वापरून शिल्लक राहिलेले बीजामृत १० पट पाण्यात मिसळून झाडांच्या मुळांशी किंवा वाफ्यांमध्ये लहान झाडांना १ कप, तर मोठ्या झाडांना १ लिटर या प्रमाणात शिंपडावे.
१३. बीजसंस्कार (बी रुजत घालण्यापूर्वी करायचे संस्कार)
व्हिडिओचा कालावधी : ३ मिनिटे
व्हिडिओचा सारांश : बी रुजत घालतांना ते बिजामृतामध्ये बुडवून घालावे. याला बीजसंस्कार म्हणतात. असे केल्याने बुरशीजन्य रोगामुळे बियाणे वाया जाण्याची शक्यता न्यून होते. पीक जास्त येते. पालापाचोळा इत्यादी कुजून जी अत्यंत सुपीक माती तयार होते, तिला इंग्रजीत ‘ह्यूमस’ म्हणतात. हा ‘ह्यूमस’ अत्यंत भुसभुशीत असतो आणि यामध्ये बोटाने सहजपणे टोकरून बी लावता येते. आपण वाफे बनवतो तेव्हा काही रोपे आपोआप उगवतात. यांची पुनर्लागवडही बिजामृतात बुडवून करावी. (या व्हिडिओमध्ये चेरी टोमॅटोच्या रोपाची पुनर्लागवड दाखवली आहे.) राजमा, मूग इत्यादी कडधान्याच्या बिया वाफ्यांमध्ये लावल्यास हवेतील नत्रवायू (नायट्रोजन) मातीत मिसळण्यासाठी यांचा उपयोग होतो. झाडांच्या वाढीसाठी मातीमध्ये पुरेसे नत्र (नायट्रोजन) असणे आवश्यक असते.
१४. प्रत्यक्ष लागवड कशी करावी ?
व्हिडिओचा कालावधी : ३ मिनिटे
व्हिडिओचा सारांश : यामध्ये प्रत्यक्ष लागवड कशी करावी, ते दाखवले आहे. आले, बटाटा, कांदा यांसारखे कंद बिजामृतात बुडवून ‘ह्यूमस’मध्ये लावावेत.
१५. लागवडीसाठी बियाणे कसे गोळा करावे ?
व्हिडिओचा कालावधी : ५ मिनिटे
व्हिडिओचा सारांश : रानतुळशीच्या मंजिर्यांमध्ये तिचे बी असते. परागीभवनासाठी (पॉलिनेशनसाठी) रानतुळशीचे साहाय्य होते. रानतुळशीच्या मंजिर्यांकडे मधमाश्या आकृष्ट होतात. मधमाश्यांमुळे आजूबाजूच्या झाडांमध्ये परागीभवन (पॉलिनेशन) होते. परागीभवन जेवढे जास्त तेवढे उत्पन्न जास्त ! रानतुळस किंवा तुळस यांच्या मंजिर्या काढून हातावर कुस्कराव्यात आणि हातावर हळूवार फुंकर मारावी. असे केल्याने फोलपटे दूर होऊन बी वेगळे निघते. घरी लागवड केलेले गाजर, पालक, मका, लाल माठ, हिरवा माठ इत्यादी झाडांचे बी आपल्याला मिळवता येते.
१६. लागवडीविषयी सविस्तर मार्गदर्शन
व्हिडिओचा कालावधी : २ तास
व्हिडिओचा सारांश
पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ या नैसर्गिक शेतीच्या तंत्राचा पुष्कळ प्रसार केला. या तंत्राची ४ मूलभूत तत्त्वे अशी आहेत.
अ. जीवामृत
आ. बीजामृत
इ. वाफसा
ई. आच्छादन
या मूलभूत तत्त्वांचे सविस्तर विवेचन या व्हिडिओत केले आहे.
१७. लागवडीसंदर्भात काही शंका असल्यास त्या या संकेतस्थळावर अशा विचारा !
अ. पानाच्या शेवटी ‘Leave a Comment’ असे लिहिलेल्या जागी क्लिक करावे.
आ. येथे आपला प्रश्न टंकलिखित करावा. आपले नाव आणि ईमेल पत्ता लिहावा.
इ. Save my name & … हा पर्याय निवडावा. असे केल्याने पुढच्या वेळी नाव आणि ईमेल पुन्हा घालावा लागणार नाही.
ई. ‘Post Comment’ असे लिहिलेल्या जागी क्लिक करावे.
१८. शंकानिरसनाची कार्यपद्धत
या मोहिमेमध्ये ठराविक दिवसांनी साधकांचे शंकानिरसन करण्यासाठी ऑनलाईन अभ्यासवर्ग घेतले जातील. या अभ्यासवर्गांमध्ये संकेतस्थळावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील. सर्वांसाठी उपयुक्त असलेल्या प्रश्नांची उत्तरे सनातन प्रभातमधूनही देण्यात येतील.
१९. श्रीगुरूंचे आज्ञापालन म्हणून या मोहिमेत श्रद्धा आणि भाव पूर्वक सहभागी व्हा !
श्रीगुरुचरित्राच्या चाळीसाव्या अध्यायात एक प्रसंग आहे. नरहरि नावाच्या ब्राह्मणाला कोड झालेले असते. श्रीगुरु नृसिंहसरस्वती त्याला ४ वर्षे वाळलेली एक औदुंबराची काठी देऊन दिवसातून ३ वेळा त्या काठीला पाणी घालायला सांगतात. लोक चेष्टामस्करी करत असूनसुद्धा भक्त नरहरि गुरूंचे आज्ञापालन म्हणून ७ दिवस मनात कोणताही विकल्प न आणता त्या वाळलेल्या काठीला श्रद्धेने पाणी घालतो. त्या वेळी श्रीगुरु त्याच्यावर प्रसन्न होऊन स्वतःच्या कमंडलूतील तीर्थ त्या काठीवर शिंपडतात. याबरोबर त्या वाळलेल्या फांदीला पालवी फुटते आणि नरहरीचे कोडही बरे होते. भक्त नरहरीप्रमाणे आपणही श्रद्धा आणि भाव पूर्वक या मोहिमेत सहभागी होऊया. ‘श्रीगुरूच आपल्याकडून ही सेवा करवून घेत आहेत’, असा भाव ठेवूया !
माझ्या बंगल्याच्या बागेत थोडी मोकळी जागा आहे पण बाजूला नारळ, रामफळाची झाडे असल्याने सावली येते. त्या जागेवर ऊन फार येत नाही. त्या जागेवर भाजी येईल का?
गच्चीवर पण भाजी लावू शकते. हल्ली प्लॅस्टिक च्या कुंड्या मिळतात त्यामध्ये लावली तर चालते का?
प्रत्येक वनस्पतीची सूर्यप्रकाशाची आवश्यकता वेगवेगळी असते. बहुतेक सर्वच फळझाडे आणि भाजीपाला यांना चांगली वाढ होण्यासाठी सकाळचे न्यूनतम ४ ते ५ घंटे ऊन मिळणे आवश्यक असते. मसाल्याच्या वनस्पतींना (उदा. मिरीची वेल) प्रखर सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. त्या सावलीत किंवा अल्प तीव्रतेच्या सूर्यप्रकाशात चांगल्या होतात. त्यामुळे झाडांची सावली पडणार्या जागेत मसाल्यांच्या वनस्पती लावता येऊ शकतात आणि आगाशीवर (गच्चीवर) सूर्यप्रकाशात भाज्यांची लागवड करता येऊ शकते.
शक्यतो प्लास्टिकचा वापर टाळावा; मात्र जुन्या प्लास्टिकच्या कुंड्या, बरण्या किंवा जाड पिशव्या असतील, तर त्या टाकून न देता त्यांचा वापर करता येऊ शकतो. मातीच्या कुंड्या किंवा विटांचे वाफे करणे अधिक योग्य असते.
खूप छान आहे पालापाचोळा गोळा करून त्याचा उपयोग कसा करायचा हे शिकायला मिळाले कोटी कोटी कृतज्ञता
खूप छान आहे पालापाचोळा गोळा करून त्याचा उपयोग कसा करायचा हे शिकायला मिळाले कोटी कोटी कृतज्ञता
It is informative, productive & useful for all to get organic food & also saving monthly expenses.
केंद्र : नेरुळ, मुंबई
प्रश्न
1) झाडाच्या पानावर किड लागते त्यावर काय उपाय करायचा ?
2) तुळशी सारख्या रोपांच्या कुंड्या वर उन कितपत यायला हवे ?
3) शिळं अन्न मातीत मिसळू शकतो का ?
4) एकदा बनवलेले जिवामृत कधी पर्यंत वापरु शकतो ?
१. याचे उत्तर यापूर्वी दिले आहे.
२. दिवसभर ऊन लागले तरी चालू शकते. न्यूनतम सकाळचे ३ – ४ घंटे ऊन मिळावे.
३. हो
४. ८ ते १० दिवस (परंतु ३ ते ४ दिवसांत संपवलेले जास्त चांगले.)
केंद्र – भांडुप, मुंबई
प्रश्न १. रोप वाढल्यानंतर अधून मधून माती वरखाली करावी असे म्हंटले आहे पण कुंडीतील माती वरखाली करताना मुळाना हात लागतो.किंवा इजा पोहचू शकते आणि रोप मरू शकते.तर कुंडीतील माती वर खाली करताना रोपाची कशी काळजी घ्यावी?
प्रश्न २.घरातील उरलेले अन्न,कांद्याची पात,फळांची साले हा झाडांचा खाऊ रोपांमध्ये कंपोस्ट खत न बनवता. असाच टाकू शकतो का..खरकटे स्वच्छ धुवून घेतले तसेच सालांचे बारीक तुकडे करून टाकले तर चालेल का?
१. मुळांना दुखापत होईल एवढी माती वरखाली करू नये. मुळांजवळील मातीत हवा खेळती राहील अशाप्रकारे सैल करावी.
२. घरातील उरलेले अन्न,कांद्याची पात,फळांची साले हा झाडांचा खाऊ रोपांमध्ये कंपोस्ट खत न बनवता असाच टाकू शकतो; परंतु याचा थर १ इंचापेक्षा जास्त नसावा. हा थर कुजल्यावर त्याच्या वर नंतर पुन्हा एक इंचाचा थर टाकू शकतो. यावर नियमितपणे (आठवड्यातून एकदा) दहा पट पाणी घातलेले जीवामृत शिंपडल्यास कचऱ्याचे लवकर विघटन होते आणि दुर्गंधही येत नाही.
घन जीवामृत कसे करायचे?
ते जास्त दिवस टिकते का?
लिक्वीड ऐवजी घन जीवामृत वापरले तर चालेल का?
घन जीवामृत बनवण्याची पद्धत : https://youtu.be/BZXOyTWXcp0
घन जीवामृत साधारण वर्षभर टिकते.
घन जीवामृत वापरू शकतो; पण शक्य तेथे ताजे जीवामृत वापरावे.
केंद्र – बोरिवली, मुंबई
प्रश्न : पान फुटीचे रोप ग्यालरीत ठेवले तेव्हा छान हिरवेगार होते परंतु ते गच्चीवर ठेवले तेव्हा सुकून गेले पानांच्या आत कीड पडली अशा वेळी काय उपाययोजना करावी
काही वेळा कुंडीतील झाडांना मुंग्या, अळ्या, कोळी यांसारखे कीटक उपद्रव करतात. हे कीटक झाडाची पाने खाऊन टाकतात किंवा ती खराब करतात. मोठ्या अळ्या असल्यास त्या वेचून काढून माराव्यात. झाडावरील किडींना प्रतिबंध करण्यासाठी पुढीलपैकी कोणतेही घरगुती उपाय करून पहावेत.
१. दोन चमचे तंबाखू पाऊण तांब्या पाण्यामध्ये सकाळी भिजत घालून दुपारी तो त्याच पाण्यात उकळून त्याचा अर्धा तांब्या काढा करावा. हा काढा थंड झाल्यावर फवार्याच्या बाटलीत भरून सायंकाळच्या वेळेस कुंडीतील झाडावर सर्व बाजूंनी फवारावा. बहुतेक किडी सायंकाळच्या वेळेस येत असल्याने या वेळेत फवारणी करणे इष्ट ठरते. किडी पानांच्या खाली लपलेल्या असल्याने पानांच्या खालूनही फवारणी करावी.
२. तंबाखूप्रमाणेच कडुनिंबाचाही काढा करून त्याची फवारणी करता येते.
३. काही वेळा नुसत्या कापराच्या अथवा हिंगाच्या पाण्यानेही मुंग्या – किडी पळून जातात. कापराचे किंवा हिंगाचे पाणी करतांना हिंग किंवा कापूर पुरेशा पाण्यामध्ये उग्र वास येईल एवढ्या प्रमाणात घालावा.’
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’)
केंद्र – जळगाव
आमच्या कडे नागवेल आहे, त्याची काही रोप तयार करून आम्ही केंद्रात काही साधकांना दिली होती, त्यावेळी शेण मिश्रित मातीत असलेले, तसेच खूप उन्हाच्या जागेवर असलेले रोप जळून गेली. नागवेलीला खत आणि प्रखर प्रकाश पडला तर ते जळून जातात का? या वेलीला किती उन्हाची गरज असते
नागवेलीला जास्त ऊन चालत नाही, नागवेल कमी सूर्यप्रकाशात म्हणजे नारळ किंवा तत्सम झाडांखाली चांगली वाढते. नागवेलीसाठी मातीतील पाण्याचा चांगला निचरा होणे आवश्यक असते, पाणी साठून राहायला नको.
केंद्र :- बोईसर, मुंबई
मला एक प्रश्न आहे झाडांना फंगस लागते व ते झाड सुकतात त्यासाठी काय करावे.
झाडांमध्ये मुंग्या येतात तर काय करावे.
१. झाडे कोणती आहेत ? लागवडीनंतर किती दिवसांनी असे होते, ते कळले, तर योग्य उपाय सांगता येतील.
२. मुंग्या कोणत्या झाडावर येतात, किती वयाची झाल्यावर येतात, ते कळवावे.
केंद्र : भांडुप, मुंबई
प्रश्न : आमच्या चाळीत घरासमोर दिवसभर अजिबात ऊन येत नाही, चाळीच्या टोकाला शेवटच्या घराजवळ फक्त ऊन येते, त्यामुळे लावलेली रोपे तीन ते चार दिवसात मरून जातात. उपाय काय करावे?
वनस्पतींच्या वाढीसाठी न्यूनतम ३ – ४ घंटे ऊन मिळणे आवश्यक आहे. उन्हाला पर्याय नाही.
केंद्र – बोईसर, मुंबई
१. तुळशी पानावर काळे ढाग पडले आहे काय उपाय करावे?
२. माझ्याकडे तुळस राहतं नाही आनली की१५ दिवसात सुखते त्यावर काय उपाय करू शकतो ?
तुळशीच्या बहुतेक समस्या जास्त पाणी घातल्याने निर्माण होतात. यामुळे आवश्यक तेवढेच पाणी तुळशीच्या रोपाला द्यावे. अतिरीक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी झाड ज्यामध्ये लावले आहे त्याला खालून भोके असणे आवश्यक आहे.
झाडाला ९० टक्के पाणी हवेतून मिळत असते. झाडाचे शेंडे मलूल झाले, तर ‘झाडाला पाणी हवे आहे’, असे समजावे आणि झाडाच्या मुळांशी ओलावा राहील एवढेच पाणी झाडाला द्यावे. पाण्याचा केवळ शिडकावा करावा. झाडाला अंघोळ घातल्याप्रमाणे भरपूर पाणी घालू नये. झाडाला पाणी घातल्यावर ते ज्या सुपीक मातीमध्ये लावलेले आहे, त्या सुपीक मातीचा, म्हणजेच ह्यूमसचा गोळा (लाडू) बांधला गेला, तर अजून पाणी देण्याची आवश्यकता नाही. गोळा बांधला गेला नाही, तर थोडे अजून पाणी द्यावे. पाण्याचा सुयोग्य वापर होण्यासाठी ह्यूमस चांगले तयार व्हायला हवे.
तुळशीला बहुतेक वेळेस केवळ पाणीच घातले जाते. ती एक वनस्पती आहे आणि वनस्पतींना खते आणि औषधांचीही आवश्यकता असते. त्यामुळे तुळशीला कधी मूठभर कुजलेले शेणखत किंवा शेणाच्या गोवरीचा भुगा, मासातून एकदा गोमूत्र किंवा जीवामृत (दहा पट पाणी घालून) मुळांजवळ घालावे किंवा फवारणी करावी. दहा पट पाणी घातलेल्या आंबट ताकाचीही फवारणी करावी.
केंद्र- मिरारोड
केंद्रातील काही साधक भाड्याने राहात आहे
त्यामुळे झाडे लावायची अडचण आहे असे सांगतात तर त्यांना काय सांगायचे?
शक्यतो घराचे काही नुकसान होणार नाही, तसेच शेजारच्यांना किंवा इमारतीतील कोणाला त्रास होणार नाही, अशा पद्धतीने लागवड केली, तर शक्यतो कोणी विरोध करत नाही. सोसायटीच्या सार्वजनिक जागेत पुढाकार घेऊन लागवड केल्यास उत्तम प्रतिसादही मिळु शकेल. आपला इतरांशी परिचय वाढेल, अशाप्रकारे समष्टी सेवाही होऊ शकेल. स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने ठरवावे.
केंद्र – मुलुंड, मुंबई
आमच्या कडे पण झाडाला बुरशी आली आहे. हळदीचे झाड वाढत आहे पण खालची पाने पिवळी झाली आहेत. गुळवेल 5 महिने झाले पाने येत नाहीत. झाड जिवंत आहे.
अ. झाडांवरील बुरशीसाठी गोमूत्र, जीवामृत, आंबट ताक यांपैकी कोणत्याही पदार्थात १० पट पाणी घालून फवारणी करावी.
आ. हळदीची रोपे ४ मासांपेक्षा मोठी असतील, तर जुनी पाने पिवळी होणे, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. लवकरच पूर्ण रोपही पिवळे होऊ शकते.
इ. गुळवेलीला पावसाच्या दिवसांतच पाने असतात. नंतर पाने न्यून होतात. गुळवेल जिवंत असेल, तर तिला पाने फुटतील. जिवामृताची आणि आंबट ताकाची फवारणी आठवड्यातून एकदा करावी.
केंद्र – गिरगाव, मुंबई
प्रश्न. मी पुढील झाडे कुंडीमध्ये लावली आहेत जास्वंद आवळा डाळिंब शमी
स्थलांतरित होताना जर झाडे मोठी झाली असतील तर कसे करायचे
असा विचार मनात येतो
झाडांची नियमित छाटणी केल्यास त्यांचा आकार लहान ठेवता येतो. वृक्षवर्गीय झाडे, उदा. आवळा, डाळिंब आणि शमी ३ वर्षांपर्यंत कुंड्यांमध्ये ठेवता येतात; परंतु नंतर त्यांची जमिनीत पुनर्लागवड करावी लागते. सदनिकेत किंवा आगाशीत लागवड करतांना शक्यतो फार मोठी वाढणारी झाडे लावू नयेत. स्थलांतरित होतांना मोठी झाडे झाडांची आवड असलेल्या स्थानिक मित्रांना देता येऊ शकतात.
बीजामृत नसेल तर बीजसंस्कार साठी पर्यायी काय आहे का ?
जीवामृत किंवा देशी गाईचे ताजे शेण व काही दिवस जुने असलेले गोमुत्र (बिजामृताच्या प्रमाणात) पाण्यात मिसळुन वापरावे.
केंद्र – जळगाव
मी अडुळसा ही वनस्पती लावून साधारण ८ मास पूर्ण झाले आहेत, पण अन्य वनस्पती प्रमाणे त्याची विशेष वाढ होत नाही, त्याचे काय कारण असू शकते (ते १ फूट इतकेच उंचीचे आहे)
अडुळसा ही सावकाश वाढणारीच वनस्पती आहे; पण तरीही पाण्याचा निचरा होणे, नियमित जीवामृत घालणे आणि चांगला सूर्यप्रकाश मिळणे यांकडे लक्ष द्यावे. झाड छोट्या कुंडीत किंवा पिशवीत असेल, तर मोठ्या कुंडीत किंवा जमिनीत लावावे.
जीवामृता मध्ये गुळ आणि पीठ का घालावे समजले नाही . आणि बनविलेले जीवामृत काजूच्या रोपांना घालू शकतो का ?
दुधात दह्याचे विरजण टाकले की, दुधाचे दही बनते. दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचे असंख्य सूक्ष्म जिवाणू असतात; पण हे जिवाणू दुधात नसतात. थोडक्यात दही हे या जिवाणूंचे विरजण (कल्चर) असते. ते दुधात टाकल्यावर दुधामध्ये जिवाणूंची वाढ होऊन दही बनते. दह्याप्रमाणे जीवामृत हेसुद्धा जिवाणूंचे एक विरजण (कल्चर) आहे. देशी गायीचे शेण, गोमूत्र आणि माती यांमध्ये असलेले झाडांना उपयुक्त असलेले जिवाणू गूळ आणि डाळीचे पीठ यांच्या साहाय्याने झपाट्याने वाढतात. जिवाणूंच्या शरिरासाठी प्रथिनांची (प्रोटीनची) आवश्यकता असते. जीवामृत बनवण्यासाठी जे डाळीचे पीठ वापरण्यात येते, त्यातून ही आवश्यकता पूर्ण होते. या प्रक्रियेसाठी जिवाणूंना आवश्यक असलेली ऊर्जा गुळातून मिळते.
काजूच्या झाडांना जीवामृत घालू शकतो.
खूप छान माहिती आहे. अगदी आनंद देणारे ज्ञान आहे. सारखे पहावे वाटतात.
माझ्याकडे मोकळी जमीन नाही आहे व उन सुद्धा येत नाही अश्या वेळी सावलीत वाढणारी काही झाडे असतील तर सांगू शकता का
https://www.sanatan.org/mr/a/84816.html या लेखात दिल्याप्रमाणे काही झाडे लावता येऊ शकतील.
नमस्कार, मला गावरान तुळशी चे रोप कोठून मिळेल?
त्या सौ.शहा यांचा फोन नंबर मिळेल का?
मी कापडी बॅग्स पेक्षा जर पोती ची बॅग वापरू शकते का ?
जुने धान्या च्या पोती ची बॅग शिवून वापरली तर चालेल का?
4 फूट , 1फूट अशी खिडकित जागा आहे …मोठी झाडे लावता येणार का?
तुळशीच्या मंजिऱ्या हातावर चोळल्यास त्यातून बी निघते. ते दोन्ही हातांमध्ये जरासे चुरडून रुजत घातल्यास तुळशीची रोपे येतील.
पोती किंवा गोणी लागवडीसाठी वापरू शकतो. केवळ पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशी छिद्रे असावीत.
खिडकीत मोठी झाडे लावता येणे शक्य नाही; पण भाजीपाला लावू शकतो.
Namaskar
Gharatil tulshichi pane pandhrat hotat, te kase talta yeil?
तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत आहे ना, हे पहावे. आवश्यक तेवढेच पाणी द्यावे. अतिरिक्त पाणी देऊ नये. तुळशीच्या मुळांशी मुंग्या नाहीत ना, याची निश्चिती करावी. मुंग्या असल्यास त्या जाण्यासाठी खोडाच्या बुंध्याशी कापराची वडी ठेवावी.
शंका :
१. उपरोक्त सूचनेनुसार गच्ची वर गवत घालून १ वीट उंचीचा वाफा तयार केला आहे व त्यावर थोड्या प्रमाणात माती देखील घातली आहे. आता हा वाफा ‘बीजारोपण’ करण्यासाठी साधारण किती दिवसात तयार होतो ?
२. गच्चीवरील वाफा १ वीट खोल असल्याने, भाज्या, औषधी वनस्पती इत्यादी लावल्यावर त्याची मूळ जमिनीच्या भेगांमध्ये जाऊन सिलिंगला हानी पोचवण्याची शक्यता आहे का ?
१. गवत, माती किती घातली आहे आणि जिवामृताचा वापर किती होतो, यावर हे सर्व अवलंबून आहे. एक ते दीड महिन्यात ज्यावेळेस गवताचे पूर्ण विघटन होऊन मातीसारखे (ह्युमस) दिसू लागेल, त्यावेळेस ‘बीजारोपण’ (लागवड) करू शकतो. आपण ओला कचरा घातला असेल, तर त्यातून काही वेळा घरातील भाज्यांचे बी या वाफ्यांमध्ये आपोआप पडून उगवते. असे झाले आणि पालपाचोळ्याची माती झाली की, यात आपण लागवड करू शकतो.
2. भाज्यांची मुळे खूप खोल जात नाहीत तसेच भुसभुशीत माती सोडुन सिमेंटमध्ये शक्यतो जाणार नाहीत. त्यामुळे काळजी नसावी.
नमस्कार मला असा प्रश्न आहे की छोट्या जागेत किंवा कुंडीत आमच्या कडे बाल्कनी आहे तर आम्ही काही झाडं उगवली तर आपण घेवडा किंवा भेंडी गवार हे उगवू शकतो का कुंडीत त्याची मुळे मोठी असतात तर ते कुंडीत पुरत नाहीत … हे भाजी पाले उगवू शकतो का.
कुंडीत घेवडा, भेंडी, गवार तसेच टोमॅटो, मिरची, कोबी, तसेच वेलीही लावता येतील. कुंडीच्या आकारावरून काय आणि किती लावावे, हे ठरवावे. साधारणपणे दीड ते दोन फूट खोलीच्या कुंडीत या भाज्या चांगल्या येतात. एका कुंडीत एक किंवा दोनच झाडे ठेवावीत.
ह्युमस बियाणं लावण्यासाठी कधी तयार होतो ? ह्युमस तयार होण्यासाठी चा कालावधी किती आहे
दीड ते दोन महिने
ताई माझ्याकडे जागा लहान आहे. त्याची नीट मांडणी करून भाज्या लावायचा प्रयत्न करते.
आमची शेती आहे, शेतीमध्ये याचप्रकारे जीवामृत, बीजामृत वापरु शकतो का ? किंवा उपाय सांगावा
याचप्रकारे जीवामृत, बीजामृत वापरु शकतो.
मी पुणे शहरात राहते. इथे जवळपास ताजे देशी गायीचे शेण मिळणे अवघड आहे. तर घन जीवामृत नेहमी साठी वापरले तर चालेल का तसेच घन जीवामृत कसे तयार करावे
जीवामृत न मिळाल्यास घन जीवामृत वापरता येते; परंतु जीवामृत बनवून वापरलेले कधीही चांगले. आपल्या शहरात असलेल्या गोशाळेचा शोध घ्यावा आणि तेथून गोमय आणि गोमूत्र आणून नियमित जीवामृत बनवावे.
घनजीवामृत कसे बनवावे हे या मार्गिकेवर दिले आहे – https://youtu.be/BZXOyTWXcp0
2 ते 3 वर्ष जुने भाजीपाला बियाणे वापरू शकतो का?
आमच्याकडील 3ते 4 वर्षाचे चाफ्याचे कलम बऱ्याच प्रमाणात वाढले आहे पण फुले येत नाहीत. काय करू शकतो
भाजी बियाणे लावल्यानंतर व रोप्याना ताजे शेण देऊ शकतो का
जुन्या बियाण्याची रुजून येण्याची शक्यता अल्प असते. तरी टाकून देण्यापेक्षा वापरून पाहू शकतो.
योग्य पद्धतीने छाटणी करावी. सूर्यप्रकाश पुरेसा आहे ना, हे पाहावे. दाहपट पाण्यात पातळ केलेले जीवामृत वापरावे.
ताजे शेण वापरू नये. दाहपट पाण्यात पातळ केलेले जीवामृत वापरावे.