थायलंडची प्राचीन नगरी – अयुद्धया !

Article also available in :

‘प्राचीन काळी ज्याला ‘श्याम देश’ म्हटले गेले, तो भूभाग म्हणजे आताचा थायलंड देश. या भूभागावर आतापर्यंत अनेक हिंदू आणि बौद्ध राजांनी राज्य केले. येथील संस्कृती हिंदु धर्मावर आधारित होती; पण कालांतराने बौद्धांच्या सांस्कृतिक आक्रमणामुळे या ठिकाणी बौद्ध धर्म प्रचलित झाला. येथील राजांना प्रभु श्रीरामाचे रूप मानले गेले आणि त्यांच्या राजधानीला अयोध्येचा दर्जा दिला गेला. रामायणाला येथे राष्ट्रीय साहित्य मानले जाते. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि ४ विद्यार्थी-साधकांनी ३ ते ७ एप्रिल २०१८ या कालावधीत थायलंड देशाचा दौरा केला. आज आपण थायलंडची प्राचीन नगरी ‘अयुद्धया’ विषयी जाणून घेणार आहोत.

१. द्वारावती साम्राज्य (६ वे ते ११ वे शतक)

श्याम देशातील राजाने देशाला उत्तुंग स्थानाप्रत नेलेले असल्याने हा देश ‘सुवर्णभूमी’ या नावाने ओळखला जाणे

श्याम देशात ६ व्या शतकापासून ११ व्या शतकापर्यंत द्वारावती साम्राज्य होते. भारतातील ‘द्वारका’ या श्रीकृष्णाच्या नगरीवरून त्या वेळच्या राजांनी ‘द्वारावती’ हे नाव ठेवले असावे. याच काळात राजा सूर्यविक्रम, हरिविक्रम, सिंहविक्रम यांनी श्याम देशाला उत्तुंग स्थानाप्रत नेले. त्यामुळे तेथील प्रजा देशाला ‘सुवर्णभूमी’ या नावाने ओळखू लागली. आजही थायलंडचे लोक त्यांच्या देशाला ‘सुवर्णभूमी’ या नावाने संबोधतात. थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉक शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला आजही ‘सुवर्णभूमी विमानतळ’ असे नाव आहेे.

२. खमेर साम्राज्य (११ वे ते १४ वे शतक)

श्याम देशावर ११ व्या शतकापासून १४ व्या शतकापर्यंत खमेर साम्राज्याच्या ‘सूर्यवर्मन २’ या राजाने आक्रमण केले आणि श्याम देशाचा काही भूभाग खमेर साम्राज्यात अंतर्भूत केला.

३. अयुद्धया साम्राज्य (१४ वे १८ वे शतक)

श्याम देशाला अयुद्धया म्हणून ओळखले जाणे, अयुद्धयाचा ‘अयुथाय’ आणि पुढे ‘थाय’ असा अपभ्रंश होऊन ब्रिटिशांनी त्याचे ‘थायलंड’ असे नामकरण करणे

श्याम देशावर वर्ष १३५१ ते वर्ष १७६७ पर्यंत अयुद्धया साम्राज्याने राज्य केले. थायलंडच्या मध्यभागी ‘चाओ फ्राया’ नदीच्या काठी ‘अयुद्धया’ नावाची प्राचीन नगरी होती. तेथूनच अयुद्धया साम्राज्याचा आरंभ झाला. अयुद्धया साम्राज्याशी संबंध असलेले इतर देश त्याला ‘श्याम देश’ असेच म्हणायचे, तर स्थानिक लोक ‘अयुथाय’ असे म्हणायचे. पुढे याचा अपभ्रंश ‘थाय’ असा झाला आणि ब्रिटिशांनी या श्याम देशाला ‘थायलंड’ असे म्हणायला आरंभ केला. वर्ष १७६७ मध्ये बर्माने केलेल्या आक्रमणात संपूर्ण अयुद्धया नगरी जाळण्यात आली. येथील अनेक मंदिरे, बौद्ध विहार, राजवाडे आणि ग्रंथालये तोडण्यात आली. आता या सर्व वास्तूंचे केवळ अवशेष येथे बघायला मिळतात. (छायाचित्र क्रमांक ४ पहा.) या प्राचीन शहराला आता ‘युनेस्को’ने जागतिक स्मारकाचा दर्जा दिला आहे.

वाट महाथाट १. अयुद्धया नगरीतील ‘वाट महाथाट’ नावाच्या बौद्ध मंदिराचे अवशेष !

वाट महाथाट २. मंदिराच्या परिसरात असलेल्या एका बोधी वृक्षाच्या बुंध्यात ठेवलेले बुद्धाच्या तोंडवळ्याचे शिल्प !
बांग-पा-इन सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या पाठीमागे चाओ फ्राया नदीच्या काठी असलेला ‘बांग-पा-इन’ राजमहाल दिसत आहे.
प्राचीन नगरी : अयुद्धया थायलंड येथील अयुद्धया या प्राचीन नगरीतील राजवाड्याचे अवशेष !
वाट चायवत्तनारम् मंदिर अयुद्धयाच्या राजाने बांधलेले वाट चायवत्तनारम् मंदिर !

४. वाट महाथाट

अयुद्धया नगरीच्या राजाने हे बौद्ध मंदिर बांधलेले असणे आणि एके काळी या मंदिरात अनेक मौल्यवान रत्ने, आभूषणे अन् नवरत्नांच्या मूर्ती असणे

अयुद्धया नगरीत मध्यभागी ‘वाट महाथाट’ नावाच्या एका मोठ्या बौद्ध मंदिराचे अवशेष आहेत (वाट म्हणजे मंदिर). (छायाचित्र क्रमांक १ पहा.) वर्ष १३७४ मध्ये राजा ‘बोरोमरचा १’ याने हे मंदिर बांधले आणि पुढे राजा रामेसुआन् याने मंदिराचा विस्तार केला. असे म्हटले जाते की, या मंदिरात अनेक अमूल्य रत्ने, आभूषणे आणि नवरत्नांच्या मूर्ती होत्या. या मंदिर परिसरात असलेल्या एका बोधी वृक्षाच्या बुंध्यात एका शिल्पकाराने बुद्धाचा तोंडवळा असलेले एक शिल्प ठेवले आहे. ते बघण्यासाठी अनेक पर्यटक येतात. (छायाचित्र क्रमांक २ पहा.)

५. वाट रच्चबुराना

राजा बोरोमरचा २ याने वर्ष १४२४ मध्ये ‘वाट महाथाट’च्या उत्तरेकडे एक बौद्ध मंदिर बांधले. त्याचे नाव आहे वाट रच्चबुराना. या मंदिराच्या भिंतींवर बाहेरच्या बाजूला अनेक ठिकाणी नागांवर आक्रमण करत असलेल्या विष्णुवाहन गरुडाची शिल्पे आहेत.

६. बांग-पा-इन राजमहाल

अयुद्धयाच्या राजाने ४६ एकर परिसरात बांधलेला हा राजमहाल असणे आणि १९ व्या शतकात थायलंडच्या चक्री साम्राज्याच्या राजाने या राजमहालाचे पुनरुज्जीवन करणे

अयुद्धया साम्राज्याचा राजा प्रसाद थोंग याने वर्ष १६३२ मध्ये अयुद्धयापासून २० कि.मी. अंतरावर चाओ फ्राया नदीच्या काठी बांग-पा-इन नावाच्या गावात एक राजमहाल बांधला. याचे नाव आहे बांग-पा-इन राजमहाल. या राजमहालाचा परिसर ४६ एकर एवढा आहे. या परिसरात राजमहालाच्या व्यतिरिक्त ग्रंथालय, अतिथी कक्ष, पूर्वजांचे समाधीस्थान, तलाव, बाग आणि राजघराण्यातील सदस्यांसाठी निवासस्थाने आहेत. या राजाला चार राण्या होत्या. प्रत्येक राणीसाठी त्याने एकेक सुंदर निवासस्थान बांधलेे. १९ व्या शतकात चीन आणि फ्रेंच सरकारच्या साहाय्याने थायलंडच्या चक्री साम्राज्याचा राजा ‘राम ४’ याने या परिसराचे पुनरुज्जीवन केल्याने आता या परिसराला वैभव प्राप्त झाले आहे. आजही हा राजवाडा पहातांना तो ‘नवीनच आहे’, असे वाटते. (छायाचित्र क्रमांक ३ पहा.)

७. वाट चायवत्तनारम्

अयुद्धयाच्या राजाने ‘अंकोर वाट’ मंदिराकडून प्रेरणा घेऊन मंदिर बांधणे आणि या मंदिराला मेरू पर्वताप्रमाणे ९ शिखरे केलेली असणे

अयुद्धया साम्राज्याचा राजा प्रसाद थोंग याने वर्ष १६३० मध्ये खमेर हिंदु साम्राज्यातील ‘अंकोर वाट’ मंदिराकडून प्रेरणा घेऊन अयुद्धया नगरीच्या दक्षिण पूर्व दिशेला एक मंदिर बांधले. हे मंदिर कंबोडियातील ‘अंकोर वाट’सारखे ‘मेरू’ पर्वतावर आधारित आहे. या मंदिराला मेरू पर्वताच्या ९ शिखरांप्रमाणे ९ शिखरे बनवली आहेत. हे मंदिर चाओ फ्राया नदीच्या काठी निर्माण केले असून आपण मंदिरातून बोटीने नदीमार्गे इतर प्रदेशांना जाऊ शकतो. (छायाचित्र क्रमांक ५ पहा.)

८. रडणार्‍या बुद्धाचे मंदिर

अयुद्धयाच्या राजाने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ बुद्धाचे मंदिर बांधणे, या मंदिरातील मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू येत असणे आणि हे अश्रू थांबणे, म्हणजे वाईट काळ जवळ आल्याचे प्रतीक असल्याचे मानण्यात येणे

अयुद्धया नगरीजवळ चाओ फ्राया नदीच्या काठी बुद्धाचे एक मंदिर आहे. याला ‘रडणार्‍या बुद्धाचे मंदिर’ म्हणतात. असे म्हटले जाते की, वर्ष १८८१ मध्ये अयुद्धयाचा राजा चुलालांगकार्न याची राणी सुनंदाकुमारी रत्ना चीनहून परत आल्यावर राजाला भेटायला नदीमार्गे बांग-पा-इन राजमहालाकडे निघाली होती. वाटेतच राणीची नाव नदीत बुडाली. हे समजल्यावर राजाला पुष्कळ दुःख झाले. त्याने राणीसाठी बुद्धाची मोठी मूर्ती नदीकाठी स्थापन केली. या बुद्धाच्या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू येत असलेले राजाने पाहिले. तेव्हापासून लोक या बुद्धाला ‘रडणारा बुद्ध’ असे म्हणू लागले. कित्येक वर्षे या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. गेल्या अनेक वर्षांपासून मात्र या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू येणे थांबले आहे. आमच्या मार्गदर्शकाने आम्हाला सांगितले, ‘‘बुद्धाच्या डोळ्यांतून अश्रू येणे थांबणे, हे वाईट काळ जवळ आल्याचे प्रतीक आहे.’’

– श्री. विनायक शानभाग, थायलंड

Leave a Comment