देशविदेशांत निरनिराळ्या पद्धतीने साजरा होणारा हिंदूंचा सण दिवाळी !

घरोघरी आनंदाचे तोरण चढवणारी भारतीय दिवाळी आता विदेशांतही चैतन्याची रुजवात करत आहे. दिवाळी थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरापर्यंत पोहोचली आहे, तर इंग्लंडच्या रस्त्यांवरही तिची धूम दिसते.

अलीकडे सगळे जगच एक ग्लोबल व्हिलेज झालेले असल्याने प्रत्येक देशातच विविध देशांतील लोक कामधंदा आणि शिक्षण यानिमित्ताने जातात. कालांतराने स्थायिकही होतात. भारतीय लोक त्याला अपवाद नाहीत. लोकांसमवेत त्यांची संस्कृती, भाषा आणि सण हे सगळे आलेच. त्यामुळे आता जगभर पसरलेल्या भारतियांनी दिवाळी अथवा दीपावली हा सणही जगभर नेला आहे. त्यात विविध वेशभूषा, भारतीय मिष्टान्ने, फराळाचे पदार्थ, सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी, मेंदी, दिव्यांची, इतर आरास आणि शोभेचे दारूकाम असतेच. भारताशेजारच्या, तसेच पुढारलेल्या काही देशांतून तो साजरा करतांना भारतापेक्षा वेगळ्या काय गोष्टी असतात, ते पाहूया.

 

१. विविध प्राण्यांप्रती कृतज्ञता म्हणून
त्यांचे पूजन करून दिवाळी सण साजरा करणारा नेपाळ !

१ अ. काग तिहार म्हणजे कावळ्यांचा दिवस !

भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये दिवाळी सण तिहार म्हणून साजरा केला जातो. यातील पहिला दिवस काग तिहार म्हणजे कावळ्यांचा दिवस! कावळ्यांसाठी गोडधोड पदार्थ घराच्या छपरावर ठेवून दिले जातात. कावळ्यांचे ओरडणे हे दु:ख आणि मृत्यूचे प्रतीक असल्याने सणापूर्वी ते दूर करण्यासाठी हा नैवेद्य ! (हिंदु संस्कृतीत पितृपक्षात ज्याप्रमाणे कावळ्याला पिंडदान केले जाते, त्याच आधारावर ही पद्धत चालू झाली असावी, असे वाटते ! – संपादक)

१ आ. कुकुर तिहार म्हणजे कुत्र्यांची पूजा !

दुसर्‍या दिवशी चक्क कुत्र्यांची पूजा होते. त्याला कुकुर तिहार म्हणतात. माणसाच्या कुत्र्याशी असलेल्या अतूट नात्याचा आदर करणे ही त्यामागची भूमिका. या दिवशी कुत्र्याला कुंकवाचा टिळा लावून, गळ्यात झेंडूची माळ घालून त्याला गोडधोड दिले जाते.

१ इ. गोपूजन आणि लक्ष्मीपूजन

नंतर गाय तिहार म्हणजे गायीची पूजा ! शेवटी लक्ष्मीपूजनही होते.

 

२. दिव्यांची रोषणाई करून दिवाळी साजरी करणारा इंडोनेशिया

इंडोनेशियामध्ये म्हणजे मुख्यत: बाली बेटांमध्ये देवळांना दिव्यांची रोषणाई उत्तम तर्‍हेने केली जाते. शिवाय दिवाळी धमाका म्हणून नृत्य आणि विविध प्रकारच्या वेशभूषा स्पर्धा यांचेही समारंभ जागोजागी साजरे होतात.

 

३. दिव्यांची आरास करून उत्साहाने दिवाळी साजरा होणारे सिंगापूर

सिंगापूरमध्ये अनेक भारतीय स्थायिक झालेले आहेत. तिथे दिवाळी आपल्यासारखीच दणक्यात साजरी होते. सुरक्षा आणि ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी मात्र तिथे सार्वजनिक आतषबाजीला कटाक्षाने बंदी आहे. येथील दिव्यांच्या आरासमध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे आकर्षक रूप सगळीकडे विपुल प्रमाणात वापरलेले दिसते.

 

४. बाहुल्यांच्या खेळाद्वारे रामायण आणि
महाभारत यांचे दर्शन घडवून मलेशियातील दिवाळी साजरी !

मलेशियामध्ये दिवाळीत शॅडो पपेट म्हणजेच सावल्यांचा खेळ मोठ्या प्रमाणात दाखवला जातो. रामायण आणि महाभारत यांतील कथा बाहुल्यांच्या खेळाद्वारे दाखवण्याचे हे कलाकृतीपूर्ण काम असून, या आकृत्या म्हशीच्या कातड्यापासून बनवल्या जातात. त्यांना रंग देऊन, सर्व प्रकारची आभूषणे, वस्त्रे आणि मुकुट घालून त्यांचे नृत्य दाखवले जाते.

 

५. नदीत दिवे सोडून दिवाळी साजरी करणारा थायलंड

थायलंडमध्ये दिवाळी लुई क्रॅथोंग म्हणून साजरी केली जाते. दीपावली म्हणून सिद्ध केलेले दिवे मात्र केळीच्या झाडाच्या पानांपासून बनवले जातात. असे सहस्रो दिवे नदीमध्ये सोडलेले असतात. हा दीपोत्सव अत्यंत नयनरम्य असतो.

 

६. दिव्यांच्या रोषणाईची स्पर्धा आयोजित करणारा फिजी

फिजी या पॅसिफिक बेटात निळीच्या उद्योगासाठी अनेक वर्षांपूर्वी गेलेले भारतीय मजूर कायमचे तिथे स्थायिक झाले आहेत. सध्या फिजीमधील ३८ टक्के लोक भारतीय वंशाचे असून, तिथे पारंपरिक पद्धतीने अतिशय जोरदारपणे दिवाळी साजरी होते. नादी या शहरामध्ये सिगाटोका, लाउटोका आणि डेनाराऊ या आसपासच्या गावांतून आणि खेडेगावांतून विशेषतः दिवाळीसाठी विशेष बसगाड्या सोडल्या जातात. या शहरातील एक आगळीवेगळी परंपरा म्हणजे दिव्यांच्या रोषणाईच्या स्पर्धा. फिजीच्या पंतप्रधानांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या स्पर्धेला प्रारंभ होतो.

 

७. महाराष्ट्राप्रमाणेच फराळाचे पदार्थ बनवून साजरी होणारी अमेरिकेतील दिवाळी

दिवाळीचा सण अमेरिकेतही आनंदाची बरसात करतो. तेथील सहस्रो भारतीय लोक त्यांच्या घरी दिवाळी साजरी करतातच; पण आता भारतीय शहरांच्या धर्तीवर अनेक ठिकाणी दिवाळीनिमित्त विशेष मिठाई बनवल्या आणि विकल्या जातात. अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंड या देशांत स्थायिक झालेल्या अनेक गुजराती स्त्रियांनीही हा गृहोद्योग चालू केला आहे. चकल्या, लाडू, शंकरपाळे यांसारख्या पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी त्या आधी महिनाभर कार्यरत असतात.

जॉर्ज बुश अमेरिकेचे अध्यक्ष असतांना वर्ष २००३ पासून त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याचा प्रघात चालू केला. अमेरिकेचे गत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी वर्ष २००९ मध्ये स्वत:च्या अध्यक्षीय घरात पूर्वेकडील खोलीमध्ये वैदिक मंत्रांच्या घोषात दीपप्रज्वलन केले होते.

 

८. संयुक्त राष्ट्रांत सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे साजरी होणारी दिवाळी

संयुक्त राष्ट्रांतही (युनायटेड किंगडम म्हणजे यूकेतही) भारतीय घरांमध्ये दिवाळी आगळीवेगळी असते. प्रत्येक भारतीय धूमधडाक्यात दिवाळी साजरी करतो. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या येथील विद्यापिठांतही विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दिवाळी सेलिब्रेशन करतात. युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सच्या वतीने तर दिवाळीनिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याला ४०० ते ५०० लोकांची उपस्थिती सहज असते. याव्यतिरिक्त लंडन शहरातून दिवाळीनिमित्त एक मोठी मिरवणूक निघते. त्यात अनेक भारतीय आणि विदेशी लोक सहभागी होतात. मिरवणुकीमध्ये भारतीय वाद्ये, नाच आणि कपडे यांचे मनोहारी दर्शन होते. आयुर्वेदिक मसाज (आपल्याकडील अभ्यंगस्नान), मेंदी, साडी नेसणे आणि नेसविणे या सार्‍या पारंपरिक गोष्टी हौसेने केल्या जातात. विदेशी नागरिकही या समारंभांत आनंदाने सहभागी होतात.

 

९. दोन आठवड्यांचा दिवाली मेला साजरा करणारा न्यूझीलंड

न्यूझीलंडमध्ये सिटी काउन्सिलची (म्हणजे आपल्याकडची म्युनिसिपालिटी) तर्‍हा आणखीच वेगळी. ऑकलंड शहर आणि वेलिंग्टन या न्यूझीलंडच्या राजधानीच्या शहरात प्रत्यक्ष दिवाळीच्या आधी दोन आठवडे दिवाली मेला साजरा केला जातो. त्याचे उद्घाटन थेट पंतप्रधानांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केले जाते. बी हाइव्ह या पार्लमेंटच्या इमारतीसमोर भलीमोठी रांगोळी काढली जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भारतीय नृत्ये, कर्नाटकी संगीत, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, रांगोळीच्या कार्यशाळा आदी त्यात समाविष्ट असते.

 

१०. हरेकृष्ण आणि स्वामीनारायण मंदिरांतून देशोदेशी साजरी होणारी दिवाळी !

देशोदेशी पसरलेल्या हरेकृष्ण मंदिरांतून आणि स्वामीनारायण मंदिरांमधूनही दिवाळी साजरी केली जाते. विशेषत: हरेकृष्ण मंदिरांतील शेंडी ठेवलेले, धोतर नेसून हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे करत नाचणारे आणि घंटोन्घंटे हार्मोनियमवर हा जप वाजविणारे विदेशी भक्त दिवाळीची वाट पहात असतात.

न्यूझीलंडमधील भारतीय मंदिरांतून दिवाळीनिमित्त अन्नकूट म्हणजे अन्नकोटाचे आयोजन होते. भक्तमंडळी अक्षरश: सहस्रो प्रकारचे पदार्थ बनवून ते आकर्षकरित्या मांडून ठेवतात.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणारे चोपडीपूजन हे या मंदिरांमधून, तसेच विविध भारतीय दुकानांमध्ये केले जाते.

अनेक भारतीय दुकाने या दिवशी आपल्या सर्व कर्मचार्‍यांना हिशेबाच्या वह्यांचे पूजन करण्यासाठी बोलावून मिठाई आणि बोनस वाटतात.

आनंदाची ही दिवाळी सगळीकडेच चैतन्याचे कोंदण लावत जाते. भारतीय दिवाळी आता अशी जागतिक होते आहे !

– कल्याणी गाडगीळ (दैनिक लोकमत (मंथन), ऑक्टोबर २०१६)

Leave a Comment