आकाशदीप

आकाशकंदिलाचा मूळ शब्द ‘आकाशदीप’ असा आहे. हल्ली तुपाच्या दिव्याच्या जागी विजेचा दिवा आल्याने त्याला आकाशकंदिल म्हटले जाते. घराच्या द्वारात टांगलेल्या आकाशदीपामुळे घराभोवती असलेल्या वायुमंडलाची शुद्धी होते. याचेच प्रत्यक्ष वास्तूत टांगण्याचे दुसरे रूप म्हणजे लामणदिवा !

 

१. इतिहास

त्रेतायुगामध्ये आकाशदीपाची संकल्पना जन्माला आली. रामराज्याभिषेकाच्या वेळी श्रीरामाच्या चैतन्याने पुनित झालेल्या वायुमंडलाचेही स्वागत घरोघरी असे आकाशदीप टांगून केले गेले.

 

२. रचना

आकाशदीपाचा मूळ आकार हा कलशासारखा असतो. हा मुख्यतः चिकण मातीचा बनवलेला असतो. याला मध्यभागी, तसेच वरच्या बाजूला गोलाकार रेषेत एक-दोन इंचावर गोलाकार छिद्रे असतात. आत तुपाचा दिवा ठेवण्यासाठी मातीची बैठक केलेली असते.

 

३. लावण्याची पद्धत

हा आकाशदीप वास्तूच्या प्रवेशद्वारावर उजव्या हाताला (कार्यरत शक्तीचे प्रतीक) टांगतात. तिन्हीसांजेला मातीच्या घुमटाकार कलशात मातीच्या छोट्याशा बैठकीवर अक्षता ठेवून त्यावर तुपाचा दीप ठेवतात आणि त्यावर मातीचेच मध्यभागी टोक असलेले झाकण ठेवतात.

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या मध्यमातून, १३.१.२००५, दुपारी १२.०२)

 

४. त्रेतायुगातील रामराज्याभिषेकाच्या वेळी
अंगणात अडकवलेला आकाशदीप ‘ज्योतीकलश’

अंधार्‍या रात्री आकाशदीपाचे लांबून दर्शन घेतल्यास मातीचा कलश अंधारामुळे दिसत नाही; पण कलशात तेवणार्‍या ज्योतीचा प्रकाश कलशाला पाडलेल्या भोकांच्या ओळींतून बाहेर पडल्यामुळे ‘प्रत्येक भोक म्हणजे मंद तेवणारी एक एक ज्योत आहे’, असे वाटते. त्यामुळे आकाशदीपाचे दृश्य म्हणजे कलशाच्या आकाराच्या ज्योतींचा समूह असल्याचा भास होतो. कलशाभोवती विरळ अशी प्रभावळ निर्माण झाल्याने कलशातून प्रकाशाचा प्रवाह बाहेर ओसंडून वहात आहे, असे मनमुग्ध दृश्य दिसते. त्यामुळे त्रेतायुगातील रामराज्याभिषेकाच्या वेळी अंगणात अडकवलेल्या आकाशदीपाचे नाव ‘ज्योतीकलश’ असे ठेवण्यात आले. – ब्रह्मतत्त्व (सौ. पाटील यांच्या माध्यमातून, १८.२.२००४, दुपारी ३.०५)

(सूक्ष्म-चित्र)

 


 

आकाशदीपाचा वाईट शक्तींवर परिणाम होणे !

तुपाच्या दिव्याकडे ब्रह्मांडातील देवतांच्या सात्त्विक लहरी आकृष्ट होतात. झाकणाच्या टोकातून कारंज्याप्रमाणे वातावरणात प्रक्षेपित केल्या जातात. यामुळे वातावरणाच्या पट्ट्यात सात्त्विक लहरींचे सूक्ष्म-छत बनते. दिव्याखालील अक्षतांकडून सात्त्विक लहरी ग्रहण होऊन खालच्या दिशेने प्रक्षेपित होतात. यामुळे भूमीवर सात्त्विक लहरींचे सूक्ष्म-आच्छादन बनते. मातीच्या कलशाला असणार्‍या भोकातून प्रक्षेपित होणार्‍या वेगवान प्रकाशलहरींचा आणि त्यातून निर्माण होणार्‍या सूक्ष्म नादाचा वाईट शक्तींना त्रास होतो. त्यामुळे सहसा आकाशदीपाच्या संपर्कात येण्याचे वाईट शक्ती टाळतात. साहजिकच वाईट शक्तींचा वास्तूभोवती असणारा संचार न्यून होतो. चिकण मातीमध्ये पृथ्वीपेक्षा आपकणांचे प्रमाण जास्त असल्याने तिची सात्त्विक लहरी प्रक्षेपण करण्याची क्षमताही जास्त असते. आकाशदीप हा टांगलेल्या अवस्थेत असल्याने एकाच वेळी वायुमंडलातील ऊर्ध्वगामी आणि अधोगामी वहाणार्‍या वायुलहरींची शुद्धी होण्यास साहाय्य होते. कालांतराने दीपातून आणि अक्षतांतून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींमुळे वास्तूभोवती संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे तिन्हीसांजेपासून वाढत्या प्रमाणात कार्यरत होणार्‍या वाईट शक्तींपासून वास्तूचे रक्षण होते.

आकाशकंदिल लावण्यामागील शास्त्र

१. पाताळातून घरात येणार्‍या आपमय लहरींना घराच्या बाहेरच्या बाजूस लावलेल्या आकाशकंदिलातील तेजतत्त्वाच्या लहरींनी थांबवणे
दिवाळीच्या काळात आपमय तत्त्वतरंगांशी निगडित अधोगामी लहरींचे ऊर्ध्व दिशेस प्रक्षेपण होण्यास सुरुवात होते. त्यामुळे पूर्ण वातावरणात जडत्वता येऊन वाईट घटकांचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे घरात जडत्वतेचा समावेश होऊन पूर्ण वास्तू दूषित होते. हे थांबवण्यासाठी दिवाळीत आधीपासूनच घराबाहेर आकाशकंदिल लावला जातो. आकाशकंदिलात तेजतत्त्वाचा समावेश असल्यामुळे ऊर्ध्व दिशेतून कार्यरत होणार्‍या आपमय लहरींवर आळा बसून तेजतत्त्वाच्या जागृतीदर्शक लहरींचे घरात वर्तुळात्मक संचारण होते; म्हणून घराच्या बाहेरच्या बाजूस आकाशकंदिल लावतात.

२. ब्रह्मांडात संचारत असलेले लक्ष्मीतत्त्व आणि पंचतत्त्व यांचा आकाशकंदिलामुळे लाभ होणे
दिवाळीच्या दिवसांत ब्रह्मांडात वाईट घटकांच्या निर्मूलनासाठी श्री लक्ष्मीतत्त्व कार्यरत असते. या तत्त्वाचा लाभ करून घेण्यासाठी पंचतत्त्वाच्या सर्व स्तरांचे एकत्रिकरण करून त्याला वायूतत्त्वाच्या गतीमानतेच्या आकर्षणातून आकाशपोकळीच्या संचारणातून ग्रहण केले जाते; म्हणून आकाशकंदिल घराबाहेर उंच जागी लावला जातो. त्यामुळे ब्रह्मांडात संचारणार्‍या तत्त्वाचा लाभ होतो. – एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १५.१०.२००६, रात्री ७.१६)

दिवाळीविषयीचे लघुपट पहा !