हिंदूंच्या देवता आणि त्यांची संख्या

ईश्वरनिर्मित हिंदु धर्मात ३३ कोटी देवता आहेत, हे आपण वारंवार ऐकले आणि वाचलेही असते; परंतु त्यामागील कार्यकारणभाव आणि शास्त्र ज्ञात नसल्याने त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येत नाही. प्रस्तुत लेखात देवतांच्या संख्येविषयी माहिती पाहू.

 

हिंदूंच्या देवतांची संख्या

देवांची आणि देवींची निरनिराळी नावे असली, तरी एकेश्वरवादाला (ईश्वर एकच आहे या नियमाला) अनुसरून देव अन् देवी निरनिराळे नाहीत, तर ते एकाच ईश्वराचे कार्यानुमेय निरनिराळे प्रकटीकरण आहे, असे समजले जाते, उदा. कालीच्या उपासकांनुसार काली हीच सर्वश्रेष्ठ देवता असून सरस्वती आणि लक्ष्मी ही तिचीच रूपे होत.

तेहेतीस कोटी देव आहेत असे नेहमीच म्हटले जाते. याचा अर्थ असा की, प्रमुख देवता तेहेतीस आहेत आणि त्या प्रत्येक देवतेचे एक कोट गण, दूत, वगैरे आहेत. कोटी हे कोटचे बहुवचन आहे. देवतांची नवनिर्मिति आणि नवनिर्मित देवतांचा क्षय ही प्रक्रिया सतत होत असल्याने त्यांची एकूण संख्या निश्चित अशी नाही. असे असले तरी मूलभूत तेहेतीस कोटी देवांच्या संख्येत पालट (फरक) होत नाही.

 

हिंदु धर्मात अनेक देवता असल्यामुळे त्यावर टीका करणार्‍यांनो, देवतांचे शास्त्र समजून घ्या !

हिंदु धर्मात कुलदेवता, वास्तूदेवता, स्थानदेवता, ग्रामदेवता, उपास्यदेवता, तसेच विविध धार्मिक विधींच्या वेळी विविध देवता यांची उपासना करतात. त्यासंदर्भात टीका करतांना धर्मद्वेष्टे आणि इतर धर्मिय म्हणतात, आमच्या धर्मात एकच देव आहे, तर तुमच्या धर्मात एवढे देव कशाला ? त्यांच्या हे लक्षात येत नाही की, देशात एक पंतप्रधान असतांना ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य आणि पुढे राज्याचे मुख्यमंत्री असे अनेक स्तर आहेत. त्या त्या स्तराचे कार्य त्या त्या स्तरावर सांभाळले जाते. एका देशाच्या संदर्भात असे आहे, तर अनंत कोटी ब्रह्मांडनायक असलेल्या परमेश्‍वराला

छोट्या छोट्या गोष्टी आपण कशा काय सांगायच्या ? म्हणून हिंदु धर्मात सरकारी कार्यालये असतात तशा कार्यानुसार विविध देवता आहेत. देवतेच्या प्रकारावरूनच तिचे कार्यक्षेत्र आपल्या लक्षात येते. जिथे पंतप्रधानांना काही सांगण्याची क्षमता आपल्यात नसते, तिथे परमेश्‍वराला काही सांगण्याची क्षमता आपल्यात असेल का ? तसे सांगणे हे केवळ मानसिक स्तरावरचे असते. यावरून हिंदु धर्मातील अनेक देवतांचे शास्त्र आणि महत्त्व लक्षात आले असेल.

– प.पू. डॉ. आठवले (१७.१०.२०१४)

विविध विचारसरणींनुसार प्रमुख तेहेतीस देवता

अ. आदित्य १२, रुद्र ११, वसु ८ (अष्टदिशांचे स्वामी), इंद्र १ आणि प्रजापति १ किंवा इंद्र आणि प्रजापतीऐवजी २ विश्वेदेव असे एकूण ३३. इंद्र आणि प्रजापतीऐवजी प्रजापति आणि वषट्कार किंवा वाक् आणि ईश्वर असेही दोन देव तेहेतीस देवांत गणले जातात.

आ. ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तीन प्रमुख देवतांशी प्रत्येकी ११ कोटी देव संबंधित आहेत.

इ. तेहेतीस देवता पुढील रूपांत आहेत – ७ पुरुषदेवता, ७ स्त्रीदेवता, ७ बालदेवता आणि ७ वाहनदेवता. उर्वरित ५ (पंचकेंद्र) देव – वायु, अग्नि, वरुण, इंद्र आणि अर्यमा – अमूर्तरूपात पुजले गेले (यांचा आकार निश्चित करता आला नाही). यांना अधिभूत देव किंवा अधिदेव म्हटले गेले.

 

कोट या शब्दाचे इतर अर्थ

१. प्रकार : देवांचे इष्ट अन् अनिष्ट, उपास्य अन् अनुपास्य, सजीव अन् निर्जीव, उच्च अन् क्षुद्र, वैदिक अन् पौराणिक असे अनेक प्रकार आहेत.

२. नग्न : ‘कोटरी सा महामाया’ म्हणजे ती महामाया नग्न आहे, असे वचन आहे. देवांना दिगंबरही म्हणतात. दिगंबर शब्दाची व्युत्पत्ति आहे ‘दिक् एव अंबरः ।’ दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर म्हणजे वस्त्र आहे असा. देवतांच्या अंगावर वस्त्रे नाहीत; पण भक्तांना सुख देण्यासाठी दर्शन देतांना त्या वस्त्रे परिधान करतात. प्रत्येक देवतेच्या वस्त्राचा रंग ठरलेला असतो, उदा. इंद्राची वस्त्रे तांबडी, यमाची पिवळी, वरुणाची काळी तर कुबेराची पांढरी असतात. (परमहंसही विशृंखल म्हणजे नग्न असू शकतात.) देवांच्या नग्नतेची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ. विशृंखल : कोणत्याही तर्‍हेचे बंधन नसलेला, बंधनाच्या पलीकडे गेलेला.

आ. सत्य : असत्य असते तेथे ते झाकण्यासाठी आवरण लागते. देव सत्य असल्याने त्यांना आवरण म्हणून वस्त्र लागत नाही.

इ. निसर्गाच्या देवता नग्न असतात, उदा. पृथ्वी, पर्वत, नदी.

३. गुहा, पोकळी किंवा अंधकार अशा ठिकाणी ज्यांची निर्मिति आहे ते : पोकळी म्हणजे दोन भिन्न लहरी एकत्र येतात त्यामधील जागा.

४. दोन डोंगरांमधील दरीत वास्तव्य करणारे

५. प्रकाशमय

६. अनाकलनीय : गण, पवित्रक हे सर्व बुद्धीला न समजणारे, म्हणजे अनाकलनीय आहे.

संदर्भ : सनातन संस्था

Leave a Comment