मनुष्यजीवनातील गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व


‘ज्ञानियांचा राजा गुरु महाराव’, असे संत तुकारामांनी म्हटले आहे. ज्ञान देतात, ते गुरु ! शिळेपासून शिल्प बनू शकते; पण त्यासाठी शिल्पकार लागतो. त्याचप्रमाणे साधक आणि शिष्य ईश्वराला प्राप्त करू शकतात; पण त्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. गुरूंनी आपल्या बोधामृताने साधक आणि शिष्य यांचे अज्ञान दूर केल्यावरच त्यांना ईश्वरप्राप्ती होते. प्रस्तुत लेखात आपण ‘संत आणि गुरु’, ‘अविद्यामाया आणि गुरुमाया’, ‘ईश्वर आणि गुरु’, ‘देवता आणि गुरु’, ‘अवतार आणि गुरु’, ‘प्रवचनकार आणि गुरु’, ‘भगत आणि गुरु’, ‘सर्वसाधारण व्यक्ती, साधक आणि गुरु’, ‘शिक्षक आणि गुरु’, असे गुरूंचे इतरांच्या तुलनेतील महत्त्व जाणून घेऊ.

 

१. संत आणि गुरु

संत सकामातील आणि निष्कामातील प्राप्तीसाठी थोडेफार मार्गदर्शन करतात. काही संत लोकांच्या व्यावहारिक अडचणी सोडवण्यासाठी, तसेच वाईट शक्तीच्या त्रासामुळे त्यांना होणार्‍या दुःखाच्या निवारणासाठी कार्य करत असतात. अशा संतांचे कार्यच ते असते. एखाद्या संतांनी एखाद्या साधकाचा शिष्य म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्यासाठी ते गुरु होतात. गुरु केवळ निष्कामातील (ईश्वर) प्राप्तीसाठी पूर्णपणे मार्गदर्शन करतात. एकदा एखादे संत गुरु म्हणून कार्य करू लागले की, त्यांच्याकडे येणार्‍यांच्या सकामातील अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे, असे वाटणे हळूहळू न्यून होत जाऊन शेवटी ते बंदच होते; परंतु ते जेव्हा एखाद्याचा शिष्य म्हणून स्वीकार करतात, तेव्हा त्याची सर्वतोपरी काळजी घेत असतात. प्रत्येक गुरु हे संत असतातच; मात्र प्रत्येक संत गुरु नसतात. असे असले तरी संतांची बहुतेक लक्षणे गुरूंना लागू पडतात.

संत

गुरु

१. इतरांविषयी प्रेम (टक्के) ३० ६०
२. सेवा (टक्के) ३० ५०
३. त्याग (टक्के) ७० ९०
४. लिखाण

अ. प्रमाण (टक्के)

आ. स्वरूप

अनुभूती जास्त

१०

मार्गदर्शन जास्त

५. प्रकट शक्ती (टक्के) २०
६. उन्नती (टीप १) शीघ्र अधिक शीघ्र

२. अविद्यामाया आणि गुरुमाया

‘मायेचे दोन प्रकार आहेत – एक अविद्यामाया आणि दुसरी गुरुमाया. अविद्यामाया जिवाला अज्ञानात अडकवते, तर गुरुमाया अविद्येतून जिवाची सुटका करते. गुरुमायेलाच ‘प्रभुमाया’ किंवा ‘हरिमाया’ असेही म्हणतात. अविद्यामाया आपल्या मायावी रूपाचा थांगपत्ता लागू देत नाही. एकनाथांसारख्या थोर संतांनाही ‘आपल्या घरी पाणी भरणारा, चंदन उगाळणारा श्रीखंड्या म्हणजे भगवंत आहे’, याचा थांगपत्ता अविद्यामायेमुळेच लागला नव्हता. पुढे द्वारकेहून दुसर्‍या भक्ताच्या रूपात येऊन हरिमायेने त्या अविद्यामायेला दूर केले, तेव्हा श्रीखंड्याचे खरे रूप नाथांना उमजले.’

 

३. ईश्वर आणि गुरु

अ. ईश्वर आणि गुरु एकच आहेत : गुरु म्हणजे ईश्वराचे साकार रूप आणि ईश्वर म्हणजे गुरूंचे निराकार रूप.

आ. अधिकोषाच्या बर्‍याच शाखा असतात. त्यांपैकी स्थानिक शाखेत खाते उघडून पैसे भरले तरी चालते. तसे करणे सोपेही असते. दूरच्या मुख्य कार्यालयातच जाऊन पैसे भरले पाहिजेत, असे नसते. तसे करण्याचा त्रास घेण्याचीही आवश्यकता नसते. तसेच भाव-भक्ति, सेवा, त्याग वगैरे न दिसणार्‍या ईश्वरासाठी करण्यापेक्षा त्याच्या सगुणरूपाच्या म्हणजे गुरूंच्या संदर्भात केल्यास ते सोपे जाते. स्थानिक शाखेत भरलेले पैसे जसे अधिकोषाच्या मुख्यालयातच जमा होतात, तसे गुरूंची सेवा केली की, ती ईश्वरालाच पोहोचते, हे पुढील उदाहरणाहून स्पष्ट होते. वामनपंडितांनी भारतभर फिरून मोठमोठ्या विद्वानांचा पराभव केला आणि त्यांच्याकडून पराजयपत्रे लिहून घेतली. ती विजयपत्रे घेऊन जात असतांना एका संध्याकाळी ते एका झाडाखाली संध्या करायला बसले. तेव्हा त्यांना फांदीवर एक ब्रह्मराक्षस बसलेला दिसला. तेवढ्यात दुसरा एक ब्रह्मराक्षस बाजूच्या फांदीवर येऊन बसायला लागला, तेव्हा पहिला त्याला येऊ देईना आणि म्हणाला, ‘‘ही जागा वामनपंडितासाठी आहे; कारण त्याला आपल्या विजयाचा फार अहंकार झाला आहे.’’ हे ऐकताक्षणीच वामनपंडितांनी सर्व विजयपत्रे फाडली आणि ते हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. बरीच वर्षे तपश्चर्या केल्यावरही देव दर्शन देईना; म्हणून निराशेने त्यांनी कड्यावरून खाली उडी मारली. तेवढ्यात ईश्वराने त्यांना झेलले आणि डोक्यावर डावा हात ठेवून आशीर्वाद दिला. त्यानंतर पुढील संभाषण झाले.

पंडित : डोक्यावर डावा हात का ठेवला, उजवा का नाही ?

ईश्वर : तो अधिकार गुरूंचा आहे.

पंडित : गुरु कोठे भेटतील ?

ईश्वर : सज्जनगडावर.

त्यानंतर वामनपंडित सज्जनगडावर समर्थ रामदासस्वामींच्या दर्शनाला गेले. समर्थांनी त्यांच्या पाठीवर उजवा हात ठेवून आशीर्वाद दिला.

पंडित : डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद का नाही दिला ?

स्वामी : अरे, ईश्वराने हात ठेवलेला आहेच की !

पंडित : मग ईश्वराने ‘डोक्यावर हात ठेवायचा अधिकार गुरूंचा’, असे का म्हटले ?

स्वामी : ईश्वराचा उजवा आणि डावा हातही एकच आहे, ईश्वर अन् गुरु एकच आहेत, हे कसे कळत नाही तुला !

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जि. पुणे, महाराष्ट्र.

 

४. शिष्याच्या दृष्टीने ईश्वर आणि गुरु

शिष्याच्या दृष्टीने ईश्वरापेक्षा किंवा देवापेक्षा गुरु श्रेष्ठ होत.

अ. गुरु थोर कि देव थोर म्हणावा ।

नमस्कार कोणास आधी करावा ।।

मना माझिया गुरु थोर वाटे ।

तयाच्या कृपाप्रसादे रघुराज भेटे ।। – समर्थ रामदासस्वामी

‘गुरुकृपाप्रसाद मिळाल्याविना आपण या भवसागरातून तरून जाऊ शकणार नाही.’ – प.पू. दास (रघुवीर) महाराज, पानवळ, बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग.

आ. गुरु गोविंद दोउ खडे, काके लागूं पाय ।

बलिहारी गुरु आपकी, गोविंद दियो बताय ।। – संत कबीर

अर्थ : गुरु आणि देव दोन्ही समोर उभे आहेत, मी कोणाला नमस्कार करू ? गुरुदेव, मी आपल्या चरणी नतमस्तक आहे की, तुम्ही माझी देवाशी गाठ घालून दिली.

हिंदु संस्कृतीने गुरूंना देवापेक्षाही मोठे स्थान दिले आहे; कारण देव नाही, तर गुरु साधकाला ईश्वरप्राप्तीसाठी प्रत्यक्ष साधना शिकवतात, त्याच्याकडून ती करवून घेतात आणि त्याला ईश्वरप्राप्तीही करवून देतात !

 

५. देवता आणि गुरु

अ. ‘देवतांकडून भोग (ऋद्धी-सिद्धी) प्राप्त करून घेतल्यास बुद्धी अशुद्ध रहाते. गुरूंकडून मिळवल्यास बुद्धी अशुद्ध न राहिल्यामुळे त्यांचा सदुपयोग होतो. सदुपयोग म्हणजे आपल्या वैभवाचा उपयोग मुमुक्षू, साधक, सिद्ध, अयाचित (न मागता मिळणार्‍या भिक्षेवर उपजीविका करणारे), दीनदुबळे यांच्यासाठी होतो.

आ. देवता लवकर प्रसन्न होत नाहीत. सहसा त्यांना आपली दया येत नाही. गुरूंचे अंतःकरण हे लोण्यापेक्षाही मऊ असल्यामुळे गुरु दयाळू असतात. केवळ ‘आपण दिलेल्या वैभवाचा त्या व्यक्तीकडून सदुपयोग होईल’, अशी त्यांची निश्चिती व्हावी लागते. असे झाले म्हणजे ते मागण्याची वेळ आपल्यावर आणत नाहीत, तर स्वतःहून ते वैभव देतात. असे करतांनासुद्धा ते वैभव न स्वीकारणारा शहाणा शिष्य गुरूंना फार फार आवडतो. मग त्याला ते स्वतःलाच देऊन टाकतात !’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

इ. क्षुद्रदेवता आणि गुरु : देवता, गुरु आणि संत यांच्याकडून कामना पूर्ण करून घेऊन विषयभोग भोगत असतांना हळूहळू वैराग्य प्राप्त होऊन, कामना असणारा परमार्थाचा अधिकारी होत असतो. क्षुद्र (गौण) देवतांकडून कामना पूर्ण करून घेतांना हे होत नाही.

 

६. अवतार आणि गुरु

गुरूंचे कार्य बहुधा दोन-चार शिष्यांच्या संदर्भात असते, तर अवतार सर्वसाधारणतः समाजाचे रक्षण अन् धर्मस्थापना यांसाठी असतात. मानवदेह धारण करणारे श्रीराम, श्रीकृष्ण आदी अवतारही गुरुगृही राहिले आणि त्यांनी गुरुसेवा करून गुरुकृपा संपादन केली. हे सर्व अर्थातच इतरांना शिकवण्यासाठी होते.

 

७. प्रवचनकार आणि गुरु

‘प्रवचनकारांचे बोलणे

गुरूंचे (संतांचे) बोलणे

१. ठरवून उत्स्फूर्त
२. कृत्रिमता सहजता
३. बुद्धीतून उगम आत्म्यातून उगम
४. संत तुकाराम, ज्ञानेश्वर आदींना उद्धृत करणे स्वानुभूतीतून
५. जडत्व चैतन्य
६. ऐकणार्‍याला थोड्या वेळाने कंटाळा येणे ऐकणारा घंटोन्घंटे (तासन्तास) ऐकू शकतो.
७. दुसर्‍याच्या मनातील प्रश्नांना उत्तरे न मिळणे प्रश्न न विचारता उत्तरे मिळणे
८. बहुधा अहंकार असणे अहंकार कधीच नसणे’

८. भगत आणि गुरु

भगत प्रापंचिक अडचणी दूर करतात, तर गुरूंचा प्रापंचिक अडचणींशी संबंध नसतो. त्यांचा संबंध शिष्याच्या केवळ आध्यात्मिक उन्नतीशी असतो.

 

९. सर्वसाधारण व्यक्ती, साधक आणि गुरु

क्रिया म्हणजे हेतूविरहित कृती. साधनेत जसजशी प्रगती होते, त्या प्रमाणात स्थूलदेह सोडून इतर देहांचे कर्म अल्प अल्प होत जात असल्याने एकूण कर्म आणि क्रिया अल्प होत जातात.

कर्मामागील इच्छा

एकूण कर्म अन् क्रिया (टक्के)

कर्म अन् क्रिया यांचे प्रमाण

कर्म
(टक्के)

क्रिया (टक्के)

१. सर्वसाधारण व्यक्ती स्वेच्छा (स्वतःची) १०० ९० १०
२. साधक परेच्छा (दुसर्‍याची) ४० ७० ३०
३. गुरु ईश्वरेच्छा (ईश्वराची) १० ९०

१०. शिक्षक आणि गुरु

शिक्षक ठराविक वेळ आणि केवळ शब्दांच्या माध्यमातून विद्यार्थ्याला शिकवतात, तर गुरु चोवीस घंटे (तास) शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात, तर शिक्षकाचा विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक जीवनाशी फारसा संबंध नसतो. थोडक्यात म्हणजे गुरु हे शिष्याचे संपूर्ण जीवन व्यापून टाकतात, तर शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी संबंध काही घंटे आणि आणि तोही काही विषय शिकवण्यापुरताच मर्यादित असतो.

‘शिक्षक आणि गुरु’ या विषयावरील अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा !

टीप १ – संत आणि गुरु दोघेही न्यूनतम ७० टक्के आध्यात्मिक पातळीचे असतात. ७० टक्क्यांपासून पुढची उन्नती संतांपेक्षा गुरूंमध्ये जास्त शीघ्र होते. ते ८० टक्के (सद्गुरु) आणि ९० टक्के (परात्परगुरु) आध्यात्मिक पातळीला संतांच्या तुलनेत शीघ्र पोहोचतात. याचे कारण असे की, ते सतत शिष्याच्या उन्नतीच्या कार्यात मग्न असतात, तर संत काही वेळा भक्तांची असत्ची कार्येही करतात. (मूळस्थानी)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गुरूंचे शिष्यांना शिकवणे आणि वागणे’

Leave a Comment