समर्थ रामदासस्वामींना त्यांच्या आजारावरील उपाय म्हणून वाघिणीचे दूध आणून देणारे छत्रपती शिवाजी महाराज !

बालकांसाठी परिपाठ !

shivaji_maharajशिवाजीराजे प्रत्येक गुरुवारी समर्थांचे दर्शन घेतल्याविना भोजन करत नसत. एके दिवशी राजे समर्थांच्या दर्शनार्थ निघाले असता महाबळेश्‍वरच्या रानात समर्थ असल्याचे त्यांना समजले. समर्थ दर्शनार्थ कितीही कष्ट पडले, तरी त्याची खंत ते मानत नसत.

त्यांनी समर्थांचा पुष्कळ शोध केला. दिवस मावळला तरी त्यांना त्यांच्या ठिकाणाचा शोध लागला नाही. शेवटी काही सेवकांसह ते मशाली घेऊन निघाले. घोर जंगल असल्यामुळे सोबतच्या माणसांची आणि त्यांची चुकामूक होऊन ते एकटेच फिरू लागले. इतक्यात एका गुहेतून जोरजोरात विव्हळण्याचा स्वर ऐकू आला. तो स्वर समर्थांचाच वाटल्याने ते त्या गुहेत शिरले.

शिवराय (समर्थांना वंदन करून) : महाराज, आपल्याला काय होत आहे ?

समर्थ : शिवबा, काय सांगू तूला ? पोटशुळाने भयंकर व्यथा होत आहे. या दुखण्यापासून जगणार, असे मला वाटत नाही.

राजे : महाराज, आपण असे म्हणू नका. आपल्यापासून तर आम्हासारख्यांना धीर मिळायचा. आपली आज्ञा व्हावी, म्हणजे मी लगेच चांगले वैद्य आणतो. औषधोपचार केल्यावर तुम्हाला लगेच बरे वाटू लागेल.

समर्थ : शिवबा, हे काही नेहमीच्या दुखण्यापैकी दुखणे नसून हा मोठा असाध्य रोग आहे. यासाठी वैद्याचा काही एक उपयोग होणार नाही. यावर रामबाण औषध म्हणजे केवळ वाघिणीचे दूध होय; पण आपला जीव धोक्यात घालून ते मला आणून देणार तरी कोण ?

राजे : आपल्या कृपाशीर्वादाने मी हे काम करू शकेन. (असे म्हणून राजे समर्थांचा तांब्या घेऊन निघाले.)

समर्थ : शिवबा, हे काय ? तू निघालास ? नको नको. मी जोगड्या आहे. मला ना बायको, ना पोर. मी मेलो, तर रडणारेसुद्धा कोणी नाही. तू आज सहस्रो लोकांना हवाहवासा वाटणारा; म्हणून हे काम तुझ्यासारख्याने करायचे नाही.

राजे : महाराज, हा देह कधी ना कधी तरी नाहीसा व्हायचाच आहे ना ? सद्गुरुसेवेत खर्ची पडला, तर याचे सार्थक तरी होईल.

राजे रानात चालले असता समोर वाघाची दोन पिल्ले जाळीतून बाहेर पडलेली त्यांना दिसली. त्यांना पहाताच आपली इच्छा निश्‍चितच सफल होईल; म्हणून राजांना आनंद झाला. वाघिणीची वाट पहात ते तेथेच बसले. थोड्या वेळाने दुरून येत असलेली वाघीण त्यांच्या दृष्टीस पडली. आपले काम आज यशस्वी होईल, अशी त्यांना निश्‍चिती वाटली. राजांना पाहून आपल्याला आज आयते भक्ष्य मिळाले; म्हणून आनंदाने वाघीण जोरात धावत आली. राजांनी तिला वंदन करून औषधाकरीता आपल्या गुरूंना दूध देण्याविषयी तिची प्रार्थना केली आणि ते म्हणाले, माझ्या देहावर जर तुझे मन आसक्त झाले असेल, तर तुझे दूध गुरूंना देऊन मी लगेच परत येतो. त्या क्षणी वाघिणीचा क्रूर स्वभाव नाहीसा होऊन ती एखाद्या सभ्य गायीप्रमाणे उभी राहिली. त्यावर राजांनी लगेच तिचे दूध काढून घेतले.

आता राजे तेथून परतणार इतक्यात, जय जय रघुवीर समर्थ, असे म्हणून समर्थांची स्वारी त्यांच्यासमोर येऊन दाखल झाली. त्यांनी शिवाजींची पाठ थोपटून, शिवबा, तू खरोखरच धन्य आहेस ! असे उद्गार काढले.

अधिक माहितीसाठी वाचा सनातनचा ग्रंथ बोधकथा