नम्र, परिपूर्ण सेवेचा ध्‍यास असलेले आणि सर्वांवर पितृवत् प्रेम करणारे श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७६ वर्षे) १२५ व्‍या संतपदी विराजमान !

पू. अरविंद सहस्रबुद्धे
पू. अरविंद सहस्रबुद्धे

पू. अरविंद सहस्रबुद्धे यांच्या संतसन्मान सोहळ्याचा भाववृत्तांत !

पुणे, ६ जुलै (वार्ता.) – आनंदी, स्थिर, नम्र, परिपूर्ण सेवेचा ध्‍यास असलेले आणि सर्वांवर पितृवत् प्रेम करणारे सनातनचे साधक श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७६ वर्षे) सनातनच्‍या १२५ व्‍या संतपदी विराजमान झाले. पुणे येथे झालेल्‍या एका अनौपचारिक कार्यक्रमात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अरविंद सहस्रबुद्धे यांच्याविषयी लिहिलेला संदेश सनातनच्‍या धर्मप्रचारक संत सद्गुरु स्वाती खाडये यांनी वाचून त्यांच्या संतपदाची आनंदवार्ता सर्वांना दिली. ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असणारे सनातनचे साधक श्री. महेश पाठक (वय ४२ वर्षे) यांनी पू. सहस्रबुद्धेकाका यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. त्‍यानंतर सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी पू. अरविंद सहस्रबुद्धे यांना शाल,  श्रीफळ आणि भेट वस्‍तू देऊन त्‍यांचा सन्‍मान केला. या सोहळ्‍याला पू. अरविंद सहस्रबुद्धे यांच्‍या ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असणार्‍या पत्नी सौ. मंगला सहस्रबुद्धे, मुलगी सौ. अंजली बोडस, पू. (सौ.) मनीषा पाठक आणि पुणे येथील काही साधक उपस्‍थित होते.

गुरुपौर्णिमेनंतरही संतरूपी कृपाप्रसाद लाभला । त्यायोगे साधकांनी आनंद अनुभवला ।।
कर्मयोगी जिवाचा साधनाप्रवास उलगडला । भावक्षणांमध्ये प्रत्येक साधक कृतकृत्य जाहला ।।

सद्गुरु स्वाती खाडये यांनी पू. सहस्रबुद्धे आणि त्यांच्या पत्नी सौ. मंगला सहस्रबुद्धे (६७ टक्के आध्यात्मिक पातळी) यांच्याशी त्यांच्या साधनाप्रवासाविषयी अतिशय प्रेमळ वाणीद्वारे संवाद साधला. पू. अरविंद सहस्रबुद्धे यांच्‍या जीवनात साधनेमुळे झालेले आमुलाग्र पालट, त्‍यांनी अनेक कठीण प्रसंगांना स्‍थिरतेने सामोरे जाणे, त्‍यांची सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावर असलेली श्रद्धा यांचे प्रसंग ऐकून उपस्‍थितांची भावजागृती झाली. साधकांवर पितृवत् प्रेम करणारे पू. अरविंद सहस्रबुद्धे यांना संत घोषित केल्‍यावर महाराष्‍ट्रातीलच नव्‍हे, तर त्‍यांच्‍या संपर्कात आलेल्‍या भारतातील अनेक साधकांनाही आनंदाची पर्वणीच प्राप्‍त झाली. पू. काकांच्या संपर्कातील साधकांनी मनोगत व्यक्त केले.

 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अरविंद सहस्रबुद्धे यांच्याविषयी लिहिलेला संदेश

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘पुणे येथील श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७६ वर्षे) पूर्वी नास्तिक होते. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास आरंभ केल्यानंतर, तसेच सनातनच्या आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन केल्यानंतर त्यांची देवावर श्रद्धा बसली. प्रेमभाव आणि सहजता या गुणांमुळे सहस्त्रबुद्धेकाकांनी अल्पावधीतच सर्वांची मने जिंकली आहेत. ते त्यांच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक साधकाची जन्मतिथी लिहून घेतात आणि त्या तिथीला साधकाला आठवणीने शुभेच्छा देतात. पूर्वी काकांच्या घरी अनेक संत आणि साधक अनेक वेळा वास्तव्याला राहिले आहेत. काका-काकूंमधील प्रेमभावामुळे ते साधकाचे आदरातिथ्य पुष्कळ आपलेपणाने करत असत. आता ‘दोघांचे वय आणि शारीरिक मर्यादा यांमुळे पूर्वीच्या तुलनेत त्यांना शारीरिक सेवा जमत नाही’, याची त्यांना खंत वाटते.

त्यांचे वय अधिक असूनही पत्नीला (सौ. मंगला अरविंद सहस्रबुद्धे (वय ६९ वर्षे) यांना)) साहाय्य करण्यासाठी ते घरातील सर्व कामे करतात. त्यात त्यांना कुठलाही न्यूनपणा वाटत नाही. ते मनाने पुष्कळ स्थिर असतात. त्यांच्या हर्नियाच्या (टीप) झालेल्या मोठ्या शस्त्रकर्माच्या वेळी आणि नंतरही ते पुष्कळ स्थिर अन् शांत होते. (टीप – हर्निया : अंतर्गळ, म्हणजे अवयवांना त्यांच्या जागी स्थिर ठेवणारे स्नायू शिथिल होणे.)

मागील १५ वर्षांपासून ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा अखंड करत आहेत. ते ही सेवा मनापासून, भावपूर्णरित्या, अचूक आणि परिपूर्ण करतात. आतापर्यंत कोणालाही त्यांच्या सेवेचा पाठपुरावा घ्यावा लागला नाही. ‘ते सेवेशी एकरूप झाले आहेत’, असे वाटते. त्यांचे ‘हर्निया’चे शस्त्रकर्म झाल्यानंतरही थकवा असतांना ते बसून, तर कधी आडवे पडून सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ‘मला काही येत नाही. सर्वकाही देव करतो’, असा त्यांचा भाव असतो. हिशोबात काही फरक असल्यास रात्री उशिरापर्यंत जागून ते फरक शोधतात आणि मगच झोपतात. त्यांच्या या उदाहरणावरून गुरूंच्या एका पैशाचा हिशोब रात्रभर शोधणार्‍या संत एकनाथ महाराजांची आठवण येते.

सतत आनंदी रहाणे, सर्वांशी स्वतःहून बोलणे, चूक मनापासून स्वीकारणे, चूक झाल्यावर साधकांची क्षमा मागणे’ इत्यादी अनेक गुणांमुळे ते सर्वांनाच जवळचे वाटतात.

त्यांच्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर शांत वाटून आनंद जाणवतो. त्यांच्या बोलण्यात पुष्कळ नम्रता आणि प्रीती जाणवते. ते अंतर्मुख झाले आहेत. ते सतत ईश्वराच्या अनुसंधानात असतात. दिवसभर त्यांच्या प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजप चालू असतो. त्यांच्या चेहर्‍यावर निराळे तेज जाणवते.

त्यांच्या पत्नी सौ. मंगला अरविंद सहस्रबुद्धे (वय ६९ वर्षे) सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असून त्यांनी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.

सतत आनंदी असणार्‍या काकांनी वर्ष २०१३ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. ‘शारीरिक त्रासातही शांत आणि स्थिर रहाणे, अल्प अहं’ इत्यादी अनेक गुणांमुळे आजच्या शुभदिनी त्यांनी ७१ टक्के आध्यात्मिक गाठली आहे अन् ते ‘व्यष्टी’ संत म्हणून सनातनच्या १२५ व्या संतपदावर विराजमान झाले आहेत.

पू. अरविंद सहस्रबुद्धे यांची पुढील आध्यात्मिक प्रगती अशीच जलद गतीने होईल, याची मला निश्चिती आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (६.७.२०२३)

 

सेवा करतांना कुणाविषयी प्रतिक्रिया आली नाही ! – पू. अरविंद सहस्रबुद्धे

‘मी संत झालो’, असे समजल्यावर निर्विचार स्थिती अनुभवत आहे. मला पुष्कळ आनंद झाला.

मला सेवा करतांना कधीही कोणत्याही साधकाविषयी प्रतिक्रिया आली नाही. कधी काही वाटलेच, तर मी लगेच क्षमा मागायचो. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सांगितल्याप्रमाणे लगेच मनाला स्वयंसूचना दिली जाते की, ही चूक पुन्हा होता कामा नये. माझ्याकडे काही जणांची जन्मतिथी लिहिलेली आहे. वाढदिवसाच्या संबंधित तिथीला मी त्या व्यक्तीला सेवा म्हणून शुभेच्छांसाठी भ्रमणभाष करतो.

गेल्या २० वर्षांपासून माझ्याकडे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ची सेवा आहे; पण मला या सेवेचा कधीच कंटाळा आला नाही. मी त्या सेवेला नेहमीच व्यष्टी साधनेची जोड दिली. साप्ताहिकाच्या नोंदींची सेवा परिपूर्ण झाली पाहिजे, असाच माझा भाव असतो. जे काही गुरुदेवांनी सांगितले, ते बिनचूक आणि परिपूर्ण करायचे. एकाग्रतेने सेवा करायची, असे मला वाटते.

 

पू. अरविंद सहस्रबुद्धे यांनी साधकांना दिलेला संदेश !

साधना आणि सेवा परिपूर्ण अन् भावपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करा !

गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांमधून मार्गदर्शन करतच असतात. ते आपण कृतीत आणायला हवे. त्यांनी सांगितलेली साधना, सेवा बिनचूक आणि परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. साधकांनी मायेत अडकायला नको. जी सेवा, साधना होत आहे, ती गुरुदेवच करवून घेत आहेत, असा भाव ठेवायला हवा.

पू. सहस्रबुद्धे यांचा त्यांच्या पत्नीविषयीचा भाव –
देवीने कमळाला चिखलातून बाहेर काढले !

अरविंद म्हणजे कमळ ! मंगला हे देवीचे नाव. ‘श्री महालक्ष्मीदेवीनेच या कमळाला चिखलातून बाहेर काढले’, असा माझा भाव आहे. (पू. सहस्रबुद्धे यांच्या पत्नीचे नाव सौ. मंगला आहे.) या वेळी सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘पू. काकांचा भाव किती अत्युच्च आहे ! पू. काकांची अंतर्मनातून साधना चालूच असल्याने काकूंना त्यांना साधनेत आणण्यासाठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागले नाहीत.’’

 

घरी येणार्‍या प्रत्येक साधकाला आई-वडिलांसारखे सांभाळणारे पू. अरविंद सहस्रबुद्धे ! – सद्गुरु स्वाती खाडये

सद्गुरु स्वाती खाडये

पू. सहस्रबुद्धेकाका यांनी अनेक साधकांना सेवेनिमित्त घरी रहायला दिले. सर्वांचे अतिशय प्रेमाने आदरातिथ्य केले. मीही त्यांच्या घरी अनेक वेळा राहिले आहे. सर्वांनाच त्यांच्या घरी रहावेसे वाटते. त्यांनी येणार्‍या प्रत्येकाला आई-वडिलांसारखे सांभाळले. मी जेव्हा पुण्यात आले, तेव्हा पहिल्यांदा त्यांच्याच घरी गेले होते. पहिल्याच दिवशी त्यांनी माझे मन जिंकले. पुण्यात आले की, मी हक्काने त्यांच्याकडे रहायचे. हे सर्व आठवले की, पुष्कळ कृतज्ञता वाटते. ते मायेपासून अलिप्त राहिले. त्यांचे घर म्हणजे आश्रमच आहे. त्यांचाही तसा भाव आहे. पू. सहस्रबुद्धे आणि सौ. सहस्रबुद्धे म्हणजे आदर्श पती-पत्नी आणि आदर्श साधक असून त्यांचे कुटुंबही आदर्श आहे.

 

‘सत्यम्, शिवम्, सुंदरम्’ अशी सेवा करणारे आणि निर्मळ मनाचे पू. सहस्रबुद्धेकाका ! – पू. (सौ.) मनीषा पाठक, पुणे

पू. (सौ.) मनीषा पाठक

माझ्या विवाहानंतर मी पुण्यात आल्यावर सहस्रबुद्धे दांपत्याचे घर माझ्या घराजवळ असल्याने ते माझे माहेरच होते. पूर्वी माझा स्वभाव भावनाशील होता. काका-काकूंनीच मला स्थिर राहून प्रयत्न करायला शिकवले. मी गर्भवती असतांना काही कालावधीसाठी मला पूर्ण वेळ विश्रांती घेण्यास सांगण्यात आले होते, तेव्हा त्या दोघांनी पुष्कळ प्रेमाने माझी शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावर काळजी घेतली. पू. सहस्रबुद्धे काका म्हणजे माझे वडीलच आहेत. ते मला त्यांच्या मुलीप्रमाणे सर्व सांगतात. त्यांच्यात पुष्कळ निरागसता आहे. त्यांची सेवा ‘सत्यम्, शिवम्, सुंदरम्’ अशी असते. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ची सेवा ते परिपूर्ण करतात.

स्वतःसमवेत ते इतरांनाही घडवतात. लहान मुलांप्रमाणे त्यांचे मन निर्मळ आहे. माझ्या साधनेच्या प्रवासात मला जेव्हा आध्यात्मिक आधाराची आवश्यकता होती, तेव्हा गुरुदेवांचा अदृश्य हात काका-काकूंच्या माध्यमातून माझ्या पाठीशी होता. ते दोघेही मला ‘तू लढ, प्रयत्न कर’, असे सतत सांगायचे. त्यांच्यामुळे माझ्या आई-वडिलांना माझी काळजी नसायची.

 

यजमान संतपदी विराजमान झाल्याचा दिवस जीवनात सुवर्णाक्षरांनी कोरण्यासारखा आहे ! – सौ. मंगला अरविंद सहस्रबुद्धे (वय ६९ वर्षे), पू. अरविंद सहस्रबुद्धे यांच्या पत्नी

सौ. मंगला अरविंद सहस्रबुद्धे

‘आजचा (यजमान संतपदी विराजमान झाल्याचा) दिवस परमभाग्याचा ! गुरुदेवांनी आम्हाला घरच्या घरी संत दिले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची शक्ती गुरुदेवच मला देणार आहेत. एका पत्नीच्या जीवनात आणखी काय महत्त्वाचे असणार ? यजमान संत झाले, हेच माझे भाग्य ! आजचा दिवस माझ्या जीवनात सुवर्णाक्षरांनी कोरण्यासारखा आहे. आतापर्यंत अनेक कठीण प्रसंगांतून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी तारून नेले. गुरुदेवा, ‘मला तुमच्या चरणांशी ठेवून घ्या’, अशी प्रार्थना आहे.’

 

नातेवाईकांनी व्यक्त केलेले मनोगत

बाबांनी (पू. अरविंद सहस्रबुद्धे यांनी) नेहमीच कर्तव्याला प्राधान्य दिले ! – सौ. अंजली बोडस (पू. अरविंद सहस्रबुद्धे यांची मुलगी) (वय ४८ वर्षे), पुणे

सौ. अंजली बोडस

संतपदाची वार्ता ऐकून माझे मन भरून आले. बाबांच्या नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे झालेल्या प्रवासाची मी साक्षीदार आहे. युवावस्थेत असतांना त्यांनी अनेक वयोवृद्ध नातेवाईकांना सांभाळण्यासाठी वेळ दिला. त्यांनी नेहमीच कर्तव्याला प्राधान्य दिले. कोणत्याही साहाय्याची कुणाकडूनही अपेक्षा केली नाही. माझ्या आजोबांनी त्यांच्या सर्व लहान भावंडांना शिकवले, मोठे केले. एकत्र कुटुंबपद्धत असल्याने आजोबांनीच त्यांचे सर्व काही केले. त्यांच्याच विचारांची जडणघडण बाबांमध्ये झाली आहे.

मी कळत्या वयाची झाले, तेव्हापासून आई सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागली. सनातन संस्थेने आम्हाला पुष्कळ आधार दिला. ‘सर्वकाही सांभाळून सेवा आणि साधना करा’, असे सनातन संस्था सांगते. आजकाल असे कार्य करणारी संस्था कुठेच नाही. सनातन संस्थेविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते.

Leave a Comment