पाप घडण्याची कारणे (भाग २)

अनुक्रमणिका

११. दशविध पापे

१२. देवता, गुरु आणि मंदिर यांच्या द्रव्याचे दान, अयोग्य व्यय आणि अपहार यांमुळे पाप लागणे

१३. पतीला लागणारे पत्नीचे पाप

१४. पाप एकमेकांना भोगावे लागते, अशा जोड्या

१५. पाप्याशी संबंध ठेवणार्‍याला लागणारे पाप

१६. मांस वापरून श्राद्ध करणार्‍याला पाप लागणे

१७. धर्मयुद्धापासून पाठ फिरवणे, म्हणजे पापाचा भागीदार होणे

१८. सनातन (हिंदु) धर्माचा नाश होत असतांना स्वस्थ बसणारा पापाचा वाटेकरी असेल !

१९. नकळत झालेल्या कर्मानेही पाप लागणे

२०. युगानुसार मनुष्याचे पापी होण्याचे कारण

२१. गतजन्मींच्या पापांचा या जन्मात होणारा परिणाम


 

११. दशविध पापे

तिथ्यादीतत्त्वात काया, वाचा आणि मन यांची मिळून यांसारखी दशविध पापे सांगितली आहेत.

अ. झाडांचा चीक पिणे आणि अफू, वांगे, तोंडले, कांदा आणि लसूण खाणे

आ. जाईच्या फुलांचा व्यापार करणे

इ. सार्वजनिक निधीचा अपहार करणे

ई. कुग्रामात वास्तव्य करणे

उ. स्त्रीचा क्रय-विक्रय करणे

ऊ. स्निग्ध पदार्थांचा विक्रय करणे

ए. अतिथीवाचून भोजन करणे

ऐ. द्रव्य घेऊन वेदाध्यापन करणे

ओ. वैद्यकीय व्यवसाय करणे

औ. शस्त्राने उपजीविका करणे.

 

१२. देवता, गुरु आणि मंदिर यांच्या द्रव्याचे दान, अयोग्य व्यय आणि अपहार यांमुळे पाप लागणे

देवद्रव्यं गुरुद्रव्यं द्रव्यं चण्डेश्वरस्य च ।
त्रिविधं पतनं दृष्टं दानलंघनभक्षणात् ।। – स्कन्दपुराण

अर्थ : देवता (मूर्ती आदी), गुरु आणि भगवान चण्डेश्वराच्या द्रव्याचे दान, लंघन (अयोग्य व्यय) आणि भक्षण या तिघांनी पाप लागते.

 

१३. पतीला लागणारे पत्नीचे पाप

पत्नीचे अर्धे पाप पतीला भोगावे लागते; कारण पत्नी पाप करत असतांना तिला प्रतिबंध न केल्याने ते त्याचे पाप होते.

 

१४. पाप एकमेकांना भोगावे लागते, अशा जोड्या

अ. पती – पत्नी

आ. शिक्षक – विद्यार्थी

इ. धनी (मालक) – सेवक (नोकर)

ई. राजा – प्रजा

उ. आचार्य, पुजारी आणि उपाध्याय – यजमान

 

१५. पाप्याशी संबंध ठेवणार्‍याला लागणारे पाप

पाप्याशी एक वर्ष संबंध ठेवणाराही पापाचा भागीदार होतो. घोर पाप करणार्‍याचे रक्षण करणार्‍याला शुभशकून समर्थ होत नाहीत.

 

१६. मांस वापरून श्राद्ध करणार्‍याला पाप लागणे

पूर्वी प्राणीवध करून मांसाने पितरांना तृप्त करत, असा आधुनिक वेदसंशोधकांचा दावा आहे; पण ब्राह्मणांना मांसभक्षण निषिद्ध आहे.

यस्तु प्राणिवधं कृत्वा, मांसैस्तर्पयते पितॄन् ।
स विद्वांन् चन्दनं दग्ध्वा कुर्यादङ्गारविक्रयम् ।।
क्षिप्त्वा कूपे यथा किचित् बाल आदातुमिच्छति ।
पतत्यज्ञानतः सोऽपि मांसेन श्राद्धकृत्तथा ।।

अर्थ : जो प्राणीवध करून मांसाने पितरांना तृप्त करतो, तो दीडशहाणा ‘चंदन जाळून कोळशाचा व्यापार करायला सिद्ध झाला आहे’, असे समजावे. विहिरीत एखादा पदार्थ टाकल्यावर तो घेण्याकरता हात लांब करून डोकावणारे बालक जसे विहिरीत पडते, तसेच ‘मांस वापरून श्राद्ध करणार्‍याला पाप लागते’, असे समजावे.

 

१७. धर्मयुद्धापासून पाठ फिरवणे, म्हणजे पापाचा भागीदार होणे

भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतो, `अर्जुना, धर्मयुद्धापासून तू पाठ फिरवलीस, तर धर्म आणि कीर्ती नष्ट होईलच, तसेच तू पापाचा भागीदार होशील; म्हणून युद्धाला सज्ज हो अन् युद्ध कर.’

 

१८. सनातन (हिंदु) धर्माचा नाश होत असतांना स्वस्थ बसणारा पापाचा वाटेकरी असेल !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘स्थापयध्वमिमं मार्गं प्रयत्नेनापि हे द्विजाः ।
स्थापिते वैदिके मार्गे सकलं सुस्थितं भवेत् ।। – सूतसंहिता, अध्याय २०, श्लोक ५४

अर्थ : (सूतऋषि म्हणतात,) बुद्धीमंतांनी सनातन हिंदु धर्माच्या स्थापनेकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. सनातन वैदिक हिंदु धर्म स्थिर होताच सगळे स्थिर आणि ऐश्वर्यशाली होईल.

आज अधर्माची, नास्तिकतेची, पुरोगामी समाजवादादी पाखंडे आणि शेकडो दस्युदले आमच्या सनातन धर्माचा नाश करायला प्रवृत्त झाली आहेत. अशा स्थितीत जर कुणी धनवान, सत्तावान, बुद्धीमान आणि समर्थ हा तमाशा पहात स्वस्थ बसेल, तर ते साक्षात पाप आहे. जो कुणी समर्थ असूनही धर्मरक्षणार्थ यत्न करणार नाही, तो पापाचा वाटेकरी होईल.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

 

१९. नकळत झालेल्या कर्मानेही पाप लागणे

एका पुण्यवान आणि प्रजाहितदक्ष राजाने त्या काळच्या गायी दान देण्याच्या प्रचलित पद्धतीनुसार गायी दान देण्याचे ठरवले. दान देण्यासाठीच्या गायी नेत असतांना वाटेत चुकून एक गाय त्या कळपात शिरली आणि ती दान दिली गेली. काही दिवसांनी ज्या ब्राह्मणाची ती गाय होती, त्याला ती दुसर्‍याकडे दिसली. त्याच्याकडे ती एकच गाय असल्याने अन् त्याचे आपल्या गायीवर अत्यंत प्रेम असल्याने तो गायीसाठी तळमळत होता. चौकशी केल्यावर ती गाय राजाकडून दान मिळाल्याचे त्याला समजले. तो राजाकडे गेला आणि त्याने तीच गाय परत मिळण्यासाठी राजाला विनंती केली. ‘एकदा दान दिलेली गाय परत कशी मागायची ?’, असा राजाला प्रश्न पडला. राजाने ब्राह्मणाला इतर गायी देऊ केल्या; परंतु त्याने घेतल्या नाहीत. पुढे यथायोग्य काळी ते सर्व जण निवर्तले.

राजाने आयुष्यभर जरी सर्व पुण्यकर्मे केली असली, तरी केवळ नकळत घडलेल्या त्या एका चुकीमुळे आणि ब्राह्मणाच्या तळमळण्यामुळे त्याला पाप लागले. ते पाप केल्याचे प्रायश्चित्त म्हणून त्याला सरड्याचा जन्म प्राप्त झाला. ते पाप भोगून संपल्यावर पुण्याचे फळ भोगण्यासाठी तो देवलोकी गेला.

 

२०. युगानुसार मनुष्याचे पापी होण्याचे कारण

युग

मनुष्याचे पापी
होण्याचे कारण

अ. कृत (सत्य) पापी व्यक्तीशी संभाषण करणे
आ. त्रेता पापी व्यक्तीला स्पर्श करणे
इ. द्वापर पापी व्यक्तीच्या घरात शिजलेले अन्न खाणे
ई. कलि प्रत्यक्ष पापी कृत्य करणे

 

२१. गतजन्मींच्या पापांचा या जन्मात होणारा परिणाम

गतजन्मीचे पाप

या जन्मात
भोगावे लागणारे भोग

अ. दारू पिणे दात काळे होणे
आ. सोन्याची चोरी नखे कुजणे
इ. पुजार्‍याला आश्वासन देऊनही दक्षिणा न देणे दारिद्र्य
ई. गुरुपत्नीसमवेत संभोग बरा न होणारा त्वचाविकार होणे
उ. ब्राह्मणाचा अपमान किंवा वध क्षयरोग होणे

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘पुण्य-पाप आणि पापाचे प्रायश्चित्त’

 

पाप-पुण्याच्या पलीकडे जाण्यासाठी साधना आवश्यक !

पाप घडण्याची कारणे यांविषयी आपण या लेखात जाणून घेतले.

येथे लक्षात घ्यावयाची गोष्ट ही की, जिवाला पाप-पुण्य लागण्याच्या मुळाशी जिवाचा ‘अहं’ हाच कारणीभूत असतो. विविध योगमार्गांनुसार अहं दूर करता येतो. उदाहरणादाखल नामसंकीर्तनयोगात नामधारकाचा नामजप चालू असतांना त्याच्याकडून जे कर्म होते, त्यात हेतू नसल्याने ती केवळ क्रिया असते, म्हणजेच कर्म हे ‘अकर्म कर्म’ होते, म्हणजेच त्या कर्माचे फळ भोगावे लागत नाही. नामसंकीर्तनयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग, गुरुकृपायोग अशा विविध योगमार्गांनुसार पाप-पुण्याच्या पलीकडे जाता येते.

गुरुकृपायोगानुसार पाप-पुण्याच्या पलीकडे जाण्याबरोबरच जलद आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी नेमकी कोणती साधना करावी हे जाणून घेण्यासाठी ‘गुरुकृपायोग’ यावर क्लिक करा !

Leave a Comment