यमराजाची धर्माधिष्ठित न्यायप्रणाली !

‘हिंदु धर्मात पुनर्जन्म आणि कर्मफलन्याय सांगितला आहे. यानुसार आपल्या मृत्यूनंतर आपल्या लिंगदेहाचा पुढील प्रवास ठरतो. ८४ लक्ष योनींतून प्रवास केल्यानंतर मनुष्यजन्म मिळतो आणि याच जन्मात आपल्याला ईश्‍वरप्राप्ती करता येते’, असेही धर्म सांगतो. या अनुषंगाने मृत्यूनंतर काय होते ? याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते. सनातनच्या सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांना सूक्ष्मातून यमराजाच्या धर्माधिष्ठित न्यायप्रणालीविषयी मिळालेले ज्ञान येथे देत आहोत. यात चांगल्या-वाईट कर्मांनुसार मिळणारी पुढील गती आदींविषयी माहिती दिली आहे. लोकमान्य टिळक यांनीही त्यांना इंग्रज न्यायाधिशांनी शिक्षा ठोठावल्यावर ‘मी कोणताही गुन्हा केलेला नाही. या न्याययंत्रणेने मला शिक्षा दिलेली असली, तरी यापेक्षाही एक मोठी न्याययंत्रणा (ईश्‍वराची) आहे. तेथे मला नक्कीच न्याय मिळेल’, अशा आशयाचे वक्तव्य करून या दिव्य न्यायप्रणालीवर अधिक विश्‍वास दर्शवला होता.

कु. मधुरा भोसले

 

१. पापी व्यक्तींची मृत्यूत्तर यमपुरीकडे वाटचाल होणे

पापी व्यक्तींचा मृत्यू झाल्यावर यमदूत पापी व्यक्तींच्या लिंगदेहाला दक्षिण दिशेला नेऊन १६ यमपुरी ओलांडून १७ व्या मुख्य यमपुरीत नेतात.

 

२. यमधर्माचा न्यायाचा दरबार

यमपुरीच्या अंत:पुरात धर्मसिंहासनावर आरूढ झालेला यमधर्म (यमराज किंवा यमदेव) चित्रगुप्त आणि प्रमुख यमदूत यांसह न्यायाच्या दरबारात उपस्थित असतो.

 

३. यमधर्माची न्यायदानाची प्रक्रिया

३ अ. चित्रगुप्ताने कर्मांचा पाढा वाचून दाखवणे

चित्रगुप्त पापी लिंगदेहाच्या जीवनातील मनसा, वाचा आणि कर्मणा यांद्वारे, म्हणजे मन, वाचा अन् कर्म यांद्वारे प्रत्येक्ष क्षणाला केलेल्या चांगल्या-वाईट कर्मांचा पाढा वाचून दाखवतो.

३ आ. १७ दैवी शक्ती साक्ष देण्यासाठी यमपुरीत तत्क्षणी प्रगट होणे

लिंगदेहाने एखादे कर्म अस्वीकार केले, तर चित्रगुप्ताच्या आवाहनाने १७ दैवी शक्ती साक्ष देण्यासाठी यमपुरीत तत्क्षणी प्रगट होतात. ‘पृथ्वी, सूर्य, चंद्र, वरुण, मेघ, वायु, अग्नि, कुबेर, कामदेव, विश्‍वकर्मा, धन्वंतरी, अश्‍विनीकुमार, इंद्र, सप्तर्षीगण, नक्षत्रदेवता, ग्रहदेवता आणि अंतरिक्षदेवता’, अशी १७ देवांची नावे आहेत.

३ इ. ‘अंतर्साक्षी’ असलेल्या अंतर्मनाने लिंगदेहाने केलेली पापकर्मे मोठ्याने ओरडून जाहीर करणे

पापी लिंगदेहात ‘अंतर्साक्षी’ असलेले त्याचे अंतर्मन (आंतरिक विवेक) लिंगदेहाला सोडून जाते. अंतर्मन दैवी साक्ष देणार्‍या १७ देवांंच्या शेजारी उभे राहून लिंगदेहाने केलेली पापकर्मे मोठ्याने ओरडून जाहीर करते.

३ ई. यमराजाने पापाचे संपूर्ण क्षालन करण्यासाठी दंडाचे
अचूक प्रमाण, स्वरूप आणि कालावधी क्षणार्धात सुनिश्‍चित करणे

मृताच्या पापकर्मांचे प्रमाण, स्वरूप आणि पापाची तीव्रता ध्यानात घेऊन यमराज पापाचे क्षालन होण्याइतकी शिक्षा, शिक्षेचे स्वरूप, शिक्षेचा कालावधी अन् नरक यांची निश्‍चिती क्षणार्धात करतो. (याउलट हल्लीची न्यायप्रणाली न्याय द्यायला वर्षानुवर्षे घेते, तरीही तो न्याय योग्य असेल, याची खात्री नसते.) यमराजाने निश्‍चित केलेल्या दंडाचे प्रमाण, स्वरूप आणि कालावधी इतका अचूक असतो की, ठरलेल्या अवधीत पापाचे संपूर्ण क्षालन होऊन पापमुक्त झालेला लिंगदेह एका क्षणात नरकातून बाहेर पडतो.

३ उ. पापी लिंगदेह एका क्षणात नरकात पोचणे

संबंधित नरकाचे प्रमुख यमदूत पापी लिंगदेहाला शिक्षा भोगण्यासाठी घेऊन जातात आणि पुढच्या क्षणी पापी लिंगदेह संबंधित नरकात पोेचतो.

 

४. यमराजाच्या अद्वितीय दैवी कार्यामुळे त्याला
सर्वोच्च पद ‘धर्म’ आणि सर्वोत्तम विशेष नाम ‘यमधर्म’ प्राप्त होणे !

४ अ. न्याय देणारी दिव्यशक्ती

यमराजाने पापाच्या प्रमाणात निश्‍चित केलेल्या दंडाचे प्रमाण, स्वरूप आणि कालावधी १०० टक्के अचूक असल्याने हा निर्णय १०० टक्के सत्य अन् परिपूर्ण आहे. यमराजाने दिलेला निर्णय धर्माच्या सचोटीला सर्वार्थाने उत्तीर्ण झाल्याने या निर्णयाला ‘न्याय’ असे संबोधले आहे. हा न्याय देणारी शक्ती सामान्य असूच शकत नाही, ती दिव्यस्वरूप असते.

४ आ. अत्यंत दुर्मिळ दिव्यशक्ती म्हणजे धर्म

ज्या दिव्यशक्तीचा प्रत्येक निर्णय ‘न्याय’ असतो ती स्वत: धर्मस्वरूप असते. अशा अत्यंत दुर्मिळ दिव्यशक्तीला त्रिगुणात्मक जगातील ‘धर्म’ हे सर्वोच्च पद प्राप्त होते. दिव्यशक्तीच्या नावात ‘धर्म’ हे भूषण जोडल्याने त्याचे नाव सर्वोत्तम विशेष नाम असते. यासाठी यमराजाला ‘यमधर्म’ असे संबोधले जाते.

४ इ. यमधर्म आणि धर्मस्वरूप अंशावतार

यमराजाचे अंशावतार ज्येष्ठ पांडव सम्राट युधिष्ठिर यांस ‘धर्मराज’ या नावाने आदराने संबोधले जायचे. यमराजाचे दुसरे अंशावतार ‘विदुर’ होते. ते विद्वान नीतीशास्त्रज्ञ होते. त्यांनी सांगितलेली सुप्रसिद्ध ‘विदुरनीती’ ही ‘विदुराची धर्मनीती’ या नावानेही ओळखली जाते.

 

५. नरकयातना भोगतांना पापी लिंगदेहाच्या मन:स्थितीनुसार
दृढ होणारा स्वभावदोषाचा कुसंस्कार आणि प्राप्त होणारी पुढील गती

 

६. नरकयातनेतून सुटण्यासाठी संपूर्ण पापक्षालनाची शुद्धीकरण प्रक्रिया घडणे

६ अ. लिंगदेहाने संपूर्ण अस्तित्वाने नरक यातना भोगल्याने तो शीघ्र पापमुक्त होणे

नरकात गेलेल्या पापी लिंगदेहाला तेथील यमदूत त्याच्या प्रत्येक पापाचे स्वरूप आणि दुष्परिणाम यांचे प्रत्येक क्षणी स्मरण करून देतात. यमदुतांनी पापकर्मांची क्षणोक्षणी जाणीव करून दिल्याने नरकातील भयंकर यातना भोगतांना लिंगदेहाची ‘पापकर्माची स्मृती’ सदैव जागृत रहाते. त्यामुळे पापक्षालनाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत लिंगदेहाच्या सूक्ष्म आकृतीजन्य अस्तित्वासह त्याचे जाणीवरूपी सूक्ष्मतर अस्तित्वही सहभागी झालेले असते. त्यामुळे लिंगदेह पूर्ण अस्तित्त्वाने नरकयातना भोगतो. त्यामुळे निर्धारित (अल्प) कालावधीत एका पापाचे संपूर्ण क्षालन होते. अशा प्रकारे प्रत्येक पापाचे क्षालन होऊन लिंगदेह प्रत्येक पापातून मुक्त होत जातो. शेवटच्या पापाचे क्षालन झाल्यावर लिंगदेह पूर्णत: पापमुक्त होतो आणि धर्मशक्तीच्या प्रभावामुळे नरकातून बाहेर फेकला जातो.

६ आ. पापी लिंगदेहाच्या शीघ्र उद्धारासाठी कठीण कार्य प्राणपणाने पूर्ण करणारे यमदूत !

लिंगदेहाने संपूर्ण अस्तित्वासह नरकयातना भोगून लवकरात लवकर पूर्णत: पापमुक्त व्हावे, अशी तळमळ लिंगदेहापेक्षा यमधर्मात अधिक असते. पापासाठी निश्‍चित केलेली दंडरूपी कठोर यातना देणे आणि पापकर्माची स्मृती क्षणोक्षणी जागृत ठेवणे, हे कठीण कार्य यमदूत पापी लिंगदेहाच्या उद्धारासाठी पूर्ण करत असतात.

६ इ. पापी लिंगदेहाला शीघ्र पापमुक्त करण्यासाठी यमदूत भावनिक स्तराची
सहानुभूती न बाळगता आध्यात्मिक स्तराची प्रीती जोपासून साक्षीभावाने कार्य करत असणे

पापी लिंगदेहांविषयी यमदूतांना जर भावनिक स्तरावर सहानुभूती वाटली असती, तर त्यांनी दंडरूपी यातनांची कठोरता न्यून केली असती किंवा पापकर्माची आठवण सतत करून न देता कधीतरी केली असती. यामुळे पापक्षालनाची गती मंद झाली असती. परिणामी यमराजाने निश्‍चित केलेला दंडाचा कालावधी वाढून पापी लिंगदेहाला अधिक काळ नरकयातना भोगाव्या  लागल्या असत्या. अशा प्रकारे लिंगदेहाला प्रत्येक पापातून मुक्त होण्यासाठी अधिक कालावधी लागेल आणि त्याला संपूर्ण पापमुक्त होण्यासाठी पुष्कळ कालावधी लागेल. हे सत्य यमदुतांना ठाऊक आहे. त्यामुळे पापी लिंगदेहाला शीघ्रतेने पापमुक्त करण्यासाठी यमदूत त्याच्याविषयी भावनिक स्तराची सहानुभूती न बाळगता आध्यात्मिक स्तराची प्रीती जोपासून त्यांचे कार्य साक्षीभावाने करत रहातात.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०१४ रात्री ८.०५)

 

विशिष्ट योनीतील नवीन देहानुसार
(मृत्यूत्तर) भूतकाळाची स्मृती टिकून रहाणे किंवा लुप्त होणे

लिंगदेह नरकातून मुक्त झाल्यावर यमदेवाने ८४ लक्ष योनीतील निवडलेल्या योनीत त्याला प्रवेश मिळेपर्यंत मृत्यूत्तर कालखंडातील सर्व घटनांचे सुस्पष्ट स्मरण असते. बहुतांश लिंगदेहांची विशिष्ट योनीत प्रवेश केल्यावर नवीन देह प्राप्त होईपर्यंत भूतकाळाची स्मृती टिकून असते. विशिष्ट योनीतील मिळालेला नवीन देह जर सूक्ष्म देह असेल, तर भूतकाळाची स्मृती दीर्घकाळ टिकून रहाते. विशिष्ट योनीतील मिळालेला नवीन देह जर स्थूलदेह असेल, तर भूतकाळाची स्मृती नवीन देहाच्या जन्माबरोबर लुप्त होते, उदा. लिंगदेहाला भूतयोनी प्राप्त झाली, तर त्याची भूतकाळाची स्मृती टिकून रहाते; परंतु त्याला जर किड्याचा जन्म मिळाला, तर त्याची भूतकाळाची स्मृती लुप्त होते.

अ. विशिष्ट योनीत लिंगदेहाला स्थूलदेह प्राप्त होऊनही भूतकाळाची स्मृती जागृत रहाणे

काही वेळा विशिष्ट योनीत लिंगदेहाला स्थूलदेह प्राप्त होऊनही त्याची भूतकाळाची स्मृती जागृत रहाते. भूतकाळाची स्मृती जागृत रहाण्यामागे विविध प्रकारचे अनेक घटक कारणीभूत असतात. भूतकाळातील स्मृतीचा कालावधी आणि गुणवत्ता यांचा प्रामुख्याने मनाच्या प्रक्रियेशी दृढ संबंध असतो.

आ. मनाच्या प्रक्रियेवर आधारित असणार्‍या भूतकाळातील स्मृतींचा प्रकार आणि कृपा

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०१४ सायं.४.५५)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment