कर्मसाफल्यासाठी आवश्यक घटक

कोणतेही कर्म यशस्वी किंवा अयशस्वी होण्यामागे कारणीभूत असणारी पंचसूत्रे (पाच घटक) येथे देत आहे.

कु. मधुरा भोसले
कु. मधुरा भोसले

१. उद्देश

कर्माची निष्कामता आणि उद्देशाची शुद्धता हे कर्म सफल होण्यासाठी आवश्यक असते.

२. स्वरूप

कर्म करत असतांना ते योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने केले, तर ते यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते.

३. आस्वाद

कोणत्याही कर्माची सफलता ही त्याचा आस्वाद आपण कशाप्रकारे घेतो, यावर अवलंबून असते. साखर गोड असूनही ती खातांना तिच्या गोड चवीचा आस्वाद मनाला घेता आला नाही, तर त्याची गोडी केवळ जिभेला जाणवेल, मनाला जाणवणार नाही. याउलट एखाद्या पदार्थात साखर अल्प असली, तरी ती आनंदाने ग्रहण केली, तर तिची गोडी निराळीच लागते, उदा. शबरीने प्रभू श्रीरामाला दिलेली उष्टी बोरे श्रीरामाला राजभोगाहून कैकपटींनी प्रिय वाटली. विदुराच्या पत्नीने भक्तीरसाने दिलेली केळ्याची सालेही भगवान श्रीकृष्णाने आनंदाने स्वीकारली. सख्यभक्तीच्या प्रीतीने चिंब भिजलेले सुदाम्याचे कोरडे पोहे श्रीकृष्णाला ५६ भोगांपेक्षाही अधिक रुचकर लागले. वरील उदाहरणांतून आपण कशा प्रकारे पदार्थांचा आस्वाद घेऊन आनंदाची प्राप्ती करू शकतो, हे लक्षात येईल.

४. कर्मफळाची अपेक्षा

कर्माच्या उद्देशासह कर्माचे स्वरूपही चांगले असेल आणि कर्म करत असतांना आस्वाद घेतल्याने त्यातील आनंदही अनुभवण्यास मिळत असेल, तर कर्म यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. कर्म करतांना मधेच अपेक्षा जागृत झाली, तर त्याचा कर्मावर सूक्ष्म-परिणाम होऊन कर्म असफल होण्याची शक्यता वाढते.

५. परिणाम

     कर्मउद्देशाची व्यापकता, निष्कामता, निरपेक्षता, कर्माची शुद्धता आणि कर्माचा आस्वाद म्हणजे कर्म करतांना मिळणारा आनंद अन् कर्मफळाविषयी निरपेक्षता, हे सर्व घटक साध्य झाले, तरी कर्मामुळे व्यष्टी आणि समष्टी यांवर होणारा परिणाम सर्वांत महत्त्वाचा असतो. कर्मामुळे घडलेल्या परिणामामुळे कर्म योग्य होते कि अयोग्य होते आणि यशस्वी झाले कि नाही, हे सिद्ध होते. भीष्माचार्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहून हस्तिनापूरच्या राजसत्तेची सेवा करून राज्यशासनात साहाय्य करण्यासाठी घेतलेली प्रतिज्ञा सर्वदृष्ट्या कितीही चांगली असली, तरी तिचा परिणाम अधर्माचे पारडे जड करणारा ठरला. त्यामुळे कर्माचे सर्व घटक एकीकडे असले, तरी कर्माचा परिणाम हा घटक सर्वांत मोठी भूमिका बजावतो. कर्मसाफल्याचे सर्व घटक स्थळ-काळाशी संबंधित असतात, तर कर्माचा परिणाम भविष्यकाळाशी संबंधित असल्यामुळे त्याविषयी सामान्य मनुष्य अनभिज्ञ असतो. कर्माच्या सफलतेचे हे गूढरहस्य केवळ त्रिकालज्ञानी संतच जाणू शकतात. काही वेळा केवळ काळच सर्व प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकतो. त्यामुळे विशिष्ट काळ संपेपर्यंत एखादे कर्म कसे होते ?, याचा निर्णय घेण्यात दिरंगाई दिसत असली, तरी ती दूरदृष्टीने योग्यच असते.
– श्रीकृष्णाचा अंश, कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून (३.२.२०१६, सकाळी १०.२२)