धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले अधिवक्ता कृष्णमूर्ती यांनी गाठली ६४ टक्के, तर भगवंताविषयी अपार भक्ती असलेले सनदी लेखापाल श्री. सतीशचंद्र यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

मंगळुरू (कर्नाटक) : २७ नोव्हेंबर २०२२ या दिवशी मंगळुरू येथील एका कार्यक्रमात गुरुदेवांविषयी अपार श्रद्धा आणि धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. यांनी ६४ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे, तसेच नम्रता अन् भगवंताविषयी अपार भक्ती असलेले मंगळुरू येथील सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) श्री. सतीशचंद्र यांनी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी भावपूर्ण वातावरणात घोषित केले. त्यामुळे तेथे उपस्थित सर्व साधकांची भावजागृती झाली. त्यानंतर पू. रमानंद गौडा यांनी अधिवक्ता कृष्णमूर्ती आणि श्री. सतीशचंद्र यांचा श्रीकृष्णाचे चित्र देऊन सत्कार केला.

अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. (डावीकडे ) यांचा सत्कार करतांना पू. रमानंद गौडा
श्री. सतीशचंद्र (डावीकडे ) यांचा सत्कार करतांना पू. रमानंद गौडा
अधिवक्ता कृष्णमूर्ती

मनोगत व्यक्त करतांना अधिवक्ता कृष्णमूर्ती म्हणाले, ‘‘वर्ष २००० मध्ये त्रास झाला असतांना एका मित्राने विष्णुसहस्रनाम म्हणण्यास सांगितल्यानंतर मी ते म्हटले. एकदा केरळ येथील ‘अम्मा’ देवस्थानात ललिता सहस्रनाम संपवत असताना कुंकू हवे होते. त्या वेळी शरणागतभावाने देवीला साकडे घालताच अर्चकांनीच (पुजार्‍यांनी) येऊन कुंकूमार्चन करू दिले.

माकडाचे पिल्लू त्याच्या आईला घट्ट धरून ठेवते. त्यामुळे आईला सर्वत्र उड्या मारता येतात. पिलाची त्याच्या आईवर संपूर्ण श्रद्धा असते. अशीच आपली श्रद्धा भगवंतावर असायला हवी.’’

श्री. सतीशचंद्र

मनोगत व्यक्त करतांना श्री. सतीशचंद्र म्हणाले, ‘‘कोरोनाच्या कालावधीच्या आधी ‘नर्सरी क्लास’मध्ये होतो. अखंड नामजप करायचो. मी झोपत असलेल्या जागी सिमेंट लावलेल्या भूमीवर तुळस आली आहे. श्रीकृष्णाला तुळस प्रिय आहे. गुरुदेवांच्या आशीर्वादाने हे झाले आहे. माझी एवढी योग्यता आहे का ? आपले मन स्वच्छ झाले पाहिजे. मी भूलोकात असतांना परोपकारी असले पाहिजे. समाजाला माझा उपयोग होऊ दे.’’

 

१. निरपेक्षतेने हिंदुत्वाचे कार्य करणारे आणि
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असलेले अधिवक्ता कृष्णमूर्ती पी.

‘मडिकेरी, कर्नाटक येथील अधिवक्ता कृष्णमूर्ती पंजीतडका (वय ४४ वर्षे) हे देवीभक्त असून मागील ११ वर्षांपासून साधना करत आहेत. धर्म आणि हिंदुत्व यांच्या कार्याविषयी त्यांना पुष्कळ तळमळ आहे. ४ वर्षांपूर्वी ते सनातन संस्थेच्या संपर्कात आले. एकदा त्यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली होती. परात्पर गुरु डॉक्टरांवर त्यांची पुष्कळ श्रद्धा आहे.

१.अ. हिंदु धर्म आणि हिंदुत्व यांच्या कार्याविषयी तीव्र तळमळ असलेले हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती !

१.अ.१. कर्नाटक उच्च न्यायालयात हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला चालवून तो जिंकणे : ‘एका हिंदु संघटनेच्या कार्यात कृष्णमूर्तीअण्णा यांचा सक्रीय सहभाग असतो. एकदा मडिकेरी येथे टिपू सुलतान जयंतीच्या वेळी दंगल झाली होती. या प्रकरणात अनेक हिंदू गोवले गेले होते. कृष्णमूर्तीअण्णांनी कर्नाटक उच्च न्यायालयात हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने हा खटला चालवला आणि जिंकला. अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांची कोणतीही अडचण आली की, ते तत्परतेने त्यांना साहाय्य करतात.

१.अ.२. हिंदुत्वाच्या कार्यासाठी त्याग करण्याची वृत्ती : हिंदुत्वाचे कार्य करतांना त्यांना वेगवेगळ्या खटल्यांसाठी ‘मडिकेरी ते बेंगळुरू’ किंवा अन्य ठिकाणी चारचाकी गाडीने जावे लागते. तेव्हा ते कोणाकडूनही प्रवासासाठी लागणारा व्यय (खर्च) घेत नाहीत. ते स्वतःच हा त्याग करतात.

१.अ.३. अनेक वेळा ते गरजू हिंदु कार्यकर्त्यांना धान्य अणि वस्तू त्यांच्या घरी जाऊन देतात.

१.अ.४. इतरांना त्वरित साहाय्य करणे : एका गोशाळेच्या प्रमुखांनी कृष्णमूर्तीअण्णा यांच्याकडे साहाय्य मागितले होते. तेव्हा त्यांनी त्वरित साहाय्य केले.

१.आ. कायद्याचा उत्तम अनुभव असूनही नम्र आणि अहंशून्य
स्थितीत राहून न्यायालयीन कामकाज करणारे अधिवक्ता कृष्णमूर्ती !

१.आ.१. अशिलाचा खटला स्वयंप्रेरणेने आणि आत्मीयतेने चालवणे : एखाद्या अशिलाने कृष्णमूर्तीअण्णा यांच्याकडे खटला सोपवला की, त्याला त्याविषयी विचार करावा लागत नाही. अण्णा स्वयंप्रेरणेने सर्व कृती करतात आणि आत्मीयतेने खटला चालवतात.

१.आ.२. अनुभवी अधिवक्ता असूनही सर्वांशी नम्रतेने बोलणे : कृष्णमूर्तीअण्णा यांना कायदा आणि धर्मकार्य यांविषयी चांगला अनुभव आहे, तरी त्यांच्या वर्तनातून ‘अधिकारवाणी किंवा मला अधिक समजते’, असे कधी जाणवत नाही. ते सर्वांशी नम्रतेने बोलतात. ते समवेत असणार्‍या कनिष्ठ अधिवक्त्यांचे मतही नम्रपणे जाणून घेतात. त्यांच्या अशा वागण्यामुळे अधिवक्त्यांना उत्साह जाणवून प्रेरणा मिळते आणि अण्णांचा आधारही वाटतो.

१.आ.३. ‘सर्व काही ईश्वरेच्छेने होते’, हा भाव असल्याने प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक आणि शांत रहाणे : अण्णा प्रत्येक प्रसंगात शांत आणि सकारात्मक असतात. एकदा एका खटल्याच्या सुनावणीसाठी ते मडिकेरी येथून २७५ कि.मी.चा प्रवास करून बेंगळुरूला गेले होते; पण न्यायालयात न्यायाधीश नसल्याने सुनावणी रहित झाली. त्या वेळी त्यांना कुठलीच प्रतिक्रिया आली नाही. त्यांच्या समवेत असलेल्या अधिवक्त्यांनी विचारले, ‘‘तुम्हाला काहीच वाटले नाही का ?’’ तेव्हा अण्णा म्हणाले, ‘‘सर्व काही ईश्वरेच्छेने होते.’’ अशा प्रकारे कोणतेही प्रसंग आले, तरी अण्णा ती परिस्थिती स्वीकारतात. घरात काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास ते शांत आणि सकारात्मक असतात.

१.आ.४. न्यायाधीश आणि न्यायालयातील इतर व्यक्ती यांनी अण्णांचा आदर करणे : अण्णा जेव्हा न्यायालयात प्रतिवाद करतात, तेव्हा तेथील वातावरण पूर्ण निःशब्द झालेले असते. न्यायाधीश त्यांचे बोलणे शांतपणे ऐकतात आणि त्यांच्याशी आदराने वागतात. न्यायालयातील इतर व्यक्तीही त्यांच्याशी आदरपूर्वक वागतात.

१.इ. साधना करणारे आणि संतांप्रती भाव असलेले साधक – कृष्णमूर्तीअण्णा !

१.इ.१. नामजप आणि प्रार्थना करणे : अण्णा प्रतिदिन नामजप आणि प्रार्थना करतात. ते कुठेही असले, तरी ‘त्यांचा नामजप सतत चालू असतो’, असे ते सांगतात.

१.इ.२. पू. रमानंदअण्णा यांच्याप्रती भाव असणे

१.इ.२.अ. सनातनचे संत पू. रमानंद (अण्णा) गौडा यांच्याशी अण्णांची भेट झाली. तेव्हा त्यांच्याशी बोलतांना अण्णांची २० मिनिटे सतत भावजागृती होत होती. त्यामुळे त्यांना बोलता येत नव्हते.

१.इ.२.आ. अण्णांच्या वाढदिवसाच्या दिवशी पू. रमानंदअण्णांनी त्यांना भ्रमणभाष केला आणि शुभेच्छा दिल्या. तेव्हा अण्णांना पुष्कळ कृतज्ञता वाटून त्यांची भावजागृती झाली. ते पू. अण्णांना म्हणाले, ‘‘आज मला अनेकांनी भ्रमणभाष केले; परंतु तुमच्याशी बोलून जो आनंद मिळाला, तो मला मिळाला नव्हता.’’

१.इ.३. कृष्णमूर्तीअण्णांच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असणारा कृतज्ञताभाव !

१.इ.३.अ. ‘गुरुदेव’ हा शब्द ऐकल्यावर अण्णांनी भावस्थिती अनुभवणे : कृष्णमूर्तीअण्णा नेहमी परात्पर गुरु डॉक्टरांविषयी बोलतात. ‘गुरुदेव’ हा शब्द नुसता ऐकल्यावरच त्यांचा भाव जागृत होतो. त्या वेळी भावजागृत स्थितीमुळे त्यांना बोलताही येत नाही.

१.इ.३.आ. रामनाथी आश्रमात असतांना अण्णांनी बेशुद्धावस्थेत ‘स्वतःचा प्राण अंधारात जात आहे’, असे अनुभवणे आणि नंतर ‘गुरुदेवांनी त्यांचा हात पकडून वर आणले’, असे दिसणे : एकदा अण्णा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. तेव्हा त्यांना ताप आला. त्यांच्या छातीत दुखायला लागले आणि त्यांना बेशुद्धावस्थेत गेल्याप्रमाणे झाले. त्या स्थितीत असतांना ‘अण्णांना स्वतःचा प्राण अंधारात जात आहे’, असे दिसत होते. नंतर ‘गुरुदेवांनी हात पकडला आणि ते वर घेऊन आले’, असे दृश्य त्यांना दिसले. शुद्धीवर आल्यावर ते म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला पुनर्जन्म दिला.’’ त्यांना गुरुदेवांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. हा प्रसंग आठवल्यावरही त्यांना कृतज्ञता वाटते.

१.इ.३.इ. अण्णा म्हणतात, ‘‘माझ्याकडून केली जाणारी प्रत्येक कृती मी करत नसून गुरुदेवच (परात्पर गुरु डॉक्टरच) करत असतात.’’

सकारात्मकता, प्रत्येक कृती निरपेक्ष भावाने करणे, त्याग आणि भाव आदी अनेक गुण मला कृष्णमूर्तीअण्णा यांच्याकडून शिकायला मिळाले. याबद्दल गुरुचरणी कृतज्ञता !’

– एक साधक, बेंगळुरू, कर्नाटक. (२४.११.२०२२)

 

२. उद्योजक सत्संगात सांगितल्याप्रमाणे साधनेला आरंभ
करणारे आणि धर्मकार्याची तळमळ असलेले सनदी लेखापाल श्री. सतीशचंद्र !

मंगळुरू, कर्नाटक येथील श्री. सतीशचंद्र हे ‘सनदी लेखापाल (चार्टर्ड अकांऊटंट)’ आहेत. ते धार्मिक संस्थांना मार्गदर्शन आणि साहाय्य करतात. मागील १२ वर्षांपासून ते ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत आणि गेल्या ३ वर्षांपासून ते उद्योजक सत्संगात नियमित सहभागी होत आहेत. श्री. सतीशचंद्रअण्णा यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

२.अ. गुणवैशिष्ट्ये

२.अ.१. मनमोकळेपणा : श्री. सतीशचंद्रअण्णा साधकांशी मोकळेपणाने बोलतात. एकदा सनातन संस्थेचे ७५ वे समष्टी संत पू. रमानंद गौडा (पू. अण्णा) यांच्याशी त्यांची भेट झाली होती. ते पू. रमानंदअण्णांशी स्वतःच्या व्यक्तीगत जीवनाविषयी मनमोकळेपणाने अन् सहजतेने बोलले.

२.अ.२. वक्तशीरपणा आणि नियोजनबद्ध कृती करणे : अण्णांमध्ये ‘वक्तशीरपणा’ हा गुण आहे. ते दैनंदिन प्रत्येक गोष्टीचे नियोजन करून समय मर्यादेनुसार सर्व कृती करतात, उदा. पूजा, नामजप, कार्यालयीन कामे करणे, साधकांना भेटणे इत्यादी.

२.अ.३. कितीही कामे असली, तरी साधकांना प्राधान्याने वेळ देणे : साधक त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जातात. तेव्हा ते साधकांना प्राधान्याने वेळ देतात. त्यांना भेटायला कितीही लोक आलेले असले, तरी साधकांचा वेळ वाया जाऊ नये; म्हणून ते आधी साधकांशी बोलतात.

२.अ.४. स्वतःकडे कमीपणा घेऊन शिकण्याच्या स्थितीत रहाणारे सतीशचंद्रअण्णा ! : ते ‘सनदी लेखापाल’ असल्याने त्यांना अनेक विषयांसंबंधीची माहिती आहे. असे असूनही ते ‘मला काही ठाऊक नाही’, असे म्हणून स्वतःकडे कमीपणा घेतात आणि शिकण्याच्या स्थितीत रहातात. ते पू. रमानंदअण्णांना म्हणतात, ‘‘तुम्ही सर्वकाही करत आहात. तुम्ही भाग्यवान आहात.’’ ते साधकांना म्हणतात, ‘‘तुम्ही सर्व जण पुष्कळ कार्य करत आहात. मी काहीच करत नाही. अजून मला बरेच काही करायचे आहे.’’

२.अ.५. लहानपणापासून देवभक्ती करणे : श्री. सतीशचंद्रअण्णा यांची आई अत्यंत धार्मिक होती आणि देवाची भक्ती करायची. त्यामुळे लहानपणापासून अण्णाही श्रीकृष्णाची आणि बालाजीची भक्ती करत आहेत.

२.अ.६. साधना आणि धर्मकार्य यांची तळमळ

२.अ.६.अ. अर्पण देणे : बर्‍याच वर्षांपासून ते सनातन संस्थेच्या कार्याला अर्पण आणि पंचांगासाठी विज्ञापनही देतात. ते अन्य धार्मिक कार्यक्रमांसाठीही अर्पण देतात.

२.अ.६.आ. उद्योजक सत्संगांत सांगितल्याप्रमाणे साधनेचे प्रयत्न केल्यावर ‘कामांतील अडथळे दूर होत आहेत’, याची सतीशचंद्र अण्णांना अनुभूती येणे : उद्योजक सत्संगात यायला लागल्यापासून अण्णा ‘नामजप करणे, आध्यात्मिक उपाय करणे, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करणे’, हे साधनेचे प्रयत्न करत आहेत. त्यांचा नामजप सतत चालू असतो. साधना चालू केल्यापासून त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावहारिक जीवनात पुष्कळ पालट झाला आहे. ‘त्यांचे प्रत्येक काम आता व्यवस्थित पूर्ण होते’, असे ते आनंदाने सांगतात.

पू. रमानंदअण्णा यांच्याशी भेट झाल्यावर ते कृतज्ञताभावाने म्हणाले, ‘‘मी साधना चालू केल्यावर माझ्या अनेक शारीरिक समस्या न्यून होऊन माझी शारीरिक स्थिती सुधारली आहे. पूर्वीच्या तुलनेत माझ्या कृतींना गतीही मिळाली आहे. माझ्या मुलाला परीक्षेत चांगले गुण मिळाले आणि आता त्याला चांगले कामही मिळाले आहे. हे सर्व ईश्वराच्या कृपेने होत आहे.’’

२.अ.६.इ. पू. रमानंदअण्णांचे मार्गदर्शन प्रतिदिन ऐकणे : कोरोनाच्या कालावधीत त्यांनी पू. रमानंदअण्णांचे ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन ऐकले आणि ते ध्वनीमुद्रित (रेकॉर्ड) करून घेतले. त्यांना मार्गदर्शन ऐकायला चांगले वाटते; म्हणून प्रतिदिन चालण्याचा व्यायाम करतांना ते मार्गदर्शन ऐकतात.

२.अ.६.ई. कौटुंबिक कार्यक्रमाला न जाता अधिवेशनात सहभागी होणे : एकदा दक्षिण कन्नड जिल्ह्यात ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ होते आणि त्याच वेळी अण्णांच्या कुटुंबात एक कार्यक्रम होता. खरेतर त्यांना कार्यक्रमाला जाणे अनिवार्य होते; पण तरीही त्यांनी स्वतः न जाता एका चालकाचे नियोजन करून कुटुंबियांना कार्यक्रमाला पाठवले आणि ते अधिवेशनात सहभागी झाले.

२.अ.६.उ. भाव : अण्णांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सनातनचे संत यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. ते संतांशी नम्रपणे बोलतात. ‘मी एक सामान्य व्यक्ती असून मला संतांचा सहवास मिळाला, हे माझे मोठे भाग्य आहे’, असे ते नम्रतेने सांगतात.

२.आ. देवाप्रती असलेल्या भावामुळे श्री. सतीशचंद्रअण्णा यांना आलेल्या अनुभूती

२.आ.१. तिरुपती येथे दर्शनाच्या रांगेत उभे असतांना एका अनोळखी आणि तेजस्वी व्यक्तीने अण्णांना अन् त्यांच्या मुलाला लाडूचा प्रसाद देणे : एकदा सतीशचंद्रअण्णा तिरुपती येथे बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. तेथे मोठी रांग होती. ते रांगेत उभे असतांना एक तेजस्वी व्यक्ती त्यांच्यापाशी आली आणि तिने अण्णांच्या अन् त्यांच्या मुलाच्या हातात अर्धा अर्धा लाडू ठेवला. अण्णांना थोडा संशय आला. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, ‘‘इतकी मोठी रांग आहे. इथे इतके लोक आहेत; पण मी तुम्हालाच लाडू देत आहे, तर त्याचा संशय कशाला घेता ?’’ आपल्या मनातील विचार त्या व्यक्तीने ओळखले. ते पाहून अण्णांची भावजागृती झाली आणि त्यांनी तो लाडू ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण केला.

२.आ.२. नियमित नामजप करत असल्याने अण्णांच्या पायाला झालेली दुखापत लवकर बरी होणे आणि आधुनिक वैद्यांना याचे आश्चर्य वाटणे : एकदा अण्णांच्या पायाला दुखापत झाली होती आणि त्यासाठी रुग्णालयात उपचार चालू होते. त्या कालावधीत त्यांचा नामजप सतत चालू होता. त्यामुळे त्यांना होणारा त्रास लवकर उणावला. तेव्हा आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘खरेतर हे दुखणे लवकर बरे होत नाही; पण तुमचे दुखणे इतक्या लवकर कसे बरे झाले ?, ते मला कळत नाही.’’ तेव्हा अण्णा म्हणाले, ‘‘मी नियमित नामजप करत असल्याने माझे दुखणे लवकर बरे झाले आहे.’’

– एक साधक, बेंगळुरू, कर्नाटक. (२४.११.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment