धर्मशास्त्रांचा अभ्यास आणि विलक्षण नम्रता असलेले डॉ. शिवनारायण सेन संतपदी विराजमान

पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांचा सन्मान करताना पू. नीलेश सिंगबाळ

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात १ जून या दिवशी कोलकाता (बंगाल) येथील शास्त्र धर्म प्रचार सभेच्या ‘ट्रुथ’ पाक्षिकाचे संपादक तथा हिंदु धर्माचे गाढे अभ्यासक डॉ. शिवनारायण सेन हे संतपदी विराजमान झाल्याचे, तर तेजपूर (आसाम) येथील ‘स्वामी विवेकानंद केंद्रा’च्या श्रीमती राणू बोरा (वय ७१ वर्षे) आणि हावडा (बंगाल) येथील ‘सलकिया भारतीय साधक समाजा’चे महासचिव श्री. अनिर्बान नियोगी (वय ५३ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. या सोहळ्याचा सविस्तर वृत्तांत येथे प्रसिद्ध करत आहोत.

‘शास्त्र धर्म प्रचार सभे’चे महासचिव डॉ. शिवनारायण सेन हे शासनात मोठ्या पदावर असतांना हिंदु धर्मातील आचारधर्माचे पालन सर्वत्र होईल, याची काळजी घेत होते. कलियुगात सनातन धर्माच्या परंपरेनुसार आचारधर्म पाळणे किती कठीण आहे, याची थोडी कल्पना आपल्या सर्वांना आहे. धर्मशास्त्रांचा अभ्यास असूनही त्यांच्यामध्ये विलक्षण नम्रता आहे. त्यांच्या मुखमंडलावर सतत भावावस्था असते. ते शब्दांच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी जागृती करता करता आता ते शब्दांच्या पलीकडे, म्हणजे अध्यात्माच्या उच्च अवस्थेला गेले आहेत. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांकडे पाहून आनंदाची अनुभूती येते. ते भाषण करतांना, विशेषतः नास्तिकांच्या विरुद्ध बोलतांना त्यांच्यातील क्षात्रतेजाचे दर्शन घडते. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज असलेले असे डॉ. शिवनारायण सेन यांच्यामध्ये गुरुभक्ती आणि हरिभक्ती यांचाही अपूर्व संगम आहे. ते खर्‍या अर्थाने भगवद्भक्त आहेत. अधिवेशनात त्यांच्या भाषणामध्ये सर्वांना चैतन्याची अनुभूती आली, हे त्यांचे संतत्व सिद्ध करते. डॉ. शिवनारायण सेन यांचा आध्यात्मिक स्तर ७१ टक्के झाला असून ते संतपदी विराजमान झाले आहेत, हे सांगतांना मला विशेष आनंद होत आहे. ‘त्यांची पुढील आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होवो’, अशी मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले.

 

श्री. अनिर्बान नियोगी यांचा सन्मान करताना पू. नीलेश सिंगबाळ

 

श्रीमती राणू बोरा यांचा सन्मान करताना पू. सौ. संगीता जधव

 

आपल्याला भगवंताचे दास व्हायचे आहे ! – पू. (डॉ.) शिवनारायण सेन

पू. (डॉ.) शिवनारायण सेन

संतपदी विराजमान झाल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना पू. (डॉ.) शिवनारायण सेन म्हणाले, ‘‘मी या सन्मानासाठी पात्र नाही. ईश्‍वर जेव्हा त्याचा झेंडा कोणाच्या हातामध्ये देतो, तेव्हा तो सदर झेंडा फडकवण्याची शक्तीही देतो. ‘ज्यांनी मला संत बनवले, त्यांनीच माझ्याकडून पुढील कार्यही करून घ्यावे’, अशी मी प्रार्थना करतो.

‘विज्ञानाच्या पुढेही ईश्‍वराची शक्ती आहे’, हे धर्माचे कार्य करणार्‍यांनी जाणणे आवश्यक आहे. जीवनात सत्य सर्वांत मोठी शक्ती आहे. सत्य हेच शास्त्र आहे आणि शास्त्र हाच धर्म आहे. सत्य हेच शिव आहे आणि सत्याचा आश्रय घेतला, तर भगवंताची कृपा निश्‍चितपणे होते. आपल्याला भगवंताचे दास व्हायचे आहे. त्याची भक्ती करायची आहे. आज हिंदु धर्मावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यामुळे हिंदूसंघटनासाठी आपण कटीबद्ध झाले पाहिजे. ‘शास्त्र धर्म प्रचार सभे’च्या कार्याला थोर संतांचे आशीर्वाद लाभले आहेत.’’

 

हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शकांनी
पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

पू. (डॉ.) शिवनारायण सेन हे धर्मशिक्षण आणि धर्मजागृती यांसाठी अविरत कार्यरत आहेत !
– सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘पूू. (डॉ.) शिवनारायण सेन हे धर्मशिक्षण आणि धर्मजागृती यांसाठी अविरत कार्यरत आहेत. त्यांनी सनातन धर्मावर होणार्‍या आरोपांचे खंडण करणारे अनेक ग्रंथ लिहिले आहेत. हे ग्रंथ मार्गदर्शक आहेत. या ग्रंथांच्या माध्यमातून धर्मविरोधी विचारांचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य मिळते. अशी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात. पू. (डॉ.) सेन हे विद्वान असूनही त्यांच्यामधील प्रेमभाव, आदर आणि नम्रता या गुणांमुळे ते सर्वांमध्ये मिसळतात. भक्तीच्या जोडीला ज्ञानयोगाच्या मार्गाने साधना करणे कठीण असते; पण या दोन्ही माध्यमांतून ते वर्तमानात आवश्यक असलेले कार्य करत आहेत. ‘पूू. (डॉ.) शिवनारायण सेन हे स्वयंप्रकाशित आहेत. त्यांना आता मन राहिलेले नाही, म्हणजे त्यांचा मनोलय झाला आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे.’’

पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांचे ज्ञानशक्ती प्रगट करण्याचे कार्य अतुलनीय !
– पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

पू. नीलेश सिंगबाळ म्हणाले, ‘‘एकेकाळी ज्ञानशक्तीच्या जोरावर भारत विश्‍वगुरुपदी विराजमान होता. त्यानंतरच्या काळात ही ज्ञानशक्ती धर्मद्रोह्यांनी नष्ट केली. हिंदूंना धर्मशास्त्रापासून वंचित केले. एखादी गोष्ट नष्ट करणे सोपे असते; पण ती पुन्हा निर्माण करणे किंवा तिची पुनर्स्थापना करणे फार कठीण असते. त्यासाठी कठोर साधना आणि तत्त्वनिष्ठा असावी लागते. ही ज्ञानशक्ती प्रगट करण्याचे अतुलनीय कार्य ज्ञानी पुरुष करत असतात. पू. (डॉ.) सेन यांचे कार्य असेच आहे. बंगालसारख्या प्रतिकूल वातावरणात राहून असे कार्य करणे, ही मोठी साधना आहे. आम्ही जेव्हा कोलकाता येथे ‘शास्त्र धर्म प्रचार सभे’च्या कार्यालयात जातो, तेव्हा पू. (डॉ.) सेन नेहमी ग्रंथलिखाणात व्यस्त असतात, तरीही ते आम्हाला वेळ देतात. कतरास (झारखंड) येथे होणार्‍या सनातनच्या गुरुपौर्णिमा सोहळ्यालाही ते आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन करतात.’’

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. (डॉ.) सेन हे रत्न ओळखले !
– डॉ. कौशिक चंद्र मल्लिक, उप-संपादक, ‘साप्ताहिक ट्रुथ’, (पू. (डॉ.) सेन यांचे भाचे)

डॉ. कौशिक चंद्र मल्लिक म्हणाले, ‘‘एक संतच दुसर्‍या संतांना ओळखू शकतात. रत्नाचे मूल्य रत्नपारख्यालाच समजते. तसे ‘पू. (डॉ.) शिवनारायण सेन कोण आहेत ?’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ओळखले. पू. (डॉ.) सेन यांच्याविषयी काही सांगण्याची माझी पात्रता नाही; पण आज्ञा म्हणून सांगत आहे. पू. (डॉ.) सेन हे माझे मामा आहेत. मी लहानपणापासून त्यांना पहात आहे. ते जे बोलतात, तसेच ते वागतात. त्यांचे जीवन आदर्शवत् आहे. त्यांचा सन्मान झाल्यामुळे मला आनंद झाला आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे ईश्‍वराप्रमाणे अद्भुत कार्य करत आहेत. महापुरुषांच्या चरणांखालील रजकणांच्या अभिषेकाने देवाजवळ जाण्याची बुद्धी होते. सर्वजण यशस्वी होतात. ईश्‍वर ज्यांना स्वतःचा म्हणून स्वीकारतो, त्यांची कधी घसरण होत नाही.’’ मनोगत व्यक्त करतांना डॉ. मल्लिक यांचा भाव जागृत झाला होता.

 

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या श्रीमती राणू बोरा (वय ७१ वर्षे) यांचे मनोगत

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे !

सत्कारानंतर मनोगत व्यक्त करतांना श्रीमती राणू बोरा म्हणाल्या, ‘‘मी या सन्मासाठी पात्र नाही. मी काहीच केले नाही. पूर्वी मी भिडस्त स्वभावाची होते. ‘स्वामी विवेकानंद केंद्रा’शी जोडले गेल्यावर स्वामी विवेकानंद यांचे साहित्य वाचले. तेव्हापासून माझ्यात धैर्य निर्माण झाले. त्यानंतर ‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य केले पाहिजे’, असे मला वाटू लागले. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी साधना करणे अतिशय आवश्यक आहे. आसाममधील ९ जिल्ह्यांमध्ये मुसलमानांची लोकसंख्या ८० टक्के इतकी आहे. आसाममध्ये मी एकटी कार्य करते. तेथे ‘मी हिंदु आहे’, असे म्हटले, तर लोक हसतात. तेथे सार्वजनिक पूजा करायची असल्यास स्थानिक प्रशासनाची अनुमती घ्यावी लागते. तेथील हिंदूंची दुःस्थिती पालटण्यासाठी त्यांना जागृत करण्याची आवश्यकता आहे.’’

 

हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे यांनी श्रीमती राणू बोरा यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

श्रीमती राणू बोरा यांचा देश आणि धर्म यांसाठी कार्यरत रहाण्याचा ध्यास !

श्री. शंभू गवारे म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी ऑगस्ट मासात श्रीमती राणू बोरा यांच्याशी प्रथमच परिचय झाला. तेव्हा ‘त्यांच्याशी पूर्वीपासून ओळख आहे’, असे वाटले. त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. ‘देश आणि धर्म यांसाठी काहीतरी करत रहावे’, असा त्यांचा ध्यास असतो. सनातनच्या आश्रमात आल्यावर त्यांना ‘येथेच रहायला हवे’, असे वाटले. वाराणसी येथील प्रांतीय हिंदू अधिवेशनात त्या इतर महिलांनाही समवेत घेऊन आल्या होत्या.’’

श्रीमती राणू बोरा यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा भाव

श्रीमती राणू बोरा म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ‘मला सर्वकाही मिळाले’, असे वाटले, तसेच आता ‘हिंदु राष्ट्र दूर नाही’, असेही वाटत आहे.’’

 

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले श्री. अनिर्बान नियोगी यांनी व्यक्त केलेले मनोगत

समष्टी सेवा करण्यासाठी साधना वाढवणे आवश्यक !

सत्कार झाल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना श्री. अनिर्बान नियोगी म्हणाले, ‘‘मी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठीन’, असा विचारही कधी केला नव्हता. हे ईश्‍वरकृपेने झाले आहे. आध्यात्मिक स्तर जेवढा अधिक असतो, तेवढी ईश्‍वरावर दृढ श्रद्धा असते आणि शंका अल्प असतात. आपण अंतरातून जेवढे शुद्ध असू, तेवढी आपल्याला ईश्‍वराची अनुभूती येते. आपण त्याच्या समीप जातो. मनातून शुद्ध असलेली व्यक्तीच इतरांना साधनेशी जोडू शकते. समष्टी सेवा करण्यासाठी साधना वाढवणे आवश्यक आहे. देवाला श्रद्धेने हाक मारल्यास त्याची कृपा होते. आध्यात्मिक शक्तीशिवाय आपण काहीही करू शकत नाही. धर्मकार्यात येणार्‍या अडचणी केवळ ईश्‍वरकृपेनेच दूर होतात.’’

लहाणपणासूनच अंगी हिंदुत्व असलेले अनिर्बान नियोगी

श्री. नियोगी पुढे म्हणाले, ‘‘लहानपणी खेळायला जाण्यापूर्वी आजी मला रामायण ऐकायला सांगत. माझ्यात हिंदुत्व पूर्वीपासून होते. माझे शिक्षण मिशनरी शाळांमध्ये झाले. तेथे येशू ख्रिस्तासमोर उभे राहून प्रार्थना करावी लागायची; परंतु माझ्यात हिंदु संस्कृतीचेच बीज असल्याने मी नुसता उभा रहात असे. लहानपणापासूनच मी हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी कार्यरत होतो. मी कर्मयोगावरील अनेक पुस्तके, तसेच भगवद्गीता वाचली आहे. देहली येथे महाविद्यालयात शिक्षण घेतांना मला ‘माझा जन्म व्यक्तीगत जीवन जगण्यासाठी झाला नसून समाजासाठी झाला आहे’, याचा बोध झाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी बंगालमध्ये धर्मकार्य चालू केले. मला अयोध्या चळवळीत सहभागी होण्याची संधी मिळाली. वर्ष १९९८ ते २००४ या कालावधीत मला विविध संतांच्या भेटी घेण्याचीही संधी मिळाली.’’

 

हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे यांनी अनिर्बान नियोगी यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

पायाला गंभीर दुखापत झाली असतांनाही धर्मकार्य करण्याची अनिर्बान नियोगी यांची तळमळ अनुकरणीय !

श्री. अनिर्बान नियोगी यांची गुणवैशिष्ट्ये सांगतांना हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे म्हणाले, ‘‘श्री. अनिर्बान नियोगी यांची धर्मकार्य करण्याची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. आम्ही जेव्हा कोलकाता येथे हिंदुत्वनिष्ठांना भेटण्यासाठी जातो, तेव्हा आमचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी ते प्रयत्नशील असतात. एकदा एका हिंदुत्वनिष्ठ व्यक्तीला भेटायला जायचे होते. त्या वेळी श्री. अनिर्बान नियोगी यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यांच्या पायातून रक्त येत होते. तरीही त्यांनी माझ्यासमवेत येण्यास प्राधान्य दिले. तेव्हा मी त्यांना ‘आपण नंतर जाऊया’, असे सांगितले; परंतु ते सिद्ध नव्हते. त्यांनी सदर हिंदुत्वनिष्ठ व्यक्तीची नियोजित भेट घेण्यासाठी जाण्याचा आग्रह धरला. मी त्यांची जखम बघितल्यानंतर त्यांना आग्रह करून दवाखान्यात नेले, तेव्हा त्यांच्या पायाला ४ टाके घालावे लागले. गंभीर दुखापत झाली असतांनाही धर्मकार्य करण्याची त्यांची तळमळ मार्गदर्शक आहे.

एकदा त्यांची आई आजारी होती; पण तरीही घरगुती अडचणींवर मात करून ते हिंदू अधिवेशनाला उपस्थित राहिले. ‘देव सर्व काळजी घेईल’, असा त्यांचा भाव असतो. श्री. नियोगी यांचा सतत ‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी मी आणखी काय करू शकतो ?’, असा विचार असतो. नवीन कल्पना सुचल्यावर ते लगेच लिहून ठेवतात आणि त्याविषयी चर्चा करतात. परात्पर गुुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या स्वप्नात आले होते. स्वप्नात श्री. नियोगी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘माझा नामजप चालू आहे’, असे सांगितले. नंतर हा प्रसंग त्यांनी मला सांगितला. यावरून श्री. नियोगी यांची नामजपाकडे असलेली ओढ दिसून येते.’’

Leave a Comment