बांगलादेशातील हिंदूंसाठी प्राणपणाने लढणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक अधिवक्ता रवींद्र घोष संतपदी विराजमान !

अष्टम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनात
आध्यात्मिक उन्नतीच्या घोषणांनी वातावरण भारावले !

पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांचा सन्मान करतांना पू. नीलेश सिंगबाळ (डावीकडे)

रामनाथी (गोवा) : स्वत:वर अनेक प्राणघातक आक्रमणे होऊनही त्याची पर्वा न करता इस्लामी देश असलेल्या बांगलादेशातील हिंदूंसाठी प्राणपणाने लढणारे, त्यांचे आधारस्तंभ असलेले आणि बांगलादेशचे स्वातंत्र्यसैनिक ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक अधिवक्ता रवींद्र घोष (वय ६७ वर्षे) त्यांच्या निष्काम कार्यामुळे संतपदावर विराजमान झाले आहेत, अशी घोषणा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी (३१ मे या दिवशी) केली. पतीच्या खांद्याला खांदा लावून निडरपणे हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या आणि धर्माचरणी असलेल्या पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांच्या पत्नी सौ. कृष्णा घोष (वय ६३ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाल्याचीही घोषणा करण्यात आली. हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांची आध्यात्मिक प्रगती घोषित झाल्याने हिंदुत्वनिष्ठांना कार्य करण्यासाठी आणखी हुरुप आला आणि सर्वांनी ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त केली.

 

पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांच्या पत्नी सौ. कृष्णा घोष
६१ टक्के पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

सौ. कृष्णा घोष यांचा सत्कार करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

समितीचे पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांचा पुष्पहार अर्पण करून आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सौ. कृष्णा घोष यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. या प्रसंगी पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष आणि सौ. कृष्णा घोष यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

 

संतपदी विराजमान झाल्यानंतर पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांनी व्यक्त केलेले मनोगत

बांगलादेशमध्ये मी तलवार आणि बॉम्ब यांच्या बळावर नव्हे, तर साधनेच्या बळावर
कार्य करत आहे ! – पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष, अध्यक्ष, बांगलादेश मायनॉरिटी वॉच, बांगलादेश

बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंच्या अधिकारांसाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढत रहाण्याचा पुनरुच्चार

बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करणे आणि त्यांच्या मानवाधिकारांसाठी लढत रहाणे, हीच माझी साधना आहे. बांगलादेशमध्ये मी तलवार आणि बॉम्ब यांच्या बळावर नव्हे, तर साधनेच्या बळावर कार्य करत आहे, असे उद्गार बांगलादेश येथील अल्पसंख्य हिंदूंच्या अधिकारांसाठी लढणार्‍या ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या संघटनेचे अध्यक्ष पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांनी केले. या कार्यात मला माझ्या धर्मपत्नीचेही सहकार्य लाभले, असेही त्यांनी सांगितले.

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात संतपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी वरील मनोगत व्यक्त केले. पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष पुढे म्हणाले,

१. वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली. तेव्हापासून मी बांगलादेशी हिंदूंसाठी लढत आहे. प्रतिकूल परिस्थितीत साधनेच्या बळावर कार्य करण्याची शिकवण आम्ही मुलांनाही देतो. केवळ साधनेमुळेच चांगले परिणाम दिसू शकतात.

२. १ मे २०१९ या दिवशी बांगलादेशच्या पोलिसांनी मला अवैधरित्या अनुमाने १२ घंटे कह्यात ठेवले. या काळात मला अन्न आाणि पिण्यासाठी पाणीही दिले गेले नाही.

३. एका अल्पवयीन हिंदु मुलाची हत्या होऊनही पोलीस त्या संदर्भात गुन्हेगारांना अटक करत नव्हते. त्यासंदर्भात मी पोलीस ठाण्यात गेलो असता पोलिसांनी आमचा छायाचित्रक (कॅमेरा) आणि भ्रमणभाष काढून घेतला.

४. अशा प्रकारच्या घटना घडत असल्या, तरी मला त्याची पर्वा नाही. आम्ही घाबरत नाही.

५. बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून होणारा छळ आणि अत्याचार या कारणांनी अनेक हिंदूंनी बांगलादेश सोडला; पण आम्ही सोडणार नाही. बांगलादेश आमची मातृभूमी आहे. मी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढलो आहे; पण स्वातंत्र्यसैनिक असूनही बांगलादेश सरकारने मला काहीही दिलेले नाही.

६. बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदूंच्या रक्षणाचे कार्य करतांना मी अजिबात हार मानणार नाही. आम्ही काहीही चुकीचे कार्य करत नाही. हिंदूंना सहकार्य करण्यासाठी आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देत आहोत. एक ना एक दिवस बांगलादेश सरकारला आमच्या लढ्याची दखल घ्यावी लागेल, हे निश्‍चित.

बांगदलादेशात माझ्यावर झालेल्या अनेक प्राणघातक आक्रमणांतून
केवळ गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच मी वाचलो ! – पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष

पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष म्हणाले, ‘‘गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले याच्या) कृपेने जो सन्मान मला मिळाला आहे, यासाठी मी त्यांच्या चरणी नमन करतो. हे सर्वच अविश्‍वसनीय आहे. गुरुदेवांच्या आशीर्वादामुळेच बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदूंच्या रक्षणाचे कार्य करणे मला शक्य होत आहे. या कार्यासाठी मी बांगलादेशातील ६४ जिल्ह्यांमध्ये फिरतो. या दौर्‍यांच्या वेळी आतापर्यंत माझ्यावर अनेक प्राणघातक आक्रमणे झाली; परंतु या सर्व आक्रमणांमधून गुरुदेवांच्याच कृपेने मी वाचलो. गुरुदेवांच्या कृपेने मला संतपदी घोषित करण्यात आल्याच्या या सुवर्णक्षणांच्या निमित्ताने मी एवढेच सांगतो की, बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी मी शेवटच्या श्‍वासापर्यंत कार्यरत राहीन.’’

 

पू. रवींद्र घोष यांनी संतपद प्राप्त केल्यानंतर
त्यांच्या पत्नी सौ. कृष्णा घोष यांनी व्यक्त केलेले मनोगत

यजमानांच्या कार्याचे आज सार्थक झाले !

पू. रवींद्र घोष यांनी संतपद प्राप्त केल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना त्यांच्या पत्नी सौ. कृष्णा घोष म्हणाल्या, ‘‘आम्हाला गुरुदेवांचा हा विशेष आशीर्वाद मिळाला, त्यामुळे मी अतिशय आनंदी आहे. बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून श्री. घोष यांच्यावर अनेक आक्रमणे झाली. त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला, तसेच आमचे घरदारही लुटण्यात आले. या प्रतिकूल परिस्थितीतही श्रीमान (यजमान पू. रवींद्र घोष) कार्य करत आहेत. ‘माझ्या यजमानांनी हिंदूंसाठी जो त्रास सहन केला आणि जे कष्ट घेतले, त्याचे आज सार्थक झाले’, असे वाटले. ईश्‍वर मनुष्याच्या माध्यमातून कार्य करतो. भगवंताने या कार्यासाठी माझ्या यजमानांची निवड केली. यासाठी मी पुष्कळ आनंदी आणि कृतज्ञ आहे.’’

 

सौ. कृष्णा घोष यांची ६१ टक्के
आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेले मनोगत

आम्ही अधिवेशनातून प्रेरणा घेऊन बांगलादेशात अधिक जोमाने कार्य करू ! – सौ. कृष्णा रविंद्र घोष

हिंदूंना लहानपणापासून धर्मशिक्षण दिले पाहिजे. मुसलमान मुलांना वयाच्या ५ व्या वर्षापासून त्यांच्या धर्माची माहिती दिली जाते. हिंदु मातांनी त्यांच्या मुलांना लहान वयातच धर्मशिक्षण दिले पाहिजे. याशिवाय मुलांना हिंदूंच्या प्रथा-परंपरांचेही ज्ञान दिले पाहिजे, तरच येणार्‍या काळात ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण होईल. या अधिवेशनामध्ये येऊन मला पुष्कळ प्रेरणा मिळाली. ही प्रेरणा घेऊन आम्ही बांगलादेशात गेल्यावर अधिक जोमाने कार्य करू.

 

पत्नी सौ. कृष्ण घोष यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी
गाठल्याविषयी पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांनी व्यक्त केलेले मनोगत

पत्नीची आध्यात्मिक प्रगती, ही
गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) कृपा आहे ! – पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष

पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांच्या पत्नीनेही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची घोषणा या अधिवेशनात करण्यात आली. त्याविषयी बोलतांना पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष म्हणाले, ‘‘हे सर्व अद्भूत आहे. पत्नीची आध्यात्मिक प्रगती, ही गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) कृपा आहे. एक वेळ अशी होती की, ‘जेव्हा मी एकटाच लढत असून माझ्या समवेत कोणीच नाही’, असे मला वाटत होते; पण पत्नीने मला उत्तम साथ दिली. गुरुदेवांच्या कृपेमुळे बांगलादेशमध्ये हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. आयुष्यात आम्हाला पैसा किंवा मान-सन्मान काहीही नको, तर केवळ ‘गुरुदेवांच्या चरणी स्थान मिळावे’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना.’’

 

सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी सौ. कृष्णा घोष यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

१. तळमळ : सौ. कृष्णा घोष यांची प्रतिकूल परिस्थितीत कार्य करण्याची तळमळ वाखाणण्याजोगी आहे.

२. निर्भय : त्यांच्यामध्ये भीतीचा लवलेशही नाही. त्यांच्या २ मुली कॅनडा येथे, तर मुलगा सिक्कीम येथे असतो. पू. रवींद्र घोष कार्यासाठी कायम घराबाहेर असतात. धर्मांधांकडून त्यांच्या जिवाला धोका आहे. अशा स्थितीत त्या घरी एकट्याच असतात, तरीही त्यांच्यामध्ये भीतीचा लवलेशही नसतो.

३. उच्च प्रतीचे धर्मप्रेम : त्यांच्यामध्ये उच्च प्रतीचे धर्मप्रेम आहे. त्या शाळेत शिक्षिका असतांना तेथील धर्मांध त्यांना कपाळावर कुंकू न लावण्याविषयी धमकवायचे; पण त्यास बळी न पडता, त्या आणखीन मोठे कुंकू लावून शाळेत जायच्या.

सौ. घोष यांना पाहून आनंद आणि उत्साह वाटतो. त्यांच्याकडून सर्वांना प्रेरणा मिळते. ‘साधनेचे बळ असेल, तर कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहून कार्य करता येऊ शकते’, हे त्यांच्याकडून शिकायला मिळते.

क्षणचित्रे

१. पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांना संत घोषित केल्यानंतर त्यांच्या पत्नी सौ. कृष्णा घोष यांनी बंगाली भाषेत मनोगत व्यक्त केले. मनोगताच्या प्रारंभी त्यांनी श्रीकृष्णाचा ‘कृष्णाय वासुदेवाय..’ हा श्‍लोक म्हटला. मनोगत बंगाली भाषेत करूनही उपस्थित धर्मप्रेमींना त्यांचा भाव लक्षात येत होता.

२. सन्मान सोहळ्यानंतर सनातनच्या सद्गुुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि सनातनच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सौ. कृष्णा घोष यांना अलिंगन दिले. वास्तविक सद्गुुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचा सौ. कृष्णा घोष यांच्याशी परिचयही नाही; परंतु जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असल्याप्रमाणे दोघींनीही सौ. कृष्णा घोष यांना आलिंगन दिले. यातून उपस्थितांना ‘साधनेला भाषा किंवा प्रांत यांचे बंधन नसते, तर ‘ईश्‍वराप्रतीचा भाव’, हाच सर्वांना जोडणारा धागा असतो’, हे शिकायला मिळाले.

३. या सोहळ्याच्या वेळी वातावरणात थंडावा जाणवत होता.

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असणारे पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष

‘सन्मान सोहळा संपल्यानंतर उपस्थित साधक आणि हिंदुत्वनिष्ठ हे पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष संत झाल्याच्या प्रीत्यर्थ त्यांची भेट घेत होते. त्या वेळी पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष हे नम्रपणे ‘केवळ गुरुदेवांचीच कृपा’, ‘गुरुदेवांचा आशीर्वाद’, इतकेच म्हणत होते. संतपदी विराजमान झाल्यानंतर मनोगत व्यक्त करतांनाही प्रत्येक २ – ३ वाक्यांनंतर ते ‘हा गुरुदेवांचा आशीर्वाद आहे’, असे म्हणत होते. त्यांच्या या कृतीतून ‘त्यांच्यामध्ये कर्तेपणाचा लवलेशही नाही’, हेच दिसून येत होते.’ – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

Leave a Comment