विश्ववंद्य श्रीमद्भगवद्गीता

श्रीमद्भगवद्गीता अर्थात साक्षात भगवान श्रीकृष्णाची अमृतवाणी !

कुरुक्षेत्रावरील विजयासाठी अर्जुनाला जशी गीतोपदेशाची आवश्यकता होती, तशी जीवनाच्या कुरुक्षेत्रावरील विजयासाठी आज प्रत्येकाला गीतामृताची आवश्यकता आहे. भारतातील निधर्मीवादाची झापडे लावणार्‍यांनी जरी ‘महाभारत’सारख्या महाकाव्याला काल्पनिक ठरवून त्याची हेटाळणी केली असली, तरी पुष्कळ पूर्वीपासून परदेशातील कित्येक विद्वान गीतेच्या अद्वितीयतेपुढे नतमस्तक होत आहेत. गुळाची चव नसलेल्या निधर्मीवाद्यांचे हसे करणारी पाश्चात्त्यांची गीताभक्ती आणि गीतेचे महत्त्व प्रस्तुत लेखात देत आहोत.

१. अठरा पुराणे, नऊ व्याकरणे आणि चार वेद यांचे सार असणारी श्रीमद्भगवद्गीता !

अष्टादश पुराणानि नव व्याकरणानि च ।
निर्मथ्य चतुरो वेदान् मुनिना भारतं कृतम् ।।
भारतोदधिपङ्कस्य गीतानिर्मथितस्य च ।
सारमद्धत्य कृष्णेन अर्जुनस्य मुखे धृतम् ।। – (संदर्भ : अज्ञात)

अर्थ : अठरा पुराणे, नऊ व्याकरणे आणि चार वेद यांचे सम्यक् मंथन करून व्यास मुनींनी महाभारत रचले. या महाभारताचे मंथन करून सर्व नवनीत (सार) श्रीमद्भगवद्गीतेच्या रूपात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मुखी ठेवले.

२. श्रीमद्भगवद्गीतेचे देशोदेशींच्या विद्वानांनी केलेले भाषांतर !

अ. शेख अबुल रहमान चिश्ती (फारसी)

आ. फ्रेंच विद्वान डुपर (फ्रेंच)

इ. जर्मन महाकवी आगस्ट विल्हेम श्लेगल (वर्ष १८२३) (जर्मन आणि लॅटिन)

ई. जर्मन विद्वान एम्.ए. श्रेडर

उ. केमेथ सेन्डर्स आणि जे.सी. टामसन

ऊ. अमेरिकेचे भारतात येऊन गेलेले न्यायाधीश आणि लेखक ‘विन्थ्रौप सार्जेट’

ए. एल.डी. बार्नेट आणि डॉ. अ‍ॅनी बेझंट (वर्ष १९०५)

ऐ. डब्ल्यू. डगलस पी. हिल (वर्ष १९२८)

ओ. फ्रेंकलिन एडजर्ट (वर्ष १९४४)

औ. क्रिस्टोफर ईशरवुड (वर्ष १९४५)

३. श्रीमद्भगवद्गीतेची स्तुती करणारे अहिंदू आणि त्यांनी केलेली स्तुती !

अ. महंमद गझनीने भारतात आणून बंदीवासात ठेवलेले बुखाराचे अत्यंत बुद्धीमान राजकुमार ‘अल् बरूनी’ याने बंदीवासात संस्कृत शिकून स्वतःच्या पुस्तकात गीतेची पुष्कळ प्रशंसा केली आहे.

आ. दिल्लीचा सम्राट अकबराने प्रकांड पंडित ‘अबुल फैजी’कडून गीतेचे ‘फारसी’ भाषेत भाषांतर करवून घेतले आणि सम्राट शहाजहानचा पुत्र दाराशिकोह याने या भाषांतरित ग्रंथाची प्रस्तावना ‘सरे अकबर’ या शीर्षकाखाली केली. आपल्या प्रस्तावनेत गीतेची अपूर्व अशी प्रशंसा करतांना त्याने म्हटले, ‘गीतेचा ‘प्लेटो’च्या गुरूंवरही प्रभाव होता.’

इ. जर्मन विद्वान ‘वॉल्टर शू ब्रिंग’ यांनी गीतेची विशेष स्तुती केली आहे.

ई. जर्मन तत्त्ववेत्ता ‘कान्ट’ आणि त्याचे प्रशंसक ‘शॉपेनहावर’ आणि ‘हिगल’ गीतेचे प्रशंसक होते.

उ. जर्मन विद्वान ‘हम्बोल्ट’ यांनी गीता वाचून ‘आपले जीवन कृतार्थ झाले आणि हे एकमात्र उत्तम दर्शनकाव्य आहे’, असे सांगितले.

ऊ. गीतेचे अनेक युरोपीय भाषांमध्ये पुनःपुन्हा भाषांतर होऊ लागले. अनेक युरोपीय आणि अमेरिकी विद्वानांनी गीतेचे महात्म्य मुक्तकंठाने गायिले आहे.

ए. थोरोचे महान भक्त अमेरिकन लेखक ‘राल्फ वाल्डो एमरसन’ गीतेचे विशेष प्रशंसक होते.

ऐ. आयरिश कवी ‘जी. डब्ल्यू रसल’ (रसेल) यांनीही गीतेची पुष्कळ स्तुती केली आहे.

ओ. ‘यीट्स’, ‘फ्रेजर’, ‘मेकनिकल’ इत्यादी विदेशी विद्वानांनीही गीतेची मुक्तकंठाने स्तुती केली आहे.

औ. ‘टी.एस्. इलियट’ यांनी गीतेला ‘मानवी साहित्याला लाभलेली अमूल्य देणगी’, असे म्हटले आहे.

अं. ‘फरक्यूहर’ यांनी गीतेला ‘विलक्षण’, असे म्हटले होते.

क. ‘बुक्स’ हे गीतेकडे ‘मानवजातीच्या उज्वल भविष्यासाठीची निर्मिती’ म्हणून बघत होते.

ख. गव्हर्नर जनरल ‘वॉरन हेस्टिंग्ज’ यांनी स्तुती करतांना म्हटले आहे, ‘गीतेतील उपदेश कोणत्याही जातीला आणि राष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी अद्वितीय आहे.’

४. युरोपीय विद्वानांनी ओळखलेले गीतेचे महत्त्व !

अ. गीतेचा प्रभाव बौद्धांच्या ‘महायान’ ग्रंथात दिसून येतो.

आ. इंग्रज कवी कार्लायल गीतेचे उपासक होते.

इ. संस्कृततज्ञ ‘सर जॉन वुडरूफ’ गीतेचे भक्त होते.

ई. भारतातील ‘ईस्ट इंडिया कंपनी’चे विद्वान इंग्रज अधिकारी ‘चार्ल्स विल्किन्स’ यांनी अत्यंत परिश्रम घेऊन संस्कृतचा अभ्यास केला आणि गीतेचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले. कंपनीने हे भाषांतर जरी स्वतःच्या लाभासाठी करवून घेतले असले, तरी ही एक क्रांतीकारी घटना होती. या घटनेने युरोपीय जगतात खळबळ माजवली.

उ. ‘सर हेनरी टामस कोलब्रुक’ हे गीतेचे प्रशंसक होते. कोलब्रुक यांनी वर्ष १७६५ ते वर्ष १८३७ या कालावधीत संस्कृतचा प्रचार केला. त्यांनी वेदांवर विद्वत्तापूर्ण लेख लिहून युरोपमध्ये वेदांचा प्रसार करण्यास प्रारंभ केला.

ऊ. ‘सर विल्यम जोन्स’ यांचा गीता तसेच संस्कृत यांना वैभव मिळवून देण्यात मोठा वाटा आहे. यासाठी त्यांनी कोलकात्याचे विद्वान पंडित ‘रामलोचन’ यांच्या कठोर आदेशाचे पालन (गंगाजलाने खोली धुणे) करून पंडितांकडून ते संस्कृत शिकले.

ए. जर्मन विद्वान ‘विन्टरनित्स’, ‘पालडायसन’ आणि ‘मॅक्समूलर’ यांनी वैदिक साहित्य अन् गीता यांचा प्रसार करण्यासाठी बहुमूल्य वाटा उचलला.

ऐ. इंग्रजी कवी ‘सर एडविन आरनोल्ड’ यांनी केलेला गीतेचा प्रसिद्ध अनुवाद ‘दिव्य संगीत’ गांधींनी लंडनमध्ये वाचल्यावर त्यांना गीतेचा प्रथम परिचय झाला.

ओ. प्रसिद्ध इंग्रजी विद्वान ‘एल्डुअस हक्सले’ यांनी ‘गीता शाश्वत दर्शन’ या ग्रंथात केलेले गीतेवरील भाष्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी स्पष्ट आणि थोडक्यात वर्णन केलेले ‘गीता शाश्वत दर्शन’ हे सर्वाधिक क्रमबद्ध आध्यात्मिक कथन आहे.’

संदर्भ : ‘गीता स्वाध्याय’, डिसेंबर २०१०

 

भारतातील नागरिकांना त्यांच्या अद्वितीय
ठेव्याची जाणीव करून न देणारी काँग्रेसची धर्मनिरपेक्षता !

‘श्रीमद्भगवद्गीतेची अद्वितीयता देशोदेशीच्या सर्व धर्मांच्या नागरिकांनी अनुभवली असली, तरी निधर्मीपणाचा टेंभा मिरवणारे भारतातील काँग्रेस शासन गीतेचा पाठ्यपुस्तकात समावेश करत नाही; कारण भारतातील मुसलमान आणि ख्रिस्ती यांना न दुखावणे, हीच काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेची व्याख्या आहे.

Leave a Comment