श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व आणि त्यातील श्‍लोकाचा सुंदर भावार्थ

१. भगवंताला शरण येणार्‍या मनुष्याचे दायित्व भगवंत घेतो !

sulochana_jadhav_aaji_clr
सौ. सुलोचना जाधव

देवद आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुलोचना जाधवआजी (वय ६८ वर्षे) यांनी सांगितलेले श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व आणि त्यातील श्‍लोकाचा सांगितलेला सुंदर भावार्थ येथे देत आहोत.

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥
– श्रीमद्भगवद्गीता अध्याय १८, श्‍लोक ६६

अर्थ : सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्वशक्तीमान, सर्वाधार अशा मला परमेश्‍वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस. अशा रितीने जो भगवंताला शरण येतो, त्याच्याविषयीचे सर्व उत्तरदायित्व भगवंत घेतो. तो अशा शरणागताला सर्व पापकर्मांच्या परिणामांपासून वाचवतो.

 

२. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली
श्रीमद्भगवद्गीता ही मनुष्यासाठी परिपूर्ण मार्गदर्शक असून
केवळ तिचे श्रद्धापूर्वक अध्ययन आणि आचरण आवश्यक आहे !

मनुष्य प्रतिदिन पाण्याने स्नान करून स्वतःला स्वच्छ करतो; परंतु जो मनुष्य श्रीमद्भगवद्गीतारूपी पवित्र ज्ञानगंगेत केवळ एकदाच स्नान करतो, तो भौतिक जीवनाच्या सर्व मलिनतेपासून मुक्त होतो. आदिनारायण श्रीविष्णुरूप साक्षात् भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीता सांगितली असल्याने मनुष्याला इतर कुठल्याही ग्रंथाचे अध्ययन करण्याची आवश्यकता नाही. मनुष्याने केवळ श्रद्धेने, लक्ष देऊन आणि नियमाने श्रीमद्भगवद्गीतेचे श्रवण अन् अध्ययन करण्याची आवश्यकता आहे.

 

३. श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ सर्व वैदिक ग्रंथांचे सार आहे !

वर्तमान युगात मनुष्यप्राणी भौतिक जीवनातच इतका मग्न आहे की, त्याला वेद-उपनिषदादी ग्रंथांचे अध्ययन करणे शक्य नाही आणि त्याची आवश्यकताही नाही. केवळ श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ पुरेसा आहे; कारण तो सर्व वैदिक ग्रंथांचे सार आहे.

 

४. गंगाजलपानापेक्षाही गीतारूपी गोरसपानाचा महिमा अधिक आहे !

असे म्हणतात, जो मनुष्य गंगाजलपान (प्राशन) करतो, त्याला निश्‍चित मोक्ष मिळतो. मग जो श्रीमद्भगवद्गीतेचे पान करतो (त्यातील सार लक्षात घेऊन ते आचरणात आणतो), त्याच्याविषयी काय सांगावे ? हा ग्रंथ म्हणजे, महर्षि व्यासांनी स्वतः सांगितलेल्या महाभारताचे सारामृत आहे.

श्रीमद्भगवद्गीतेचा महिमा गंगा नदीपेक्षाही अधिक आहे. श्रीमद्भगवद्गीता ही गायीसमान आहे आणि तिचे दूध काढणारा गोपाळ हा भगवान श्रीकृष्ण आहे. गीतारूपी दुग्ध हे वेदांचे सार आणि अर्जुन हा गोवत्सासारखा (वासरासारखा) आहे. विवेकी महात्मे आणि शुद्ध भक्त या गीतारूपी दुग्धामृताचे पान करतात.

 

५. अनेकातून एकात येणे या अध्यात्मशास्त्रीय
सिद्धांतानुसार श्रीमद्भगवद्गीता हे एकमेव परिपूर्ण शास्त्र आहे !

सध्याच्या काळात मनुष्याला अशी उत्सुकता आहे की, आपल्याला एकच शास्त्र, एकच ईश्‍वर, एकच धर्म आणि एकच व्यवसाय (कर्म) असावा; म्हणून संपूर्ण विश्‍वाकरता एकच सार्वत्रिक शास्त्र असावे. ते आहे श्रीमद्भगवद्गीता ! एकच ईश्‍वर, म्हणजे भगवान श्रीकृष्ण होय. एकच धर्म म्हणजे त्याला शरण जाणे आणि त्यासाठीचा उपाय म्हणजे श्रीकृष्णाच्या नामाचा अखंड जप करणे. श्रीकृष्णाची सेवा हा एकच व्यवसाय (कर्म) होय.

– सौ. सुलोचना जाधव, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३१.७.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात