भगवद्गीता काय सांगते ?

।। श्रीकृष्णाय नमः ।।
पू. अनंत आठवले

 

१. प्रश्न : तुमच्या सर्व लेखांमध्ये गीतेचा उल्लेख असतो. आम्ही गीता वाचलेली नाही; पण बहुतेक
सर्व धार्मिक पुस्तकांमध्ये एखाद्याचे चरित्र आणि चमत्कारच असतात. गीतेत काय विशेष वेगळे आहे ?

उत्तर

अ. गीता कोणाचेही चरित्र सांगत नाही.

आ. गीता कुठल्याही चमत्कारांचे वर्णन करीत नाही.

इ. गीता मांत्रिक, तांत्रिक, मठाधीशांच्या पराधीन बनवीत नाही.

ई. गीता, गीतेची पारायणे करायला सांगत नाही.

उ. गीतेत कुठल्याही मंत्राचा आग्रह नाही.

ऊ. गीता कुठलेही स्थानमाहात्म्य, तीर्थयात्रा सांगत नाही.

ए. गीता कोणतीही अनुष्ठाने करायला शिकवीत नाही.

ऐ. गीतेत कुठल्याही साधनामार्गाचा अधिक्षेप (कमी लेखणे) नाही.

ओ. गीता कुणावरही अवलंबून राहायला सांगत नाही.

औ. गीतेत फतवे, कमांडमेंट्स, आज्ञा नाहीत.

 

२. प्रश्न : मग गीता करते तरी काय ?

उत्तर : एक श्लोक आहे –

‘न हस्ते यष्टिमादाय देवाः रक्षन्ति साधकम् ।

यं तु रक्षितुमिच्छन्ति

सुबुद्ध्या योजयन्ति तम् ।।’

अर्थ : ‘देवता हातात काठी घेऊन साधकाचे रक्षण करीत नाहीत. ज्याचे रक्षण करण्याची इच्छा करतात, त्याला सुबुद्धीने युक्त करतात.’ गीता हे करते !

भगवान् श्रीकृष्णांनी हे गीतेत सांगितलेलेच आहे. गीतेत अ. १० मध्ये ते असे म्हणत नाहीत की भक्तांना मी मोक्ष देतो. ते म्हणतात ‘मी त्यांना बुद्धी देतो.’

‘ददामि बुद्धियोगं तं येन मां उपयान्ति ते ।।’

– भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक १०

अर्थ : ‘माझ्या भक्तांना मी तत्त्वाचे ज्ञान देतो ज्याने (तसे प्रयत्न करून) ते मला प्राप्त होतात.’

थोडक्यात, गीता जन्ममृत्यूच्या फेर्‍यातून सुटण्याचे प्रयत्न करण्याची बुद्धी देऊन त्यासाठीचे उपाय (मार्ग) सुद्धा सांगते. अनेक मार्ग सांगून आपल्या प्रकृतीला रुचेल तो मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्यही देते.

– पू. अनंत आठवले

(संदर्भ : लवकरच सनातन संस्था प्रकाशित करणार्‍या ‘पू. अनंत आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या ग्रंथातून)

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment