साधकांकडून गीतेतील सूत्रांचे आचरण करवून घेऊन त्यांना बंधमुक्त करणारे परात्पर गुरु डॉक्टर !

Article also available in :

पू. अनंत आठवले

परात्पर गुरु डॉक्टरांनी तुम्हा सर्व साधकांना एक फार चांगली गोष्ट शिकवली आहे. तुम्ही प्रत्येक कृती ईश्‍वराला नमस्कार करून आरंभ करता आणि प्रत्येक कार्य पूर्ण झाल्यावर तुम्ही पुन्हा नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त करता. संगणकावरील सेवा झाल्यावर तुम्ही त्यालाही नमस्कार करूनच तो बंद करता.

भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटले आहे,

यत्करोषि यदश्‍नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्‍लोक २७

अर्थ : हे कौन्तेया (कुंतीपुत्र अर्जुना), तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर.

गीतेमध्ये भगवंताची तशी आज्ञा आहे. ‘असे करण्यामुळे काय होते ?’, हे त्याने पुढील श्‍लोकात सांगितले आहे.

शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः ।
संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्‍लोक २८

अर्थ : अशा रितीने ज्यामध्ये सर्व कर्मे मला भगवंताला अर्पण होतात, अशा संन्यासयोगाने युक्त चित्त असलेला तू शुभाशुभफळरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील.

प्रत्येक कर्माचे शुभ आणि अशुभ फळ असते. शुभाशुभ फळ म्हणजे पुण्य आणि पाप. त्या पुण्य आणि पाप यांमुळेेच आपण जन्म-मृत्यूच्या बंधनात अडकतो. यातून सुटण्यासाठी आपण करत असलेले प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण केल्यामुळे त्या कर्माचा त्याग होतो. त्यामुळे तुमचे संन्यास-कर्मयोगाचे आचरण होते; कारण संन्यासामध्ये त्याग असतो. त्यामुळे ‘पाप-पुण्य आणि कर्मबंधन यांच्या पलीकडे जाऊन त्या बंधनातून तुम्ही मुक्त व्हाल आणि मला प्राप्त होऊन शकाल’, असे जे भगवंताने गीतेमध्ये म्हटले आहे, ते परात्पर गुरु डॉक्टर तुम्हा साधकांकडून प्रत्यक्षात करवून घेत आहेत. असे केल्यामुळे भगवंत तुम्हाला मुक्ती देईल.

 

साधकांना निर्दोष बनण्याची शिकवण देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

अ. श्रीमद् शंकराचार्यांनी रामनाथी आश्रमात आल्यावर ‘निर्दोषं हि समं ब्रह्म ।’ असे म्हणणे

काही वर्षांपूर्वी रामनाथी आश्रमात पूर्वाम्नाय श्रीगोवर्धनमठ पुरी पीठाधीश्‍वर श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्‍चलानंदसरस्वती महाराज आले होते. त्या वेळी मी येथे नव्हतो. मी मुंबईमध्ये रहात होतो. ते वृत्त मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वाचले होते. तेव्हा त्यांनी म्हटले होते, ‘निर्दोषं हि समं ब्रह्म ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ५, श्‍लोक १९) म्हणजे ‘सच्चिदानंदघन परमात्मा निर्दोष आणि सम आहे.’

त्याचा अर्थ असा आहे की, ‘ब्रह्म निर्दोष आहे. ब्रह्मामध्ये कोणताच दोष किंवा विकृती नसते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षडरिपु आहेत. ते ब्रह्मामध्ये नसतातच आणि ब्रह्माचा दुसरा गुण त्यांनी ‘ब्रह्म सम आहे’, असा सांगितला आहे. राग-द्वेष, शीत-उष्ण, या सर्वांमध्ये ब्रह्म सम रहाते. त्याला कशामध्ये किंवा कुठल्याही विशेष गोष्टीत रुची नसते, त्याचप्रमाणे कशामध्ये अरुचीही नसते. शंकराचार्यांना रामनाथी आश्रमात ‘निर्दोषं हि समं ब्रह्म ।’ असे का म्हणावेसे वाटले असेल ? रामनाथी आश्रमात त्यांना ‘जे निर्दोष आहेत आणि समवृत्तीचे आहेत, जे कुणाशी अधिक मैत्री करत नाहीत आणि कुणाचा द्वेषही करत नाहीत’, असे साधक आढळले असतील. त्यामुळेच त्यांनी असे म्हटले असेल.

आ. निर्दोष आणि समवृत्तीचे साधक ब्रह्मात स्थित असणे

‘असे होण्यामुळे काय होते ?’, हे त्या श्‍लोकाच्या पुढील चरणात म्हटले आहे.

तस्माद्ब्रह्मणि ते स्थिताः ।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ५, श्‍लोक १९

अर्थ : ज्यांचे मन समभावात स्थिर झाले आहे, ते सच्चिदानंदघन परमात्म्यातच स्थिर असतात.

समवृत्तीमुळे ते साधक ब्रह्मामध्येच स्थित असतात. जे निर्दोष आहेत, ज्यांच्यामध्ये कोणताही स्वभावदोष नाही, त्यांच्यामध्ये समवृत्ती आपोआप येते. निर्दोषत्व आणि समवृत्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर समवृत्ती पूर्णतः आली असेल, तर मनुष्य निर्दोष होईल किंवा पूर्ण निर्दोषत्व झाले, तर तो आपोआप समवृत्तीचा होईल. जे साधक निर्दोष आणि समवृत्तीचे झाले, ते ब्रह्मातच लीन रहातात. शंकराचार्यांनी आपल्या आश्रमातील तुम्हा साधकांना पाहूनच असे म्हटले असेल. त्यांनी निर्दोषत्वाचे महत्त्व सांगितले; कारण हेच साधनेचे मूळ आहे. आपण जेव्हा भक्ती करतो, पूजा करतो, जप करतो, तेव्हा काय होते ? आपण १० वेळा नामजप करण्याचा संकल्प केला, एक सहस्र वेळा नामजप करण्याचा संकल्प केला, १ लक्ष नामजप करण्याचा संकल्प सोडला, तरी यामुळे भगवंत प्रसन्न होत नाही; मात्र जेव्हा आपण लक्षपूर्वक नामजप करतो, आपले लक्ष सांसारिक गोष्टींमध्ये न रहाता ते भगवंताकडे लागते, तेव्हा चित्तामध्ये विकृती रहात नाही. हे वाढत जाऊन हळूहळू ती त्याची प्रवृत्ती होते आणि मनुष्य विकृतीरहित होऊन जातो.

इ. कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी ‘मनुष्याला निर्दोष करणे’ हा साधनेचा उद्देश असणे

प्रत्येक साधनेमध्ये हाच उद्देश असतो, मग तो भक्तीमार्ग असो किंवा पतंजलयोग असो, ज्याला ‘योगश्‍चित्तवृत्तिनिरोधः ।’(पातञ्जलयोगदर्शन, समाधिपाद, सूत्र २) म्हणजे ‘योग चित्ताच्या वृत्तींचा निरोध करतो’, असे म्हटले गेले आहे. चित्ताच्या वृत्ती काय असतात ? योग मनात येणार्‍या असंख्य चांगल्या-वाईट अशा सर्वच विचारांना थांबवतो. सर्व विचार थांबवले गेले, तर दोष कुठे रहातात ? प्रत्येक साधनेचा उद्देश ‘मनुष्याला निर्दोष करणे’ हाच असतो आणि तीच प्रत्येक प्रकारच्या साधनेतील प्रमुख सूत्र आहे. नुसतेच कर्म कराल, तर फसाल; पण जेव्हा आपण निष्काम कर्म करू, तर आपल्या मनात विकृती रहाणारच नाही. हेच मूळ सूत्र आहे. ही गोष्ट परात्पर गुरु डॉक्टर आपणाकडून प्रत्यक्षात करवून घेत आहेत.

असे उच्च कोटीचे गुरु आपणा सर्वांना लाभले आहेत. त्यांना माझा नमस्कार !’

– अनंत आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू), ढवळी, फोंडा, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment