गोमंतकातील हिंदुत्वाची धगधगती ज्वाळा प्रा. सुभाष वेलिंगकर !

प्रखर राष्ट्राभिमान, हिंदु धर्मावरील नितांत प्रेम अन् तत्त्वनिष्ठा यांचे गोमंतकातील मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प्राध्यापक सुभाष वेलिंगकर ! उतारवयात निवांत वेळ घालवण्याऐवजी काळाची पावले ओळखून धर्मांतर आणि जिहाद यांना विरोध, मंदिर सुरक्षा, धर्मशिक्षण, हिंदु संस्कार समर्पण अशी पंचसूत्री हाती घेऊन कार्य करणारी हिंदुत्वाची ज्वाळा. असे हे ‘तरुण’ व्यक्तीमत्त्व पंचाहत्तरी साजरी करत आहे. त्या निमित्ताने हा लेखनप्रपंच…

प्रा. सुभाष वेलिंगकर असा नेता गोमंतकाला लाभला, हे समस्त हिंदु समाजाचे भाग्य !

 

१. संघातून देशभक्तीचे बाळकडू

पोर्तुगिजांच्या राजवटीतून गोवा मुक्त झाल्यानंतर जून १९६२ मध्ये पणजीचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोव्यातील पहिल्या शाखेचा शुभारंभ झाला. तेव्हा प्रा. वेलिंगकर यांनी १३ वर्षांचे असतांना शाखेत प्रवेश केला. त्यानंतर सलग ५५ वर्षे संघातून गोमंतकात राष्ट्रीयत्व अन् हिंदुत्व रुजवले. ते राष्ट्ररक्षणाचे कार्य करत असतांना वर्ष १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांना १० मास कारावास सहन करावा लागला; पण त्यांनी राष्ट्रकार्य सोडले नाही. यातून त्यांच्यातील राष्ट्रप्रेम अधोरेखित होते.

श्री. चेतन राजहंस

 

२. गोमंतकातील कुशल हिंदूसंघटक

‘हिंदूसंघटक’ हा शब्द आला की, आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मरण करतो. गोव्यात मात्र कुशल हिंदूसंघटक म्हटले की, प्रा. वेलिंगकर सर यांची मूर्ती डोळ्यांसमोर उभी रहाते. सध्या ते ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’, ‘भारतमाता की जय संघ (गोवा)’, ‘हिंदू रक्षा महाआघाडी’ यांच्या माध्यमातून सक्रीयपणे हिंदूसंघटनाचे कार्य करत आहेत. यातून त्यांच्यातील संघटनकौशल्य दिसून येते. ‘हिंदू रक्षा महाआघाडी’च्या माध्यमातून त्यांनी आरंभलेले कार्य ही तर काळाची आवश्यकता आहे. यंदा त्यांच्याच प्रयत्नांमुळे चैत्र शुक्ल प्रतिपदेला, म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी गोव्यात ठिकठिकाणी नववर्ष स्वागतानिमित्त मोठ्या प्रमाणात प्रभातफेर्‍या निघाल्या. यातून हिंदू संघटनासाठी त्यांच्यातील तळमळ दिसून येते.

विविध संघटनांमध्ये उत्तुंग कार्य करूनही गोमंतकातील सर्व हिंदु संघटना, मंदिरे आणि मठ-आश्रम यांना त्यांचा आधार वाटतो. हेच प्रा. वेलिंगकर यांचे व्यापकत्व !

 

३. गोमंतकातील तत्त्वशून्य राजकारणाला विरोध

प्रा. वेलिंगकर यांनी वेळोवेळी गोमंतकातील तत्त्वशून्य राजकारणाला विरोध केला. त्यांनी ‘सेक्युलॅरिझम (निधर्मीपणा)’च्या नावाखाली होत असलेल्या अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्याच्या धोरणाला विरोध करतांना हिंदुत्वाच्या मुद्यांवर खुली चर्चा चालू केली. पोर्तुगालहून येत असलेले जहाज असो किंवा श्रीरामसेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांच्यावरील गोवा प्रवेशबंदी असो, त्यांनी त्याविषयी निर्भिडपणे आवाज उठवला. ख्रिस्ती शाळांना अनुदान देण्याच्या विरोधात ते रस्त्यावर उतरले. भारतीय भाषांच्या स्वाभिमानासाठी त्यांनी संघटना स्थापन केली. आज खुद्द गोमंतकामध्येसुद्धा रामनवमीच्या दिवशी आतंकवादी विचारसरणीच्या लोकांकडून दंगे होऊ लागले आहेत. अशा वेळी प्रा. वेलिंगकर करत असलेल्या कार्याला विशेष महत्त्व आहे.

 

४. गोमंतकाच्या अस्मितेचे रक्षक

गोवा पोर्तुगिजांच्या राजवटीतून मुक्त झाला असला, तरी पोर्तुगीजधार्जिणे आजही ती संस्कृती गोमंतकावर थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. गोव्यावर इन्क्विझिशन (धर्मच्छळ) लादणारे क्रूरकर्मा फ्रान्सिस झेवियर याचे गोवामुक्तीनंतरही ‘गोंयचो सायब’ म्हणून उदात्तीकरण चालू ठेवले आहे. अशा वेळी ‘गोवा ही भगवान परशुरामनिर्मित भूमी, हीच गोव्याची ओळख आहे. भगवान परशुराम हाच गोव्याचा निर्मितीपासूनचा ‘रक्षणकर्ता’ आहे’, असे जगाला ठणकावून सांगण्याचे धाडस प्रा. वेलिंगकर करत आहेत. यातून त्यांचा निर्भिडपणा दिसून येतो.

 

५. सनातन संस्थेशी असलेले ऋणानुबंध !

सनातन संस्थेशी त्यांचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध ! त्यांनी गोवा रक्षा महाआघाडीची स्थापना करण्याचे ध्येय सांगितल्यावर सनातन संस्थेला त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करण्याची अमूल्य संधी प्राप्त झाली. यासाठी त्यांच्याप्रति कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ‘हिंदूंवरील अन्याय, अत्याचार आणि हिंसा यांच्या घटनांची माहिती देऊन हिंदु समाजात जागृती घडवून आणणारे एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात’ हेच आहे. गेली ४ वर्षे मी सर्वप्रथम ‘सनातन प्रभात’ हाताळल्यानंतरच अन्य वृत्तपत्रे वाचायला घेतो. हिंदु समाजासाठी कार्य करणार्‍या समस्त बंधू-भगिनींनी हे दैनिक आपल्या कार्याचा अविभाज्य भाग करावा’, असे उघडपणे हिंदु समाजाला त्यांनी केलेले आवाहन प्रा. वेलिंगकर यांच्यातील विनम्रपणा आणि सनातन संस्थेवर असलेले प्रेमच व्यक्त करत असते.

६. गोमंतकाचे भाग्य !

असा नेता गोमंतकाला लाभला, हे आमचे आणि समस्त हिंदु समाजाचे भाग्य आहे. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे विविधांगी पैलू उलगडणे, हा या लेखाचा हेतू नाही, तर गोमंतकासाठी अतुलनीय योगदान दिलेल्या प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याप्रति हृदयपूर्वक कृतज्ञता व्यक्त करणे, हा आहे. ‘वयाच्या अमृत महोत्सवी वर्षातही तरुणांना लाजवेल, अशा पद्धतीने कार्य करणारे प्रा. सुभाष वेलिंगकर यांना दीर्घायुष्य आणि बळ मिळावे’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

– श्री. चेतन राजहंस, सहसंपादक ‘सनातन प्रभात नियतकालिक समूह आणि राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था. (४.१०.२०२२)

 

Leave a Comment