अत्यल्प व्ययात, तसेच सहज उपलब्ध साहित्यामध्ये घरच्या घरी भाजीपाला लागवड करा !

सौ. राघवी मयूरेश कोनेकर

१. घरच्या घरी भाजीपाला लागवड करण्यासाठी लागणारे साहित्य

१ अ. कुंड्या किंवा पिशव्या (ग्रो-बॅग)

घरी प्लास्टिकच्या किंवा मातीच्या कुंड्या उपलब्ध असतील, तर त्यांमध्ये लागवड करता येते. कुंड्या नसतील, तर जुने टब, ड्रम, टायर अशा पर्यायांचा उपयोग करता येतो. आजकाल पेठेमध्ये खास लागवडीसाठी बनविलेल्या विविध आकारातील पिशव्या (ग्रो-बॅग) मिळतात. त्यांचाही उपयोग करू शकतो.

१ आ. विटा

वाफे (लागवडीसाठीचे विशिष्ट आकाराचे कप्पे) बनविण्यासाठी विटांचा उपयोग होतो. केवळ एक वीट उंचीच्या वाफ्यातही उत्तम भाजीपाला लागवड होते. एकदा आणलेल्या विटांचा अनेक वर्षे उपयोग करता येतो.

१ इ. विघटनशील कचरा

सुका पालापाचोळा, उसाचे चिपाड (रस पिळून काढल्यावर राहिलेला भाग), झाडांच्या वाळलेल्या काड्या, झावळ्या, नारळाच्या शेंड्या, घरातील भाजीपाल्याची अन् फळांची साले, देठे इत्यादी विघटनशील कचर्‍याचा कुंडी किंवा वाफे भरण्यासाठी, तसेच आच्छादन करण्यासाठी (जमीन झाकण्यासाठी) उपयोग करता येतो. माती उपलब्ध झाली नाही, तर असा विघटनशील कचरा कुजवून त्यापासून सुपीक माती (ह्यूमस) बनवून तिच्यात लागवड करता येते.

१ ई. जीवामृत बनवण्यासाठी बालदी

आपल्या लागवडीच्या आवश्यकतेनुसार जेवढे लिटर जीवामृत बनवायचे असेल, त्याहून थोड्या अधिक लिटर क्षमतेची बालदी घ्यावी. ही बालदी धातूची नसावी. बालदीऐवजी मातीचे मडकेही वापरता येते. बालदीतील जीवामृत सुती कापड किंवा गोणपाट याने झाकावे. (‘जीवामृत’ म्हणजे देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांचा वापर करून बनवलेले नैसर्गिक खत. – संकलक)

१ उ. बीजामृत बनवण्यासाठी डबा

घरगुती लागवडीसाठी बीजामृत अल्प प्रमाणात लागते. त्यामुळे साधारण अर्धा ते एक लिटर क्षमतेचा प्लास्टिकचा डबा पुरेसा होतो. (‘बीजामृत’ म्हणजे देशी गायीचे शेण, गोमूत्र, चुना इत्यादींचा वापर करून बियाण्यावर संस्कार करण्यासाठी बनवलेले नैसर्गिक मिश्रण. – संकलक)

१ ऊ. पाण्याची व्यवस्था

घराभोवती किंवा छतावर लागवडीच्या जवळच पाण्याचा नळ असावा. पाणी घालण्यासाठी झारी किंवा नळी (पाईप) असावी. नळीने पाणी देतांना एकाच ठिकाणी जास्त पाणी पडू नये, यासाठी तिला ‘शॉवर’ बसवता येतो.

१ ए. भाजीपाल्याचे बियाणे

घरात उपलब्ध असलेले मेथीदाणे, धने, मोहरी, चवळी आदी पदार्थ यांचा बियाणे म्हणून उपयोग करून लागवडीचा आरंभ करावा. पुढे आपल्या कुटुंबाच्या आवडीनुसार भाज्यांची सूची बनवून, तसेच उपलब्ध जागेचा विचार करून भाजीपाल्याचे बियाणे आणावे. बियाणे शक्यतो देशी असावे; परंतु ते उपलब्ध न झाल्यास पेठेत उपलब्ध असलेले बियाणे वापरावे.

१ ऐ. फळझाडे आणि फुलझाडे यांची कलमे किंवा फांद्या

शासनमान्य कृषी सेवाकेंद्र किंवा विश्वासू (खात्रीशीर) रोपवाटिका (नर्सरी) यांमध्ये फळझाडांची उत्तम गुणवत्तेची कलमे अल्प मूल्यात उपलब्ध होऊ शकतात. काही फुलझाडांच्या फांद्या लावून नवीन रोपे बनवता येतात.

१ ओ. देशी गाईचे शेण आणि गोमूत्र

जिवामृताचा उपयोग नियमितपणे करता यावा, यासाठी यांची उपलब्धता नियमित होईल असे पहावे. न्यूनतम १५ दिवसांतून एकदा देशी गायीचे १०० ग्रॅम ताजे शेण आणि १०० मिलि गोमूत्र (हे कितीही जुने चालते.) उपलब्ध होईल, असे पहावे. हे सहज शक्य आहे.

१ औ. अन्य साहित्य

लहान खुरपे, झाडे कापण्याची कात्री, सुतळी, झाडांना आधार देण्यासाठी लहान काठ्या, तुषार सिंचन करणारी (स्प्रेची) लहान बाटली इत्यादी साहित्यही आवश्यक आहे.

 

२. घरच्या घरी भाजीपाला लागवड करतांना लक्षात घेण्याची सूत्रे

अ. जिथे लागवड करणार आहोत, त्या ठिकाणी पुरेसा सूर्यप्रकाश येत असल्याची निश्चिती करावी.

आ. नैसर्गिक पद्धतीने लागवड करतांना आंतरपिकांचे कार्य महत्त्वाचे असते. कुंड्यांपेक्षा वाफा किंवा पसरट पिशव्यांमध्ये (ग्रो-बॅगमध्ये) एकाहून अधिक पिकांची लागवड केल्यास अधिक उत्पन्न मिळते.

इ. सर्व कुटुंबियांनी मिळून लागवडीची कामे वाटून घेतल्यास कोणा एकावर कामांचा ताण येत नाही. घरातील लहान मुलांनाही आवर्जून या कामांत सहभागी करून घ्यावे आणि सर्वांनी निसर्गाजवळ राहण्यातील आनंद घ्यावा.

ई. सातत्य, चिकाटी, निरीक्षणक्षमता, शिकण्याची वृत्ती अशा गुणांच्या आधारे भाजीपाला लागवड करणे सहज शक्य आहे.

येणार्‍या भीषण आपत्काळात सर्वांनाच न्यूनतम स्वतःच्या कुटुंबासाठी तरी विषमुक्त भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी सनातनने ‘घरोघरी लागवड मोहीम’ चालू केली आहे. या विषयावरील अनेक लेख, छायाचित्रे, माहितीपट (व्हिडिओ) सनातनच्या संकेतस्थळावर घरच्या घरी भाजीपाला लागवड कशी करावी ? या मार्गिकेवर उपलब्ध आहेत. त्यांचा अभ्यास करून प्रत्येकाने थोड्या प्रमाणात तरी लागवड चालू करावी.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२३.८.२०२२)

Leave a Comment