मानसोपचार आणि अध्यात्म यांतील भेद

अध्यात्म हे चैतन्यमय असून मानसोपचार चैतन्यविरहित कसे आहे, हे पुढील काही उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल.

१. ‘एका मुलीचे एका मुलावर प्रेम होते. बौद्धिक दृष्टीने विचार केल्यास तिने त्याच्याशी लग्न करणे अयोग्य होते; म्हणून तिच्यावर संमोहनोपचार जवळजवळ एक वर्ष केल्यावर लग्न करण्याचा विचार तिने सोडला. येथे वैखरी वाणीचा वापर होता. आणखी एका निराळ्या प्रकरणात एका मुलाचे एका मुलीवर प्रेम होते. त्यांनी गुपचूप साखरपुडा केला आणि मग घरच्या मंडळींना सांगितले. ‘हे लग्न टिकणार नाही’, असे अध्यात्मदृष्ट्या विचार केल्यावर प.पू. डॉ. जयंत आठवले यांना जाणवले; म्हणून तसे त्याला त्यांनी दुसर्‍याच्या माध्यमातून सांगितले आणि ‘तीन दिवसांनी तुला योग्य काय ते सुचेल’, असे त्याला सांगितले. तोपर्यंत त्याने विचार करायचा नव्हता. भावनेच्या आहारी जाऊन लग्न करणे किंवा साखरपुडा मोडणे, असे व्हायला नको; म्हणून तीन दिवसांचा अवधी सांगितला होता. तिसर्‍या दिवशी साखरपुडा मोडल्याचे त्याने सांगितले. येथे ‘साखरपुडा मोडावा’,असा संकल्पही नव्हता. केवळ मध्यमा वाणीचा वापर असल्यामुळे मुलाला योग्य निर्णय घेता आला होता.

२. एका व्यक्तीच्या भावासाठी सांगून आलेली मुलगी कुटुंबातील एकाला आवडली नाही; म्हणून त्यांनी मुलीकडच्यांना नकार कळवला. इतर लोक म्हणाले, ‘‘एवढी चांगली मुलगी नाकारली कशी ?’’ मग त्यांच्यात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. त्यांची खरंच चूक असती, तर त्यांना मानसशास्त्रानुसार ‘प्रत्येकाकडून चूक होते. झाले-गेले विसरा’, या पद्धतीचे काही मास समजावून सांगावे लागले असते. चूक नसल्यास ‘योग्य केले’ याची निश्चिती देण्याविषयी सूचना द्याव्या लागल्या असत्या. अर्थात हे चूक आहे कि योग्य, हे केवळ साधनेने अध्यात्मात थोडीफार उन्नती झाल्यावरच कळते. त्या वेळी प.पू. डॉ. जयंत आठवले यांना असे जाणवले की, त्या मुलीशी लग्न झाले असते, तर त्यांना सर्वसाधारण माणसाइतके सुख मिळाले असते; पण सहा मासांनी होणारे लग्न दुप्पट सुख देणार आहे. हे त्यांना सांगितल्यावर तत्क्षणी त्यांची खंत गेली.

३. ‘आपण हृदयविकाराच्या झटक्याने मरणार’, अशी एका रुग्णाला भीती वाटायची. अध्यात्मदृष्ट्या विचार केल्यावर त्याचे आयुष्य अजून ३५ वर्षे असल्याचे प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या लक्षात आले. तसे त्याला सांगितल्यावर तत्क्षणी त्याची भीती गेली. अन्यथा संमोहनोपचाराने त्याला बरे करायला ८ – ९ मास लागले असते.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्म’

Leave a Comment