भस्म

 

ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म ! ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म !

 

१. व्युत्पत्ती

‘भ’ म्हणजे ‘भर्त्सनम्’ (नाश होणे) आणि ‘स्म’ म्हणजे ‘स्मरणम्’ (स्मरण करणे) थोडक्यात ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म ! भस्मातील ‘भ’ म्हणजे सगळ्या पापांची निंदा करण्याचे द्योतक आहे, तर ‘स्म’ यातून शिवाच्या स्मरणाची आठवण होते.

 

२. व्याख्या

कुठलीही वस्तू जाळल्यावर जी राख उरते, तिला ‘भस्म’ म्हणत नाहीत, तर देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात.

 

३. अर्थ

भस्म लावणे, याचा सांकेतिक अर्थ म्हणजे ‘दुष्कृत्यांचा नाश होणे’ आणि ‘ईश्वराची आळवणी करणे’ होय.

 

४. भस्माचे महत्त्व

भस्म आपल्याला ‘हे शरीर नश्वर आहे आणि एक दिवस त्याचीही राख होणार आहे; म्हणून आपण देहाची आसक्ती बाळगता कामा नये’, याची आठवण करून देते.

४ अ. भस्माचा टिळा शिवभक्तीचे प्रतीक असणे

भस्म हे विशेषकरून शिवाशी संबंधित आहे; कारण भगवान शिव सर्वांगाला भस्म लावतो. शिवभक्त आपल्या भालप्रदेशावर भस्माने त्रिपुंड्राकृती काढतात. कधी कधी लाल रंगाचा टिळाही या त्रिपुंड्राच्या मध्यभागी काढतात. तो टिळा शिवभक्तीचे प्रतीक मानला जातो. जीव-शिव यांच्या मीलनाने हे दृश्य आणि अदृश्य जगत निर्माण होते, हे दर्शवणारे चिन्ह होय.

४ आ. पुरुषांनी कपाळावर भस्माचे तीन पट्टे लावल्यावर होणारे सूक्ष्मातील लाभ

 

 

५. भस्म लावण्याचा उद्देश

आम्हाला आमचे देहतादात्म्य सोडून या जन्ममरणाच्या फेर्‍यांतून मुक्त व्हायचे आहे, याची आठवण म्हणून.

 

६. भस्माचा वापर

दंडावर भस्माचा वापरदंडावर भस्माचा वापर

अ. भस्म हे सर्वसाधारणपणे कपाळावर लावतात. काही जण दंड आणि छाती इत्यादी भागांवरही लावतात. काही तपस्वी सर्वांगाला भस्म लावतात.

अ १. भस्म कपाळाला लावतांना पाळावयाचा दंडक : उपनिषदे एक दंडक पाळायला सांगतात, ‘भस्म कपाळाला लावतांना ‘महामृत्यूंजय मंत्रा’चा जप करावा.

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ।। – ऋग्वेद, मण्डल ७, सूक्त ५९, ऋचा १२

अर्थ : कीर्तीमान आणि महाशक्तीशाली त्र्यंबकाचे (रुद्राचे) आम्ही यजन करतो. हे रुद्रा, काकडी देठापासून खुडावी, त्याप्रमाणे आम्हाला मृत्यूपासून मुक्त कर; पण अमरत्वापासून दूर ठेवू नको.

आ. बरेच जण प्रत्येक वेळी चिमूटभर भस्मच वापरतात.

इ. पूजा म्हणून देवाला राखेने अभिषेक घालतात. त्या भगवत् स्पर्शाने पवित्र झालेली राख भस्म म्हणून वाटतात.

 

७. भस्माचे इतर प्रचलित शब्द

७ अ. विभूती

विभूती म्हणजे गौरव. विभूती लावणार्‍यांना ती गौरव प्रदान करते.

७ आ. रक्षा

रक्षा म्हणजे सुरक्षेचा स्त्रोत. रक्षा लावणार्‍यांना तो निर्मल बनवतो आणि अनारोग्य अन् विपत्ती यांपासून त्यांचे रक्षण करतो.

 

८. भस्मातील औषधी गुण

भस्मात काही औषधी गुण असल्याने ते आयुर्वेदिक उपचार पद्धतीत वापरतात. शरिरातील बाष्पता शोधून घेण्याच्या क्षमतेमुळे डोकेदुखी, सर्दी या व्याधींसाठी त्याचा औषधात उपयोग होतो.

 

९. ब्रह्माप्रमाणेच राखही शाश्वत असणे

लाकडे जळल्यावर त्यांची केवळ राख शेष रहाते. त्या राखेचा आणखी नाश होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्म हे अविनाशी सत्य आहे. असंख्य नाम रूपात्मक असणारी ही दृश्ये आणि अदृश्य सृष्टी नष्ट झाली, तरी हे ‘सत्य’ विद्यमान रहाते. – स्वामिनी विमलानंद (मासिक ‘शक्तिब्रह्माश्रम समाचार’, ऑगस्ट २०११)

 

भस्माची शिकवण

१. मनुष्याने आपली आहुती देऊन भस्म होणे, म्हणजे आपल्या इच्छा-आकांक्षा, दोष, अज्ञान अन् अहं यांचा त्याग करणे आणि मनाची शुद्धता प्राप्त करणे

२. मानवी देह हा नश्वर असल्याने मरणानंतर त्या देहाची जळून राखोटी होणार आहे. त्यामुळे कोणीही देहासक्ती बाळगू नये. मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो, याची जाणीव ठेवून मोठ्या महत्प्रयासाने मिळालेला मनुष्यजन्म सार्थकी लावण्यासाठी आणि आपला प्रत्येक क्षण पवित्र अन् आनंददायी करण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे, असे भस्म सूचित करते. अर्थात् यांतून साधनेचे महत्त्व पुन: एकदा अधोरेखितहोते.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘शिव – भाग १’

Leave a Comment