मनुष्याला २३ पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन केल्याचे पुण्य देणारी अमरनाथ यात्रा !

Article also available in :

धार्मिक मान्यतेनुसार अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने काशीमध्ये घेतलेल्या दर्शनापेक्षा १० पट, प्रयागपेक्षा १०० पट आणि नैमिषारण्यापेक्षा १ सहस्र पट अधिक पुण्य लाभते. म्हणूनच आजही कोट्यवधी हिंदू मोठ्या भक्तीभावाने अमरनाथ यात्रा करतात. अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाची, तसेच तेथील पार्वती पीठाची वैशिष्ट्ये सांगणारा हा लेख.

amarnath_temple_yatra_in_india

 

१. पूर्वीचे अमरेश्‍वर म्हणजेच आताचे श्री अमरनाथ तीर्थक्षेत्र !

अमरनाथ हे हिंदूंचे मुख्य तीर्थक्षेत्र आहे. प्राचीन काळी ते अमरेश्‍वर म्हणून ओळखले जायचे. श्रीनगरहून सुमारे १४५ कि.मी. अंतरावर हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये अमरनाथची गुहा वसलेली आहे. समुद्रसपाटीपासून ३ सहस्र ९७८ मीटर उंच ठिकाणी असलेली ही गुहा १६० फूट लांब आणि १०० फूट रूंद आहे. या गुहेची उंचीही अधिक आहे. अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाच्या दर्शनाने मनुष्याला २३ पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन केल्याचे पुण्य मिळते.

 

२. बर्फाच्या शिवलिंगाच्या रूपाने साक्षात्
भगवान शिवाचे अस्तित्व असलेली अमरनाथ गुहा !

अमरनाथ येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते. भगवान शिवाने देवी पार्वतीला या गुहेमध्ये अमरत्वाचा मंत्र दिला होता, हे या गुहेचे महत्त्व आहे. साक्षात् भगवान शिवाचे या गुहेमध्ये अस्तित्व आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पार्वती देवीला अमरकथा सांगण्यासाठी घेऊन जात असतांना भगवान शिवाने वाटेमध्ये प्रथम स्वत:चे वाहन नंदीचा त्याग केला. यानंतर चंदनबाडी येथे स्वत:च्या जटेमधून चंद्राला मुक्त केले. शेषनाग येथील एका तलावावर पोचल्यानंतर त्यांनी गळ्यातून साप काढले. आपल्या प्रिय पुत्र गणपतीला त्यांनी महागुणस पर्वतावर सोडले. नंतर पंचतरणी या ठिकाणी जाऊन भगवान शिवाने पाचही तत्त्वांचा त्याग केला. एका मान्यतेनुसार राखीपौर्णिमेच्या दिवशी साक्षात् भगवान शिवाचे अमरनाथ गुहेमध्ये आगमन होते.

 

३. ५१ शक्तीपिठांपैकी एक पीठ
असलेले अमरनाथ गुहेमधील पार्वती पीठ !

अमरनाथ गुहेमध्ये निर्माण होणारे शिवलिंग संपूर्ण बर्फाचे बनते; मात्र गुहेबाहेर पुष्कळ अंतरावर साधा बर्फ आहे. या गुहेच्या वर रामकुंड आहे, असे सांगितले जाते. अमरनाथ गुहेत पार्वती पीठ असून आजही अनेक भाविक त्याविषयी अनभिज्ञ आहेत. हे पीठ ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. येथे देवी सतीच्या कंठाचा भाग पडला होता, असे मानले जाते. शास्त्रात नमूद केलेल्या माहितीनुसार भगवान शिवाने पार्वती मातेला अमरत्वाचे रहस्य सांगितले होते. त्या वेळी माता पार्वतीसह एक पोपट आणि दोन कबूतर यांनीही ते ऐकले. हा पोपट नंतर शुकदेव नामक ऋषि होऊन अमर झाला आणि कुबतरांची जोडीही अमर झाली. काही भक्तांना आजही त्या गुहेमध्ये अमर झालेल्या कबुतरांची जोडी दिसते.

संदर्भ : आज तक वृत्तवाहिनी