महादेवासमोर नंदी नसलेले त्रैलोक्यातील एकमेव श्री कपालेश्‍वर मंदिर

Article also available in :

कुंभनगरी नाशिकचे माहात्म्य

नाशिक ही खर्‍या अर्थाने पुण्यभूमी आहे. या नगरीला साक्षात् भगवान शिव, प्रभु श्रीरामचंद्र अशा अनेक देवतांचे चरणस्पर्श झाले आहेत; म्हणूनच ती आध्यात्मिक नगरीही आहे. नाशिक हे जसे त्र्यंबकेश्‍वरमधील ज्योर्तिलिंगासाठी प्रसिद्ध आहे, तसेच ते अतीप्राचीन श्री कपालेश्‍वराच्या मंदिरासाठीही प्रसिद्ध आहे. आज श्रावणी सोमवारनिमित्त नाशिक येथील श्री कपालेश्‍वर महादेवाची महती आणि माहिती जाणून घेऊ.

Kapaleshwar-4

 

 

१. ज्योर्तिलिंगांच्या दर्शनाचे फळ कपालेश्‍वर महादेवाच्या दर्शनाने प्राप्त होणे

शिवक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील नऊ कोशात्मक ब्रह्मगिरीरूपी शिवलिंगाच्या सान्निध्यात नाशिकक्षेत्री असलेले कपालेश्‍वर हे स्वत: भगवान विष्णु यांनी स्थापन केलेले शिवलिंग आहे. गोदावरी नदीच्या तिरी असलेल्या रामकुंडासमोर पायर्‍या चढून गेल्यावर श्री कपालेश्‍वरांचे स्थान आहे.

सर्वेभ्योऽप्याधिका काशी तत: पञ्चवटी स्मृता ।
कपालेश्‍वरसंज्ञं तु ततोऽप्याधिकमुच्यते ॥ – श्री कपालेश्‍वरमहादेव स्तोत्र

अर्थ : सर्व क्षेत्रांत काशी श्रेष्ठ आहे. त्याहीपेक्षा पंचवटी अधिक श्रेष्ठ आहे आणि कपालेश्‍वराचे स्थान, तर अतिशय श्रेष्ठ आहे.

१२ ज्योर्तिलिंगाच्या दर्शनाचे फळ कपालेश्‍वर महादेवाच्या दर्शनाने मिळते, तसेच कोटी यज्ञ केल्याने जे पुण्य मिळते, ते पुण्य कपालेश्‍वरदर्शनाने मिळते. इतके कपालेश्‍वर शिवलिंगाचे अगाध माहात्म्य आहे.

 

२. महादेवासमोर नंदी नसण्याविषयी पद्मपुराणात सांगितलेली कथा

महादेवासमोर नंदी नसलेले कपालेश्‍वराचे मंदिर हे त्रैलोक्यात एकमेव आहे. कुठल्याही शिव मंदिरात जातांना प्रथम नंदीचे दर्शन अन् नंदीच्या दोन शिंगांतून शिवलिंगाचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे; परंतु कपालेश्‍वर मंदिरात नंदीच नाही. याविषयी पद्मपुराणात उद्धृत केलेली कथा पुढीलप्रमाणे आहे.

२ अ. भगवान शिवाला ब्रह्महत्येचे पातक लागणे

ब्रह्मदेवास ५ मुख होती, ते ४ मुखांनी ५ वेदांचे पठण करत; पण ५व्या मुखातून एकदा विष्णुनिंदा झाली. ही विष्णुनिंदा ऐकून हरिभक्त शंकराचा क्रोध अनावर झाला. त्यांनी ब्रह्मदेवाच्या हातातील ब्रह्मास्त्र हिसकावून विष्णुनिंदा करणार्‍या मुखाचा शिरच्छेद केला. त्यामुळे भगवान शिवाला ब्रह्महत्येचे पातक लागले.

२ आ. पापक्षालनासाठी शिवाने उत्तरेसह दक्षिणेकडील तीर्थांची यात्रा करणे

या पापक्षालनासाठी भगवान शिवाने उत्तरेकडील अनेक तीर्थयात्रा केल्या; परंतु पातकापासून त्यांची मुक्तता झाली नाही. तेव्हा दुःखी होऊन ते दक्षिणेकडे आले. नाशिक क्षेत्राजवळ गंगापूर-गोवर्धन या गावांजवळ तेव्हा ब्राह्मणांची वस्ती होती. तेथे देवशर्मा नावाचा ब्राह्मण रहात होता. त्याच्याकडे गायी आणि वासरे होती. भगवान शिव तेथे थांबले असता त्यांना मध्यरात्रीच्या सुमारास गाय-वासरू यांच्यातील संवाद ऐकायला मिळाला. गाय वासराला समजावत होती, उद्या देवशर्मा ब्राह्मण तुझ्या नाकात वेसण घालणार आहे. तू शांतपणे वेसण घालून घे. त्यावर वासरू गायीला म्हणाले, मी नाकात वेसण घालणार नाही. देवशर्माने जर बलपूर्वक असे केले, तर मी त्याला ठार मारीन. तेव्हा गायीने वासराला ब्रह्महत्येच्या महाभयंकर पातकाची कल्पना देऊन त्या पातकापासून मुक्तता होणार नसल्याचे सांगितले. त्यावर वासराने गायीला तू चिंता करू नकोस. ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्त होण्याचा मार्ग मला माहीत आहे, असे सांगितले.

२ इ. वासराकडून शिवाला ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होण्याचा मार्ग कळणे

दुसर्‍या दिवशी देवशर्मा त्या वासराच्या नाकात वेसण घालण्यासाठी आला. तो वासराच्या नाकात वेसण घालण्यासाठी खटपट करत असतांना त्या वासराने (गोर्‍ह्याने) स्वत:चे पाश तोडून स्वत:च्या शिंगांनी त्या ब्राह्मणाला ठार मारले. तेव्हा पांढर्‍या वासराचे शरीर काळे पडले. तेव्हा ते वासरू तडक रामकुंडावर आले आणि त्याने त्या ठिकाणाच्या अरुणा, वरुणा आणि गोदावरी या नद्यांच्या त्रिवेणी संगमात असलेल्या अस्थीविलय तीर्थात उडी घेतली आणि त्याचे शरीर पूर्ववत पांढरे झाले.

२ ई. भगवान शिव पापमुक्त झालेल्या ठिकाणी श्रीविष्णूने स्वतः कपालेश्‍वर शिवपिंडीची स्थापना करणे

भगवान शिवाने हे सर्व पाहिले. त्यानेही त्या तीर्थात स्नान केले आणि ते त्याचवेळी ब्रह्मपातकातून मुक्त झाले. गोर्‍ह्याने (नंदीने) त्यांना पातकापासून मुक्तीचा मार्ग दाखवल्यामुळे भगवान शिवाने नंदीला येथे गुरु मानले आहे; म्हणून येथील शिवपिंडीच्या समोर नंदी नाही. शिवपिंडीसमोर नंदी नसलेले त्रैलोक्यातील हे एकमेव मंदिर आहे.

भगवान शिवाची ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्तता होताच विष्णुसहित सर्व देवतांनी पुष्पवृष्टी केली. यानंतर श्रीविष्णूने या जागी स्वहस्ते शिवपिंडीची स्थापना करून त्यास कपालेश्‍वर असे नाव दिले.

 

३. कपालेश्‍वर मंदिराचा प्राचीन इतिहास

कपालेश्‍वर शिवलिंग हे अतीप्राचीन आहे. त्याचा शोध इ.स. ११०० च्या सुमारास लागला. काही लोकांना रामकुंडानजिक असलेल्या टेकडीवर एक भुयार दिसले. त्या भुयारात शिवलिंग असल्याचे त्यांनी पाहिले. त्या वेळी त्यांनी तेथील ब्राह्मणांशी चर्चा करून समुपदेशन घेतले आणि नंतर येथे कपालेश्‍वर मंदिर असल्याची घोषणा केली. तेव्हापासून तेथे पूजा-अर्चा चालू झाली. अरुणा-गोदावरी नद्यांच्या संगमावर असलेले हे मंदिर यवनांनी नष्ट केले होते.

कालांतराने येथील पाटलांनी गवळी राजा यास मंदिर बांधण्यास सांगितले. वर्ष १६५५ मध्ये कोळी राजाने त्या काळचे सहस्रावधी रुपये खर्चून मंदिर बांधले आणि तेथे गुरवांची नेमणूक केली. त्यानंतर कृष्णाजी पाटील यांनी २७५ रुपये व्यय करून पायर्‍या बांधल्या. श्री. जगजीवनराव यांनी वर्ष १७६३ मध्ये १० सहस्र रुपये व्यय करून मंदिराचा पुढील भाग बांधला.

 

४. श्री कपालेश्‍वर मंदिरातील पूजेचा नित्यक्रम

येथे भगवान शिवाची नित्य पूजा-अर्चा केली जाते. प्रत्येक सोमवारी श्री कपालेश्‍वराच्या रौप्यमुकुटाचे महास्नान होऊन तेथे संकल्पासहित षोडशोपचारे पूजन केले जाते. कार्तिक मासात श्री कपालेश्‍वरांचे हरिहर, अर्धनारी नटेश्‍वर, ब्रह्मरूप असे वेगवेगळे ध्यान सजवले जाते. प्रत्येक श्रावणी सोमवार, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा आणि शिवरात्र या दिवशी देवाचा उत्सव साजरा होतो. श्री कपालेश्‍वर मंदिरात गुरव आणि ब्रह्मवृदांना पूजेचा सामायिक अधिकार आहे. श्री कपालेश्‍वर हे अत्यंत जागृत देवस्थान आहे.