पोटदुखी आणि पाणी

Article also available in :

पाणी आणि पोट यांचा संबंध घनिष्ठ असल्याने पाणी पिण्याच्या पद्धतींचा थेट परिणाम आपल्या पोटासंबंधित गोष्टींवर पडतो, यासाठीच पुढील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

१. एकाएकी उद्भवणारी पोटदुखी आणि पाणी

‘कोणत्याही कारणामुळे एकाएकी पोट दुखत असेल, तर २ ते ४ पेले कोमट पाणी प्यावे आणि स्वस्थ बसून रहावे. तोंडात बोटे घालून उलटी करण्याचा प्रयत्न करू नये. हा उपाय एकदाच करावा. पाणी प्यायल्याने काही अपाय होत नाही. अधिकचे पाणी काही वेळाने लघवीवाटे बाहेर निघून जाते. पाणी पिऊन २ घंट्यांनीही बरे न वाटल्यास मात्र तज्ञांचा समादेश (सल्ला) घ्यावा.

वैद्य मेघराज पराडकर

वरीलप्रमाणे पाणी प्यायल्याने पुढील लाभ होतात. अपचन झाल्याने अन्न पोटात थबकून पोट दुखत असल्यास आपोआप मळमळून उलटी होते आणि पोटात थबकलेले अन्न बाहेर पडून बरे वाटते. लहान मूतखडा अडकल्याने पोटात दुखत असेल, तर प्यायलेले पाणी लघवीवाटे बाहेर निघून जात असतांना कधी कधी मूतखडा पडून जाऊन बरे वाटते.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

२. पोटाच्या गंभीर विकारामध्ये पाणीसुद्धा पिणे धोक्याचे

आधुनिक वैद्य (डॉ.) रवींद्र भोसले

‘तीव्र पोटदुखी आणि एकापेक्षा अधिक उलट्या झाल्या असतील, तर पोटाचा गंभीर विकार असू शकतो, उदा. जठराचा व्रण (अल्सर) फुटणे. अशा रुग्णांनी तोंडाने पाणीसुद्धा घेणे धोक्याचे असते. त्यामुळे असा प्रसंग ओढवल्यास घरगुती उपचार न करता तातडीने आधुनिक वैद्यांना दाखवावे.’

– आधुनिक वैद्य (डॉ.) रवींद्र भोसले, शल्यचिकित्सक आणि जठरांत्ररोगतज्ञ (गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट), नगर (२४.११.२०२२)

 

३. ताप असतांना कोणते पाणी प्यावे ?

‘ताप असतांना साधे (थंड) पाणी पिऊ नये. एक लिटर पाण्यामागे (चहाचा) पाव चमचा या प्रमाणात ‘सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण’ घालून ५ मिनिटे पाणी उकळावे. हे पाणी थर्मासमध्ये ठेवून तहान लागेल तेव्हा थोडे थोडे कोमट करून प्यावे. असे पाणी प्यायल्याने ताप उतरण्यास साहाय्य होते आणि शक्तीही टिकून राहते.’

 

४.पाण्याऐवजी सरबत प्यावे का ?

‘कधीतरी गंमत म्हणून सरबत प्यायल्यास चालते; परंतु प्रतिदिन सरबत पिण्याची सवय आरोग्याला चांगली नसते. सरबतातून अनावश्यक साखर पोटात जाते. साखर आरोग्याला हानीकारक असते. साखरेऐवजी गूळ घातला, तरी गूळही अधिक प्रमाणात प्रतिदिन खाणे योग्य नसते. गुळाचे पदार्थ वारंवार खाल्ल्याने प्रतिदिन ते पदार्थ खाण्याची इच्छा होत रहाते. त्यामुळे सरबताऐवजी साधे पाणीच प्यावे.’

 

५. पाणी उष्ण (गरम) कि थंड प्यावे ?

‘थंडीच्या दिवसांत उष्ण, तर उष्णतेच्या दिवसांत थंड पाणी प्यावे. थंड, म्हणजे शीतकपाटातील नव्हे. उन्हाळ्यात माठातील (मातीच्या मडक्यातील) पाणी प्यायल्याने मन प्रसन्न होते. अन्य ऋतूंमध्ये माठातील पाणी पिऊ नये. शिंका येणे, सर्दी, घशाकडे कफ येणे, ताप, दमा हे विकार असतांना साधे थंड (न उकळलेले) पाणी पिऊ नये. त्यांनी उकळलेले पाणी कोमट किंवा थंड करून प्यावे.’

 

६. पोट साफ होत नसल्यास अधिक वेळा थोडे थोडे पाणी प्यावे

‘पोट साफ होण्यासाठी भरपूर पाणी पिणे चुकीचे आहे. त्याऐवजी अधिक वेळा थोडे थोडे पाणी प्यावे. एका वेळी अधिक प्रमाणात पाणी प्यायल्यास अधिकचे पाणी लघवीवाटे बाहेर निघून जाते. त्या पाण्याचा शरिराला काही उपयोग होत नाही. कुंडीतील झाडाला भरपूर पाणी घातल्यावर कुंडीच्या तळाशी असलेल्या छिद्रातून पाणी बाहेर निघून जाते, तसे हे आहे. झाडाला नीट पाणी मिळावे, म्हणून ठिबक सिंचन करतात. यामध्ये एका वेळी अधिक पाणी न देता थेंब थेंब पाणी दिले जाते. या पाण्याचा झाडाला पुरता उपयोग होतो. त्याप्रमाणे शरिरालाही पुरेसे पाणी मिळावे, यासाठी एकाएकी गटागट पाणी न पिता थोड्या थोड्या वेळाने एकेक घोट प्यावे.’

 

७. ‘दिवसभरात ८ पेले पाणी प्यावे’, हे योग्य आहे का ?

‘शरिराला किती पाणी आवश्यक आहे’, हे प्रदेश, वातावरणातील उष्णता किंवा थंडावा, शरिराला होणारे श्रम, आहार इत्यादी अनेक घटकांवरून ठरत असते. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असल्याने प्रत्येक व्यक्तीची पाण्याची आवश्यकता वेगळी असू शकते. त्यामुळे पाणी किती प्यावे, यासंबंधी स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेण्यापेक्षा ईश्वरी संवेदनेनुसार तहान लागते, तेव्हा थोडे थोडे पाणी प्यावे.’

 

८. जेवतांना पाणी प्यावे कि पिऊ नये ?

‘कणीक भिजवतांना पाणी न्यून झाले, तर ती घट्ट होते आणि पोळ्या लाटतांना जड जातात. पाणी अधिक झाले, तर कणीक पातळ होते आणि ती पोळपाटाला चिकटते. कणीक भिजवतांना पाण्याचे प्रमाण योग्य असेल, तरच पोळ्या व्यवस्थित लाटता येतात. अन्नाचे योग्य पचन होण्यासाठीसुद्धा ते अधिक घट्ट किंवा पातळ असू नये. त्यामुळे ‘जेवतांना आवश्यकतेनुसार मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी प्यावे’, असे आयुर्वेदात सांगितले आहे.’

 

९. ‘शौचाला होण्यासाठी तांब्याभर पाणी पिणे’ ही सवय असल्यास ती मोडावी

‘सकाळी उठल्याउठल्या पाणी प्यायले, तरच शौचाला होते’, अशी सवय असेल, तरीही सकाळची ही पाणी पिण्याची सवय मोडावी. पाणी पिऊन शौचाला होण्यापेक्षा जठराग्नी (पचनशक्ती) चांगला असणे महत्त्वाचे आहे. तो चांगला राहिला, तर योग्य वेळी आपणहून  शौचाला होतेच, त्यासह आरोग्यही चांगले रहाते.’

 

१०. सकाळी उठल्याउठल्या भरपूर पाणी पिऊ नये !

‘जगात ७० टक्के पाणीच आहे. पाणी हे जीवन आहे’, असे असले, तरी चूल पेट घेत असतांना तिच्यात तांब्याभर पाणी ओतले, तर काय स्थिती होईल ? सकाळी उठल्याउठल्या भरपूर पाणी प्यायल्याने जठराग्नीच्या (पचनशक्तीच्या) संदर्भात असेच होत असते. त्यामुळे सकाळी तहान लागेल तेव्हा थोडे थोडे पाणी प्यावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

1 thought on “पोटदुखी आणि पाणी”

Leave a Comment