सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कु. मुग्धा वैशंपायन यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !

आश्रमात कलेशी संबंधित चालणार्‍या सेवेची माहिती घेतांना डावीकडे कु. मुग्धा वैशंपायन आणि त्यांच्या शेजारी सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर

रामनाथी, गोवा – अलिबाग येथील सुप्रसिद्ध सुगम आणि शास्त्रीय गायिका कु. मुग्धा वैशंपायन यांनी ८ मे २०२२ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली. भेटीच्या वेळी कु. मुग्धा वैशंपायन यांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म कार्य, तसेच संगीत संशोधन कार्याविषयीची माहिती दिली. विश्‍वविद्यालयाकडून चालू असलेले संशोधनकार्य त्यांनी जिज्ञासेने जाणून घेतले.

कु. मुग्धा वैशंपायन यांचे संशोधनाच्या दृष्टीने भक्तीगीत गायनाचा प्रयोग घेण्यात आला. या प्रयोगाला संत आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे साधक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी त्यांना गोवा येथील सुप्रसिद्ध संवादिनी वादक श्री. दत्तराज सुर्लकर यांनी संवादिनीवर, तर महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे साधक श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी तबल्यावर साथ दिली. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते कु. मुग्धा वैशंपायन यांचा श्री गणपतिचे छायाचित्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी कु. मुग्धा वैशंपायन म्हणाल्या, ‘‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संशोधनाचे कार्य मोठे आणि पुष्कळ चांगले आहे. येथे गातांना मला मंदिरामध्ये गातांना जाणवते, तशीच सकारात्मक ऊर्जा जाणवली.’’

 

कु. मुग्धा वैशंपायन यांचा परिचय

कु. मुग्धा वैशंपायन या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातील अंतिम ५ गायकांपैकी एक आहेत. त्यांना ‘रायगड कन्या’ म्हणूनही ओळखले जाते, तसेच त्यांना ‘रायगड भूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांत, तसेच मराठी चित्रपट अन् दूरदर्शनवरील मालिकांसाठी पार्श्‍वगायनही केले आहे.

Leave a Comment