कुंभमेळ्याचे महत्त्व आणि पावित्र्यरक्षण

कुंभमेळा म्हणजे जगातील सर्वांत मोठी धार्मिक यात्रा ! कुंभमेळा हे भारताच्या सांस्कृतिक महत्तेचे केवळ दर्शन नव्हे, तर संतसंग देणारे आध्यात्मिक संमेलन आहे. कुंभपर्वाच्या निमित्ताने प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक या चार क्षेत्री प्रत्येक १२ वर्षांनी भरणार्‍या यात्रेला हिंदु जीवनदर्शनात महत्त्वपूर्ण स्थान आहे.


कुंभमेळ्याचे आध्यात्मिक माहात्म्य आणि सांस्कृतिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. गुरूला राशीचक्र भोगण्यास १२ वर्षे लागत असल्यामुळे प्रत्येक १२ वर्षांनी कुंभयोग येतो. गुरु कन्या राशीत असतांना ‘कन्यागत’, सिंह राशीत असतांना ‘सिंहस्थ’ आणि कुंभ राशीत असतांना ‘कुंभमेळा’ अशा तीन मोठ्या पर्वणी हिंदु धर्मदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जातात. तेथे गंगास्नान, साधना, दानधर्म, पितृतर्पण, श्राद्धविधी, संतदर्शन, धर्मचर्चा इत्यादी धार्मिक कृती करण्यासाठी कोट्यवधी भाविक येतात. हा श्रद्धावानांचा मेळाच आहे. केवळ भाविकच नव्हे, तर देवता, ऋषी, संत अन् तेहतीस कोटी तीर्थे कुंभपर्वास येतात, हे सारे अद्वितीय आहे.

‘हिंदूऐक्य’ हा कुंभमेळ्याचा उद्घोष आहे. कुंभमेळ्यातून हिंदूंची धार्मिक अन् सांस्कृतिक अमरता प्रतीत होते. हा मेळा परदेशी नागरिकांना हिंदु धर्माच्या अंतरंगाचे दर्शन घडवतो. कुंभमेळ्यात धर्मश्रद्धायुक्त आचरण करणार्‍या भाविकांनाच कुंभपर्वाचा खर्‍या अर्थाने आध्यात्मिक लाभ होतो. कुंभमेळ्याचे मूळ प्रयोजन लक्षात घेऊन साधूसंत, संप्रदाय अन् हिंदू संघटना यांनी धर्मशिक्षण, धर्मप्रबोधन, धर्मरक्षण आणि हिंदूसंघटन ही चतुःसूत्री घेऊन सातत्याने कार्य केले, तर हिंदु धर्माला निश्चितच पुनर्वैभव प्राप्त होईल. म्हणूनच या ग्रंथात प्रामुख्याने कुंभमेळ्याचे माहात्म्य, कुंभक्षेत्री करावयाचे आचरण आणि कुंभमेळ्याचे मूळ प्रयोजन यांविषयी विवेचन केले आहे.

हा ग्रंथ वाचून सर्व हिंदूंनी कुंभमेळ्याचे महत्त्व अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोनातून समजून घ्यावे, या श्रेष्ठ पर्वणीच्या निमित्ताने साधूसंतांच्या नेतृत्वाखाली ‘हिंदु धर्मरक्षण आणि हिंदूसंघटन’ या कार्यासाठी पुढाकार घ्यावा आणि तेथून धर्मध्वजा उंच उंच फडकावण्याची स्फूर्ती घेऊनच परतावे, हीच कुंभपर्वस्थित देवतांच्या चरणी प्रार्थना !

– संकलक

अर्पणमूल्य : रु. २०/-

संपर्क क्रमांक : ९३२२३१५३१७

'ऑनलाईन' खरेदीसाठी यावर क्लिक करा !

Leave a Comment