दानाचे महत्त्व

हिंदु धर्माने त्याग हेच मनुष्य जीवनातील मुख्य सूत्र सांगितलेले आहे. तन, मन आणि धन यांपैकी धनाचा त्याग हा त्या तुलनेत सर्वात सहज करण्यासारखा आहे. दानाचे महत्त्व लक्षात घेतल्यास ते करतांना आपला समर्पणाचा भाव जागृत होऊन केलेल्या दानाचा अधिक लाभ होऊ शकतो. यासाठी येथे दानाचे महत्त्व स्पष्ट करत आहोत.

 

दान केल्यामुळे होणारे लाभ

१. समष्टी पुण्य वाढणे

सध्याच्या काळात भूकंप, वादळ, पूर, दुष्काळ अशा अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण फारच वाढले आहे. याचे मूळ कारण म्हणचे समष्टी पापात झालेली वाढ ! समष्टी पाप अल्प करण्यासाठी किंवा त्याचा परिणाम अल्प करण्यासाठी समाजातील पुण्य वाढवणे अतिशय आवश्यक आहे. समष्टी पुण्य वाढवण्यासाठी समाजातील लोकांनी साधना करणे आवश्यक आहे. साधना म्हणजे ईश्‍वरासाठी तन, मन, धन, बुद्धी आणि प्राण अर्पण करणे. यात धनाच्या तुलनेत तन, मन, बुद्धी आणि प्राण अर्पण करणे कठीण असते; म्हणून समाजातील अधिकाधिक लोकांनी सत्कार्यासाठी धनाचा जरी त्याग केला, तरी समाजाचे एकत्रित पुण्य, म्हणजे समष्टी पुण्य वाढेल आणि समाज सुखी व्हायला साहाय्य होईल.

२. समाजाची ईश्‍वरावरील श्रद्धा वाढणे

ईश्‍वरासाठी केलेल्या कोणत्याही कृतीचे फळ दहापटीने परत मिळते. या नियमानुसार ईश्‍वरासाठी अर्पण केले, तर ईश्‍वर त्याची दहापटीने परतफेड करतो. याविषयीच्या अनुभूती सनातनच्या अनेक साधकांनी अनेक वेळा घेतल्या आहेत. समाजातील व्यक्‍तींनाही अशा अनुभूती याव्यात आणि त्यांची ईश्‍वरावरील श्रद्धा वाढावी; म्हणून समाजाकडून त्याग होणे आवश्यक आहे. समाजाची श्रद्धा वाढावी; म्हणून ईश्‍वरही अधूनमधून स्वतःहून चमत्कार घडवत असतो. ईश्‍वराच्या या कार्यात हातभार लावला, तर ईश्‍वराची कृपा निश्‍चित होते.

३. समाजात त्यागाची भावना निर्माण करणे

संत साईबाबासुद्धा घरोघरी जाऊन भिक्षा मागायचे. त्यांना तर काहीच नको होते. ते स्वतः ईश्‍वराचे सगुण रूप होते. त्यांनी अनेक लोकांची दुःखे दूर केली होती, तरीही ते स्वतः दारोदारी जाऊन भिक्षा का मागायचे ? यामागचे मूळ कारण म्हणजे लोकांनी काहीतरी अपर्ण करावे, भिक्षा द्यावी, जेणेकरून अर्पण देणार्‍याला लाभ होईल. यावरून लक्षात येते की, ईश्‍वर किती दयाळू आणि करुणाकर आहे ! लोकांचे भले व्हावे; म्हणून ईश्‍वरच संतांच्या रूपातून घरोघरी जाऊन लोकांसमोर हात पसरतो. साईबाबांच्या जीवनातील एक प्रसंग पुढीलप्रमाणे आहे. –

‘साईबाबा एकाच्या घरी सलग दोन दिवस भिक्षा मागायला जातात; परंतु त्यांना भिक्षा दिली जात नाही. तिसर्‍या दिवशीही ते जेव्हा त्या घरासमोर जातात, तेव्हा त्यांचा एक भक्‍त त्यांना म्हणतो, ‘‘बाबा, या घरातील माणसे भिक्षा देत नाहीत, तर तुम्ही पुनःपुन्हा का जाता ?’’ त्यावर बाबा म्हणतात, ‘‘मी माझ्यासाठी जात नाही, तर त्यांच्यातच त्यागाची वृत्ती निर्माण व्हावी; म्हणून जातो.’’ त्यागातच आनंद आहे, हे संतांना ठाऊक असते; परंतु ही अनुभूती इतरांनीही घ्यावी; म्हणून संतही समाजात जाऊन समाजाला त्यागाची संधी देतात.

४. आध्यात्मिक स्तरावर लाभ मिळवण्यासाठी दान हे ‘सत्पात्रे’ करणे आवश्यक !

अर्पण, दान हे नेहमी ‘सत्पात्री’ असावे. दिलेल्या दानाचा योग्य विनियोग झाल्यास यजमानाला दानाचे अधिकतम ‘फळ’ मिळते. सध्या दान स्वीकारणारी ‘सत्पात्री’ व्यक्‍ती क्वचितच मिळते. ज्यांना दान देणे अशक्य असेल, त्यांनी मासभर गुरुसेवा करावी. ज्यांना शक्य आहे, त्यांनी दिवसाकाठी एक रुपया तरी दान करावा आणि मासभर गुरुसेवाही करावी. ज्यांना केवळ धनाचा त्याग शक्य आहे, त्यांनी एकत्रित धन एकदाच अर्पण करावे.

{IMG:616}

सनातन संस्था ही ‘शास्त्रीय परिभाषेत धर्मशिक्षण देणारी आणि धर्मजागृती’ यांचे कार्य करते. तसेच इतर अनेक आध्यात्मिक संस्थाही अध्यात्मप्रसाराचे कार्य करत असतात. या संस्था धनाचा विनियोग केवळ ईश्‍वरी कार्यासाठीच करत असतात. अशा संस्थांना अर्पण करावे. सर्व साधक, वाचक, विज्ञापनदाते आदींनी या संधीचा लाभ आध्यात्मिक स्तरावर होण्यासाठी प्रयत्‍न करावा.

1 thought on “दानाचे महत्त्व”

  1. छान
    चांगला उपक्रम आहे
    ll श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली ll
    चरणार्पणमस्तु

    Reply

Leave a Comment