भावी भीषण संकटकाळासाठी उपचार-पद्धतींची आवश्यकता

1351246847_p-sandeep-dada-150
पू. संदीप आळशी

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या मताप्रमाणे आगामी काळ हा आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबीय आणि देशबांधव यांचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. या पार्श्‍वभूमीवर पुढील विचारमंथन निश्‍चितच लाभदायक ठरेल.

 

महायुद्धाच्या काळात स्थिती काय असते ?

दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने ब्रिटनविरुद्ध युद्ध पुकारले. ब्रिटनमध्ये पहिल्या ४ दिवसांतच १३ लाख लोकांचे स्थलांतर करावे लागले. युद्धकाळात प्रकाशबंदीही चालू झाली. बाहेर रस्त्यावर अगदी मिट्ट काळोख असायचा. खिडकीतून वा दारातून अंधुकसा प्रकाशसुद्धा बाहेर आला, तरी दंड व्हायचा ! इतकी कडक प्रकाशबंदी एक-दोन दिवस किंवा मास (महिने) नाही, तर तब्बल पाच वर्षे होती ! दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जर्मनीने रशियालाही कोंडीत पकडले होते. त्या आपत्काळात रशियन जनतेवर झाडपाला, लाकडाच्या भुशाचे केक असे पदार्थ खाऊन पोट भरण्याची पाळी आली होती !

 

आज भारत तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा !

जिहादी आतंकवाद्यांच्या माध्यमातून पाकिस्तानचे भारताविरुद्ध छुपे युद्ध गेल्या दोन दशकांहून अधिक काळ चालू आहे. पाकने स्वतःची युद्धसज्जता गेल्या काही वर्षांत अनेक पटींनी वाढवली आहे. चीनने तर भारताला गिळंकृत करण्यासाठी सीमाभागात रस्त्यांचे जाळेही विणले आहे. एवढे उघडपणे समोर घडत असतांनाही भारताने या शत्रूराष्ट्रांविषयी अद्याप कोणतेही ठोस धोरण स्वीकारलेले नाही.

थोडक्यात युद्ध अटळ आहे. हे युद्ध काय केवळ दोन राष्ट्रांमधील असेल ? आज जग एवढे लहान झाले आहे की, पाकिस्तान भारताविरुद्ध युद्धाला उभा राहिला, तर जगभरातील मुसलमान राष्ट्रे पाकच्या खांद्याला खांदा लावून उभी रहातील.

 

घोर आपत्काळाविषयी द्रष्टे, संत, सप्तर्षि आणि देवता यांनी वर्तवलेली भाकिते !

तिसर्‍या महायुद्धाचे इतके स्पष्ट संकेत दिसत असतांनाही सुखाधीन जीवनात लिप्त झालेल्या आणि मी भले अन् माझे काम भले, अशी मानसिकता जपणार्‍या बहुतांश भारतियांना या संकटाचे गांभीर्य वाटत नाही. पुढील विवेचनावरून या विषयाचे गांभीर्य वाढण्यास साहाय्य होईल.

१. द्रष्टे

चारशे वर्षांपूर्वी नॉस्ट्रॅडॉमस नामक प्रसिद्ध द्रष्टा फ्रान्समध्ये होऊन गेला. त्याने बरीच भविष्ये वर्तविली, ती तंतोतंत खरी झाली. त्याने पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धांविषयी जे सांगितले, तसेच वास्तवात घडले. त्याने तिसर्‍या महायुद्धाविषयीही सांगितले आहे, हे तिसरे महायुद्ध इतके महाभयंकर होणार आहे की, तुम्हाला पहिली दोन महायुद्धे खेळण्यासारखी वाटतील !

२. संत

प.पू. गगनगिरी महाराजांनी सांगितले होते, पुढे काळ इतका वाईट येणार आहे की, आम्हा संतांनाही वाटेल की, डोळे मिटले असते तर बरं झालं असतं ! बर्‍याच संतांनी अशाच प्रकारे सांगितले आहे.

वर्ष २०१२ नंतर कधीही तिसरे महायुद्ध आरंभ होईल. हे महायुद्ध अतिशय महाभयंकर असेल. यात भारत स्वतः गोवला जाईल. अणुबॉम्बच्या साहाय्याने होणारा संहार पुष्कळ असेल. गावेच्या गावे उद्ध्वस्त होतील. तिसर्‍या महायुद्धानंतर संपूर्ण पृथ्वीची शुद्धी करावी लागेल. त्यासाठी अनेक संत सिद्ध व्हावे लागतील. याकरिता साधकांनी साधना वाढवणे आवश्यक आहे, असेही एका द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे.

३. सप्तर्षि

मनुष्य देवाबरोबर देशालाही विसरला आहे. हा मनुष्य जणूकाही पृथ्वीवर खूप दिवस जगणार असल्यासारखा याने धनसंग्रह केला आहे. याला किती अहं आहे ? निसर्ग जेव्हा पृथ्वीवर खेळ करील, तेव्हा कुठला राजा माणसाला वाचवायला येणार ? डॉक्टर किंवा सैनिक वाचवू शकणार नाहीत. हे राष्ट्र राजा नाही, तर गुरुच चालवत आहेत. आपत्कालाची तीव्रता इतकी आहे की, आता देवाचे भक्तच यातून वाचू शकतात. (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी केलेल्या सप्तर्षि जीवनाडीच्या वाचनातून, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (११.१२.२०१५))

४. देवता

त्सुनामी, वादळे आणि भूकंप होतील. दुनिया पेटेल. काळरात्र येईल. भारतावरही संकट येईल. अतिरेकी मोठा घोटाळा करतील. नरसंहार होईल. दिवसा डाके आणि लुटालूट होईल. जमीन ओसाड पडेल. नद्या कोरड्या पडतील. शेतांमध्ये पाणी साचेल. वीज नसेल. औषधे मिळणार नाहीत. रोगराई वाढेेल. डॉक्टर लोक हात टेकतील. चालता-बोलता मनुष्याचा प्राण जाईल.

– श्री हालसिद्धनाथदेव (श्री डोणे महाराज, जि. बेळगाव यांच्या माध्यमातून, भाकणुकीचे स्थळ : सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.)

थोडक्यात, येणार्‍या आपत्काळात जनजीवन आणि समाजव्यवस्था यांची भयावह दुर्दशा होईल.

 

आपत्काळात शासनावर विसंबून रहाणे, हा मूर्खपणा !

दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष स्टॅलिन आणि ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल, असे कुशल नायक अनुक्रमे रशिया आणि ब्रिटन यांना लाभले होते. तसेच रशियन अन् ब्रिटीश जनतेने स्वाभिमानपणा, राष्ट्रप्रेम, राष्ट्रासाठी त्याग आणि धैर्य, या गुणांची पराकाष्ठा केली. त्यामुळेच रशिया आणि ब्रिटन, ही राष्ट्रे तरली.

भारताची परिस्थिती याच्या विपरीत आहे. शांतताकाळातच पूर आला, तर गावेच्या गावे वाहून जातात. रेल्वे अपघात झाल्यावर साहाय्य-पथक कितीतरी घंट्यांनी (तासांनी) पोहोचते. कुंभमेळा आणि जत्रोत्सव यांच्या वेळी चेंगराचेंगरी होऊन कित्येक भाविक मृत्यूमुखी पडतात. शांतताकाळात ही स्थिती, तर आपत्काळात आपला निभाव कसा काय लागेल, याचा तुम्हीच विचार करा !

 

मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची कुबुद्धी !

आज भ्रष्टाचाराच्या किडीने संपूर्ण देशाला सर्व स्तरांवर अक्षरशः पोखरून टाकले आहे. एखाद्या दिवशी बसेसचा संप असेल, तर टॅक्सी-रिक्क्षावाले लगेच भाडे वाढवून स्वतःचे उखळ पांढरे करून घेतात. भ्रष्टाचार आणि स्वार्थांधता यांचा इतका कुसंस्कार झालेला आहे की, आपत्काळात अन्नधान्य, पाणी, जीवनावश्यक वस्तू इत्यादींमध्येही भ्रष्टाचार होऊ शकतो. आतापर्यंतच्या अनुभवावरून मनुष्यातील माणुसकी अत्यंत खालच्या स्तराला जाऊन मनुष्याचे वर्तन पशूलाही लाजवेल असे होण्याची शक्यताही नाकाराता येत नाही. केवळ स्वतःच्या अस्तित्वासाठी, जगण्यासाठी दुष्ट लोक हव्या त्या मार्गाचा अवलंब करू शकतील.

 

आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी ग्रंथमालिकेचे प्रयोजन !

आपत्काळात दळणवळणाची साधने तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळाला तोंड देेण्याच्या सिद्धतेचा एक भाग म्हणून भावी आपत्काळात संजीवनी ठरणारी ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. आतापर्यंत यातील ११ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. सध्या आपत्काळाला काही प्रमाणात आरंभ झालेलाच आहे. आताच हा विषय नीट समजून घेतला, त्यातील शंकांचे निरसन करून घेतले आणि ग्रंथमालिकेत दिलेल्या विविध उपचारपद्धतींमध्ये प्रशिक्षित झालो, तर आगामी भीषण आपत्काळ निश्‍चितच सुसह्य होईल, याची निश्‍चिती बाळगा !

ग्रंथमालिकेतून शिकून घेतलेल्या उपचारपद्धती केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीही उपयुक्तच आहेत.

१. अग्नीशमन, प्रथमोपचार आणि आपत्कालीन साहाय्य यांचे प्रशिक्षण देणारे ग्रंथ

सध्या गावागावात चिकित्सालये असतात. शहराशहरांमध्ये अग्नीशमन यंत्रणा उपलब्ध असतात. त्यामुळे बहुतेकांना अग्नीशमन, प्रथमोपचार आणि आपत्कालीन साहाय्य यांचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता वाटत नाही. आगामी आपत्काळाच्या दृष्टीने मात्र हे प्रशिक्षण घेणे अनिवार्य बनले आहे; कारण यामुळेच आपण जीवित आणि वित्त यांची होणारी अपरिमित हानी रोखू शकतो. सध्या हे प्रशिक्षण देणारी पुस्तके उपलब्ध असतात; परंतु सनातनच्या ग्रंथांत विषय अत्यंत सोप्या भाषेत आणि शास्त्रीय आधारे समजावला आहे.

२. बिंदूदाबन-उपचार, रिफ्लेक्सॉलॉजी आणि मर्मचिकित्सा यांविषयीचे ग्रंथ

बिंदूदाबन-उपचार आणि रिफ्लेक्सॉलॉजी यांमध्ये शरिरातील विशिष्ट दाब-बिंदूंवर दाब देऊन उपाय करायचे असतात, तर मर्मचिकित्सा यामध्ये शरिरातील विशिष्ट मर्मस्थानांवर दाब द्यायचा असतो. त्यामुळे शरिरातील चेतनेच्या प्रवाहातील अडथळे दूर होऊन विविध शारीरिक अन् मानसिक त्रासांवर मात करता येते.

३. प्राणशक्तीवहन उपायांविषयीचा ग्रंथ

मानवाच्या स्थूलदेहात असलेल्या रक्ताभिसरण, श्‍वसन, पचन इत्यादी विविध संस्थांना कार्य करण्यासाठी जी शक्ती लागते, ती प्राणशक्ती (चेतना) वहन संस्था पुरवते. तिच्यात अडथळे निर्माण झाल्यास विकार निर्माण होतात. ते अडथळे स्वतः शोधून दूर करण्याचे नाविन्यपूर्ण उपाय या ग्रंथात सांगितले आहेत. यामध्ये विकार बरा करण्यासाठी पंचतत्त्वांशी संबंधित मुद्रा, न्यास आणि नामजप करायचा असतो.

४. संमोहन उपचाराविषयीचे ग्रंथ

कित्येक जणांना निरर्थक विचारध्यास, निराशा, व्यसनाधीनता यांसारख्या मानसिक समस्या असतात. तोतरेपणा, दमा, लैंगिक समस्या यांसारख्या शारीरिक समस्यांमागेही बर्‍याचदा मानसिक कारणच असते. या समस्यांवर संमोहन उपचार केल्याने त्या बर्‍या व्हायला साहाय्य होते.

५. औषधी वनस्पतींची लागवड

तहान लागल्यावर विहीर खोदायची नसते, अशा आशयाची एक म्हण आहे. आगामी आपत्काळात औषधी वनस्पती उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच त्यांची लागवड घराच्या अंगणात वा परिसरात करणे आवश्यक आहे. तसेच हा विषय अनेकांपर्यंत पोहोचवून त्यांनाही यासंदर्भात कृतीशील करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सनातनने औषधी वनस्पतींची लागवड करा ! हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.

६. ग्रंथमालिका व्याधींच्या निवारणासाठी विविध उपचारपद्धती

यामध्ये शारीरिक आणि मानसिक त्रासांवर उपयुक्त ठरतील अशा विविध उपचारपद्धती दिल्या आहेत. वाचकाला प्रत्येक व्याधी / त्रास यांवर उपयुक्त घरगुती आयुर्वेदीय उपाय, आसने, प्राणायाम, बिंदूदाबन-उपाय, मुद्रा-उपाय, देवतांचे नामजप, मंत्रोपचार इत्यादी उपचारपद्धतींविषयी एकाच ठिकाणी माहिती कळेल, हे या ग्रंथमालिकेचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे. या ग्रंथमालिकेत दिलेल्या पद्धतींनुसार उपचार केल्यास रुग्ण बरे होऊ शकतील किंवा त्यांचा त्रास सुसह्य होईल. या ग्रंथमालिकेतील काही उपचारपद्धतींचा थोडक्यात ऊहापोह पुढे केला आहे.

६ अ. सोपे घरगुती आयुर्वेदीय उपचार
यामध्ये घरात, परसात, तसेच जवळच्या परिसरात उपलब्ध असलेल्या भाज्या, धान्य, मसाले, फळे, औषधी वनस्पती आदींद्वारे उपचार करण्याविषयीचे मार्गदर्शन केले आहे.
६ आ. पुष्पौषधी
यात स्वभावदोष तसेच मनोविकार यांवर लाभदायक असलेल्या तयार पुष्पौषधींचे विवेचन केले आहे. ही औषधे होमिओपॅथीच्या औषधांप्रमाणे असतात.
६ इ. फिजिओथेरपीचे व्यायामप्रकार, योगासने, बंध, प्राणायाम आणि शुद्धीक्रिया (षट्क्रिया)
आधुनिक जीवनशैलीमुळे सध्या लोकांच्या अनारोग्याचे प्रमाण अतिशय वाढले आहे. २५-३० वर्षांचे अनेक तरुण-तरुणीही मानदुखी, पाठदुखी, बद्धकोष्ठता, निद्रानाश आदी विकारांनी त्रस्त दिसतात. अ‍ॅलोपॅथीच्या औषधांचे दुष्परिणामही समोर येत आहेत. अशा परिस्थितीत शेकडो वर्षांची परंपरा लाभलेले योगशास्त्र हे एक वरदानच आहे. यासाठी ग्रंथमालिकेत विविध शारीरिक, मानसिक, तसेच मनोकायिक विकारांवर योगोपचार पद्धत (उदा. आसने, बंध, प्राणायाम, शुद्धीक्रिया) कशी अवलंबावी, याचे विवेचन केले आहे.
६ ई. मुद्रा-उपचार
मनुष्यदेह पंचतत्त्वांनी बनलेला आहे. पंचतत्त्वांपैकी कोणत्याही तत्त्वाचे देहातील प्रमाण अल्प किंवा अधिक झाले, तर त्यामुळे शारीरिक आणि मानसिक विकार उद्भवतात. हातांची बोटे विशिष्ट स्थितीत ठेवून केलेल्या मुद्रेमुळे मनुष्याला स्वतःच्या देहातील पंचतत्त्वांचे संतुलन राखणे शक्य होते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रासांचे निवारण होण्यास साहाय्य होते.
६ उ. देवतांचे नामजप आणि बीजमंत्र, तसेच पुराणोक्त अन् वेदोक्त मंत्र
विशिष्ट मंत्राच्या आधारे जीवनातील समस्या दूर करणे अथवा व्याधीवर उपाय करणे, हा प्राचीन काळापासून हिंदु धर्मात सांगितलेला उपाय आहे. ग्रंथमालिकेत शारीरिक आणि मानसिक त्रासांच्या निवारणासाठी नामजप आणि मंत्र दिले आहेत, तसेच चांगले आरोग्य लाभावे, भविष्यात येणारी संकटे टळावीत आदींसाठीही मंत्र दिले आहेत.
६ ऊ. अन्य उपचारपद्धती
चुंबक चिकित्सा, स्वमूत्रोपचार, रिकाम्या खोक्यांचे उपाय, पिरॅमिड चिकित्सा, ज्योतिषशास्त्रानुसार उपाय, रेकी इत्यादी उपचारपद्धतीही दिल्या आहेत.
७. अग्निहोत्र या विषयावरील ग्रंथ
आगामी तिसर्‍या महायुद्धात अण्वस्त्रांपासून निघणार्‍या किरणोत्सर्गाचा प्रभाव नष्ट करू शकेल, असा सोपा अन् अल्प वेळेत होणारा यज्ञविधी म्हणजे अग्निहोत्र ! सनातनच्या अग्निहोत्र या ग्रंथाद्वारे अग्निहोत्राचे महत्त्व समजून घेऊन तो केल्यास आपत्काळात परिवाराचे रक्षण होण्यात साहाय्य होईल.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ करून घ्या !

आगामी काळाची पावले ओळखून मानवजातीच्या कल्याणासाठी भावी आपत्काळात संजीवनी ठरणारी ग्रंथमालिका प्रसिद्ध करण्याचा, एवढा दूरदृष्टीचा विचार परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यासारखे संतच करू शकतात ! हे उपाय श्रद्धापूर्वक केल्यास त्यांचे फळही अवश्य मिळेल, याची निश्‍चिती बाळगा !

 

धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः स पन्थाः । – यक्षप्रश्‍न, श्‍लोक ११७

अर्थ : धर्माची तत्त्वे सामान्य माणसाला समजण्यास गूढ असल्याने थोर माणसे ज्या मार्गाचा अवलंब करतात त्याच मार्गाने आपणही जावे.

भावार्थ : परात्पर गुरु प.पू. डॉक्टरांसारख्या थोर विभूतीने आपत्काळातून तरून जाण्यासाठी सुचवलेले उपाय आचरणात आणण्यातच आपले कल्याण आहे.

आपत्काळ ओढवण्यामागील कारणमीमांसा जाणून साधना वाढवा आणि ईश्‍वरी राज्य स्थापा !
अतिवृष्टिः अनावृष्टिः शलभा मूषकाः शुकाः ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतयः स्मृताः ॥ – कौशिकपद्धति

अर्थ : (राज्यकर्ता धर्मनिष्ठ नसला की, प्रजा धर्मपालन करत नाही. प्रजेने धर्माचे पालन न केल्यामुळे) अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात.

तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.
१. मुद्रा-उपाय, मंत्रजप आदी उपाय हे सूक्ष्म-स्तरावरील उपाय असल्याने या उपायांचा अपेक्षित परिणाम होण्यासाठी उपाय करणार्‍यामध्ये श्रद्धा, भाव यांसारखे ईश्‍वरी गुणही असावे लागतात. ते साधनेमुळेच निर्माण होऊ शकतात.

२. सध्याचा समाज धर्माचरणापासून दुरावला आहे. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांच्यावर अनेक संकटे ओढवली आहेत. एकेका संकटाचा प्रतिकार करण्यापेक्षा संपूर्ण समाजाला नीतीमान बनवणारे, म्हणजे सर्व संकटांचा समूळ नाश करणारे आणि विश्‍वकल्याणाचे ध्येय बाळगणारे धर्माधिष्ठित ईश्‍वरी राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे. यासाठी सर्वांनी धर्मपालक आणि नीतीमान राज्यकर्त्यांनाच निवडून दिले पाहिजे.

प्रार्थना !

सर्वांमध्ये आगामी भीषण आपत्काळाविषयीचे गांभीर्य निर्माण व्हावे आणि सनातनच्या ग्रंथमालिकेचा लाभ करून घेऊन आपत्काळाला तोंड देण्याची क्षमता निर्माण व्हावी, ही परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी भावपूर्वक प्रार्थना !

– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.३.२०१३)