घरच्या घरी करा वांग्याची लागवड

Article also available in :

‘आपल्या आहारात वांग्यांचा नियमित वापर असतो. वांगी जशी विविध आकारांत येत असतात, तसाच त्यांचा स्वयंपाकातील वापर विविध प्रकारे होतो. वांग्यांची भाजी, भरीत, कापे, भजी इत्यादी अनेक प्रकारे आपण वांगी खात असतो. आपण घरच्या घरी वांग्याचे पीक वर्षभर घेऊ शकतो.

श्री. राजन लोहगांवकर

 

१. बियांपासून रोपांची निर्मिती

वांग्याची लागवड करण्याआधी आपल्याला त्यांची रोपे करून घेणे आवश्यक असते. वांग्याच्या बिया रोपवाटिकेमधून आणाव्यात. (काही शहरांमध्ये बियाण्यांची दुकाने असतात. त्या ठिकाणीही वांग्याचे बी मिळू शकते. – संकलक) वांग्यांच्या विविध प्रकारांनुसार वेगवेगळ्या बिया उपलब्ध असतात. आपल्याला हव्या त्या प्रकारच्या बिया आणाव्यात. रोपे निर्माण करण्यासाठी पसरट भांडे (ट्रे), कागदी पेले अथवा प्लास्टिकचे किंवा पुठ्ठ्याचे लहान खोके घ्यावेत. खाली पाणी वाहून जाण्यासाठी छिद्रे करून घ्यावीत. यात ‘पॉटिंग मिक्स’ने (सेंद्रिय खत घातलेल्या मातीने) निम्म्याच्या वर भरून घेऊन ओले करून घ्यावे. (‘पॉटिंग मिक्स’ऐवजी नैसर्गिक पद्धतीने जीवामृत वापरून पालापाचोळा कुजवून बनवलेले ह्यूमसही (सुपीक मातीही) वापरता येते. – संकलक) माती समतल (एकसमान) करून घेऊन त्यावर ओळींमधे वांग्याच्या बिया पसरवून घ्याव्यात. शक्यतो वांग्यांच्या विविध प्रकारांसाठी वेगवेगळी पसरट भांडी अथवा खोके वापरावेत. बियांवर अर्धा ते पाऊण इंच सेंद्रिय खतमिश्रित माती पसरून झारीने किंवा ‘स्प्रे’ने पाणी शिंपडावे. बियांना मुंग्या येणार नाहीत, अशा ठिकाणी सावलीत; पण सूर्यप्रकाश मिळेल, अशा पद्धतीने खोके ठेवावेत. ५ ते ७ दिवसांत बिया रुजून येतील. ‘स्प्रे’ने नियमित पाणी देत रहावे. पाणी अधिक घातल्यास रोपे आडवी होतील. त्यामुळे पाणी हलकेच शिंपडावे. साधारणपणे ३ – ४ आठवड्यांत रोपे मोठी होतील. रोपे ६ ते ८ इंच उंच झाली किंवा त्यावर प्रत्येकी ४ ते ६ पाने आली की, आपण ती दुसरीकडे लावू शकतो.

 

२. वांग्याच्या रोपांची पुनर्लागवड

वांग्याच्या एका रोपासाठी १५ ते २० लिटर क्षमतेची कुंडी पुरेशी होते. कुंडीची खोली एक ते सव्वा फूट असणे आवश्यक आहे. कुंडीला तळाशी आणि सर्व बाजूंनी आवश्यक तेवढी छिद्रे करून ती नेहमीप्रमाणे भरून घ्यावी. आतली सेंद्रिय खतमिश्रित माती ओली करून घेऊन मधोमध हाताने खड्डा करून रोपे लावून त्याभोवती हलक्या हाताने माती दाबून घ्यावी. थोडे पाणीही द्यावे. वांग्याच्या रोपाला वांगी लागल्यावर आधाराची आवश्यकता असते; म्हणून रोप लहान असतांनाच कुंडीत काठी रोवून ठेवावी. कुंडी मोठी असेल, तर २ रोपांमधे एक ते दीड फूट अंतर ठेवावे. जमिनीवर रोपे लावणार असाल, तर २ रोपांत दीड फूट आणि २ ओळींत २ फूट अंतर ठेवावे. आधार देण्यासाठी प्रत्येकी १ काठी रोवावी. रोप उभे राहिल्यावर ते काठीला जाड दोरीने बांधावे; मात्र दोरी खोडाला घट्ट बांधू नये.

 

३. वांग्याच्या रोपांची घ्यायची काळजी

३ अ. जमिनीलगतची पाने छाटणे

रोपे मातीत रुळल्यावर चांगली वाढू लागतील. रोपाला जमिनीलगत जेवढी पाने असतील, ती कापून रोपाच्या मुळाशी अंथरावीत. खोड आणि पानांची डहाळी यांच्या मधल्या भागात लहान पाने दिसत असतील, तर तीही काढून टाकावीत. मातीच्या पातळीपर्यंत ऊन व्यवस्थित पोचेल, अशा पद्धतीने रोपाच्या खालच्या भागातील पाने काढावीत. रोपाचा शेंडा खुडल्यास रोपाची आडवी वाढ होऊन जास्त फांद्या फुटतील आणि अधिक वांगी मिळतील.

३ आ. पाणी आणि खत व्यवस्थापन

वांग्याच्या रोपांना पाणी पुरेसे आणि नियमित घालावे. त्यामुळे झाडे निरोगी रहातील. आच्छादनाचा वापर आवश्यक तेवढा केल्याने मातीमध्ये ओलावा राहील. (‘झाडाच्या मुळाशी पालापाचोळा अंथरणे’, याला आच्छादन म्हणतात. – संकलक) प्रत्येक १५ दिवसांनी (१० पट पाणी घातलेले जीवामृत इत्यादी) द्रवरूप खताची फवारणी आणि २ – ३ आठवड्यांनी कंपोस्ट खत (एक प्रकारचे सेंद्रिय खत) घालत रहावे. कंपोस्ट घालतांना ते आच्छादनाच्या खाली घालून त्यावर पुन्हा आच्छादन करावे.

३ इ. किडींचे व्यवस्थापन

वांग्याच्या पिकावर मावा आणि पिठ्या ढेकूण यांचा त्रास होत असतो. यासाठी झाडांचे नियमित निरीक्षण करत रहावे. अशी कीड दिसताच, ती त्वरित काढून टाकावी. पाण्याचा फवारा मारल्यास कीड निघून जाते. ‘नीमार्क’ (कडुनिंबाच्या पानांचा अर्क) किंवा गोमूत्र किंवा अन्य काही सेंद्रिय कीटकनाशक असेल, तर ते फवारावे, म्हणजे कीड पसरणार नाही. या पिकात फळमाशीचाही त्रास पुष्कळ असतो. त्यासाठी घरीच सापळे बनवून बागेत ठेवले, तर त्यावरही चांगले नियंत्रण होते.

३ इ १. फळमाश्यांसाठी सापळे बनवणे 

प्लास्टिकच्या बाटलीचे तोंड कापून घ्यावे. त्याच्या आत तेल, जेली, पातळ केलेला गूळ इत्यादी कुठलाही चिकट द्रव भरावा. त्यावर छोट्या वाटीत गोड वासाच्या फळाचे तुकडे ठेवावेत. बाटलीला सर्व बाजूंनी साधारण १ सें.मी. व्यासाची छिद्रे पाडून घ्यावीत. बाटलीच्या वरील भागाला प्लास्टिकचा कागद गुंडाळून घ्यावा. बाजूच्या छिद्रांतून माशा आत जाऊन बाहेर येण्याच्या प्रयत्नांत खाली असलेल्या चिकट द्रवावर पडून त्याला चिकटतील. गच्चीवरील बागेसाठी अशा २ – ३ बाटल्या फळमाश्यांसाठी सापळे म्हणून पुरेशा होतात.

३ ई. परागीभवन

वांग्याच्या रोपाला साधारण सव्वा ते दीड मासात फुले येऊ लागतात. या पिकामधे परागीभवन आपोआप होते. एकाच फुलात स्त्री आणि पुं असे दोन्ही केसर असल्याने वार्‍याचा हलका झोतही परागीभवन करण्यास पुरेसा होतो. फुले गळत असतील, तर हलकीशी टिचकी मारली, तरी परागीभवन होऊन फळ धरते.

 

४. वांग्यांची काढणी

फळ धरल्यापासून १५ ते २० दिवसांत वांगी काढता येतात. वांगी दाबून बघितल्यावर जी काहीशी कडक लागतील, ती काढण्यास योग्य आहेत, असे समजावे. वांगी हातांनी तोडून किंवा ओढून काढू नयेत. नेहमी कात्री किंवा धारदार चाकू यांच्या साहाय्यानेच काढावीत. झाडाला दुखापत होईल, असे काहीही करू नये.

 

५. अधिक उत्पन्न मिळण्यासाठी करायची उपाययोजना

एकदा वांगी लागू लागली की, पुढील ६ – ७ मास वांगी मिळत रहातील. त्यानंतर वांग्यांचा आकार आणि संख्या रोडावेल. अशा वेळी रोपाची छाटणी करावी. शेंडा छाटावा. ३ – ४ चांगल्या फांद्या आणि ८ ते १० निरोगी पाने ठेवून उर्वरित भाग छाटून टाकावा. हे काम तीव्र उन्हाळ्यात न करता शक्यतो पावसाळ्यात करावे. साधारण एका मासात पुन्हा नवीन पालवी फुटेल आणि पुन्हा पहिल्यासारखी वांगी मिळू लागतील; मात्र खतपाणी देण्याचे वेळापत्रक अगदी शिस्तपूर्वक पाळावे. चार माणसांच्या कुटुंबाकरिता १५ ते २० रोपे लावावीत. छाटणीनंतरचा दुसरा बहर समाधानकारक नसेल, तर रोपांची दुसर्‍यांदा लागवड करण्याची सिद्धता चालू करावी; मात्र पुन्हा त्याच मातीत वांग्याची नवीन रोपे लावणे टाळावे.’

– श्री. राजन लोहगांवकर, टिटवाळा, जिल्हा ठाणे. (२२.५.२०२१)

साभार : https://vaanaspatya.blogspot.com/

 

६. वांगी लागवडीचे प्रात्यक्षिक – video

लागवड कशी करावी, हे समजण्यासाठी यूट्यूबवरील व्हिडिओ वाचकांच्या सोयीसाठी येथे देत आहोत. या व्हिडिओमधील काही भाग वरील लेखात दिलेल्या माहितीपेक्षा वेगळा असू शकतो. व्हिडिओमध्ये जिथे रोपांच्या लागवडीसाठी विशिष्ट प्रकारची माती सांगितलेली असेल, तिथे नैसर्गिक पद्धतीने जीवामृत वापरून पालापाचोळा कुजवून बनवलेले ह्यूमसही (सुपीक मातीही) वापरता येते. अन्य कोणत्याही खताऐवजी १० पट पाण्यामध्ये पातळ केलेले जीवामृत वापरता येते. विकतचे कोणतेही खत न वापरताही लागवड पुष्कळ चांगली होऊ शकते. हायब्रिड बियाण्याऐवजी देशी बियाणे वापरावे.

Leave a Comment