परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्म-जगतासंबंधीचे कार्य

अनुक्रमणिका

अध्यात्मातील सूक्ष्म स्तरावरील अभ्यासाचे विश्लेषण करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले

 

१. मानवाला सूक्ष्मासंबंधीच्या पैलूंची दृश्यस्वरूपात
ओळख करून देणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘अध्यात्म हे खरे पहाता सूक्ष्मातील म्हणजे, स्थूल पंचज्ञानेंद्रिये (डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा), मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील शास्त्र आहे. सर्वसामान्य व्यक्तीची सूक्ष्मातील कळण्याची क्षमता नसल्याने तिला अध्यात्मातील सूक्ष्म-जगतासंबंधी काहीच ठाऊक नसते. सूक्ष्मासंबंधीच्या विविध पैलूंची ओळख प्रस्तुत लेखातून होईल.

 

२. साधकांना सूक्ष्म-जगताकडे
पहाण्याची अभिनव दृष्टी देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः सूक्ष्मातील असंख्य प्रयोग आणि अभ्यास करून सूक्ष्मातील कळण्याचे तंत्र विकसित केले अन् पुढे ते साधकांनाही शिकवले. यामुळे आज सनातनच्या अनेक साधकांना सूक्ष्मातील अचूक जाणता येते आणि काही साधकांना अद्वितीय असे ईश्वरी ज्ञान सूक्ष्मातून ग्रहण करता येते. परात्पर गुरु डॉक्टरांची सूक्ष्मातील जाणण्याच्या संदर्भातील शिकवण, साधकांना त्यांनी कसे घडवले ? यासंदर्भातील त्यांचे कार्य या लेखाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया.

या लेखात विविध विषयांच्या अनुषंगाने ‘सूक्ष्मातील जाणण्याची आवश्यकता’ याविषयीचे मार्गदर्शन येथे देत आहोत. – संकलक

 

३. सूक्ष्मातील जाणण्याचे महत्त्व सांगणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचार

अ. देवतेचे चित्र काढणे किंवा मूर्ती बनवणे यावर होणारी बुद्धीप्रामाण्यवाद्यांची टीका

‘दिसलेल्या वस्तूंचे चित्र काढणे किंवा मूर्ती बनवणे, हे ठीक आहे; पण न दिसणार्‍या देवतेचे चित्र काढणे किंवा मूर्ती बनवणे, हे ठीक नाही. त्यामुळे ‘चित्रकार किंवा मूर्तीकार हे समाजाला चुकीच्या दिशेने नेतात’, असे बुद्धीप्रामाण्यवादी म्हणतात. आंधळ्याने ‘दृश्यस्वरूपात काही नसते’, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच हेही आहे.

बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या हे लक्षात येत नाही की, योगी, साधू-संत यांना सूक्ष्मातून देवता दिसतात. ते त्यांचे वर्णन करतात आणि त्यानुसार चित्रकार अन् मूर्तीकार देवतेचे चित्र काढतात किंवा मूर्ती बनवतात. सूक्ष्म-दर्शक (मायक्रोस्कोप) आणि दुर्बिण यांच्यामधून डोळ्यांनी न दिसणार्‍या वस्तू दिसतात. त्याचप्रमाणे योगी, साधू-संत यांना सूक्ष्मातून देवता दिसतात. बुद्धीप्रामाण्यवाद्यांना सूक्ष्मातून काही दिसत नसल्यामुळे, म्हणजे सूक्ष्म-जगताविषयी ते आंधळे असल्यामुळे ते ‘देवता नाहीत’, असे म्हणतात.’  (१२.६.२०२१)

आ. सूक्ष्मातून कळण्याचा दुष्परिणाम !

‘‘सूक्ष्मातून कळणे’ म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या वापराशिवाय ज्ञान मिळणे. सूक्ष्मातून कळण्यामुळे कुणाला काही विचारले जात नाही. त्यामुळे ‘दुसर्‍यांकडून शिकल्यामुळे अहंभाव अल्प होण्याचा लाभ’ होत नाही. उलट ‘मला कळते’, हा अहंभाव निर्माण होतो.’ (२०.३.२०१९)

इ. राष्ट्राच्या संदर्भात सूक्ष्मातून आणि स्थुलातून कळले, तरी त्यामुळे लाभ होण्यात येणार्‍या अडचणी

१ इ १. सूक्ष्मातून कळणे

‘सूक्ष्मातून कळणे, म्हणजे ‘एखाद्या प्रसंगी भविष्यकाळात काय घडणार आहे’, याचाही सूक्ष्मातून वेध घेणे. हे कळणार्‍यांना काँग्रेस अन् इतर पक्ष यांचे सरकार देशाला रसातळाला नेणार असल्याचे १५ – २० वर्षे आधीच कळल्याने ते त्या संदर्भात जनतेची जागृती चालू करत होते; पण तेव्हा समाजाला काँग्रेस सरकारचे खरे स्वरूप न कळल्याने त्यांना समाजाकडून विशेष प्रतिसाद मिळत नाही.

१ इ २. स्थुलातून कळणे

स्थुलातून कळणे, म्हणजे घटना प्रत्यक्ष घडत असतांना तिची जाणीव होणे. स्थुलातून कळणार्‍यांना काँग्रेस अन् इतर पक्ष यांच्या सरकारने देशाला रसातळाला नेल्यावरच त्याची जाणीव होते आणि ते त्या संदर्भात जनतेची जागृती चालू करतात. तेव्हा समाजाला सरकारचे खरे स्वरूप कळल्याने समाजाकडून विशेष प्रतिसाद मिळतो; पण तोपर्यंत देश रसातळाला गेलेला असल्याने देशाला परत वर आणण्यासाठी बराच अधिक काळ लागतो.’ (६.१०.२०११)

१ इ ३. ‘माझे कार्य अधिक प्रमाणात सूक्ष्मातील असल्यामुळे इतर संतांप्रमाणे माझे नाव हिंदूंमध्ये मोठे झाले नाही; पण सूक्ष्माचे अभ्यासक, सूक्ष्म जाणणारे संत आणि महर्षि यांच्यापर्यंत माझे नाव पोचले आहे.’ (१.६.२०१६)

 

४. सूक्ष्मातील कळण्यासाठीची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

अ. सूक्ष्म परीक्षण करतांना मनाची निर्विचार स्थिती असणे आवश्यक

‘एखाद्या व्यक्तीचे सूक्ष्म परीक्षण करतांना त्या व्यक्तीचे नाव मनातल्या मनात आठवून कोणती स्पंदने जाणवतात, हे पहायचे असते. तेव्हा अध्यात्मशास्त्रातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा नियम लागू होऊन त्या व्यक्तीचे नाव, म्हणजे शब्द आठवल्यावर तिच्याशी संबंधित इतर सर्व घटक आल्याने आपल्याला त्या व्यक्तीची स्पंदने कळतात आणि सूक्ष्म परीक्षण होते.

सूक्ष्म परीक्षण करतांना लक्षात ठेवायची महत्त्वाची गोष्ट, म्हणजे तेव्हा आपले मन निर्विचार हवे. त्यानंतरच त्या व्यक्तीची स्पंदने आपल्याला अचूक कळतात. मन निर्विचार असले की, आपल्या मनात त्या व्यक्तीविषयीच्या पूर्वानुभवामुळे तिच्याविषयी चांगले किंवा वाईट विचार येत नाहीत आणि त्यामुळे आपले सूक्ष्म परीक्षण बरोबर येते. तसेच मन निर्विचार ठेवल्यास एखादी कनिष्ठ किंवा अनिष्ट शक्ती आपल्याला उत्तर देत नाही, तर ईश्वराकडून उत्तर मिळते, म्हणजे ते विश्वमन आणि विश्वबुद्धी यांकडून आलेले असते.’ (१.८.२०११)

आ. सूक्ष्मातील कळण्यातील टप्पे

१. ‘स्थुलातील सूक्ष्म, म्हणजे समोर दिसणार्‍या एखाद्या वस्तूतील स्पंदने कळणे

२. बाजूच्या खोलीतील एखाद्या वस्तूतील स्पंदने कळणे

३. पुढे विविध लोकांतील, उदा. भुवलोकातील, म्हणजे सूक्ष्मातील सूक्ष्म कळणे

४. सूक्ष्मातीसूक्ष्म ईश्वराचे विचार कळणे’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.८.२०१७)

सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.

Leave a Comment