दही खाताय, मग हे वाचाच !

Article also available in :

आयुर्वेदात आठ प्रकारच्या प्राण्यांच्या दुधाचे व दह्याचे वर्णन केले आहे. आपण मात्र गायीच्या दुधापासून निर्मित दह्याचे गुण पाहूयात.

१. दह्याचे गुणधर्म

  • भोजनात रुची उत्पन्न करते
  • भुक वाढवते, बल वाढवते
  • आंबट रसाचे व उष्ण आहे
  • अर्धे विरजलेले दही पचायला जड व कृमि उत्पन्न करणारे आहे त्यामुळे त्याचे सेवन करणे निषिद्ध आहे.

अ. कपड्यातून गाळलेले दही (चक्का)

वात कमी करणारे, कफ वाढवणारे, अति स्निग्ध, भोजनात रुची निर्माण करते, पचण्यास जड आहे. म्हणूनच श्रीखंड जे चक्क्यापासून बनते ते मेदस्वी व कफ रोग ग्रस्त, ज्यांना भूक लागत नाही अशा व्यक्तींनी सेवन करू नये.

आ. दधी सार (दह्यावरची मलई)

पचण्यास जड, बल देणारी आहे, परंतु ज्यांची पाचन शक्ती जास्त आहे त्यांनीच हे सेवन करावे.

इ. असार दही (मलई विरहित)

पचण्यास हलके, गुणाने रुक्ष आहे, वात वाढवणारे व मलावष्टम्ब (Constipation) करणारे आहे.

ई . मस्तु (दह्यावरील पाणी)

तहान, श्रम, अरुची घालवणारे आहे, मलाचे भेदन करून त्यास बाहेर काढणारे, शरीरातील स्रोतस मोकळी करणारे आहे. परंतु आम्ल तुरट रस व आवृष्य (शुक्राणूंना अयोग्य) असल्यामुळे ह्याचे नित्य सेवन करू नये.

– वैद्य शार्दुल चव्हाण

दही हा आयुर्वेदाचा फार मोठा शत्रू आहे, असे अनेकांना वाटते. प्रत्यक्षात मात्र तसे मुळीच नाही. ‘नीट विरजलेले सायीचे दही हे शरिराला स्निग्धता देते, जिभेची चव वाढवते, वात न्यून करते आणि शुक्रधातू वाढवते’, असे आयुर्वेद सांगतो. अदमुरे दही कित्येक जण आवडीने खातात. ते गोड असल्याने चांगले, असा त्यांचा समज असतो; मात्र प्रत्यक्षात जी गोष्ट धड दूधही नाही आणि दहीही नाही, अशी त्रिशंकू गोष्ट आरोग्याला चांगली कशी असेल ? पिढ्यान्पिढ्या गैरसमजातून उत्तम समजले जात असले, तरी अदमुरे दही खाऊ नका. ते शरिरातील तिन्ही दोष वाढवते.

 

२. दही सेवनाचे नियम

अ. दही गरम गोष्टींमध्ये मिसळणे योग्य नव्हे !

दही घेतांना छान फेटून घ्या. तसे केल्याने ते पचायला सोपे जाते. त्यात साखर, मीठ, मिरपूड किंवा आवळा पूड घालून घेतली, तर हे दही बाधत नाही. दही गरम गोष्टींमध्ये मिसळायचे मात्र नाही. दुधासारखेच तेदेखील नासते आणि जरी नासले नाही, तरी काही हानीकारक घटक उत्पन्न करते. त्यामुळे ‘दही + गरम’ हे समीकरण नकोच.

आ. दही आणि लस्सी उष्ण !

सगळ्यात महत्त्वाचे सूत्र, म्हणजे पचायला जड असलेले दही हे थंड नसून उष्ण आहे ! मग त्यामुळे सर्दी कशी काय होते ? सहसा दही आंबट असेल किंवा आपली प्रकृती कफाची असेल किंवा लहान मुले असतील, तरच कफाचा त्रास होऊ शकतो, अन्यथा नाही. लस्सीही दह्यापासूनच बनवली जात असल्याने उष्णच असते. मग सर्दीचे त्रास गोड असलेल्या या लस्सीनेही कसे होतात ? कारण मुळात लस्सी हा पदार्थ गोड होतो तो साखरेमुळे. ती लस्सीची अंगीभूत चव नव्हे ! त्यातच पाणी मिसळले गेल्याने पुन्हा त्यातील जलांश वाढल्याने या पदार्थाने सर्दी होऊ शकते. असे असले तरी लस्सीसुद्धा उष्ण आहे. जसे मिरची शीतकपाटामध्ये (‘फ्रीज’मध्ये) ठेवली, म्हणून ‘थंड’ असे आपण म्हणतो का ? अगदी तसेच इथेही आहे.

इ. दही प्रतिदिन खाणे टाळा !

दही हा कॅल्शियमपासून ते शरिराला उपयुक्त बॅक्टेरियापर्यंत विविध गोष्टींचा उत्तम स्रोत आहे, असे कुणी कितीही ओरडून सांगितले, तरी त्याचे ‘नियमित’ म्हणजे प्रतिदिन न चुकता सेवन टाळावे. विशेषतः मधुमेह (डायबेटीस), सूज, पीसीओडी (मासिक पाळी), स्थौल्य यांपैकी कोणती समस्या असल्यास दही न्यूनतम खाणे वा टाळणे योग्य ! बाकी वरील नाममात्र काळजी घेऊन दही खावे. त्याने शरिरावर सुपरिणाम दिसून येतील आणि कोणतेही दुष्परिणाम मात्र होणे टळेल.

ई.  रात्री सेवन करू टाळा !

दही हा ‘नियमितपणे’ आणि रात्री खाण्याचा पदार्थ नाही, हा दही खाण्यासाठीचा मूलभूत नियम आहे.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.

1 thought on “दही खाताय, मग हे वाचाच !”

Leave a Comment