महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? भाग – ५

Article also available in :

औषधी वनस्पतींची संख्या अगणित आहे. अशा वेळी कोणत्या वनस्पती लावाव्यात ? असा प्रश्न पडू शकतो. प्रस्तुत लेखात काही महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ?, याविषयी माहिती दिली आहे. या वनस्पती लागवड केल्याच्या साधारण ३ मासांपासून त्या औषधांसाठी वापरता येण्यासारख्या आहेत. सध्याचा आपत्काळ लक्षात घेता वृक्षवर्गीय वनस्पतींच्या लागवडीपेक्षा अशा वनस्पतींना प्राधान्य दिल्यास आपल्याला या वनस्पतींचा लगेच उपयोग होऊ शकतो. औषधी वनस्पतींची रोपे सहजपणे सर्वत्र उपलब्ध होत नाहीत. या समस्येवरील उपाययोजनाही या लेखातून मिळेल. वाचक या लेखात दिलेल्या वनस्पतींव्यतिरिक्त अन्यही वनस्पती लावू शकतात.

 

भाग ४ वाचा…  महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? भाग – ४

 

२२. पारिजातक

पारिजातक

२२ अ. महत्त्व

ताप, सांधेदुखी यांमध्ये पारिजातकाचा चांगला उपयोग होतो. घराशेजारी एखादे झाड असावे.

२२ आ. लागवड

याची फांद्यांपासून अभिवृद्धी करता येते. फेब्रुवारी – मार्च मासांत याच्या फांद्या रेतीत पुरून ठेवल्यास जूनपर्यंत चांगली रोपे तयार होतात आणि ती पावसाळ्यात लावता येतात.

 

२३. बेल

२३ अ. महत्त्व

बेलाची साल, पाने आणि फळे यांचा औषधांमध्ये उपयोग होतो. शौचाला आव पडत असल्यास बेलफळाचा मोरांबा करून खाल्ल्याने लाभ होतो. पानांचा रस रक्तातील ‘हिमोग्लोबिन’ वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. एखादे झाड आपल्या भोवताली असावे.

२३ आ. लागवड

बेलाची रोपे विकत मिळतात. परिपक्व होऊन झाडावरून नैसर्गिकपणे गळून पडलेल्या बेलफळातील बिया रुजत घातल्यास स्वतःही रोपे बनवू शकतो.

 

२४. वाळा

१. वाळ्याचे झुडूप आणि २. वाळ्याची मुळे

२४ अ. महत्त्व

याची मुळे अतिशय सुगंधी आणि थंड असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत यांचा विशेष उपयोग होतो. वाळ्याची मुळे माती घट्ट पकडून ठेवत असल्याने मातीची धूप थांबवतात. वाळ्याची मुळे उन्हात वाळवून नंतर प्लास्टिक पिशवीत घालून कपड्यांच्या कपाटात ठेवल्यास ५ – ६ वर्षे टिकतात. यांमुळे कपड्यांनाही सुगंध येतो आणि पाहिजे तेव्हा वाळा आपल्याला वापरताही येतो.

२४ आ. लागवड

वाळ्याची रोपे रोपवाटिकांमध्ये विकत मिळू शकतात. गवती चहासारखी वाळ्याचीही बेटे (झुडूपे) होतात. एखाद्याकडे वाळ्याचे बेट असेल, तर ज्याप्रमाणे गवती चहाचे ठोंब (रोप) काढून त्यांची लागवड केली जाते, त्याचप्रमाणे वाळ्याचेही ठोंब काढून लागवड करता येते. वाळा जमिनीत लावल्यास त्याची मुळे खणून काढतांना तुटून वाया जातात. तसे होऊ नये, यासाठी वाळ्याची लागवड प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये करावी. यासाठी २५ किलो धान्याच्या रिकाम्या गोण्या घ्याव्यात. तळाशी कुजलेले शेणखत घालावे आणि रेतीमिश्रित माती गोण्यांमध्ये भरून वर वाळ्याचा ठोंब लावावा. खाली शेणखत असल्याने ते घेण्यासाठी वाळ्याची मुळे लांब लांब वाढतात आणि साधारण वर्ष – दीड वर्षाने वाळ्याची पिशवीभर मुळे मिळतात. वाळ्याची मुळे काढतांना ती मातीसकट पाण्यामध्ये काही काळ भिजवून ठेवतात आणि नंतर पाण्यात हालवून त्यांची माती काढली जाते. यामुळे स्वच्छ मुळे मिळतात.

 

२५. आस्कंद (अश्‍वगंधा)

आस्कंद (अश्वयगंधा)

२६ अ. महत्त्व

ही वांग्याच्या जातीची वनस्पती आहे. हिची मुळे शक्तीवर्धक आहेत. हे जास्त वापरले जाणारे औषध आहे.

२६ आ. लागवड

हे ६ मासांचे पीक आहे. पावसाळ्यानंतर भातकापणी झाली की, भातशेतीमध्ये अश्‍वगंधेचे पीक घेता येते. हे दवावर होते. त्यामुळे वेगळ्या पाण्याची आवश्यकता रहात नाही. बियाण्यापासून याची लागवड करतात. मोठ्या प्रमाणात व्यावसायिक स्तरावर लागवड करायची असल्यास ‘नागोरी’ जातीच्या अश्‍वगंधेचे बी वापरावे. या जातीच्या झाडांची मुळे अंगठ्याएवढी मोठी असतात. घरगुती स्तरावर लागवड करायची असल्यास न्यूनतम २ ते ४ रोपे लावावीत. घराभोवती जागा असल्यास ५० ते १०० रोपे लावली, तरी त्यांचा उपयोग होतो. फळे धरल्यावर त्यांचा रंग तांबडा होतो आणि पाने गळू लागतात. तेव्हा मुळे खणून काढावीत. मुळे धुऊन वाळवून त्यांची पूड करून ठेवावी. फळांमधून मिळणार्‍या बियांपासून या वनस्पतीची पुनर्लागवड करता येते. वनस्पतीचा वरचा भाग गुरांचे खाद्य म्हणून वापरता येतो.

 

२६. झेंडू

झेंडू

घराभोवती झेंडूची झाडे असल्यास डासांची समस्या न्यून होते. व्रण भरून येण्यासाठी झेंडूच्या रसाचा उपयोग होतो. फुलाच्या पाकळ्या वाळवून बी म्हणून वापरल्या जातात.

 

२७. उपलसरी (सारिवा किंवा अनंतमूळ)

उपलसरी (सारिवा किंवा अनंतमूळ)

२७ अ. महत्त्व

रक्तशुद्धी करणारे हे एक श्रेष्ठ औषध आहे. हिची मुळे औषधात वापरतात. ही मुळे अतिशय सुगंधी असतात. याच्या नित्य सेवनाने गर्भाशयातील गाठी विरघळण्यास साहाय्य होते. ही वनस्पती कोकणात पुष्कळ आढळते; परंतु आता ही नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहे. शक्य तेवढी जास्त प्रमाणात ही वनस्पती लावावी.

२७ आ. लागवड

या वनस्पतीची पाने खुडल्यावर पांढर्‍या रंगाचा चीक येतो. कोकणीत या वनस्पतीला ‘दूधशिरी’ म्हणतात. पाने निमुळती हिरवी असतात. त्यांवर पांढर्‍या रंगाच्या आडव्या-उभ्या रेषा असतात. हिची मुळे खोल असतात. मुळे खणून मिळणारी रोपे घरी आणून लावावीत. जिथे कुठे ही रोपे मिळतील तिथून ती खणून आणून लावावीत. हिच्या खोडाच्या किंवा मुळाच्या तुकड्यांपासूनही लागवड करता येते. २ वर्षांनंतर हिची मुळे औषधांमध्ये वापरण्यासारखी होतात.’

संकलक

श्री. माधव रामचंद्र पराडकर आणि वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

मार्गदर्शक

डॉ. दिगंबर नभु मोकाट, साहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तथा प्रमुख निर्देशक, क्षेत्रीय सहसुविधा केंद्र, पश्चिम विभाग, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकार.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’, ‘११६ वनस्पतींचे औषधी गुणधर्म’ आणि ‘९५ वनस्पतींचे औषधी गुणधर्म’

मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची रोपे किंवा बियाणे मिळण्याची ठिकाणे

१. क्षेत्रिय सहसुविधा केंद्र, पश्चिम विभाग, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकार, द्वारा वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. संपर्क क्रमांक : ९०२१०८६१२५

या केंद्राद्वारे शेतकर्‍यांना लागवडीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाते. डॉ. दिगंबर नभु मोकाट, साहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे हे या केंद्राचे प्रमुख संचालक आहेत. ते शेतकर्‍यांनी औषधी वनस्पतींची लागवड करावी, यासाठी गेली २० वर्षे महाराष्ट्राच्या विविध भागांत कार्य करत आहेत.

२. औषधी आणि सुगंधी वनस्पती संशोधन संचालनालय, बोरीयावी, गुजरात. (०२६९२-२७१६०२) या ठिकाणी या लेखात दिलेल्या वनस्पतींपैकी तुळस, कालमेघ, शतावरी आणि अश्वगंधा या वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड करायची असल्यास त्यांचे बियाणे मिळते. कोरफड, मंडूकपर्णी (ब्राह्मी), गवती चहा, अडुळसा आणि गुळवेल यांची रोपेही येथे मोठ्या प्रमाणात विकत मिळतात. इच्छुक वाचक येथे संपर्क करून कुरियरद्वारे बियाणे उपलब्ध होऊ शकेल का ? याची विचारणा करू शकतात. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या लागवडीची रोपे किंवा बियाणे यांविषयीची माहिती पुढील मार्गिकेवर उपलब्ध आहे. https://dmapr.icar.gov.in/HeadPage/Pricelist.html

३. मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती पाहिजे असल्यास त्या पुढील ठिकाणीही मिळू शकतात. त्या त्या संस्थेच्या नावापुढे कंसात संपर्क क्रमांक दिला आहे.

महाराष्ट्रातील कृषी विद्यापिठे आणि त्यांतील उपविभाग

१. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी (०२३५८-२८२०६४)

२. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (०७२४-२२५८३७२)

३. सुगंधी व औषधी वनस्पती, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. (०२४५२- २३४९४०८)

४. अखिल भारतीय औषधी सुगंधी वनस्पती व पानवेल संशोधन योजना, वनस्पती रोगशास्त्र व कृषी अणूजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. (०२४२६-२४३३१५, २४३२९२)

महाराष्ट्रातील काही खासगी रोपवाटिका (नर्सरी)

१. कोपरकर नर्सरी, गवे, ता. दापोली, जि. रत्नागिरी. (०२३५८-२८२१६५/२६७५२१, ९४२२४३१२५८)

२. इको फ्रेंडली नर्सरी, परंदवाडी, सोमटणे फाट्याजवळ, तालुका मावळ, जि. पुणे. (९४२२२२४३८४, ९२२५१०४३८४)

३. ए.डी.एस्. नर्सरी, कशेळे, कर्जत-मुरबाड रस्ता, जि. रायगड.

४. धन्वन्तरि उद्यान, पिंपळगाव उज्जैनी, जि. नगर. (९६७३७६९६७६)

औषधी वनस्पतींची रोपे मिळण्याचे गोव्यातील ठिकाण

गोव्यातील वनखात्याच्या ‘रिसर्च अँड युटिलायझेशन’ या विभागाद्वारे औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाते. या विभागाच्या वालकिणी, सांगे आणि घोटमोड, उसगांव, फोंडा आदी ठिकाणी रोपवाटिका आहेत. यांपैकी वालकिणी गावातील रोपवाटिकेमध्ये मोठ्या प्रमाणात विविध लहान औषधी वनस्पतींची रोपे अल्प दरात मिळतात. देवस्थान कमिटी, समाजसेवी संस्था आदींना गोव्यातील वनखात्याच्या ‘वनमहोत्सव’ या उपक्रमाच्या अंतर्गत औषधी वनस्पतींचे विनामूल्य वितरणही केले जाते. गोव्यातील इच्छुक व्यक्ती औषधी वनस्पतींच्या रोपांसाठी गोव्यातील वनखात्याच्या ‘रिसर्च अँड युटिलायझेशन’ या विभागाला संपर्क करू शकतात.

संपर्कासाठी पत्ता

Dy. Conservator of Forests,

Research and Utilisation Division and CEO

State Medicinal Plants Board

Goa.

Phone : 0832 – 2750099

  • आपत्काळाच्या दृष्टीने महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? हे सांगणारी ही लेखमाला साधक आणि वाचक यांनी संग्रही ठेवावी.
  • ज्या व्यक्तींकडे मध्यम (३ – ४ एकर) किंवा मोठ्या प्रमाणात लागवड करण्यायोग्य भूमी आहे, अशा व्यक्तींनी समाजबांधवांचा विचार करून मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करावी. यामुळे अनेकांना आयुर्वेदाची औषधे उपलब्ध होऊन त्यांचे आरोग्यरक्षण होईल. या माध्यमातूनही समष्टी साधना होईल !

Leave a Comment