कालमेघ वनस्पती आणि तिचा विकारांतील उपयोग

Article also available in :

 

१. महत्त्व

ही वनस्पती साथीच्या रोगांवर अतिशय उपयुक्त आहे. ही अत्यंत कडू असते. ही तापावर आणि जंतांवर वापरतात. ही सारक (पोट साफ करणारी) असल्याने काही ठिकाणी पावसाळ्यात आणि त्यानंतर येणार्‍या शरद ऋतूत आठवड्यातून एकदा हिचा काढा करून घेण्याचा प्रघात आहे. याने शरीर निरोगी रहाते.

 

२. ओळख

हिचे लॅटिन नाव Andrographis paniculata असे आहे. या वनस्पतीला कोकणीत ‘किरायते’ म्हणतात. कोकणातील लोकांना ही वनस्पती सुपरिचित आहे. पावसाळ्याच्या आरंभी हिला भरपूर पाने असतात. (छायाचित्र १) या वनस्पतीचे आयुष्य ९० ते १०० दिवसांचे असते. पावसानंतर पाणी दिले, तर ही वनस्पती टिकते, नाहीतर वाळून जाते. बर्‍याच वेळा कोकणात पावसाळ्यानंतर वाळलेल्या अवस्थेत ही वनस्पती ठिकठिकाणी आढळते. हिला पावसाळ्याच्या शेवटी बारीक बोंडे येतात. (छायाचित्र २) यांमध्ये बी असते.

 

३. लागवड

ही वनस्पती कोकणात बहुतेकांच्या घरी असते. पहिला पाऊस झाला की, या वनस्पतीची रोपे आधी पडलेल्या बियांपासून मोठ्या संख्येत तयार होतात. ही तयार रोपे आणून लावता येतात. पाऊस संपतांना जे बी होते, ते एकत्र करून ठेवल्यास दुसर्‍या वर्षी पावसाच्या आरंभी पेरून त्यापासूनही रोपे बनवता येतात. पाण्याची उपलब्धता असल्यास घरातील कुंड्यांमध्ये हे बी कधीही पेरता येते.

 

४. विकारांतील उपयोग

४ अ. ताप 

‘कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये मूठभर कालमेघ आणि पाव चमचा सुंठीची पूड २ पेले पाण्यात घालून उकळून एक पेला काढा करावा. हा काढा अर्धा – अर्धा पेला सकाळ – संध्याकाळ घ्यावा. (कोरोनाच्या काळात अनेक वैद्यांनी या वनस्पतीच्या आधारे कोरोनावर यशस्वी उपचार केल्याची उदाहरणे आहेत.)

४ आ. आम्लपित्त 

वाळलेल्या कालमेघाची पूड करून ठेवावी. घशात किंवा छातीत जळजळ होत असल्यास अर्धा चमचा कालमेघाची पूड अर्धा चमचा साखरेसह चघळून खावी.

४ इ. बद्धकोष्ठता, पित्त आणि उष्णता 

मूठभर कालमेघाचा पेलाभर पाण्यात अर्धा पेला काढा करून तो सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा. प्रत्येक शरद ऋतूमध्ये हा काढा आठवड्यातून एकदा घ्यावा.

४ ई. जंत (कृमी) होणे, त्वचाविकार आणि रक्तशुद्धीसाठी

सलग ७ दिवस मूठभर कालमेघाचा पेलाभर पाण्याचा अर्धा पेला काढा करून सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा.

 

५. विशेष सूचना

ही वनस्पती वात वाढवणारी असल्याने ताप नसतांना आणि वैद्यांनी सांगितल्याखेरीज हिचा काढा प्रतिदिन घेऊ नये. वैद्यांनी सांगितल्याखेरीज या वनस्पतीचा ७ दिवसांपेक्षा जास्त काळ सलग वापर करू नये.

 

६. लागवडीसाठी कालमेघाच्या बिया अशा गोळा करून ठेवा !

पावसाळ्यानंतर वाळत आलेले कालमेघाचे रोप मुळापासून उपटावे. मुळाकडील भाग कापून वेगळा काढून ठेवावा. वनस्पतीचा वरचा भाग प्लास्टिकच्या पिशवीत घालून दोन्ही हातांमध्ये धरून चोळावा. असे केल्याने वनस्पतीचे बी पिशवीत जमा होईल. हे बी ताटलीत घेऊन त्यावर हळूवार फुंकर मारावी, म्हणजे त्यात असलेला पानांचा कचरा बाजूला होईल. अशा रितीने कचराविरहित बी एकत्र करून कागदाच्या पुडीत बांधून प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवावे. यामध्ये बी गोळा केल्याचा दिनांक घालावा. यातील थोडे बी लागवडीसाठी बनवलेल्या वाफ्यांमध्ये किंवा कुंडीमध्ये रुजत घालावे. थोडे बी पुढील पावसाळ्यात रुजत घालण्यासाठी जपून ठेवावे. (चिमूटभर बियांपासूनही पुष्कळ रोपे रुजून येतात.)

 

७. वाळलेली वनस्पती नीट साठवून ठेवा !

बी काढलेली कालमेघ वनस्पती आणि तिची मुळे पाण्यात वेगवेगळी धुऊन नंतर एकत्र करून सावलीत वाळवून ठेवावीत. मुळे वेगळी धुतल्याने मुळांची माती संपूर्ण वनस्पतीला लागत नाही. या वाळलेल्या वनस्पतीचा काढा करण्यासाठी, तसेच चूर्ण करून वापरण्यासाठी उपयोग होतो. घरच्या घरी चूर्ण करायचे झाल्यास ते मिक्सरवर करता येते. मिक्सरवर चूर्ण करण्यापूर्वी वनस्पती थोडा वेळ उन्हात वाळवावी, म्हणजे चूर्ण सहज बनते. वाळलेली वनस्पती किंवा तिचे चूर्ण प्लास्टिकच्या पिशवीत नीट बांधून (पॅक करून) ठेवावे. बाहेरची हवा लागली नाही, तर नीट वाळवून ठेवलेली वनस्पती साधारण २ वर्षे वापरता येते.

 

८. कालमेघाचे बी आणि वाळलेली वनस्पती स्थानिक स्तरावर वाटून घ्या !

ज्या साधकांकडे ही वनस्पती उपलब्ध आहे, ते स्वतःला आवश्यक तेवढी वनस्पती ठेवून शेष वनस्पती इतर साधकांना देऊ शकतात. कालमेघाचे बीसुद्धा साधक एकमेकांमध्ये वाटून घेऊन घरच्या घरी त्याची लागवड करू शकतात.

(टीप – ज्या प्रदेशामध्ये कालमेघ ही वनस्पती आढळते, त्याच प्रदेशात तिची लागवड करावी. जिथे ही वनस्पती नैसर्गिकपणे आढळत नाही, तिथे या वनस्पतीची लागवड करण्याची आवश्यकता नाही. अशा भागांमध्ये कडूनिंबाच्या पानांचा या वनस्पतीप्रमाणेच उपयोग करता येऊ शकतो.)

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

सनातनची ‘घरोघरी लागवड मोहीम’ हे ईश्वरी
नियोजन असल्याची साधिकेला आलेली अनुभूती

सौ. राघवी कोनेकर

कार्तिकी एकादशीपासून सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्वत्रच्या साधकांना ‘नैसर्गिक शेती’ तंत्राचे महत्त्व सांगून त्याप्रमाणे लागवड कशी करावी, याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. याविषयीचा सविस्तर लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आला होता. यानंतर अवघ्या ५ दिवसांनी, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी समिती स्थापन करणार’, अशी घोषणा केल्याचे वृत्त छापून आले. ‘या दोन्ही घटना म्हणजे निवळ योगायोग नसून देशात शेतीविषयी क्रांती घडण्याचे ईश्वरी संकेतच आहेत’, असा विचार मनात आला. या घटनेमुळे संस्थेने हाती घेतलेली ‘घरोघरी लागवड मोहीम’ हे ईश्वरी नियोजन असल्याचे अधोरेखित झाले. काळानुरूप आवश्यक असलेल्या या मोहिमेमध्ये सर्व साधकांना सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल श्री गुरूंच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

– सौ. राघवी मयुरेश कोनेकर, फोंडा, गोवा.

 

सनातनच्या संकेतस्थळावरील लागवडीसंदर्भातील व्हिडिओ
पाहिले नसल्यास ते लवकरात लवकर पाहून लागवडीला आरंभ करा !

 

वैद्य मेघराज पराडकर

‘कार्तिकी एकादशीपासून सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक साधकाच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड व्हावी, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे. अत्यंत सोप्या आणि नैसर्गिक पद्धतीने पेठेतून काहीही विकत न आणता घरच्या घरी लागवड कशी करायची, याचे सविस्तर मार्गदर्शन करणारे व्हिडिओ सनातनच्या संकेतस्थळावरील पुढील मार्गिकेवर दिले आहेत. साधकांनी हे व्हिडिओ पाहिले नसल्यास लवकरात लवकर पहावेत आणि विषय समजून घेऊन लागवडीला आरंभ करावा.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सनातनच्या संकेतस्थळावर वाचा : ‘घरच्या घरी
नैसर्गिक पद्धतीने लागवड कशी करावी’, यासंदर्भात सविस्तर माहिती

https://www.sanatan.org/mr/a/82985.html (या मार्गिकेवर थेट जाण्यासाठी शेजारचा ‘QR कोड’‘स्कॅन’ करा !)

टीप १ – ‘QR कोड’ म्हणजे ‘Quick Response कोड’. ‘स्मार्ट फोन’मधील ‘QR कोड स्कॅनर’ ही प्रणाली (ॲप) चालू करून ‘QR कोड’वर ‘स्मार्ट फोन’चा छायाचित्रक (कॅमेरा) धरावा, म्हणजे ‘कोड’ ‘स्कॅन’ होतो आणि ‘स्मार्ट फोन’मध्ये संकेतस्थळाची मार्गिका आपोआप उघडते. तिचे टंकलेखन करावे लागत नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment