सत्सेवेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या कार्यात जिज्ञासूंनी स्वत:चा सहभाग वाढवावा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सोलापूर आणि चिंचवड (पुणे) येथील जिज्ञासूंसाठी दोन दिवसांच्या ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन

सोलापूर – जीवनात साधनेचे महत्त्व अनन्यसाधारण असून सत्सेवेच्या माध्यमातून मिळणार्‍या संधीचा अधिकाधिक लाभ करून घ्या. ईश्वरी नियोजनानुसार हिंदु राष्ट्र येणारच आहे. सत्सेवेच्या माध्यमातून जिज्ञासूंनी हिंदु राष्ट्राच्या कार्यात स्वतःचा सहभाग वाढवावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. २० आणि २१ नोव्हेंबर या दिवशी चिंचवड (पुणे) आणि सोलापूर जिल्ह्यातील ‘साधना सत्संगा’मध्ये नियमित सहभागी होणार्‍या जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. या सोहळ्याला ३५० हून अधिक जिज्ञासू ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते. या दोन दिवसांच्या सत्संग सोहळ्याचे सूत्रसंचालन सनातनच्या साधिका सौ. मेघा जोशी आणि सौ. वंदना जोशी यांनी केले, तर कार्यक्रमाचा उद्देश सौ. सुनीता पंचाक्षरी आणि सौ. अनिता बुणगे यांनी सांगितला. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या अमूल्य मार्गदर्शनाने प्रभावित झालेल्या जिज्ञासूंनी साधना करण्यास आरंभ केल्यापासून आलेले अनुभव आणि अनुभूती यांचे उत्स्फूर्तपणे कथन केले.

(सद्गुरु) कु. स्वाती खाडये

या कार्यक्रमात विविध जिज्ञासूंनी साधना आणि सत्सेवा यांमुळे स्वत:मध्ये झालेले पालट यांविषयीचे अनुभव सांगितले. सोहळ्याच्या दुसर्‍या दिवशी सनातनचे साधक श्री. अमोल कुलकर्णी यांनी जिज्ञासूंना साधनेविषयी मार्गदर्शन केले. दोन दिवसांच्या या सोहळ्यामध्ये दैवी वातावरण निर्माण झाले होते.

जिज्ञासूंचे अभिप्राय

१. श्री. राजेंद्र गुजर, सोलापूर – सत्संग सोहळा पुष्कळ चांगला झाला. यापुढे आणखी जोमाने साधना आणि सेवा करीन. केवळ माझे वय अधिक असल्याने वयाची अडचण येते; पण ‘जय गुरुदेव’ असा नामजप केल्यास उत्साह येतो. त्यामुळे कसलीच भीती वाटत नाही.

२. श्री. अंकुश माने, सोलापूर – आजच्या सत्संग सोहळ्यातून पुष्कळ काही शिकायला मिळाले. अधिकाधिक लोकांपर्यंत साधनेचे महत्त्व पोचवण्यासाठी प्रयत्न करीन.

३. सौ. पूजा जाधव, सोलापूर – सत्संग सोहळ्याच्या माध्यमातून मला माझ्या साधनेला दिशा मिळाली. या सोहळ्यात सद्गुरु आणि संत यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार साधना करण्याचा प्रयत्न करीन.

४. श्रीमती रंजना शेरखाने, सोलापूर – यापुढे अधिकाधिक लोकांना साधना सांगण्याचा प्रयत्न करीन. सनातनच्या ग्रंथांचा अधिकाधिक प्रसार करीन.

५. सौ. मधुरा कुलकर्णी, चिंचवड, पुणे – आजच्या सोहळ्यामुळे समष्टी साधनेचे महत्त्व लक्षात आले. त्याप्रमाणे समष्टी सेवा अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करीन.

६. सौ. गौरी गुरव, चिंचवड, पुणे – आजपर्यंत मी आणि माझे कुटुंब एवढाच विचार केला; पण हा समाज आणि राष्ट्रही आपलेच आहे, तोही धर्माविषयी जागरूक व्हायला हवा यासाठी प्रयत्न करायला हवे, असे वाटते. यापुढे व्यष्टी साधना वाढवून सत्सेवा करण्याचा प्रयत्न करीन.

७. सौ. राजश्री कोकणे, चिंचवड (पुणे) – या सत्संग सोहळ्याच्या माध्यमातून मला नामजपामुळे स्वत:तील दोष दूर होण्यास साहाय्य होते, हे शिकायला मिळाले. यापुढे मी नामजप करण्यामध्ये सातत्य ठेवीन.

 

सोहळ्याच्या वेळी जिज्ञासूंना आलेली अनुभूती

श्रीमती रत्नमाला गायकवाड, बार्शी, जिल्हा सोलापूर – या सत्संग सोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी मिळाल्यामुळे मी भाग्यवान आहे. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन चालू होते, तेव्हा माझा आतून दत्ताचा नामजप होत होता. त्यामुळे मला पुष्कळ ऊर्जा आणि चैतन्य मिळाले.

 

क्षणचित्रे

१. सत्संग सोहळ्यात जिज्ञासू त्यांचे अनुभव सांगत असतांना सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्वांचा भाव जागृत झाला होता.

२. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनाने प्रभावित झालेल्या जिज्ञासूंनी कार्यक्रम झाल्यानंतर त्वरित स्वत:चे अभिप्राय ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून कळवले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment