रुद्राक्ष

अनुक्रमणिका

१. व्युत्पत्ती अन् अर्थ

२. रुद्रवृक्ष (रुधिरवृक्ष, रुद्राक्षवृक्ष)

अ. रुद्रवृक्ष निर्माण होण्याचे पौराणिक विवेचन

आ. रुद्रवृक्षाचे सर्वसाधारण विवेचन

३. रुद्राक्ष (रुद्रवृक्षाचे फळ)

४. रुद्राक्षाची वैशिष्ट्ये

५. रुद्राक्षाचे कार्य

अ. नादलहरी आणि प्रकाशलहरी यांचे एकमेकांत रुपांतर करणे

आ. सम (सत्त्व) लहरी ग्रहण करणे

इ. रुद्राक्षमाळेने कोणत्याही देवतेचा जप करता येणे

६. रुद्राक्षाचे लाभ

अ. इतर माळांच्या तुलनेत अधिक लाभदायक

आ. कुंडलिनी जागृत होण्यास साहाय्य होते

इ. विद्युत चुंबकीय गुणधर्म असणे

७. खोटा रुद्राक्ष

अ. भद्राक्ष

आ. विकृताक्ष

इ. कृत्रिम रुद्राक्ष

ई. खर्‍या आणि खोट्या रुद्राक्षांतील भेद

उ. खोटा रुद्राक्ष आणि संत

८. चांगला रुद्राक्ष (वैशिष्ट्ये)

९. खर्‍या रुद्राक्षाचे सूक्ष्म-चित्र


 

खरा रुद्राक्ष !
खरा रुद्राक्ष !

शिवपूजा करतांना गळ्यात रुद्राक्षांची माळ घालावी, असे शास्त्र सांगते. नाथ संप्रदायी, वाम संप्रदायी आणि कापालिक हे विशेषकरून रुद्राक्षाचा वापर करतात. योगीही रुद्राक्षांच्या माळा धारण करतात. रुद्राक्षाचा अर्थ, त्याची वैशिष्ट्ये, कार्य, तसेच खरा आणि खोटा रुद्राक्ष यांतील भेद याविषयीची माहिती या लेखातून समजून घेऊया.

 

१. व्युत्पत्ती अन् अर्थ

‘रुद्र ± अक्ष’ या दोन शब्दांपासून रुद्राक्ष हा शब्द बनला आहे.

अ. अक्ष म्हणजे डोळा. रुद्र ± अक्ष म्हणजे जो सर्व पाहू आणि करू शकतो, (उदा. तिसरा डोळा) तो रुद्राक्ष. अक्ष म्हणजे आस. डोळा एकाच अक्षाभोवती फिरतो; म्हणून त्यालाही अक्ष म्हणतात.

आ. रुद्र म्हणजे रडका. ‘अ’ म्हणजे घेणे आणि ‘क्ष’ म्हणजे देणे; म्हणून अक्ष म्हणजे घेण्याची किंवा देण्याची क्षमता. रुद्राक्ष म्हणजे रडणार्‍याकडून त्याचे दुःख घेण्याची आणि त्याला सुख देण्याची क्षमता असलेला.

 

२. रुद्रवृक्ष (रुधिरवृक्ष, रुद्राक्षवृक्ष)

अ. रुद्रवृक्ष निर्माण होण्याचे पौराणिक विवेचन

तारकापुत्र अधर्माचरण करू लागल्याने विषादाने शंकराच्या नेत्रांतून पडलेल्या अश्रूंचे ‘रुद्राक्षवृक्ष’ होणे आणि शिवाने तारकापुत्रांचा नाश करणे

तडिन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष या तारकापुत्रांनी धर्माचरण अन् शिवभक्ती करून देवत्व प्राप्त करून घेतले. काही कालावधीनंतर ते अधर्माचरण करत असल्याचे पाहून शंकर विषादग्रस्त झाला. त्याचे नेत्र अश्रूंनी डबडबले. त्याच्या नेत्रांतील चार अश्रूबिंदू पृथ्वीवर पडले. त्या अश्रूंपासून बनलेल्या वृक्षांना ‘रुद्राक्षवृक्ष’ म्हणतात. त्या चार वृक्षांपासून तांबडे, काळे, पिवळे आणि पांढरे रुद्राक्ष निर्माण झाले. नंतर शिवाने तारकापुत्रांचा नाश केला.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

आ. रुद्रवृक्षाचे सर्वसाधारण विवेचन

हा समुद्रसपाटीपासून तीन सहस्र मीटर उंचीवर किंवा तीन सहस्र मीटर खोल समुद्रात सापडतो. रुद्राक्षाची झाडे कपारीत वाढतात, सपाटीत वाढत नाहीत. याच्या झाडाची पाने चिंचेच्या किंवा गुंजेच्या पानासारखी; पण अधिक लांब असतात. त्याला वर्षाला एक ते दोन सहस्र फळे लागतात. हिमालयातील यती केवळ रुद्राक्षफळ खातात. याला अमृतफळ असेही म्हणतात. ते खाल्ल्यास तहान लागत नाही.

 

३. रुद्राक्ष (रुद्रवृक्षाचे फळ)

रुद्राक्ष प्राप्त होण्याची प्रक्रिया
रुद्राक्ष प्राप्त होण्याची प्रक्रिया

रुद्रवृक्षाची फळे झाडावर पिकून थंडीत खाली पडतात. मग आतील बिया सुकतात. एका फळात पंधरा-सोळापर्यंत बिया (म्हणजे रुद्राक्ष) असतात. जितक्या अधिक बिया, तितका त्यांचा आकार लहान असतो आणि त्यांचे मूल्यही अल्प असते. लहान रुद्राक्ष एकेकटा सुटा न वापरता, बरेच लहान रुद्राक्ष एका माळेत माळतात आणि त्यांच्यासह एक मोठा रुद्राक्षही ओवतात. रुद्राक्षाला मूलतः आरपार भोक असते, बळे (मुद्दाम) पाडावे लागत नाही. आरपार भोकाला वाहिनी म्हणतात. रुद्राक्षाचा रंग तांबूस असतो आणि आकार माशासारखा चपटा असतो. त्याच्यावर पिवळ्या रंगाचे पट्टे असतात. त्याच्या एका अंगाला उघडल्यासारखे तोंड असते. ‘१० मुखांपेक्षा अधिक मुखे असलेल्या रुद्राक्षांना ‘महारुद्र’ म्हणतात.’ – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (ज्येष्ठ शु. ५, कलियुग वर्ष ५१११ २९.५.२००९)

 

४. रुद्राक्षाची वैशिष्ट्ये

रुद्राक्ष वातावरणातील तेज घेऊन त्याचे तेलात रूपांतर करतो. रुद्राक्षाच्या झाडाखाली बसून ‘ॐ नमः शिवाय ।’ हा जप केला की, त्यातून सुगंधी तेल चोवीस घंटे (तास) बाहेर येते. रुद्राक्षाच्या भोकातून फुंकर मारली की, ते तेल बाहेर पडते. रुद्राक्षाचे तेल सुगंधी आहे. त्याच्या झाडापासूनही तेल काढले जाते. रुद्राक्षाला सिद्ध केले की, तेलाच्या ठिकाणी त्यातून वायू बाहेर पडतो.

 

५. रुद्राक्षाचे कार्य

अ. नादलहरी आणि प्रकाशलहरी यांचे एकमेकांत रुपांतर करणे

रुद्राक्ष विश्वातील देवांच्या प्रकाशलहरींचे मानवाच्या शरिरातील नादलहरींत आणि नादलहरींचे प्रकाशलहरींत रूपांतर करतो. यामुळे देवांच्या लहरी मानव ग्रहण करू शकतो आणि मानवाच्या विचारांचे देवांच्या भाषेत रूपांतर होते.

आ. सम (सत्त्व) लहरी ग्रहण करणे

रुद्राक्ष सम (सत्त्व) लहरी ग्रहण करतो, तसेच त्याच्या उंचवट्यातून सम लहरी बाहेर फेकल्या जातात. खरा रुद्राक्ष बोटात धरला, तर स्पंदने जाणवतात. त्या वेळी शरीर रुद्राक्षातून निघणार्‍या सम लहरी ग्रहण करत असते. अंगठा आणि अनामिका यांत रुद्राक्ष धरल्यास स्पंदने शरिरात कोठेही जाणवतात. रुद्राक्ष कडेला (बाजूला) ठेवल्यावरही अर्धा घंट्यापर्यंत (तासापर्यंत) त्याचा परिणाम जाणवतो, म्हणजे त्या अवधीत बोटात काहीही धरले, तरी स्पंदने जाणवतात. मात्र हात पाण्याने धुतल्यास बोटात स्पंदने जाणवत नाहीत.

इ. रुद्राक्षमाळेने कोणत्याही देवतेचा जप करता येणे

कोणत्याही देवतेचा जप करण्यास रुद्राक्षमाळ चालते.

 

६. रुद्राक्षाचे लाभ

अ. इतर माळांच्या तुलनेत अधिक लाभदायक

रुद्राक्षमाला गळ्यात इत्यादी धारण करून केलेला जप रुद्राक्षमाला धारण न करता केलेल्या जपाच्या सहस्र पटीने लाभदायक असतो, तर रुद्राक्षाच्या माळेने केलेला जप इतर कोणत्याही प्रकारच्या माळेने केलेल्याच्या दहा सहस्र पट लाभदायक असतो; म्हणूनच रुद्राक्षमाळेने मंत्र जपल्याविना किंवा धारण केल्याविना शीघ्र (पूर्ण) मंत्रसिद्धी प्राप्त होत नाही, असे शैव समजतात. रुद्राक्षमाळेचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी ती गळ्याजवळ दोर्‍याने तिचा गळ्याला अधिकाधिक स्पर्श होईल अशी बांधावी.

आ. कुंडलिनी जागृत होण्यास साहाय्य होणे

रुद्राक्षाने कुंडलिनी जागृत होण्यास आणि प्राणायामातील केवल कुंभक साधण्यास साहाय्य होते.

इ. विद्युत चुंबकीय गुणधर्म असणे

‘रुद्राक्षात विद्युत चुंबकीय (इलेक्ट्रोमॅग्नेटिक) गुणधर्म असतात.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

 

७. खोटा रुद्राक्ष

अ. भद्राक्ष

भद्राक्ष
भद्राक्ष

याचे झाड रुद्राक्षासारखे असते; पण त्याची फळे आणि बिया गोलाकार असतात. बियांना, म्हणजे भद्राक्षांना मुखे नसतात, म्हणजे उर्ध्व-अधर भाग नाहीत. भद्राक्ष वापरल्यास ते विषवर्धन करते, म्हणजे विषम लहरी वाढवते. सामान्यतः भद्राक्षच रुद्राक्ष म्हणून विकले जायचे. याची फळे पक्षी खात नाहीत आणि खाल्ल्यास मरतात.

आ. विकृताक्ष

विकृताक्ष

आजकाल बहुधा रुद्राक्ष म्हणून हाच विकला जातो. ही एक प्रकारच्या रानटी बोराची बी असते. नेपाळमधील गुरंग नावाच्या भटक्या जमातीतील लोकांनी विकृताक्षाचा वापर करायला आरंभ केला. याला उष्ण (गरम) सुईने आरपार भोक पाडतात, तसेच यावर ॐ, स्वस्तिक, शंख, चक्र इत्यादी आकृत्या उष्ण सुईने कोरतात. रंग येण्यासाठी याला काताच्या पाण्यात ठेवतात; म्हणून पाण्यात ठेवला की, याचा रंग जातो.

इ. कृत्रिम रुद्राक्ष

लाकडी रुद्राक्ष

हे लाख, लाकूड, प्लास्टिक इत्यादींपासून बनवलेले असतात.

ई. खर्‍या आणि खोट्या रुद्राक्षांतील भेद

खरा रुद्राक्ष

खोटा रुद्राक्ष

१. आकार माशासारखा चपटा गोल
२. रंग (तांबूस) पक्का पाण्याने धुतला जातो
३. पाण्यात टाकल्यास सरळ खाली जातो तरंगतो किंवा हेलकावे खात खाली जातो
४. आरपार भोक असते सुईने पाडावे लागते
५. तांब्याच्या भांड्यात
किंवा पाण्यात टांगून
ठेवल्यावर स्वतःभोवती फिरणे
होते नाही
६. काही काळाने कीड लागणे लागत नाही लागते
७. मूल्य (२००८ मधील) रु. ४,००० ते ४०,००० रु. २० ते २००
८. कोणत्या लहरी ग्रहण करतो? सम (सत्त्व)
९. स्पंदने जाणवणे जाणवतात जाणवत नाहीत

उ. खोटा रुद्राक्ष आणि संत

संतांनी बाह्यतः ‘खोटा’ रुद्राक्ष दिला, तरी त्यांच्या चैतन्याने तो आतून ‘खरा’ झालेला असतो.

 

८. चांगला रुद्राक्ष (वैशिष्ट्ये)

रुद्राक्षाची वैशिष्ट्ये

रुद्राक्षाची वैशिष्ट्ये

१. जड (वजनदार) आणि सतेज

२. मुखे स्पष्ट असलेला

३. ॐ, शिवलिंग, स्वस्तिक इत्यादी शुभचिन्हे असलेला

४. मोठ्यात मोठा रुद्राक्ष आणि लहानात लहान शाळीग्राम उत्तम. (मेरुतंत्र)

५. कवेत मावणार नाही, एवढा बुंधा असलेल्या, म्हणजे जुन्या झाडाचा रुद्राक्ष

६. समुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर असलेल्या झाडाचा रुद्राक्ष आणि एकाच झाडाच्या वरच्या फांद्यांतील रुद्राक्ष : उंचीवरच्या रुद्राक्षांना वरून येणारे सत्त्वगुण अधिक प्रमाणात मिळतात; म्हणून ते अधिक प्रभावशाली असतात.

७. पांढर्‍या रंगाचा सर्वांत चांगला. त्यापेक्षा कनिष्ठ रुद्राक्ष अनुक्रमे तांबडा, पिवळा आणि काळा रंग असलेले असतात. पांढरे आणि पिवळे रुद्राक्ष सहसा आढळत नाहीत. तांबडे आणि काळे रुद्राक्ष सर्वत्र आढळतात.

 

९. खर्‍या रुद्राक्षाचे सूक्ष्म-चित्र

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘शिव’