७९ व्या वर्षीही त्वचेवर विशेष सुरकुत्या नसणे, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दैवी वैशिष्ट्य !

अनुक्रमणिका

परात्पर गुरु डॉ. आठवले

हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ७९ व्या वर्षीचे छायाचित्र आहे. तरीही त्यात ‘त्वचेवरील सुरकुत्या, गालाची त्वचा खाली ओघळणे, तोंडवळ्यावरील दीर्घकाळ आजारपणाची किंवा थकव्याची लक्षणे, वयस्कर व्यक्तींमध्ये दिसणारा एक प्रकारचा मलूलपणा’, अशी सामान्य वयस्कर व्यक्तीप्रमाणे लक्षणे जाणवत नाहीत. उलट याही वयात त्यांची त्वचा अत्यंत तुकतुकीत आहे. प्राणशक्ती अत्यल्प असूनही त्यांचा तोंडवळा अत्यंत तजेलदार आहे.

 

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले
यांची छायाचित्रे निवडण्याची सेवा करतांना भगवंताने उलगडलेली सुंदर लीला !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विविध विषयांवरील मार्गदर्शन दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होते. साधकांना त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूतीही प्रसिद्ध होतात. या लिखाणामध्ये प्रसिद्ध होणारी त्यांची छायाचित्रे साधकांना विशेष भावतात. गेल्या २ वर्षांत परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्याकडून त्यांच्या विविध छायाचित्रांचा अभ्यास करवून घेतला. या काळात छायाचित्रांच्या अभ्यासाच्या माध्यमातून भगवंताने उलगडलेली परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारत्वाच्या संदर्भातील दैवी लीला आम्हाला अनुभवता आली.

 

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०१९ पासून वेगवेगळ्या
माध्यमांतून ‘माझे सध्याचे वय दिसेल’, असे छायाचित्र दैनिकात प्रसिद्ध करा’, असा निरोप देणे

कु. सायली डिंगरे

साधारण वर्ष २०१९ पासून त्यांनी अनेक वेळा ‘माझे सध्याचे वय दिसेल’, असे छायाचित्र दैनिकात प्रसिद्ध करावे’, असा निरोप आम्हाला पाठवला. ‘अमुक छायाचित्रामध्ये मी तरुण दिसतो. आता माझे वय झाले आहे. त्यामुळे नियमित प्रसिद्ध करण्यासाठी ते छायाचित्र घेऊ नये’, असे त्यांनी सांगितले. काही वेळा त्यांच्याहून अल्प वय असलेल्या; पण वयस्कर साधकाचे दैनिकातील छायाचित्र दाखवून ‘त्यांच्याहून मी वयस्कर आहे; पण छायाचित्रात तसे दिसत नाही. त्यामुळे माझी आताच्या वयाची छायाचित्रे प्रसिद्ध करावीत’, असा निरोप ते पाठवत असत. त्यांचा निरोप आल्यानंतर प्रत्येक वेळी आम्ही त्या कालावधीत काढलेली छायाचित्रे अभ्यासून त्यांतील छायाचित्रे निवडली. त्यानंतर आम्ही त्यांच्या तेव्हाच्या वयाचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यास आरंभ केला. असे २ – ३ वेळा झाले. विविध औचित्यांनी काढलेली परात्पर गुरु डॉक्टरांची अनेक छायाचित्रे आहेत. असे असले, तरी ‘गेल्या काही वर्षांतील छायाचित्रांत दैनिकातील राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या लिखाणाच्या समवेत प्रसिद्ध करण्यासारखी छायाचित्रे नाहीत’, असे कळल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनीच पुढाकार घेऊन ऑगस्ट २०२० मध्ये त्यांची काही छायाचित्रे काढून घेतली. मे २०२१ मध्ये आम्ही त्यांतीलच एक छायाचित्र प्रसिद्ध करत होतो, तरीही परात्पर गुरु डॉक्टरांनी पुन्हा ‘सध्याचे वय दिसणारी छायाचित्रे प्रसिद्ध करावीत’, असा निरोप पाठवला.

साधकांना वेगवेगळी छायाचित्रे पहायला मिळावीत; म्हणून आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांची गेल्या १ – २ वर्षांत काढलेली ‘एका बाजूने पहाणारे हसरे’ आणि ‘दूरदृष्टीने पहाणारे’, ही दोन छायाचित्रेही काही विशेष प्रसंगी प्रसिद्ध केली. त्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी विचारले, ‘‘आता म्हातारपणातील समोरची छायाचित्रे बरी दिसत नसल्यामुळे अशी एका बाजूने पहाणारी छायाचित्रे आपण प्रसिद्ध करतो का ?’’ वास्तविक तसे नव्हते. त्याहून विशेष म्हणजे ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे वय कितीही झाले, तरी ते अधिकाधिक मोहक दिसू लागले आहेत’, हे साधकांविना अन्य कोण सांगू शकेल ?

थोडक्यात काय, तर ‘त्यांचे वय झाले आहे’, हे छायाचित्रातून दिसले पाहिजे’, हे या सर्व प्रक्रियेतून आमच्या लक्षात आले.

 

२. जून २०२१ मध्ये काढलेली परात्पर गुरु डॉक्टरांची
छायाचित्रे पाहून त्यांच्या त्वचेच्या संदर्भातील दैवी वैशिष्ट्ये लक्षात येणे

कु. पूजा नलावडे

आम्ही पुन्हा नवीन छायाचित्र प्रसिद्ध करण्याची सिद्धता चालू केली. त्याच काळात जून २०२१ मध्ये एका संशोधनासाठी परात्पर गुरु डॉक्टरांची छायाचित्रे काढण्यात आल्याचे आम्हाला कळले. त्या छायाचित्रांमध्ये तरी ‘त्यांचे वय ७९ वर्षे दिसेल’, असे आम्हाला वाटले. प्रत्यक्षात छायाचित्रे पहातांना लक्षात आले की, परात्पर गुरु डॉक्टरांच्या कोणत्याच छायाचित्रात सामान्य वयस्कर व्यक्तींसारखी लक्षणे दिसत नाहीत.’

‘त्वचेवरील सुरकुत्या, गालाची त्वचा खाली ओघळणे, तोंडवळ्यावरील दीर्घकाळ आजारपणाची किंवा थकव्याची लक्षणे, वयस्कर व्यक्तींमध्ये दिसणारा एक प्रकारचा मलूलपणा’, असे काहीच परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहून जाणवत नाही. उलट याही वयात त्यांची त्वचा अत्यंत तुकतुकीत आहे. प्राणशक्ती अत्यल्प असूनही त्यांचा तोंडवळा अत्यंत तजेलदार आहे. त्या छायाचित्रांकडे पाहून ‘एखाद्या बाळालाच पहात आहोत’, असे वाटते. इतकी त्यांत निरागसता आहे.

ही छायाचित्रे पाहून ‘देवाला परात्पर गुरु डॉक्टरांचे हे अवतारी वैशिष्ट्य उलगडायचे आहे. त्यासाठी ‘सध्याच्या वयाची छायाचित्रे छापणे’, ही लीला भगवंत घडवत आहे’, हे आमच्या लक्षात आले.

 

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालटणार्‍या
आध्यात्मिक स्थितीची अनुभूती छायाचित्रांच्या सेवेच्या माध्यमातून घेता येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या प्रसिद्धीपराङ्मुख विभूतींना खरेतर त्यांचे कोणतेही छायाचित्र प्रसिद्ध केले किंवा प्रसिद्ध केले नाही, तरी त्याचे काही वाटत नसते, तरीही परात्पर गुरु डॉक्टरांनी छायाचित्रांच्या संदर्भात दिलेले निरोप ऐकून आरंभी मला (कु. सायली डिंगरे हिला) वाटत असे की, ‘त्या त्या वयाचे छायाचित्र प्रसिद्ध केले की, साधकांना ‘आपले गुरु आता कसे दिसतात ?’, हे कळावे’, असा त्यांचा उद्देश असेल. गेल्या ६ मासांत मला (कु. सायली डिंगरे हिला) वाटू लागले की, ‘वय दिसणे’, यापेक्षा त्यांची त्या त्या काळातील आध्यात्मिक स्थिती साधकांना पहाता यावी, तसेच ते छायाचित्र पाहून साधकांना गुरूंच्या त्या आध्यात्मिक स्थितीचा काळानुसार लाभ व्हावा’, हा त्या निरोपामागील कार्यकारणभाव असेल, उदा. ऑगस्ट २०२० पूर्वी प्रसिद्ध होत असलेले त्यांचे छायाचित्र हसरे होते. त्यातून त्यांची प्रीती ओतप्रोत जाणवायची. ते ‘सगुण स्थितीत आहेत’, असे त्या छायाचित्रातून जाणवते. जुलै २०२० मध्ये काढलेल्या छायाचित्रामध्ये मात्र त्यांची निर्गुण स्थिती जाणवत असे. त्या छायाचित्राच्या डोळ्यांतील भाव पहाता ‘ते शून्यात पहात आहेत’, असे जाणवते.

आता जून २०२१ मध्ये काढलेले छायाचित्र पहाता पुन्हा त्यांची निर्गुण-सगुण स्थिती जाणवत आहे.

‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांचाच किती विचार करतात !’, हेही या सेवेतून अनुभवता आले. परात्पर गुरु डॉक्टरांची एका बाजूने काढलेली छायाचित्रे कधीतरी वेगळेपणा म्हणून वापरू शकतो; मात्र नेहमीसाठी ‘माझे साधकांकडे पहाणारे छायाचित्र घ्या’, असे त्यांनी सांगितले. ‘दैनिकाच्या माध्यमातूनही साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांना पाहिल्याची अनुभूती घेता यावी’, अशी त्यांची तळमळ असते. सदैव साधकांचाच विचार करणार्‍या अशा ईश्वरस्वरूप गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

‘हे भगवंता, ‘या सर्व माध्यमांतून उलगडणारे गुरुमाऊलीचे ईश्वरत्व आम्हाला अनुभवता येऊ दे. तुझ्या कृपेने गुरुमाऊलीला अपेक्षित अशी सेवा आमच्याकडून निरंतर घडू दे’, अशी प्रार्थना !’

– कु. सायली डिंगरे आणि कु. पूजा नलावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.७.२०२१)

 

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अहंशून्यता आणि
ईश्वरत्वाकडे वाटचाल झाल्याने त्यांच्या छायाचित्रांत त्यांचे वय जाणवत नाही !

कु. भाविनी कपाडिया

‘मी वर्ष २०२१ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे पाहिली. त्या छायाचित्रांत परात्पर गुरु डॉक्टर लहान बाळाप्रमाणे वाटतात. ‘त्यांची दृष्टी शून्यात आहे’, असे वाटते. ती छायाचित्रे पाहून माझ्या मनात पुढील विचार आला, ‘शून्य म्हणजे निर्गुण आणि शंभर म्हणजेही निर्गुण. यांतील शून्य हे अहंशून्यतेच्या दृष्टीने आहे, तसेच शंभर म्हणजे ईश्वराशी १०० टक्के एकरूप होणे आणि ईश्वराचे सर्व गुण आपल्यात येणे. परात्पर गुरु डॉक्टर अहंशून्य आहेत. तसेच ते ईश्वराशी एकरूप झाले आहेत. त्यांची १०० टक्क्यांकडे म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्याच्या दिशेने वाटचाल झाली आहे.’ (‘९५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढे गेल्यावर आणि अहं ५ टक्क्यांहून अल्प झाल्यावर संतांचे स्थुलातील कार्य त्यांच्या अस्तित्वानेच आपोआप होते.’ – संकलक)

परात्पर गुरु डॉक्टरांची निर्गुण स्थिती असल्याने जरी त्यांचे वय वाढत असले, तरी त्यांची वाटचाल ० टक्के अहंकडे झाली आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडवळ्यावर निरागसता आणि लहान बाळाप्रमाणे भाव आहेत. ते १०० टक्के ईश्वराप्रमाणे असल्याने ईश्वराचे तेज त्यांच्या तोंडवळ्यावर आहे. ‘त्यांच्या त्वचेची पारदर्शकता वाढणे, सावली अधिकाधिक फिकट वाटणे, देहावर शुभचिन्हे दिसणे’ इत्यादी त्यांच्या देहातील दैवी पालटांमुळे ते ईश्वराच्या गुणांशी एकरूप झाले आहेत’, हे लक्षात येत आहे. ‘देवतांना वय नसते’, हेही देवतांचे वैशिष्ट्य परात्पर गुरु डॉक्टरांच्या या छायाचित्रांच्या माध्यमातून दिसून येते. त्यामुळेच त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहून त्यांचे वय वाढत असल्याचे जाणवत नाही.

यातून ‘परात्पर गुरु डॉक्टर हे ईश्वरच आहे’, याची पुन्हा एकदा प्रचीती येते.’

– कु. भाविनी कापडिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.७.२०२१)

 

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अहंशून्यता !

कु. दीपाली होनप

‘सर्वसामान्य व्यक्तीचे छायाचित्र काढल्यावर ती ‘त्यात स्वतःचे वय किती दिसते ?’, असा विचार करते. सर्वसाधारणतः तिला ‘आपण छायाचित्रात अल्प वयाचे दिसावे’, असे वाटत असते. एखाद्या छायाचित्रात तिचे वय अधिक वाटत असेल, तर तिला वाटते, ‘अरे, यात मी मोठा/मोठी वाटते ! माझे वय तर यापेक्षा अल्प आहे.’ याउलट परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘छायाचित्रांतून स्वतःचे वाढलेले वय लक्षात यायला हवे’, असे वाटते. यातून त्यांची अहंशून्यता लक्षात येते.’

– कु. दीपाली होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.७.२०२१)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment