अनेक दैवी गुणांमुळे प्रपंचाचा डोलारा सहजतेने सांभाळणारी घराची स्वामिनी !

swayampak_achar

 

१. देवतांनी आपल्यातील अंश गृहिणीकडे दिला असल्याने ती प्रपंच समर्थपणे सांभाळू शकणे

देवाच्या शासनात चार महत्त्वाची खाती स्त्रीदेवतांकडेच सदासाठी देण्यात आली आहेत आणि त्या आपापली खाती समर्थपणे आणि उत्तम रितीने सांभाळत आहेत. आपल्या शक्तीने दुष्टांचा संहार करण्याचे संरक्षण खाते कालिकादेवीकडे, अर्थ खाते श्री लक्ष्मीदेवीकडे, शिक्षण खाते सरस्वतीकडे, तर अन्न खाते अन्नपूर्णादेवीकडे आहे. या देवतांनी आपल्यातील अंश गृहिणीकडे दिला आहे; म्हणून ती सारे घर आणि प्रपंच समर्थपणे सांभाळू शकते, तसेच स्वसामर्थ्यावर तोलून धरू शकते.

aai_abhyas_ghene2-scr

 

२. प्रतिकूल परिस्थितीतही घर सांभाळणारी
आणि चांगले संस्कार करून मुलांना घडवणारी गृहिणी !

कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, जेवणासाठी कितीही माणसे घरात असू देत, ती घर चांगल्या प्रकारे चालवून दाखवते. उद्या पती आणि मुले यांना लोणी-तुपासारखे पौष्टिक अन् सात्त्विक अन्न खायला मिळावे; म्हणून दुधावरची साय राखून ठेवणार्‍या गृहिणीला बचतीचे जे महत्त्व कळले आहे, तितके इतर कुणालाही कळलेले नाही. मुलांच्या शिक्षणाची जी आच आईला असते, तितकी वडिलांना असेलच असे नाही. घरोघरी मुलांचा अभ्यास कोण करून घेते ? त्यांच्यावर संस्कार करून त्यांना कोण घडवते ? स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक विवेकी (प्रज्ञावंत) असतात; कारण त्यांचे ज्ञान अल्प आणि समजूतदारपणा अधिक असतो.

 

३. कामाचा उरक, सुगरणपणा आणि हौस ही गृहिणीच्या
यशाची बलस्थाने असून घर हेच तिला आपले विश्‍व वाटणे

तारतम्य हा गृहिणीचा सर्वांत महत्त्वाचा गुण आहे, तर कामाचा उरक, सुगरणपणा आणि हौस ही गृहिणीच्या यशाची बलस्थाने आहेत. स्वतःची कामगिरी बिनबोभाट पार पाडण्याचे बाळकडू तिला आईकडूनच मिळालेले असते. आपले सूत्र पटवून देता येत नसेल, तर गप्प बसून माघार घ्यावी, यात अपमान किंवा न्यूनपणा वाटावा, असे काही नाही, ही गोष्ट गृहिणीला जेवढी कळते, तेवढी पुरुषाला कळत नाही. पुरुष बाहेरच्या अफाट विश्‍वाचा जितका विचार करतो, तितका स्त्री करत नाही. तिच्या मेंदूची प्रवृत्ती डोळ्यांसमोरच्या जवळच्या प्रश्‍नांचा विचार करण्याकडे असते. ती हाडामांसाच्या जवळच्या माणसांचा विचार करते. एखाद्या गोष्टीत भावनिकपणे गुंतून पडते. ती जवळच्या माणसांत जेवढी लिप्त होते, तितकी ती बाहेरच्या विश्‍वात गुंतून पडत नाही; म्हणून घर हेच तिला आपले विश्‍व वाटते.

 

४. सहनशक्तीचा विचार केल्यास स्त्रीला कुणीही
अबला म्हणण्याचे धाडस करू न शकणे आणि गृहिणीचे कष्ट
विचारपूर्वक अभ्यासल्यास तिच्यातील सामर्थ्याचे दर्शन घडू
शकणे

सहनशक्तीचा विचार केला, तर स्त्रीला कुणीही अबला म्हणण्याचे धाडस करणार नाही आणि त्या अर्थाने ती प्रबलाच असते. रुग्णाई (आजारपण), बाळंतपण, मुलांच्या खस्ता काढणे आणि आतातर आधुनिक जीवनातील ताणतणाव इत्यादी सारे सहन करण्याची तिची शक्ती अफाटच असते. एक घर उभे करणे, ते चालवणे आणि अडचणीच्या प्रसंगात ते सावरणे, तसेच तोलून धरणे यांसंबंधी गृहिणीचे कष्ट विचारपूर्वक अभ्यासले, तर गृहिणीच्या सामर्थ्याचं दर्शन घडेल. ८ घंटे (तास) पुरुष अर्थार्जनाच्या निमित्ताने बाहेरच्या विश्‍वात वावरत असतो. त्याच्या श्रमाचे मूल्यमापन पैशात करता येते; पण २४ घंटे घरात कष्ट करणार्‍याच्या श्रमाचे मोजमाप कुणीच करत नाही. एकदा माझा एक मित्र म्हणाला, नोकरी न करणार्‍या गृहिणीला नवर्‍याने आपला निम्मा पगार (अर्धे वेतन) तिला हिशेब न विचारण्याच्या अटीवर आणि प्रतिमास (दरमहा) द्यायला हवा. पूर्वीच्या काळी मध्यमवर्गीय कुटुंंबात आधी लहान मुलांची, नंतर पुरुषमंडळींची जेवणं झाली की, गृहिणीने लोणच्याच्या फोडीसह तूप-भात जेवायचा, असेच चित्र असायचे !

 

५. स्त्री ही अष्टावधानी असून तिची एकाच वेळी
अनेक आघाड्यांवर लढण्याची क्षमता अचंबित करणारी असणे

काळ पालटल्याने एकत्र कटुंबपद्धतीला तडे जाऊ लागले. राहणीमानाच्या कल्पना पालटल्या. सुखसोयींची साधने आली. कुटुंंबांच्या गरजा वाढल्या. गृहिणीला वेळ मिळू लागला आणि मोकळा श्‍वास घेता येऊ लागला. अर्थार्जनासाठी स्त्री घराबाहेर पडू लागली. अर्थार्जनाने (अर्थार्जन करून) तिची प्रपंचाला हातभार लावणे आणि घरही सांभाळणे यांसाठी तारेवरची कसरत चालू झाली. पुरुषाची वृत्ती एका विशिष्ट कामापुरती लक्ष केंद्रित करण्याची असते; पण स्त्री ही अष्टावधानी असते. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढण्याची तिची क्षमता अचंबित करणारी आहे.

 

६. दया, क्षमा, माया, सहनशीलता,
प्रेम आणि भक्ती या गुणांचा समुच्चय स्त्रीमध्ये
असणे अन् त्या बळावर ती प्रपंचाचा डोलारा तोलू शकणे

स्त्री या शब्दामध्ये स, त आणि र ही तीन अक्षरे आहेत. स हे अक्षर सत्त्व गुणाचे, तसेच क्षमा, दया आणि आज्ञापालन ही लक्षणे असलेले ! त हे अक्षर तमोगुणाचे, तसेच पाप, भीती, दयाळूपणा आणि लाजाळूपणा ही लक्षणे असलेले ! र हे अक्षर रजोगुणाचे, तसेच धैर्य, स्वातंत्र्य आणि स्वतःच तारतम्याने निर्णय घेण्याचे लक्षण ! म्हणूनच स्त्री सामर्थ्यशाली आहे. दया, क्षमा, माया, सहनशीलता, प्रेम आणि भक्ती या गुणांचा समुच्चय स्त्रीमध्ये असतो अन् त्या बळावर ती प्रपंचाचा डोलारा तोलू शकते; म्हणून स्त्री ही घराची सम्राज्ञी आणि स्वामिनी म्हणून शोभते.

 

७. संयम हा गृहिणीच्या व्यक्तीमत्त्वातील
सर्वांतमौल्यवान दागिना असणे आणि त्या बळावर
ती कोणताही निर्णय विवेकाने अन् तारतम्याने घेऊ शकणे

संयम हा तिच्या व्यक्तीमत्त्वातील सर्वांत मौल्यवान दागिना ! म्हणूनच ती कोणताही निर्णय विवेकाने आणि तारतम्याने घेते. तडकाफडकी निर्णय घेण्यात पुरुष आघाडीवर असतो; म्हणून त्याचा निर्णय चुकण्याची शक्यता असते. त्याचे परिणाम पुरुषासमवेत स्त्रीलाही सहन करावे लागतात. ७० – ७५ विद्यार्थी असलेल्या वर्गात एक विद्यार्थिनी बसू शकते; पण ७० – ७५ विद्यार्थिनी असलेल्या वर्गात एका विद्यार्थ्याने बसून दाखवावे !

 

८. पुरुष हे संस्कारांचे विद्यालय असेल, तर
स्त्री ही संस्कारांचे विद्यापीठ असणे आणि संसारात
पुरुष करतो, तो त्याग, तर स्त्री करते, ते समर्पण असणे

aai_mulga_jevan-scr

 

प्रत्येक सुजाण आणि सुशिक्षित गृहिणी आपली योग्यता, क्षमता अन् रुची यांनुसार आपल्या कुटुंबाची जोपासना करत असते. तसेच मुलांवर संस्कार करत असते. त्यांना चांगल्या सवयी लावत असते. मूल वेडेवाकडे वागले, तर आपण संस्कारात न्यून पडलो, अशी अपराधीपणाची भावना तिच्या मनात निर्माण होऊन तिला त्याविषयी खंत वाटते.

वडील हे मुलांना कुठली सर्वोत्तम देणगी देऊ शकत असतील, तर त्यांनी मुलांच्या आईवर जिवापाड प्रेम करावे. पुरुष हे संस्कारांचे विद्यालय असेल, तर स्त्री ही संस्कारांचे विद्यापीठ आहे. तसेच संसारात पुरुष करतो, तो त्याग आणि स्त्री करते, ते समर्पण असते ! – श्री. शरद देशपांडे, पुणे (संदर्भ : अज्ञात)

 

९. सासरकडील अभिमानाचा ध्वज उंचावणारी गृहस्वामिनी !

माथ्यावर मंगलाक्षतांचा पाऊस पडला की, तिचे नवे आयुष्य चालू होते. अपरिचित घर, घरातली माणसे, त्यांचे स्वभाव अन् त्यांच्या लहरी हे तिला नवीन असते. सर्वांशी जुळवून घेऊन आयुष्याचा नवा अध्याय लिहावा लागतो. मनाची दारे कुणापुढे उघडी करायची ? त्यांपैकी एक म्हणजे, ज्याच्या हातात हात घालून भावी आयुष्याची वाटचाल करायची तो पती आणि दुसरा म्हणजे, माहेर सोडतांना, सासरघरी सदासर्वदा पाठराखण करण्यासाठी आईने दिलेला तो बाळकृष्ण ! हे करतांना सासरकडील अभिमानाचा ध्वज सतत उंचावत ठेवत असते, ती गृहस्वामिनी ! सासरहून, लग्नानंतर प्रथमच मुलगी माहेरी येते, तेव्हा आई विचारते, लेकी गं लेकी, सासुरवास कसा आहे ? त्यावर लेक सांगते, केळीच्या पानावर, आंबेमोहोराचा भात जसा !

– श्री. शरद देशपांडे, पुणे (संदर्भ : अज्ञात)