मानवी जीवनाची नोट असेपर्यंतच तिचे महत्त्व जाणून साधना करा ! – परात्पर गुरु पांडे महाराज

परात्पर गुरु पांडे महाराज

भगवंताने दिलेल्या आयुष्याला कुणी महत्त्वच देत नाही. भगवंताने दिलेल्या चैतन्यशक्तीची उपयोगिता जीवनाच्या उद्धारासाठी न करता ती अनावश्यक व्यय केली जात आहे. या चैतन्यशक्तीचे मूल्य कुणी जाणूनच घेत नाही. भगवंताच्या चैतन्यशक्तीद्वारेच या सृष्टीचे कार्य चालू आहे. मानव मात्र या मायावी सृष्टीमध्ये (नोटांमध्ये) अडकला आहे. खरेतर मानवाचा श्‍वास हेच त्याच्यासाठी खरे चलन आहे. ‘हा श्‍वास कुणामुळे चालू आहे ?’, हा विचारच कुणी करत नाही. या चैतन्याविना मानवाचे शरीर केवळ मृत शरीर असते, हे कुणाच्या लक्षात कसे येत नाही ? सध्याचा मानव भौतिक सुखाच्या मागे लागून बहिर्मुख बनला आहे. त्याने अंतर्मुख होऊन या सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. मिळालेले मानवी जीवन हे स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी आहे. त्यासाठी प्रतिदिन साधना करणे आवश्यक आहे. गुरूंच्या कृपाछत्राखाली साधना करून जीवन-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटून भगवत्प्राप्ती करणे, हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे.’

 

१. साधनेचे महत्त्व

‘मानवाचे शरीर हे भगवंताचीच निर्मिती आहे. तोच त्यात कार्यरत आहे. मानवाचे अस्तित्वच नाही. हे केवळ ‘मानवाचे कल्याण व्हावे, त्याला ईश्‍वरप्राप्ती व्हावी आणि आनंद मिळावा’, यासाठी तोच मानवासाठी करत आहे. मानवाने मात्र त्याने दिलेल्या शरिराच्या पोषणासाठी त्याचीच सेवा करून मुक्त होऊन जीवनात आनंद घ्यायचा आहे आणि केलेल्या कर्माचे फळ त्यालाच अर्पण करायचे आहे. ‘मी’, ‘माझे’ यांमुळे भगवंताच्या सृष्टीत जी अडवणूक होते, त्यापासून तो मुक्त होतो आणि या सृष्टीतून निघून जातांना तो मुक्त होऊन आनंदाने जातो. जातांना कोणत्याही गोष्टीमध्ये त्याची आसक्ती राहू नये, यासाठी हा प्रयत्न आहे; कारण जाणारा बाकीचे सर्व येथेच सोडून जाणार आहे; म्हणून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटण्याचा हा मार्ग आहे. याचा अभ्यास म्हणजे साधना !’

 

२. भौतिक सुख उपभोगत असतांना
साधना करून क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज याने सक्षम रहायचे आहे !

‘आपल्या डोक्यावर टांगती तलवार आहे, अशी स्थिती प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. त्यातही भौतिक सुख उपभोगत असतांना साधना करून क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज याने सक्षम रहायचे आहे. गाफील न रहाता जागृत रहायचे आहे. भौतिक जग वेगळे आणि आध्यात्मिक जग वेगळे, असे नाही. अध्यात्माद्वारे भौतिक जगाचा उपभोग घ्यायचा. येथे प्रधान आध्यात्मिक आणि भौतिक गौण, असे करून उपभोगणे, साधना महत्त्वाची ! परशुरामासारखे सक्षम रहाणे, हे खरे जीवन आहे. आज याची आवश्यकता आहे.’

– (परात्पर गुरु) परशराम पांडे महाराज

Leave a Comment