प.पू. पांडे महाराज यांनी मृत्यू या विषयावर केलेले मार्गदर्शन

१. व्यक्तीच्या मृत्यूनंतर ती आहे,या सकारात्मक
भावनेने पाहिल्यास मनात वैफल्य निर्माण होत नाही !

PP_pande_maharaj
प.पू. पांडे महाराज

एखाद्याचा मृत्यू झाल्यावर आपण म्हणतो, मृत्यू झाला, म्हणजेच आता ती व्यक्ती नाही. वास्तविक तिचे अस्तित्व तिथे नसले, तरी तिचे स्थित्यंतर होऊन ती वेगळ्या स्वरूपात असतेच. ती आहे, या भावनेने त्याकडे पाहिल्यास, म्हणजे सकारात्मक भाव ठेवल्यास ती नसल्याचा भाव निर्माण होत नाही. त्यामुळे मनात वैफल्य निर्माण होत नाही. जसे एखाद्याचा मुलगा विदेशात असतो, तेव्हा तो म्हणतो, माझा मुलगा विदेशात आहे, तसे हे आहे.

 

२. सकारात्मक विचार हा नेहमी फलदायी आणि
उन्नतीकारक असून नकारात्मक विचार वैफल्यदायी अन् अधोगतीला नेणारा असतो !

1
ती. आजींच्या पार्थिवाला तुळशीचा हार घालतांना प.पू. पांडे महाराज

आहे, या जाणिवेमुळे त्याला हायसे वाटते. यात सत्य असे आहे की, जीव हा भगवंताचा अंश आहे. तो त्यापासून निर्माण होऊन या भूतलावर कार्य करत आहे. त्याच्या कर्मप्रारब्धाप्रमाणे तो कार्यरत रहातो. साधनेद्वारे त्याची प्रगती परिपूर्ण झाल्यास शेवटी तो ईश्‍वराशी एकरूप होतो. तेव्हा तो जीव दिसत नसला, तरी तो नाही, असे नसते. त्यासाठी तो आहेच, या भावनेने वागले पाहिजे. त्यामुळेे वैफल्य येत नाही. सकारात्मक विचार हा नेहमी फलदायी आणि उन्नतीकारक असतो, तर नकारात्मक विचार हा वैफल्यदायी अन् अधोगतीला नेणारा असतो, हे यावरून लक्षात येते.

जेव्हा एखादे लहान मूल आई घरात आहे, हे जाणूनच बाहेर स्वच्छंदाने खेळते. तेच अरे, तुझी आई तर बाहेर गेली आहे, असे त्याला कुणी सांगितल्यास ते मूल लगेच रडू लागते.

 

३. आपण जीर्ण वस्त्र पालटून
नूतन वस्त्र परिधान करतो, त्याप्रमाणे मृत्यू आहे !

भगवंत गीतेत म्हणतात, जसे आपण जीर्ण वस्त्र पालटून नूतन वस्त्र परिधान करतो, त्याप्रमाणे मृत्यू आहे. मृत्यूनंतर त्याला पुनर्जन्म मिळून तो दुसर्‍या देहात प्रविष्ट होतो. उदा. कौरव-पांडवांच्या युद्धात अभिमन्यूचा चक्रव्यूहात वध झाल्यानंतर पांडवांना फार दुःख झाले. विशेषतः अर्जुनाला दुःख झाले. युद्धानंतर कृष्णाने त्याला सूक्ष्म रूपाने परलोकात नेले आणि तेथे ध्यानस्थ असलेल्या एका ऋषीला संबोधून म्हटले, हा तुझा अभिमन्यू ! म्हणजे हा जीव अभिमन्यूच्या रूपात तेवढ्यापुरते कार्य करण्यासाठी आला होता.

मृत्यूविषयी जीव सतत चिंता करतो. तो जेथपर्यंत भगवंतात विलीन होत नाही, तेथपर्यंत तो कोणत्यातरी स्वरूपात अस्तित्वात रहातो. यासाठी त्याने चिंता न करता मिळालेला प्रत्येक क्षण सत्मध्ये राहून साधना करत रहावी, जेणेकरून तो यमयातनेपासून दूर राहील.

– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.८.२०१६)

 

भगवंताला स्वीकारले, तर भगवंत त्याचे गुण (चैतन्य) तुम्हाला देईल !

२२.८.२०१६ या दिवशी प.पू. पांडे महाराज यांची धर्मपत्नी सौ. पांडेआजी यांचे देहावसान झाले. त्याच्या दुसर्‍या दिवशी, म्हणजे २३.८.२०१६ या दिवशी पहाटे ५.३० वाजता प.पू. पांडे महाराज नेहमीप्रमाणे प्रसन्नतेने फिरायला जाण्यासाठी खोलीतून बाहेर आले. तेव्हा मी त्यांना म्हणालो, काल मला तुम्ही शिकवलेले वेदामध्ये मृत्यू हा शब्द नाही, तर केवळ परिवर्तन होते, हे सूत्र आठवले. नंतर दिवसभर माझ्याकडून प्रार्थना आणि नामजप चांगला झाला. त्या प्रसंगी प.पू. महाराजांनी मला पुढील मार्गदर्शन केले.

१. मृत व्यक्तीचा स्थूलदेह पृथ्वीवरून गेला, तरी
स्पंदनांची उपस्थिती रहात असल्याने दिवा लावणे इत्यादी कृती करणे आवश्यक !

काल हिचा (प.पू. महाराजांची धर्मपत्नी सौ. पांडेआजी यांचा) मृत्यू झाला; पण असे काही झाले आहे, असे मला काल वाटले नाही आणि आजही वाटत नाही. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने चैतन्य आहे. यावरून मायेचे आवरण असेल, तर दुःख असते, हे सिद्ध झाले. एखादी व्यक्ती गावाला गेल्यावर जसे वाटते, तसे हे असते.

ही (सौ. पांडेआजी) जेथे झोपत असे, त्या सतरंजीवर चांगली स्पंदने होती. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने ती महर्लोकात गेली. मृत व्यक्तीचा स्थूलदेह पृथ्वीवरून गेला, तरी स्पंदनांची उपस्थिती रहाते; म्हणून दिवा लावणे इत्यादी करायचे असते. प.पू. भक्तराज महाराज यांनी देहत्याग केला असला, तरी त्यांनी वापरलेल्या गाडीमध्ये चैतन्यदायी स्पंदने अजूनही आहेत.

२. चैतन्य म्हणजेच श्रीकृष्ण असल्याने त्याच्याशी अनुसंधान ठेवायला हवे !

मायेचे आवरण आले की, विचार पालटतात आणि मायेचे कार्य दिसून येते. चैतन्य म्हणजे श्रीकृष्ण ! तो होता, आहे आणि रहाणार आहे. श्रीकृष्णाशी म्हणजे चैतन्याशी अनुसंधान ठेवले, तर तो सदैव आहेच. केवळ त्याचे स्वरूप पालटते.

नाटकात काम केल्यावर ती व्यक्ती पुन्हा तिच्या व्यक्तिमत्त्वानुसार वागते. एखाद्या व्यक्तीला एका नाटकात दोन पात्रे वठवायची असतील, तर ती व्यक्ती दोन वेळा वेशभूषा पालटते. एकपात्री नाटकात तर नटाचा केवळ भाव पालटत असतो. कार्य करणारी चैतन्य-शक्ती आहे. मृत्यू पावलेले शरीर म्हणजे काय ? ते कार्य करत नाही, हे सिद्ध झालेले असतांनाही आपला त्यावर विश्‍वास बसत नाही. आपण मृतदेहालाच महत्त्व देतो. एवढे प्रत्यक्ष पाहिले आणि सत्य असले, तरीही व्यवहारात असे चालू असते.

३. प.पू. डॉक्टर (श्री गुरु) आपल्याला मायेतील ब्रह्माचे दर्शन करवत असणे

मी प.पू. महाराजांना म्हणालो, व्यवहारातील लोकांना स्मशानवैराग्य येते आणि दोन-चार दिवसांनी पुन्हा त्यांचे स्वार्थी अन् रज-तमात्मक वागणे चालू होते. त्यावर प.पू. महाराज पुढे म्हणाले, तुम्ही कोणाला स्वीकारता, हे महत्त्वाचे आहे. भगवंताला स्वीकारले, तर भगवंत त्याचे गुण (चैतन्य) तुम्हाला देईल. साधना म्हणजे भगवंताला स्वीकारणे.

इतर वेळी मायेला स्वीकारले, तर सुख-दु:ख होते. माया ही भासमान आहे. तिच्यावरील चकाकीला आपण भाळतो. ते रज-तमाचे आवरण असते. काही वेळाने त्याचा मुलामा निघून जातो आणि पितळ उघडे पडते. हे सर्व मायेतील प्रकार आहेत. प.पू. डॉक्टरांच्या (श्री गुरूंच्या) कृपेने आपल्याला समजून येत आहे. ते मायेतील ब्रह्माचे दर्शन करवतात. त्यांच्यामुळे आपल्याला अनुभवता येते. ही किमया सामान्यांमध्ये नाही.

४. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी साधनेची आवश्यकता असणे

मायेत राहून ब्रह्म पहाणे, म्हणजे अंधारात राहून प्रकाश पहाणे. साधना करून ब्रह्म जाणणे, म्हणजे स्वतःजवळ प्रकाश घेऊन अंधारात राहून प्रकाश पहाणे. तमसो मा ज्योतिर्गमय ।, म्हणजे मला अंधाराकडून प्रकाशाकडे ने; म्हणून साधनेची आवश्यकता आहे.

प.पू. पांडे महाराज यांनी स्वतःच्या पत्नीच्या निधनाच्या प्रसंगीही नेहमीप्रमाणे त्यांच्या चैतन्यमय वाणीतून आम्हा साधकांसाठी ज्ञानामृत दिले; यासाठी प.पू. पांडे महाराज आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

– श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.८.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात