काली

‘काळाला जागृत करणारी काली’, असे जिचे वैशिष्ट्य सांगितले जाते, त्या कालीमातेविषयीची माहिती थोडक्यात जाणून घेऊया.

श्री कालीमाता
श्री कालीमाता

१. कालीची व्याख्या

अ. ‘कालीची व्याख्या ‘प्राणतोषिणी’ या ग्रंथात पुढीलप्रमाणे दिली आहे.

कालसङ्कलनात् काली सर्वेशामादिरूपिणी ।

कालत्वादादि भूतत्वादाद्या कालीति गीयते ।।

भावार्थ : काली काळाला जागृत करणारी आणि सर्वांच्या उत्पत्तीचे मूळ आहे. काळ, पंचमहाभूते आणि प्राणीमात्र यांच्या संदर्भात काली सर्वांच्या आधी प्रगट होणारी आहे. काळ हाच जिचा पाय आहे आणि भूतकाळाच्याही आधी ती प्रकट होणारी आहे; म्हणून तिला ‘काली’ म्हणतात.

आ. तंत्रलोकात कालीची पुढील व्याख्या दिली आहे.

काली नाम पराशक्तिः सैव देवस्य गीयते ।

अर्थ : ब्रह्माची जी नित्य क्रियाशक्तीरूप पराशक्ती (श्रेष्ठ शक्ती) आहे, तिलाच ‘काली’ असे म्हणतात.’

२. कालीचे वैशिष्ट्य आणि कार्य

काली ही महाकाल अर्थात शिव याच्या हृदयावर उभी राहून नृत्य करते. तिला कालीविलासतंत्रात ‘शवासना किंवा शवारूढा’ असेही म्हटले आहे. तंत्रमार्गात शव आणि शिव ही एकाच तत्त्वाची नावे आहेत. निराकार ब्रह्माचे प्रथम साकार रूप म्हणजे शव होय. ते निश्चल असते. त्यात शक्तीचे स्पंदन चालू होऊन ते सृष्टीरचनेच्या कार्यासाठी सक्रिय होऊन उठते, तेव्हा त्याला ‘शिव’ म्हणतात. हे निराळ्या भाषेत सांगायचे, तर शक्तीहीन ब्रह्म हे ‘शव’ असून, शक्तीयुक्त ब्रह्म हे ‘शिव’ होय. शिवामधला इकार हा शक्तीवाचकच आहे. महाशक्तीच्या क्रीडेला आधार झाल्याकारणाने त्यालाच ‘शवासन’ असे म्हणतात. ‘हेसौः’ हे शवबीज किंवा प्रेतबीज आहे. हेच प्रेत सृष्टीरचनेच्या काळी पद्मरूप ग्रहण करते आणि महामाया कालीचे आसन अथवा क्रीडास्थल बनते. यालाच कालीचे ‘महाप्रेतपद्मासन’ म्हणतात. हाच आशय खालील श्लोकार्धात सांगितलेला आहे.

प्रेतस्थां च महामायां रक्तपद्मासनास्थिताय । – कालीविलास तंत्र

अर्थ : तांबड्या कमळाच्या आसनावर बसलेली काली ही महामायेचे रूप आहे आणि ती प्रेताला, म्हणजे निश्चल प्रकृतीला, चेतना देते.

३. कालीमातेच्या रूपाच्या वैशिष्ट्यांचा भावार्थ

रुपाचे वैशिष्ट्य

भावार्थ

१. महिषासुराचे तोडलेले मुंडके

अज्ञान किंवा मोह यांचा नाश

२. गळ्यातील मुंडमाला (कर्पूरादी स्तोत्रानुसार ५२, तर निरुत्तर तंत्रानुसार ५० मुंडकी)

शब्दब्रम्हाचे प्रतीक अशी वर्णमाला

३. शवांचे हात तोडून त्याची कमरेभोवती केलेली मेखला (साखळी)

साधकांचे तोडलेले हात म्हणजे क्रियमाण-कर्मापासून केलेली त्यांची मुक्तता

४. स्मशानात नृत्य

वासनाविमुक्त साधकाचे ह्रदय म्हणजे स्मशान आणि नृत्य म्हणजे आनंद

४. कालीची उपासना

अ. कालीयंत्र

‘बंगालमध्ये कालीची उपासना प्राचीन कालापासून प्रचलित आहे. या पूजेत सुरा (दारू) ही अत्यावश्यक वस्तू मानली आहे. मंत्राने शुद्ध करून तिचे सेवन केले जाते. कालीपूजेसाठी वापरले जाणारे कालीयंत्र त्रिकोण, पंचकोन किंवा नवकोन करावे, असे कालिकोपनिषदात सांगितले आहे. काही वेळा ते पंधरा कोनांचेही करतात. कालीपूजा कार्तिक कृष्णपक्षात, विशेष करून रात्रीच्या वेळी फलप्रद सांगितली आहे. या पूजेत कालीस्तोत्र, कवच, शतनाम आणि सहस्रनाम यांचा पाठ विहित आहे.’

आ. धार्मिक ग्रंथ

कालीच्या उपासनेचा प्रपंच करणारे अनेक ग्रंथ उपलब्ध असून, त्यांतील पूर्णानंदांचा ‘श्यामारहस्य’ आणि कृष्णानंदांचा ‘तंत्रसार’ हे दोन ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘शक्ती’

2 thoughts on “काली”

  1. नमस्कार आमची कुलस्वामिनी महाकाली असून आम्हाला घरी त्यांच्या मूर्तीची स्थापना करावयाची आहे.पण काही लोक भीती घालतानाही दिसत आहेत की घरी उग्रदेवतेची स्थापना करणे म्हणजे संकट ओढवून घेण्यासारखे आहे. पण माझं मन सांगत की आदिशक्ती जिथे असते तिथे कसल संकट आणि कसलं भय…ती तर अनंत मातांच वात्सल्य घेऊन बसलेली आहे.आई क्रोधात असो की प्रेमात ती तर आपल्या बाळांवर कृपाच करत असते… तिच्या क्रोधीत नेत्रातून देखील मला तीच प्रेमच दिसत….तिचे नामस्मरण करतो आता प्रकट पूजा सेवा करून तिचे लाड करण्याची इच्छा आहे.तिला सुन्दर श्रुंगार करून डोळे भरून पहायचं आहे…काय करावं काही कळत नाही घरचे लोक बाकीच्यांच ऐकतात….मला विरोध करतात….स्थापना करण्याचे काय परिणाम असतील किंवा करावी की नको हे सांगण्याची कृपा करावी

    Reply
    • नमस्कार,

      स्थापना लहान मूर्तीची असेल तर काही अडचण नाही. देवघराचे नियम आपण पाळतो तसेच या लहान मूर्तीसाठी पाळू शकतो. वेगळे असे नियम नाहीत.

      Reply

Leave a Comment