साधकांना साधनाप्रवासात कुठेही अनुभूती वा सिद्धी यांमध्ये अडकू न देता लीलया सगुणातून निर्गुणाकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

Article also available in :

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. एका संतांना अध्यात्मातील पुढच्या टप्प्याची,
म्हणजे कुंडलिनी शक्तीच्या जागृतीची अनुभूती आल्याने
त्या अवस्थेत ‘हातून काही चुकीचे घडू नये किंवा वेडेपणा
होऊ नये’; म्हणून त्यांनी घराबाहेर जाणे आणि लोकांत मिसळणे टाळणे

‘चार-पाच वर्षांपूर्वी आम्ही दौर्‍यावर असतांना माझी एका राज्यातील एका संतांशी भेट झाली होती. त्या वेळी त्यांनी ते अनुभवत असलेल्या आध्यात्मिक अवस्थेविषयी मला सांगितले. ते म्हणाले, ‘‘मला अध्यात्मातील पुढच्या टप्प्याची, म्हणजे ‘उन्मनी’ अवस्थेची अनुभूती या कालावधीत येत आहे. त्यामुळे मी सध्या अधिक वेळ घराबाहेर जाण्याचे आणि समाजात लोकांना भेटण्याचे टाळत आहे. याचे कारण म्हणजे या अवस्थेमध्ये आपले मन पूर्णत: ईश्वराशी एकरूप होऊन जाते. ही अवस्था गाठलेली व्यक्ती तिचे देहभान विसरून जाते. कधी कधी असेही होते की, इतरांच्या दृष्टीने ती व्यक्ती काहीही विसंगत कृती करू लागते. ती वेगळेच वागू लागते. तिच्या वागण्याला सामान्य माणसांच्या भाषेत ‘निवळ वेडेपणा’ म्हणतात. ‘माझ्याकडून असे चुकीचे काही होऊ नये’, या भीतीने मी आता घराबाहेर जाणे आणि लोकांना भेटणे टाळत आहे.’’

 

२. अशाच प्रकारच्या ‘कुंडलिनीशक्तीच्या जागृती’ची
एक अनुभूती श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्याला शक्तीच्या
स्तरावरील अनुभूतींमध्ये अडकायचे नसल्याचे सांगणे

याच संदर्भात मला आलेली एक अनुभूती येथे सांगावीशी वाटते. वर्ष २००१ मध्ये प.पू. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे संगीतविषयक प्रयोग चालू असतांना एकदा मी ध्यानाला बसले होते. तेव्हा मला अचानक स्थुलातून जाणवले की, ‘माझ्या मूलाधारचक्रापासून विशुद्धचक्रापर्यंत ऊर्जाशक्तीचा एक प्रवाह पाठीच्या मणक्यामधून सरळ वरच्या रेषेत गेला आणि तो प्रवाह मानेतच अडकला आहे.’ यापूर्वी मी असे कधी अनुभवले नव्हते. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला आलेली ही अनुभूती ‘कुंडलिनीशक्तीच्या जागृती’ची आहे. हठयोगी, ध्यानयोगी, शक्तीपातयोगी यांच्यासाठी ही उच्च स्तरावरील अनुभूती आहे; पण आपल्याला अशा कोणत्याही शक्तीच्या स्तरावरील अनुभूतींमध्ये अडकायचे नाही.

 

३. अशा अनुभूतींमध्ये न अडकण्याची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली कारणे

अ. मनुष्य जन्म हा अत्यंत अल्प काळाचा आहे. आपल्याला लवकर अध्यात्मातील पुढच्या पुढच्या टप्प्यांना जायचे आहे. साधनेमधील विविध टप्पे अनुभवून त्यातून शिकून पुढे जायचे आहे.

आ. ‘शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती’ या साधनेतील विविध टप्प्यांचा अनुभव घेऊन पुढे जाणे आणि लवकर ईश्वरप्राप्ती करून घेणे’, हे आपले ध्येय आहे.

इ. शक्तीच्या पातळीवरील अशा अनुभूतींत अडकलो, तर आपल्याला समाजात राहून समष्टी साधना करणे कठीण होईल. समष्टी साधनेने लवकर मनोलय आणि बुद्धीलय होतो.

 

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार
साधना करण्याला आता महत्त्व असून अशा शक्तीच्या
पातळीवरील अनुभूतींकडे दुर्लक्ष करण्यास सांगणे आणि
त्यानंतर अशा प्रकारच्या अनुभूती येणे आपोआप बंद होणे

‘काळानुसार साधना करणे’, याला आता पुष्कळ महत्त्व आहे. आज समाजाची स्थिती पुष्कळ वाईट आहे. समाजाला धर्मशिक्षण देणे, महत्त्वाचे आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्याला ८० टक्के महत्त्व आहे. तुम्ही अशा शक्तीच्या पातळीवरील अनुभूतींकडे दुर्लक्ष करा, म्हणजे तुम्ही त्यात अडकणार नाही. शक्तीच्या पातळीवरचा टप्पा आयुष्यात लवकर संपवून पुढे चला.’’

त्यानंतर मी अशा प्रकारच्या अनुभूतींकडे लक्ष दिले नाही. काही दिवसांनी मला अशा प्रकारच्या अनुभूती येणे आपोआपच बंद झाले. प.पू. डॉक्टरांनी लवकर मला अशा अनुभूतींच्या टप्प्यातून पुढे नेले.

 

५. ‘कुंडलिनीशक्तीची जागृती’ या व्यष्टी स्तरावरील अनुभूतीत अडकल्याने होणारी हानी

५ अ. ‘‘कुंडलिनीशक्तीची जागृती’ हेच अध्यात्मातील अंतिम सत्य
असल्याचे वाटून व्यक्तीचे आयुष्य (साधना) एका टप्प्याला येऊन अडकणे

‘कुंडलिनीशक्तीची जागृती होणे’, हे व्यष्टी अनुभूतींचे जग आहे. यात ‘मी आणि माझी अनुभूती’ एवढेच विश्व निर्माण होते. समाजात लोक बर्‍याच वेळा अशा प्रकारच्या अनुभूतींना भुलून जातात आणि त्यांना वाटते, ‘हेच अंतिम सत्य आहे. मला आता अध्यात्मातील उच्च स्तराची अनुभूती आल्यामुळे मला सर्व ज्ञान झाले आहे.’ या भ्रमात त्यांचे आयुष्य एकाच टप्प्याला येऊन अडकते.

५ आ. पुढच्या टप्प्याला जाण्याची जिज्ञासा न राहून त्यांची साधनेत अधोगती होणे

‘अध्यात्मात पुढच्या टप्प्यालाही काही असू शकते’, याची जिज्ञासा त्यांच्यामध्ये नसल्याने ईश्वराच्या व्यापक रूपापर्यंत ते पोचू शकत नाहीत. उलट त्यांचा अहं वाढून त्यांची साधनेत अधोगती होते.

५ इ. अशा अनुभूतींची योग्य माहिती नसल्याने काही जणांनी घाबरून साधना थांबवणे

काही जणांच्या बाबतीत असेही होते की, त्यांना अशा अनुभूतींची योग्य माहिती नसल्याने असे काही झाले, तर ते घाबरूनही जातात आणि ‘आता यापुढे अजून काही विचित्र व्हायला नको’; म्हणून साधना करणेच थांबवतात.

 

६. अशा अनुभूतींमध्ये न अडकता त्यांतून शिकून
साधनेत पुढे जाण्यासाठी त्यांचा लाभ करून घेणे आवश्यक !

शेवटी सर्वच माया आहे. केवळ ‘निर्गुण निराकार ईश्वर’ हाच एकमेव सत्य आहे; पण आपण साधक असल्याने आपल्याला या सर्वांमधून शिकून त्यामध्ये न अडकता साधनेत पुढे जाण्यासाठी त्याचा लाभ करून घ्यायचा आहे. ‘एखादी सिद्धी प्राप्त झाली, अमुक एक अवस्था अनुभवली किंवा काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आली’, हे सर्व वर्तमानात शिकण्यासाठी आहे. यातून आपल्याला साधनेचे महत्त्व कळते. आपला उत्साह वाढतो.

 

७. अशा अनुभवांमधून नव्या पिढीला साधनेत योग्य दिशा मिळून तिची जलद प्रगती होणे

आपल्या अनुभवांमधून पुढे जन्म घेणार्‍या नव्या पिढीला शिकायला मिळेल. त्यांना साधनेत योग्य दिशा मिळेल आणि आपल्याकडून झालेल्या चुका त्यांच्याकडून होणार नाहीत. त्यामुळे साधनेत जलद प्रगती करण्यास त्यांना साहाय्य होईल.

 

८. ‘सनातन संस्थेच्या साधकांसाठी एकमेव
अवस्था म्हणजे ‘सतत शिकण्याच्या स्थितीत ठेवणारी शिष्यावस्था !’

साधक अशा कोणत्याच गोष्टींमध्ये अडकले नसल्याने ते कोणत्याही अवस्थेत स्थिर राहून त्यांची नित्य कर्मेही तेवढ्याच दायित्वाने पूर्ण करू शकतात. ‘सनातन संस्थेच्या साधकांसाठी एकमेव अवस्था म्हणजे ‘सतत शिकण्याच्या स्थितीत ठेवणारी शिष्यावस्था.’ प्रत्येकाकडून शेवटपर्यंत शिकणे आणि स्वतःमध्ये कोणत्याही प्रकारचे सांप्रदायिकत्व येऊ न देता व्यापक होण्यासाठी प्रयत्न करणे, हेच खरे लवकर मोक्षप्राप्ती होण्याचे साधन आहे.

गुरूंच्या शिकवणीनुसार साधे सरळपणाने शेवटपर्यंत प्रामाणिक प्रयत्न करत रहाणे आणि त्यानुसार झोकून देऊन समष्टी सेवा करणे, एवढेच साधकांना ठाऊक आहे आणि यातच त्यांना आनंदही आहे.

 

९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना तन, मन आणि धन
यांचा त्याग शिकवून त्यांना प्रायोगिक स्तरावर ‘शून्य’ होण्याचे
प्रशिक्षण दिल्याने त्यांना मोक्षप्राप्ती करतांना शून्यात जाणे कठीण नसणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना लीलया सगुणातून निर्गुणाकडे नेण्यास आरंभ केला आहे. निर्गुणात शेवटी काहीच नसते. प.पू. डॉक्टरांनी तन, मन आणि धन यांचा त्याग शिकवून साधकांना प्रायोगिक स्तरावर ‘स्वतः शून्य होण्याचे’ एक प्रकारे प्रशिक्षणच दिल्याने मोक्षप्राप्ती करतांना साधकांना ‘शून्यात जाणे’ कठीण होणार नाही, हेही तितकेच खरे.’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment