रायपूर (छत्तीसगड) येथील संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांची रामनाथी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

रायपूर (छत्तीसगड) येथील शदाणी दरबार तीर्थचे संतश्री
पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज

रामनाथी (गोवा) – रायपूर (छत्तीसगड) येथील शदाणी दरबार तीर्थचे नवम् पीठाधीश संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांनी येथील सनातनच्या आश्रमाला १६ फेब्रुवारी या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी आश्रमात राष्ट्र-धर्म यांच्याविषयी करण्यात येणार्‍या विविध सेवा अन् कार्य यांविषयी संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांना सविस्तर माहिती सांगितली. या वेळी पू. महाराजांच्या धर्मपत्नी पू. भाभी मां दीपिका शदाणी यांसह त्यांचे काही भक्तही उपस्थित होते. या प्रसंगी सनातनचे संत तथा सनातन प्रभात नियतकालिकांचे माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांच्या हस्ते पू. महाराजांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी पू. भाभी मां दीपिका शदाणी यांचा सन्मान सनातनच्या साधिका सौ. अर्चना घनवट यांनी केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.

संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांचा सन्मान करतांना पू. पृथ्वीराज हजारे

संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराजांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संगीत संशोधनाचे कार्य संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर यांच्याकडून समजून घेतल्यानंतर ते प्रभावित झाले आणि म्हणाले, या संशोधनाचा प्रसार झाला पाहिजे. आमच्याकडून यासाठी अवश्य प्रयत्न करू.

या वेळी पू. महाराजांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या नृत्य विभागातील साधिका कु. शर्वरी कानस्कर आणि कु. अपाला औंधकर यांना कौतुकाने लक्ष्मीप्रसाद भेट दिला.

सनातन आश्रमाविषयीचे अभिप्राय

१. श्री. नरंग सितलानी, दुर्ग : आश्रम पाहून अतिशय चांगले वाटले आणि आनंद मिळाला.

२. श्री. सुरेश धिंगानी, भिलाई : आश्रम पुष्कळ सुंदर असून सूक्ष्म-जगताविषयी (आध्यात्मिक संशोधनाविषयी) सांगितलेली माहिती अद्भुत आहे.

३. श्री. वसंत मोटलानी, दुर्ग : सनातन संस्थेकडून करण्यात येत असलेला हिंदु धर्माचा प्रसार अतिशय चांगला आहे. सनातनचे धर्माविषयीचे कार्य प्रशंसनीय आहे. संस्थेच्या प्रसारकार्याविषयी ऐकून मनामध्ये आत्मसन्मानाची भावना जागृत झाली.

सनातन संस्था, सनातन प्रभात, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य म्हणजे भारताच्या पुनरुत्थानाचे कार्य होय ! – संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज

या वेळी संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज म्हणाले, गेल्या ७-८ वर्षांपासून सनातन संंस्था आणि शदाणी दरबार तीर्थ यांचे नाते निर्माण झाले आहे. हिंदु धर्माचे महान कार्य करणार्‍या दुर्लभ संस्थांपैकी सनातन संस्था एक आहे. सनातन संस्था, सनातन प्रभात, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य म्हणजे भारताच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे. यातून हिंदु धर्माचे कल्याण होत आहे. या कार्याला आश्रय देणे, सहकार्य करणे, त्यात सहभाग घेणे, हे प्रत्येकाने करायला हवे. शदाणी दरबार तीर्थच्या वतीने रायपूर, छत्तीसगड येथे मार्च २०२० मध्ये हिंदु राष्ट्र-अधिवेशनाचे आयोजन केले होते. त्यातून अनेकांमध्ये हिंदु राष्ट्राच्या संदर्भात आत्मविश्‍वास निर्माण झाला.

हरिद्वार येथील महाकुंभपर्वात साधकांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था शदाणी दरबार तीर्थ करणार

हरिद्वार येथे एप्रिल मासात होणार्‍या महाकुंभपर्वात जे साधक हिंदु राष्ट्राचे कार्य करण्यासाठी येतील, त्या साधकांच्या जेवणाची आणि निवासाची व्यवस्था शदाणी दरबार तीर्थच्या वतीने करण्यात येईल, असे आश्‍वासन या वेळी पू. महाराजांनी दिले.

Leave a Comment