पुणे येथील अष्टांग योगी संत श्री शिवोकांत स्वामीजी यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

रामनाथी (गोवा) – ‘अष्टांग योग परिवार, हिंदुस्थान’चे संस्थापक तथा विश्व हिंदु परिषदेच्या पुणे महानगराचे धर्माचार्य प्रमुख अष्टांग योगी संत श्री शिवोकांत स्वामीजी यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यांच्या समवेत गोव्यातील बोरी गावचे पंचसदस्य श्री. सतीश बोरकर, दुर्भाटचे पंचसदस्य श्री. कृष्णा नाईक, श्री. परेश बोरकर आणि श्री. प्रसाद नाईक उपस्थित होते.

सनातनचे साधक श्री. निषाद देशमुख यांनी त्यांना आश्रम दाखवला आणि आश्रमात चालू असलेल्या कार्याची माहिती सांगितली. सनातनच्या वतीने श्री. उमेश नाईक यांनी स्वामीजींचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि सनातनचे ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी स्वामीजींना सनातनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

 

हिंदु धर्मासाठी संघटित होऊन लढा द्यायला हवा !

या वेळी स्वामीजी म्हणाले, ‘‘हिंदु धर्मासाठी संघटित होऊन लढा द्यायला हवा. अहंकारी राज्यकर्त्यांनी सत्तेच्या स्वार्थापोटी हिंदु धर्माची अनन्वित हानी केली आहे. सात्त्विक लोकांना धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी संघर्ष करावा लागतो.’’

 

आश्रम पाहून स्वामीजींनी व्यक्त केलेला अभिप्राय

स्वामीजी म्हणाले, ‘‘मला आनंदाची अनुभूती आली आणि हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला गती मिळाली. साधना, स्वाध्याय यांसह आश्रमातील सेवा आणि शोधकार्य हिंदु राष्ट्राचा मार्ग आणखी प्रबळ करेल.’’ स्वामीजींसमवेत आलेल्या इतर मान्यवरांनीही ‘आश्रम पाहून मन शांत झाले आणि आनंद जाणवला’, असे सांगितले.

Leave a Comment