ऋषिमुनींच्या आश्रमात वावरणार्‍या पशू-पक्ष्यांची आठवण करून देणारे सनातनचे आश्रम, संत आणि साधक यांच्याकडे आकृष्ट होणारे पक्षी !

Article also available in :

नाविन्यपूर्ण आध्यात्मिक संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय !

‘कण्वमुनी आणि त्यांची पत्नी यांना मूलबाळ नसल्याने त्यांनी शकुंतलेचा सांभाळ करून तिचे पालनपोषण केले. विश्‍वामित्र ऋषि आणि मेनका यांची सुकन्या शकुंतला हिचे संपूर्ण बालपण अन् तारुण्य कण्वमुनींच्या आश्रमात गेले. वनातील आश्रमाच्या परिसरातील पशू-पक्षी आणि वृक्ष-लता शकुंतलेशी बोलत असत. हरीण, मोर, भारद्वाज आणि राजहंस तिच्याजवळ येत असत अन् शकुंतला त्यांना प्रेमाने कुरवाळत असे. शकुंतलेशी खेळतांना हरीण तिच्या साडीचा पदर दातात धरून खेचत असे, तर कधी तिला पाहून हर्षित होऊन उड्या मारत असे. तिला पाहून आनंदी झालेला मोर पिसारा फुलवून नाचत असे, तर तिच्या दर्शनाने कोकीळ मंजूळ गायन करत असे. शकुंतला उच्च स्वर्गलोकातील जीव असल्याने तिच्या भोवतीच्या सात्त्विक आणि सुगंधमय वायूमंडलाकडे, तसेच तिच्यातील भाव, प्रेमभाव अन् मनाची निर्मळता या दैवी गुणांमुळे तिच्याकडे पशू-पक्षी, तसेच वृक्ष-लता आकृष्ट होत असत. सत्य, त्रेता आणि द्वापर युगांमध्ये ऋषिमुनींच्या आश्रमात जे दृश्य पहायला मिळायचे, तसेच दृश्य कलियुगातील सनातनचे आश्रम, संत आणि साधक यांच्या संदर्भातही पहायला मिळत आहे. अशीच काही उदाहरणे आपण येथे पहाणार आहोत.

 

घरट्यात बसल्याप्रमाणे एका संतांच्या मांडीवर
आणि हातांच्या ओंजळीत बसणारे खंड्या पक्ष्याचे पिलू !

एका संतांच्या मांडीवर बसून त्यांच्याकडे पहातांना खंड्या पक्ष्याचे पिलू

१४.९.२०१४ या दिवशी आश्रमाच्या एका कोपर्‍यात खंड्या (Malechite Kingfisher) या जातीच्या पक्ष्याचे एक पिलू पडले होते आणि त्याला उडता येत नव्हते. त्यामुळे त्याला आश्रमात आणले. तेव्हा एका संतांनी त्याला हातात घेतले होते. त्या वेळी तो पक्षी अत्यंत शांत बसला होता, जणू काही तो त्याच्या आईच्या पंखाखालीच बसला आहे आणि घरट्यात बसल्याप्रमाणे तो संतांच्या मांडीवर अन् हातांच्या ओंजळीत १० ते १५ मिनिटे बसला होता. नंतर साधकांनी त्याला हातात घेतल्यावर तो त्यांना चोचीने चावत होता. काही वेळाने तो उडून गेला.

 

मुल्की आश्रमात प्रतिदिन सकाळी येणारा आणि
संत अन् साधक यांनी दिलेला खाऊ खाल्ल्यावरच जाणारा मोर !

मुल्की येथील सेवाकेंद्र परिसरात आलेल्या मोराने सद्गुरु सत्यवान कदम यांच्या जवळ येऊन त्यांच्या ओंजळीतील दाणे टिपणे

वर्ष २०१३ पासून मुल्की आश्रमात प्रतिदिन सकाळी एक मोर येत आहे. तो सकाळी अल्पाहाराच्या वेळी येतो. संत आणि साधक यांनी खायला दिल्यावर तो खाऊन परत निघून जातो. काही दिवसांनी त्याचे येण्याचे प्रमाण वाढले. तो सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही अल्पाहारांच्या वेळी येतो. काही वेळा खाऊन झाल्यावरही तो तेथेच थांबून रहातो. त्यावरून आपण समजायचे की, याचे पोट भरलेले नाही आणि परत खायला दिल्यावर त्याचे पोट भरले की, तो निघून जातो.

प्रारंभीच्या काळात मोर आश्रमात आला की, त्याला खाण्यासाठी लांब ठेवावे लागायचे. आता तो हातातील पदार्थ घेऊन खातो आणि आश्रमातील परिसरातही निर्भयपणे फिरतो. तो आश्रमापासून दूर असला आणि त्याला बोलावले, तर तो येतो. या मोराच्या पिसार्‍याची लांबी इतर मोरांच्या पिसार्‍यापेक्षा अधिक आहे. ‘इतर मोरांपेक्षा हा मोर वेगळा आहे’, असे जाणवते. आता त्या मोरासमवेत एक दुसराही मोर येतो.

 

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी ‘खंड्या’ पक्षी येणे

५.७.२०१५ या दिवशी मिरज येथील साधक श्री. गिरीष पुजारी यांच्या घरी सांगली जिल्ह्यातील साधकांसाठी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. मार्गदर्शनाला प्रारंभ झाल्यावर श्री. पुजारी यांच्या घरी जिन्यामध्ये ‘खंड्या’ (किंगफिशर) पक्षी येऊन बसला. मार्गदर्शन चालू असतांना खंड्या स्थिर होता. असा पक्षी येणे हा शुभसंकेत असतो.

 

आध्यात्मिक पातळी ६१ प्रतिशत असणार्‍या गोवा येथील
श्रीमती प्रतिमा ठक्कर यांच्या घरी आलेल्या चिमण्यांनी त्यांच्या हातूनच दाणे खाणे

मडगाव येथील साधक श्री. अरविंद ठक्कर यांच्या आई श्रीमती प्रतिमा ठक्कर या त्यांच्या घरातील झोपाळ्यावर बसल्यावर तेथे १५ ते २० चिमण्या येतात आणि त्यांना श्रीमती ठक्कर यांनीच खायला दिल्यावर त्या तो खाऊ खातात. घरातील अन्य कुणीही त्या चिमण्यांना खायला दिल्यानंतर त्या न खाताच उडून जातात.

 

साधनेला आरंभ केल्यावर डॉ. संजय सामंत यांच्या
घराच्या खिडकीच्या जाळीवर, तसेच घरात विविध प्रकारचे पक्षी येणे

कुडाळ येथील डॉ. संजय सामंत यांच्या घराच्या खिडकीच्या लाखंडी गजांवर बसलेला खंड्या पक्षी (डावीकडील छायाचित्रात) आणि बाजूच्या छायाचित्रात अन्य दोन पक्षी

 

संतांच्या आवाजातील भजने लावल्यावर गरुडपक्षी जवळ येणे
आणि विदेशी संगीत लावल्यावर तो दूर निघून जाणे

‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे साधक श्री. शॉन क्लार्क यांनी ऑस्ट्रेलियातील एका प्राणी संग्रहालयामध्ये भजने लावल्यावर ती ऐकण्यासाठी त्यांच्या जवळ आलेले गरुड पक्षी

केवळ भारतातच नव्हे, तर विदेशातही असेच दृश्य पहायला मिळते. ७.७.२०१५ या दिवशी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे साधक श्री. शॉन क्लार्क ऑस्ट्रेलियातील एका प्राणी संग्रहालयामध्ये गेले असता तेथे असलेल्या एका पिंजर्‍यामध्ये चार गरुड होते. त्या वेळी श्री. शॉन यांनी संतांची भजने लावल्यावर पक्षी त्यांच्याकडे यायला लागले.

श्री. शॉन यांनी विदेशी संगीत लावल्यावर गरुड दूर निघून गेले. भजन लावल्यावर ते पुन्हा जवळ आले.

 

सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात, प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांवर
एक पक्षी येऊन बसणे आणि नंतर स्वतःच उडून जाणे

सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेकडे पहाणारा पक्षी दाखवला आहे

२६.१२.२०२० या दिवशी सायं. ४.५० वाजता ‘केशरी डोक्याचा कस्तूर (Orange Headed Thrush)’ हा पक्षी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात प.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या पादुका ठेवल्या आहेत, त्या पादुकांवर बसून प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेकडे पाहत होता. ध्यानमंदिरात त्या पक्षाचे छायाचित्र काढण्यात आले, तरी तो तेथून हलला नाही. तो तेथेच बसून होता. अर्ध्या तासाने तो स्वत:च तेथून उडून गेला. असे अन्य काही पक्षी आणि पाखरे यांच्या संदर्भात झाले आहे.’

 

पक्ष्यांनी सात्त्विक वातावरण, साधक आणि संत यांच्याकडे
आकृष्ट होण्यामागील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणमीमांसा

पक्ष्यांमध्ये स्वतःचे असे काही वैशिष्ट्य असते. सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य प्राणी हा सर्वांत बुद्धीमान असतो; परंतु असे असले, तरी वनस्पती आणि प्राणी, तसेच पक्षी यांची सूक्ष्म ज्ञानेंद्रिये अन् कर्मेंद्रिये अधिक प्रमाणात कार्यरत असल्यामुळे ते मनुष्यापेक्षा अधिक सतर्क असतात. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत.

पक्ष्यांनाही सूक्ष्मातील दिसते. त्यांच्या डोळ्यांमध्ये असणार्‍या इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्यांना रात्रीच्या काळोखातही वातावरणात कार्यरत असणार्‍या त्रासदायक शक्ती दिसतात.

सूक्ष्मातील कळण्याच्या या क्षमतेमुळे त्यांची ओढ सात्त्विक वनस्पती, माणसे आणि सात्त्विक वातावरण यांच्याकडे असते. कलियुगात जन्माला आलेल्या मनुष्यांपैकी बहुतांश मनुष्य भुवर्लोक आणि पाताळ येथून जन्माला आलेले आहेत. त्यामुळे रज-तमप्रधान असलेल्या मनुष्याभोवतीचे वायूमंडलही रज-तमप्रधान असते; परंतु साधना करणार्‍या जिवांभोवतीचे वायूमंडल साधनेमुळे सत्त्वप्रधान झालेले असल्याने प्राणी आणि पक्षी साधकांकडे, संतांकडे अन् सात्त्विक वातावरणाकडे आकृष्ट होतात.

प्राणी आणि पक्षी निसर्गतःच दुर्बळ असल्यामुळे अन्य प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी ते विविध प्रकारे संरक्षणासाठी मार्ग शोधतात; परंतु साधक अथवा संत यांच्या संदर्भात त्यांच्या संरक्षणाची शाश्‍वती असल्यामुळेही पक्षी साधकांकडे आकृष्ट होतात आणि निश्‍चिंतपणे दीर्घकाळ त्यांच्या सहवासात रहातात.

पक्ष्यांचे सात्त्विक वातावरण, साधक आणि संत यांच्याकडे आकृष्ट होणे वाचल्यावर मराठीतील सुप्रसिद्ध कवी ग.दि. माडगूळकर यांच्या ‘या डोळ्यांची दोन पाखरे’ या काव्यरचनेतील पुढील काव्यपंक्ती आठवल्या.

दर्शन तुमचे हाच असे हो या पक्ष्यांचा चारा ।
सहवासाविण नकोच यांना अन्य कोठचा वारा ॥

तुमचा परिसर यांस नभांगण, घरकुल तुमची छाती ।
सावलीतही बसतील वेडी प्रीतीच्या दडूनी ॥

एका अश्रूमाजी तुमच्या जातील पण बुडूनी ।
नव्हेत डोळे, नव्हेत पक्षी, ही तर अक्षय नाती ॥’

– कु. प्रियांका विजय लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२२.७.२०१५)

वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

‘सनातनचे आश्रम, संत आणि साधक यांच्या घरी अनेक बुद्धीअगम्य घटना घडत आहेत. विविध पक्षी आश्रमातील साधकांकडे आणि संतांकडे आकृष्ट होऊन दीर्घकाळ एका ठिकाणी बसून रहातात, त्यांच्या हातून अन्न ग्रहण करतात, असे लक्षात आले आहे.

पक्षी अशा कृती केव्हा करतात ? त्यांच्या अशा कृती करण्यामागील कोणती वैज्ञानिक कारणे असू शकतात ? हे पक्षी कोणत्या व्यक्तींकडे आणि का आकृष्ट होतात ? यामागील वैज्ञानिक कारण काय असते ? कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे या संदर्भात संशोधन करता येईल ?’, आदींविषयी वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संपर्क : श्री. रूपेश रेडकर,

ई-मेल : [email protected]

Leave a Comment