पावसाळ्यामध्ये नैसर्गिकपणे उगवलेल्या औषधी वनस्पतींचा संग्रह करा ! (भाग १)

Article also available in :

भावी भीषण महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, पेठेतील (बाजारातील) औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. अशा वेळी आपल्याला आयुर्वेदाचाच आधार असेल. क्रमशः प्रसिद्ध होणार्‍या लेखाच्या या भागात ‘निसर्गातील वनस्पतींचा संग्रह कसा करावा’ या विषयीची माहिती समजून घेऊया. लवकरच या विषयावर सनातनचा ग्रंथ प्रकाशित होणार आहे. या ग्रंथात ‘औषधी वनस्पती गोळा करून साठवून ठेवणे’ याविषयी व्यावहारिक (प्रत्यक्ष करण्याच्या कृतींची) माहिती सविस्तरपणे दिली जाईल.

 

१. पावसाळ्यानंतर काही औषधी वनस्पती वाळून
जात असल्याने त्या आताच गोळा करून ठेवा !

वैद्य मेघराज पराडकर

‘प्रतिवर्षी वरुणदेवतेच्या कृपेमुळे पावसाळ्यात निसर्गतः असंख्य औषधी वनस्पती उगवतात. यातील काही वनस्पती पावसाळा संपल्यावर साधारण १ – २ मासांत वाळून जातात. त्यानंतर पुन्हा पावसाळा येईपर्यंत या वनस्पती मिळत नाहीत. त्यामुळे अशा वनस्पती आताच गोळा करून ठेवायला हव्यात.

 

२. औषधी वनस्पती गोळा करून ठेवण्याचे लाभ

या लेखात दिलेल्या औषधी वनस्पतींपैकी काही वनस्पती आयुर्वेदाच्या औषधांच्या दुकानांत विकतही मिळतात; परंतु अशा वनस्पती विकत घेण्यापेक्षा त्या निसर्गातून गोळा करणे कधीही चांगले असते. विकत मिळणार्‍या औषधी वनस्पती ताज्या असतीलच, याची निश्‍चिती नसते. वनस्पती जुन्या असल्यास त्यांची परिणामकारकता न्यून होते. बहुतेक वेळा पेठेत मिळणार्‍या औषधी वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ असते. त्यांच्यामध्ये धूळ, माती आणि इतर कचराही असतो. याउलट जेव्हा आपण स्वतः औषधी वनस्पती गोळा करतो, तेव्हा त्या ताज्या आणि निर्भेळ मिळतात. अशा वनस्पती आपण धुवून ठेवू शकतो. त्यामुळे त्या स्वच्छही रहातात. वनस्पती गोळा करून नीट वाळवून हवाबंद डब्यात सुरक्षित ठेवल्यास साधारण १ ते दीड वर्ष वापरता येतात.

 

३. वनस्पतींची ओळख होण्यासाठी गावातील
जाणकार किंवा परिचित वैद्य यांचे साहाय्य घ्या !

खेडेगावातील बहुतेक वयस्कर व्यक्तींना बर्‍याच औषधी वनस्पतींची माहिती असते. अशा व्यक्तींना या लेखात दिलेल्या वनस्पतींची छायाचित्रे दाखवून त्या वनस्पती कुठे मिळू शकतील, हे विचारून या वनस्पतींची निश्‍चित ओळख करून घ्या. शक्य असल्यास आपल्या ओळखीच्या वैद्यांचेही साहाय्य घेता येईल. वैद्यांना औषधी वनस्पतींची ओळख तर असतेच, तसेच ती कशी वापरायची, याचेही ज्ञान असते. एखादा कुशल वैद्य एकाच औषधी वनस्पतीचा विविध रोगांत प्रभावीपणे वापर करू शकतो. या लेखात दिलेल्या वनस्पतींव्यतिरिक्त एखाद्या जाणकाराने अन्यही वनस्पती सांगितल्यास त्यांचाही योग्य त्या प्रमाणात संग्रह करून ठेवावा.

 

४. औषधी वनस्पती गोळा करण्यासंबंधी काही प्रायोगिक सूत्रे

अ. घरातून बाहेर पडण्यापूर्वी प्रार्थना करावी आणि घरी आल्यावर कृतज्ञता व्यक्त करावी.

आ. घाण, सांडपाणी, दलदल, स्मशानभूमी इत्यादी ठिकाणच्या वनस्पती गोळा करू नयेत. औषधी वनस्पती गोळा करणार असू, ती जागा स्वच्छ असावी.

इ. त्या परिसरात प्रदूषण निर्माण करणारे, विशेषतः हानीकारक रसायने सोडणारे कारखाने नसावेत.

ई. बुरशी किंवा कीड लागलेल्या, तसेच रोगट वनस्पती घेऊ नयेत.

उ. विषारी वृक्षावरील औषधी वनस्पती घेऊ नयेत, उदा. कुचल्याच्या (काजर्‍याच्या) झाडावरील गुळवेल घेऊ नये.

ऊ. जिथे मनाला त्रासदायक स्पंदने जाणवतात, त्या जागेवरील वनस्पती घेऊ नयेत.

ए. वनस्पतीची निश्‍चित ओळख झाल्याविना वनस्पती काढू नये. चुकीच्या वनस्पतीचा वापर झाल्याने हानीकारक परिणामही होऊ शकतात. त्यामुळे जाणकाराकडून वनस्पतीची निश्‍चित ओळख करून घ्यावी.

ऐ. सूर्यास्तानंतर औषधी वनस्पती तोडू नयेत.

 

५. औषधी वनस्पती गोळा केल्यावर करण्याची प्रक्रिया

अ. गोळा केलेल्या वनस्पती सुतळीने एकत्र बांधून त्यांवर लगेच नाव लिहून पिशव्यांत भराव्यात.

आ. त्या घरी आणून स्वच्छ धुवून घ्याव्यात. वनस्पती धुतांना त्यांचे बी वाया जाऊ नये, यासाठी धुण्यापूर्वी ते वेगळे काढून ठेवावे. वनस्पती मुळापासून उपटून आणलेल्या असल्यास त्यांची मुळे कात्रीने कापून झाडापासून वेगळी करावीत. मुळांना माती लागलेली असल्याने ती माती वनस्पती धुतांना अन्य वनस्पतींना लागू नये, यासाठी मुळे वेगळी धुवावीत.

इ. वनस्पती स्वच्छ धुतल्या जाव्यात, यासाठी त्या आणल्यावर अर्धा ते एक घंटा पाण्यात भिजवून ठेवाव्यात. यामुळे त्यांच्यावरील धूळ आणि अन्य मळ भिजून लवकर वेगळा होण्यास साहाय्य होते.

ई. वनस्पती ओल्या असतांनाच त्यांचे लहान तुकडे करून ठेवावे.

उ. वनस्पती धुवून झाल्यावर त्या उन्हात नीट वाळवाव्यात. वनस्पती सुगंधी असतील, तर त्या उन्हात न वाळवता सावलीत वाळवाव्यात. वाळलेल्या वनस्पतींवर पुढची प्रक्रिया लगेच करायची नसल्यास त्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये नाव घालून सीलबंद करून ठेवाव्यात. वनस्पतींच्या सीलबंद केलेल्या पिशव्या हवाबंद डब्यात ठेवाव्यात.

ऊ. वाळवून ठेवलेल्या वनस्पती किंवा त्यांची चूर्णे वापरात नसतील, तर ठराविक कालावधीने डबे उघडून ती सुस्थितीत आहेत ना, याची पहाणी करावी.

ए. वनस्पतीचे नीट वाळलेले लहान तुकडे मिक्सरमध्ये घालून त्यांची बारीक पूड करून ठेवावी. मिक्सरमध्ये केलेली पूड पीठ चाळायच्या चाळणीने चाळून घ्यावी. चाळणीत जो चाळ राहील, तो एकतर पुन्हा मिक्सरमध्ये घालून बारीक करावा किंवा तसाच वेगळा पिशवीत ठेवून द्यावा. वनस्पतीच्या बारीक भुकटीला ‘चूर्ण’, तर चाळणीत जो चाळ रहातो, त्याला ‘यवकुट चूर्ण’ किंवा ‘भरड’ म्हणतात. चूर्ण पोटात घेण्यासाठी किंवा लेपासाठी, तर भरड काढ्यासाठी वापरता येते. सर्व चूर्ण एकत्र भरून ठेवण्यापेक्षा साधारण १५ चमचे चूर्णाच्या लहान लहान पिशव्या भराव्यात. प्रत्येक पिशवीवर चूर्णाचे नाव आणि उत्पादन दिनांक लिहून त्या सीलबंद करून हवाबंद डब्यात ठेवाव्यात. असे केल्याने चूर्ण जास्त सुरक्षित रहाते.

 

६. वनस्पती गोळा करतांना मिळणार्‍या बियाण्यापासून त्यांची लागवडही करा !

काही वनस्पती निसर्गतः अधिक प्रमाणात उपलब्ध असल्या, तरी त्यांची लागवड करणेही इष्ट ठरते. लागवड केल्याने आपल्या आवश्यकतेनुसार पाहिजे त्या वेळी वनस्पती उपलब्ध होऊ शकते. औषधी वनस्पती गोळा करतांना त्या वनस्पतीचे बियाणेही वेगळे काढून ठेवावे. ज्यांना शक्य असेल, त्यांनी या वनस्पतींची आपल्या परसात किंवा शेतात लागवड करावी. कोणत्या वनस्पतींची लागवड करायची, हे पुढे त्या त्या वनस्पतीच्या माहितीत दिले आहे.

 

७. रस्त्यातून येता-जाता दिसणार्‍या वनस्पतींचे निरीक्षण करण्याची सवय लावा !

आपण येता-जाता अनेक वनस्पती पहात असतो; परंतु त्या औषधी वनस्पती आहेत, हे आपल्याला ठाऊक नसते. या लेखात दिलेल्या वनस्पती सर्वत्र आढळणार्‍या आहेत. या वनस्पती रस्त्यात येता-जाताही सहज ओळखता येतील, अशा आहेत. या, तसेच अन्यही वनस्पतींचे निरीक्षण करण्याची आणि त्यांची ओळख करून घेण्याची आपण स्वतःला सवय लावून घेतली, तर भीषण आपत्काळात आपल्याला त्यांचा वापर करता येऊ शकेल.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.११.२०२०)

Leave a Comment